'दहशतवादी आणि नागरिकांना एकच न्याय कसा?' थरूर कोलंबियात पाकिस्तानवर नेमकं काय म्हणाले?

कोलंबियाच्या दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व शशी थरूर करत आहेत.

फोटो स्रोत, @ShashiTharoor

फोटो कॅप्शन, कोलंबियाच्या दौऱ्यावर गेलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व शशी थरूर करत आहेत.

दहशतवाद आणि पाकिस्तानात केलेल्या हल्ल्याबद्दल भारताची भूमिका मांडण्यासाठी शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधीमंडळ अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देशांचा दौरा करत आहे.

शुक्रवारी 30 मे ला हे मंडळ कोलंबियात गेलं होतं. तिथे त्यांनी देशाचे उप-परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.

शशी थरूर म्हणाले, "भारतानं ज्यावर चिंता व्यक्त केली होती ते कोलंबियाचं वक्तव्य मागे घेतल्याचं उपमंत्र्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात आमची भूमिका त्यांना पूर्णपणे समजली आहे."

कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने 8 मेला जाहीर केलेल्या निवेदनात भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर टीका केली होती आणि त्यात मारल्या गेलेल्या लोकांप्रती सहवेदना व्यक्त केली होती.

जम्मू काश्मीरमधल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका स्थानिक घोडेस्वारासह 26 लोकांचा मृत्यू झाला. त्यासाठी भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं. यानंतर भारताने 7 मे रोजी पाकिस्तानात अनेक ठिकाणी दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते.

गुरूवारी (29 मे) खासदार शशी थरूर म्हणाले, "आम्ही कोलंबिया सरकारच्या त्या प्रतिक्रियेमुळे थोडे नाराज आहोत. त्यात दहशतवादी पीडितांबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानात झालेल्या मृतांप्रती सहवेदना व्यक्त केली गेली."

"हे वक्तव्य केलं गेलं तेव्हा परिस्थिती पूर्ण समजून घेतली गेली नसावी, असं आम्हाला वाटतं," असं थरूर पुढे म्हणाले.

थरूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळानं कोलंबियाच्या परराष्ट्र विभागासमोर भारताची बाजू मांडली.

शशी थरूर नेमकं काय म्हणाले?

शशी थरूर यांनी कोलंबियाच्या परराष्ट्र विभागाचे उपमंत्री रोजा योलांडा विलविसेंसियो यांच्या उपस्थितीत वक्तव्य मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.

ते म्हणाले, "उपमंत्री रोजा योलांडा यांनी सांगितलं की आम्ही ज्यावर नाराजी व्यक्त केली होती ते वक्तव्य कोलंबियानं अधिकृतरित्या मागे घेतलं आहे. कोलंबिया आमची बाजू पूर्णपणे समजून घेत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो."

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार रोजा योलांडा यांनी म्हटलं, "आम्हाला खात्री आहे की आज दिलं गेलेलं स्पष्टीकरण आणि काश्मीरमधल्या संघर्षाबद्दल मिळालेली माहिती यावरून चर्चा सुरू ठेवता येईल."

कोलंबियातले संसद सदस्य अलेजांद्रो टोरो हेही यावेळी उपस्थित होते.

शशी थरूर यांनी कोलंबियाच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांसमोर सांगितलं की, कोलंबिया भारताच्या भूमिकेला समजून घेत आहे.

फोटो स्रोत, @ShashiTharoor

फोटो कॅप्शन, शशी थरूर यांनी कोलंबियाच्या उप-परराष्ट्रमंत्र्यांसमोर सांगितलं की, कोलंबिया भारताच्या भूमिकेला समजून घेत आहे.

शशी थरूर पुढे म्हणाले,‌ "एका बाजूला दहशतवादी आहेत तर दुसऱ्या बाजुला निर्दोष नागरिक. त्यांना एकसारखा न्याय लावणं शक्य नाही.

आमच्या देशावर हल्ला करणारे आणि देशाच्या रक्षणासाठी पुढे येणारे यांना एकाच पातळीवर ठेवता येणार नाही. पण कोलंबियाने मागे केलेल्या वक्तव्यावर आम्ही निराश झालो ते यामुळेच की, या फरकाकडे दुर्लक्ष केलं गेलं."

