गुकेशची बीबीसीला विशेष मुलाखतः बक्षिसाच्या रकमेबद्दल विचारल्यावर काय उत्तर दिलं?

फोटो स्रोत, FIDE
भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा ठरला आहे. गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं.
याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं जगज्जेतेपद मिळवता आलं होतं. त्यानंतर 11 वर्षांनी गुकेशनं ही कामगिरी बजावली.
तसंच अठरा वर्षांचा गुकेश बुद्धिबळातला आजवरचा सर्वात युवा जगज्जेता ठरला आहे.
सिंगापूरमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत गुकेश आणि लिरेन एकूण चौदा गेम्समध्ये खेळले. त्यात तेराव्या गेम्सनंतर दोघं प्रत्येकी साडेसहा गुणांसह बरोबरीत होते.
अखेरचा गेमही बरोबरीत सुटेल असं वाटू लागलं होतं. पण गुकेश शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्यांनं अखेर लिरेनवर मात केली. या सामन्यानंतर गुकेशनं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या

फोटो स्रोत, FIDE
या विजयानंतर आता कशा भावना आहेत?
>> धन्यवाद. मला खूप छान वाटत आहे. मी सामना जिंकलो आणि खरंच हे घडलंय हे समजायला मला काहीसा वेळ लागला. पण मी शांत झालो आणि आता खरंच खूप आनंदी आहे.
आपण जिंकणार याची जाणीव कधी झाली ?
>> संपूर्ण सामन्यात मला अनेकदा विजयाची संधी होती. पण मी शेवटी तणावात यायचो. मला विजयापर्यंत पोहोचता येत नव्हतं. या गेममध्ये मी जिंकेल असं वाटलं नव्हतं. पण मला अचानक लक्षात आलं की, आता मी हा सामना जिंकणार आहे. तेव्हा माझ्या भावना एकदम उफाळून आल्या.
अखेरच्या चालीच्या दोन ते तीन चालींआधी मला विजय मिळेल याचा अंदाज आला होता. प्रतिस्पर्धी अधिक नर्व्हस होत आहे हे माझ्या लक्षात येत होतं. त्यानंतर मी विजय मिळवला.
या प्रवासात तुझ्या पाठिशी असणाऱ्यांविषयी काय सांगशील?
>> सुरुवातीपासूनच मला कुटुंबीयांचा कायम पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे. त्याचबरोबर मित्र, प्रशिक्षक आणि प्रायोजकांनीही नेहमी मदत केली. त्या सर्वांनी त्यांना शक्य त्या पद्धतीनं मला मदत केली.
माझ्यासाठी त्या सगळ्यांना अनेक प्रकारचा त्यागही करावा लागला आहे. त्यांच्या तुलनेत माझ्यासाठी सगळं काही अगदी सोपं होतं. कारण मी मला आवडणारं काम करत होतो. म्हणजेच बुद्धिबळ खेळत मी फक्त जीवनाचा आनंद घेत होतो.
बुद्धिबळात असं यश मिळण्यसाठी प्रेरणा कुठून मिळाली?
>> सुरुवातीला मी फक्त कुटुंबीयांबरोबर घरी चेस खेळायचो. मी इतर खेळ खेळतो तशी छंद म्हणून त्याची सुरुवात केली होती. पण नंतर मला त्यात हळू हळू जास्त आवड निर्माण झाली.
त्यानंतर मी शाळेच्या चेस समरकॅम्पमध्ये सहभागी झालो. त्याठिकाणी असलेल्या एका प्रशिक्षकांनी माझ्या खेळातली चुणूक आणि वेगळेपणा हेरला आणि तिथून प्रवास सुरू झाला.
सुरुवातीला काही स्पर्धा खेळलो. पण 2013 मध्ये माझा आदर्श असलेले विश्वनाथ आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांचा विश्व विजेतेपदासाठीचा सामना पाहिला आणि तिथून खरी प्रेरणा मिळाली.


मॅग्नस कार्लसनने सामना सुरू असताना ही विश्वविजेतेपदाची लढत आहे, असं वाटत नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं वाईट वाटलं का?
>> खरं सांगायचं तर नाही. मला माहिती होतं की, काही गेम हवे त्या दर्जाचे झाले नव्हते. पण मला वाटतं की, विश्वविजेतेपदाच्या सामन्याचे विजेते हे फक्त बुद्धिबळाच्या कौशल्यावर नव्हे तर तुमचं व्यक्तिमत्त्वं आणि इच्छाशक्ती यावरही ठरत असतात.
मला वाटतं माझ्यात असलेल्या त्या वैशिष्ट्यांचा मी चांगला वापर केला. फक्त बुद्धिबळ म्हणाल तर, खरंच मला आवडतो तसा उच्च दर्जाचा खेळ नव्हता.
पण, हा माझ्यासाठी नवा अनुभव होता, हेही त्यामागचं कारण आहे. त्यामुळं महत्त्वाच्या क्षणी मी कामगिरी करण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे.

फोटो स्रोत, FIDE
तू सामन्यांसाठी तयारी कशी करतो?
>> सामन्यांसाठी करावी लागणारी सर्वात महत्त्वाची तयारी म्हणने मानसिक तयारी. साधारणपणे मी अत्यंत शांत राहण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ध्यानधारणा, योगा आणि अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात.
खरं तर हा अनुभव अत्यंत तणावदायक असतो. पण मी हा तणाव पेलू शकतो याची मला नेहमी जाणवी होती.
आता पुढे काय? आनंद कसा साजरा करणार?
>> सर्वात पहिलं म्हणजे, काही तासांपूर्वीच माझी आणि आणि कुटुंबीय सिंगापूरला आले आहेत. अद्याप त्यांना भेटलो नाही, त्यांना भेटून सेलिब्रेशन करणार आहे. त्यांच्याबरोबर मी वेळ घालवणार आहे.
बक्षीसाच्या रकमेचा विचार करता माझ्या कुटुंबाच्या दृष्टिनं ही बक्षीसाची रक्कम अत्यंत महत्त्वाची आहे, असं गुकेश म्हणाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












