You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बायडन-जिनपिंग यांच्या भेटीचा अर्थ काय, अमेरिका-चीनच्या संबंधांची वाटचाल कशी असेल?
- Author, फ्रान्सिस माओ
- Role, बीबीसी न्यूज
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची नुकताच भेट झाली. या भेटीत शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे आगामी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सहकार्य करू असं बायडन यांना सांगितलं. त्यांच्या भेटीचा अर्थ काय आणि आगामी काळात दोन्ही देशांच्या परस्परसंबंधांची वाटचाल कशी असेल?
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबतच्या अखेरच्या भेटीत अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याबाबत वक्तव्य केलं.
बायडन आणि जिनपिंग यांची शनिवारी (16 नोव्हेंबर) पेरूमधील वार्षिक आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (EPEC) परिषदेत भेट झाली. यावेळी त्यांनी बायडन यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात दोन्ही देशांच्या संबंधांमधील चढउतारही मान्य केले.
या भेटीत दोघांनीही व्यापार आणि तैवानसारख्या मुद्द्यांवर दोन्ही देशातील तणाव कमी करण्यावरही भर दिला.
विश्लेषकांच्या मते, दोन महिन्यांनी ट्रम्प अध्यक्षपदाची सुत्रं हातात घेतील, तेव्हा अमेरिका-चीन संबंध अधिक अस्थिर होऊ शकतात. यात ट्रम्प यांनी दिलेल्या चीनच्या आयातीवरील शुल्क वाढवण्याच्या आश्वासनासह इतर घटकांचा समावेश असेल.
ट्रम्प यांनी निवडणुकीत चीनमधून होणाऱ्या सर्व आयातीवर 60 टक्के शुल्क लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी परराष्ट्र आणि संरक्षण विभागात चीनबाबत आक्रमक असणाऱ्या व्यक्तीची निवड केली आहे.
आपल्या पहिल्या सरकारच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी चीनला नेहमीच स्पर्धक म्हणून वागवलं. कोरोनाच्या साथीच्या काळात ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला 'चिनी विषाणू' म्हटल्याने दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते.
लिमा येथील या बैठकीत बोलताना चीनचे अध्यक्ष जिनपिंग म्हणाले की, अमेरिकेशी स्थिर संबंध ठेवण्याचं चीनचं उद्दिष्ट कायम असेल.
"संवाद करण्यासाठी, सहकार्य वाढवण्यासाठी आणि मतभेदांवर काम करण्यासाठी चीन अमेरिकेच्या नवीन प्रशासनासोबत काम करण्यास तयार आहे," असंही जिनपिंग यांनी नमूद केलं.
दुसरीकडे बायडन यांनी अमेरिका आणि चीन या दोन जागतिक शक्तींमधील सामरिक स्पर्धेचं रूपांतर युद्धात होऊ नये, असं मत व्यक्त केलं.
बायडन म्हणाले, "दोन्ही देश स्पर्धेचं रूपांतर संघर्षात होऊ देऊ शकत नाहीत. ही आमची जबाबदारी आहे. मागील 4 वर्षात असं करणं शक्य असल्याचं आम्ही सिद्ध केलं आहे, असं मला वाटतं."
बायडन यांच्या कार्यकाळात अमेरिका आणि चीनच्या संबंधांमध्ये तणाव वाढल्याचं दिसलं. यात स्पाय बलून प्रकरण आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी तैवानला भेट दिल्यानंतर तैवानच्या सर्व बाजूंनी चीनच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या सैन्य कवायती या घटनांचा समावेश आहे.
चीनने कायमच तैवानवर दावा केला आहे. असं असलं तरी, ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळानंतर बायडन प्रशासनाने चीनशी असलेल्या संघर्षाला अधिक सावधपणे हाताळण्याचा प्रयत्न केला.
आता चीनला अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनिश्चिततेबद्दल सर्वात काळजी वाटू शकते, असं विश्लेषकांचं मत आहे.
जर्मन मार्शल फंडाच्या इंडो-पॅसिफिक कार्यक्रमाचे व्यवस्थापकीय संचालक बोनी ग्लेसर म्हणाल्या, "चीन भविष्यात अमेरिकेशी वाटाघाटी आणि व्यवहार करण्यास तयार दिसत आहे. त्याबाबत ते ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्याबाबत आशावादी दिसत आहेत."
"असं असलं तरी ट्रम्प सरकारने चीनवर अधिक कर लादला तर चीनकडून याला प्रत्युत्तर देखील मिळू शकतं," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
ट्रम्प सरकारच्या धोरणांवर प्रभाव पाडण्यासाठी इतर कोणतेही विश्वसनीय माध्यम नसल्याबाबतही चीनला काळजी वाटू शकते, असंही बोनी ग्लेसर यांनी नमूद केलं.
जिनपिंग यांच्याशी नेहमीच मतभेद राहिले आहेत. मात्र, त्यांच्याशी झालेल्या चर्चा प्रामाणिक होत्या.
बायडन यांच्या सरकारच्या काळात त्यांच्या जिनपिंग यांच्याशी तीन बैठका झाल्या. यात गेल्या वर्षी सॅन फ्रान्सिस्को येथे झालेल्या शिखर परिषदेचाही समावेश आहे. तेथे दोन्ही नेत्यांनी अंमली पदार्थ आणि हवामान बदलाला लढा देण्याबाबत सहमती दर्शवली होती.
असं असलं तरी बायडन यांनी ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीनवर लावले गेलेले शुल्क कायम ठेवले होते. त्यांनी मे महिन्यात चीनच्या इलेक्ट्रिक कार, सोलर पॅनेल आणि स्टीलवर शुल्क लादले होते.
चीनच्या आक्रमकपणाला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी आशिया खंडात अनेक देशांशी संबंध सुधारत ताकद वाढवली. विशेष म्हणजे चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका तैवानचे रक्षण करेल, असेही बायडन यांनी नमूद केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)