ते पुढे म्हणाले, "आम्हाला आनंद आहे की आमच्या सार्वभौमत्वासाठी, जगात आणि भारतीय उपखंडात शांततेसाठी, कोलंबियाचे प्रतिनिधी म्हणून आपण आता आमच्या सोबत ठामपणे उभे आहात."

शशी थरुर यांच्या भाषणानंतर हा‌ भारताचा धोरणात्मक विजय मानला जात आहे.

सिंधू जल कराराबद्दल थरूर काय म्हणाले?

दहशतवादाप्रती पाकिस्तानकडून समाधानकारक पावलं उचलली‌ जाणार नाहीत‌ तोपर्यंत सिंधू जल करारावरची स्थगिती कायम राहिल, असं शशी थरूर म्हणाले.

"1960 च्या दशकाच्या सुरुवातीला सद्भावना आणि सौहार्दाच्या भावनेने भारताने पाकिस्तानसोबत 'सिंधू जल करार' केला होता.

हे शब्द कराराच्या प्रस्तावनेतही घालण्यात आले आहेत. दुर्दैवाने, गेल्या चार वर्षांत झालेल्या दहशतवादी कारवायांनी या सद्भावनेचा वारंवार विश्वासघात केला आहे."

"दहशतवादी हल्ले आणि युद्ध झाल्यानंतरही हा करार कायम ठेवण्यात आला होता. पण यावेळी आमच्या सरकारने करारावर स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे.

"हा करार तोपर्यंत स्थगित राहील, जोपर्यंत पाकिस्तानकडून आम्हाला समाधानकारक संकेत मिळत नाहीत की ते त्या सौहार्दाच्या भावनेने काम करण्यास तयार आहेत. ज्याचा उल्लेख कराराच्या प्रस्तावनेत करण्यात आला आहे."

थरूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळानं कोलंबियाच्या परराष्ट्र विभागासमोर भारताची बाजू मांडली.

फोटो स्रोत, @ShashiTharoor

फोटो कॅप्शन, थरूर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळानं कोलंबियाच्या परराष्ट्र विभागासमोर भारताची बाजू मांडली.

ते पुढे म्हणाले, "कराराबद्दल बोलायचं झालं तर आम्ही नेहमी उदार शेजाऱ्याची भूमिका बजावली आहे.

आम्ही फार उदार मनानं पाकिस्तानला ते पाणी देत होतो ज्याचा हक्क करारामुळे त्यांना मिळाला होता. पण करारातंर्गत आमच्या हक्काचं पाणीही आम्ही वापरलेलं नाही.

सद्भावनेची भावना एकतर्फी टिकवून ठेवणं आता आम्हाला शक्य नाही."

कोलंबियाने पाकिस्तानला का दिला पाठिंबा?‌

भारत-पाकिस्तान संघर्षात कोलंबियानं आधी पाकिस्तानची बाजू घेण्यामागे चीनचा हात असू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, कोलंबिया चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट एंड रोड इनिशिएटिव (बीआरआय) या प्रकल्पात अलीकडेच सामील झाला आहे.

बीआरआयमध्ये पाकिस्तानही आहे आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये चीनने भरपूर गुंतवणूक केली आहे.

याच वर्षी 13 मेला बीजिंगमध्ये चीन आणि लॅटिन अमेरिकन मंचाच्या बैठकीत कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (सर्वात उजवीकडे) सहभागी झाले होते.

फोटो स्रोत, FLORENCE LO/POOL/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, याच वर्षी 13 मेला बीजिंगमध्ये चीन आणि लॅटिन अमेरिकन मंचाच्या बैठकीत कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो (सर्वात उजवीकडे) सहभागी झाले होते.

14 मे रोजी चीन आणि कोलंबिया यांनी बीआरआय अंतर्गत संयुक्त सहकार्य योजनेवर स्वाक्षऱ्या केल्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणांनंतर कोलंबिया या लॅटिन अमेरिकेतील देशानं चीनकडे झुकण्यास सुरुवात केली.

कोलंबिया सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहे. 2025 च्या अर्थसंकल्पात त्यांना सुमारे 11 अब्ज डॉलर्सच्या आर्थिक तरतुदीची गरज आहे. त्यांची अर्थव्यवस्था कमी महसूल, जास्त सार्वजनिक कर्ज आणि सरकारी खर्चात कपात या संकटांशी झगडत आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.