इंस्टाग्रामवर पोलिसांनी मुलीचं फेक अकाऊंट बनवून फरार आरोपीला कसं पकडलं? वाचा

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत जखमी केल्याची घटना समोर आली होती.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी धारावी पोलीस ठाण्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीच्या फिर्यादीनुसार तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करत चौकशी करायला सुरुवात केली होती.
मात्र या प्रकरणामधील आरोपी पसार झाला होता. घटनास्थळी आणि आरोपीच्या परिचयात असलेल्या लोकांची पोलीस गेले काही महिने चौकशी करत होते. दोन महिने उलटले तरी या प्रकरणी पोलिसांना आरोपीचा शोध घेणे कठीण झालं होतं.
आरोपीबाबत पोलिसांनी विविध बाजूंनी तपास करत असता आरोपी याचा काही संपर्क होत नव्हता. मात्र आरोपी समाजमाध्यमांवर ॲक्टिव्ह असल्याचं तपास करणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानुसार धारावी पोलिसांनी इंस्टाग्रामवर एका तरुणींचे फेक अकाऊंट बनवून या आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
बनावट मुलीच्या अकाऊंटच्या माध्यमातून आरोपीशी संवाद झाला आणि पोलिसांनी सापळा रचून नाशिक येथे या आरोपीला तीन महिन्यांनी अटक केली.
पोलीसदेखील सोशल मीडियाचा योग्य वापर करुन आरोपीपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांच्या कौशल्याचं कौतुक होत आहे. मात्र आरोपीवर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत, अशी आरोपीच्या वतीने वकिलांनी माहिती दिली आहे.
नक्की हे प्रकरण काय आहे?
20 एप्रिल 2025 रोजी साधारण सव्वाआठ वाजता फिर्यादी रामशंकर सरोज मित्रांसोबत ओमदत्त सोसायटीच्या खाली, खामदेव नगर या ठिकाणी गप्पा मारत उभे असताना आरोपी शुभम कोरी यांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अवैध पद्धतीने कागदपत्र आणि रेशनबाबत आरोपीबद्दल रेशन ऑफिसमध्ये रामशंकर सरोज यांनी केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आपल्या गळ्यावर चाकुने वार करुन जखमी केले, असे सरोज यांनी पोलिसांना माहिती दिली.
या घटनेबाबत सरोज यांनी स्थानिक धारावी पोलीस स्टेशन गाठत यासंदर्भात रितसर तक्रार दिली. या तक्रारीनुसार धारावी पोलिसांनी कलम 109 (2) भा. न्या. सं. सह 37(1) (अ), 135 म.पो का. या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजू बिडकर, पोलिस निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शेलार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.
आरोपी गुंगारा देत असल्याने तपास आव्हानात्मक
या घटनेबाबत पोलीस गेले दोन महिने या प्रकरणी आरोपीचा शोध घेत होते. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी देखील काही माहिती हस्तगत केली होती. मात्र आरोपी फोन बंद करून मुंबईतून पसार झाला होता.
आरोपी ओळख लपवून सतत पोलिसांना गुंगारा देत असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
अटकेपासून वाचण्यासाठी शुभम मोबाइल वापरत नव्हता. सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. त्याने नातेवाईक, कुटुंबीयांसोबतचाही संपर्क तोडला होता.
मुलीचे बनावट अकाऊंटच्या संवादातून आरोपी फसला
मात्र, तपास करत असताना पोलिसांच्या एक लक्षात आलं की, आरोपी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह दिसतो. त्यामुळे पोलिसांनी त्याचा सोशल मीडियावरून पाठलाग सुरू केला. तो इन्स्टाग्रामवर सक्रीय असल्याचे समजताच पोलिसांनी तोच धागा पकडून तपासाला सुरुवात केली.
सुंदर तरुणीच्या नावाने पोलिसांनी इन्स्टाग्राम खाते बनवून शुभमला रिक्वेस्ट पाठवली. त्याने मुलीची रिक्वेस्ट तत्काळ स्वीकारली. तिच्याशी काही दिवस चॅटिंग सुरू केले.

फोटो स्रोत, Getty Images
तरुणीच्या मधाळ संवादात हरवून पोलिसांनी त्याचे नाशिकमधील लोकेशन शोधले. मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार तेथील अंबड पोलिसांनी 12 जुलै 2025 रोजी सिडको कॉलनीतून त्याच्या मुसक्या आवळल्या.
सदर आरोपी लहानपणापासून फिट येण्याचा त्रास असल्याने अंबड पोलीस ठाणे, नाशिक येथे तशी नोंद घेण्यात आली. तसेच त्यावेळी त्याचा मोठा भाऊ अभिषेक मनोज कोरी, वय 24 वर्षे हा सोबत होता.
प्रत्यक्षात पोलिसांनीच इन्स्टाग्रामवरून रचलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे लक्षात येताच डोक्यावर हात मारण्याची वेळ आरोपीवर आली.
आरोपीला लहानपणापासून येतात फिट्स
शुभम कोरी (20) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.
अचानक पोलिस धडकल्याने शुभम चक्कर येऊन कोसळला. त्याला लहानपणापासून फिट्स येतात. त्यामुळे पोलिसांनी त्याला नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले.
मुंबईत घेऊन येत असताना त्याला पुन्हा चक्कर आली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत सांगून त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी आरोपीला अटक झाल्यानंतर धारावी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. यानंतर त्याला दोन दिवसीय पोलीस कोठडी आणि आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
या प्रकरणातील तपास करणारे उपनिरीक्षक विकास शेलार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की,"आरोपीने सतत ठिकाणं बदलत आम्हाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सोशल मीडियावर सक्रिय होता, याचा उपयोग करून आम्ही एक वेगळी युक्ती वापरली. समाजमाध्यमातून त्याच्याशी संपर्क साधत त्याला पकडण्यात यश आलं. सध्या याप्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे."
आरोपी शुभम कोरी यांचे वकील श्रीकृष्ण घोगीकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "शुभम वर लावलेले आरोप खोटे आहेत. त्याने इतक्या माणसात हल्ला करणे हे शक्य नाही. फिर्यादीचा आमच्या अशीलाला अडकवण्याचा प्रयत्न आहे. आम्ही आमची कायदेशीर बाजू कोर्टात मांडत आहोत आणि लढत आहोत"
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











