कोलोंबियात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर प्रचारादरम्यान हल्ला, प्रकृती गंभीर

मिगेल उरिबे टुर्बे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मिगेल उरिबे टुर्बे यांच्यावर भाषण करताना हल्ला झाला
    • Author, फ्रांसिस माओ आणि इआन ऐकमन
    • Role, बीबीसी न्यूज

लॅटिन अमेरिकेतील कोलोंबिया देशात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर प्रचारादरम्यान राजधानी बोगोटामध्ये शनिवारी गोळ्या झाडण्यात आल्या. घटनास्थळावरुन पोलिसांनी 15 वर्षीय अल्पवयीन संशयिताला या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.

39 वर्षीय खासदार मिगेल उरिबे टुर्बे यांच्यावर एका प्रचारसभेदरम्यान त्यांच्यावर हल्लेखोराने तीन गोळ्या झाडल्या त्यातील दोन गोळ्या डोक्यात लागल्या आहेत तर एक गोळी पायावर लागली आहे.

उरिबे यांच्या पत्नी मारिया क्लॉडिया टाराझोना यांनी सांगितले की खासदार 'उरिबे यांची प्रकृती नाजूक आहे. ते आपले प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करत असून त्यांच्यावरील उपचार योग्य पार पडले जावेत यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी.' अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.

उरिबे यांचा पक्ष सेंटरो डेमोक्रेटिको पार्टीने या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा लोकशाही आणि देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका उद्यानात प्रचारसभेवेळी उरिबे भाषण करत होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर तिथे जमा असलेले लोक घाबरुन पळाले.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी एएफपी वृत्तवाहिनीला सांगितले की त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या आणि गुडघ्यावर एक गोळी झाडण्यात आली. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उरिबे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते अद्यापही गंभीर आहेत असे बोगोटा शहराचे महापौर कार्लोस फर्नांडो गलान यांनी म्हटले आहे.

उरिबे यांच्यावर हल्ला

फोटो स्रोत, Reuters

या घटनेवेळी संशयिताला पकडताना पोलिसांनी गोळ्या झाडल्या त्यावेळी संशयिताच्या पायावर गोळी लागल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या पंधरा वर्षीय अल्पवयीन संशयित 9 मीमी ग्लॉक टाइप पिस्तुल बाळगून होता असं महाधिवक्त्यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं. पुढील तपास सुरू असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सत्ताधारी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले की मी हल्ल्याचा निषेध करत आहे. हा हल्ला केवळ व्यक्तीवरच नाही तर तो लोकशाहीवर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उरिबे यांच्याशी आमचे केवळ राजकीय मतभेद आहेत. 'या हल्ल्याचा आपण कडाडून निषेध करत असून सर्वांनी या कठीण काळात त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी', असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

उरिबे हे 2022 पासून खासदार आहेत. उरिबे हे उजव्या विचारसरणीचे नेते आहेत तर सध्या तिथे डाव्या विचारसरणीच्या पेट्रो यांचे सरकार आहे. पुढच्या वर्षी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका आहेत त्यासाठी ते प्रचार करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.

उरिबे यांच्या आई डायना टुर्बे या पत्रकार होत्या. 1991 ला पाबलो एस्कोबारच्या मेडलिन कार्टेलकडून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी सुटका करताना डायना टुर्बे यांचा मृत्यू झाला होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.