बड्या खनिज तेल कंपनीविरोधात उभा राहिला कर्मचारी, 'भयानक' जलप्रदूषणाचा केला उलगडा

बीबीसीनं भेट दिलेल्या काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर प्रदुषणामुळं इंद्रधनुष्यासारख्या रंगाचा थर दिसत होता.
फोटो कॅप्शन, बीबीसीनं भेट दिलेल्या काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर प्रदुषणामुळं इंद्रधनुष्यासारख्या रंगाचा थर दिसत होता.
    • Author, ओवेन पिनेल
    • Role, बीबीसी आय इनव्हेस्टिगेशन्स

काही कंपन्यांच्या प्रदूषणामुळे जलस्त्रोत आणि जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणाचे निष्कर्ष मांडणाऱ्यांना, त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमकावलं जात आहे.

स्थानिक समुदाय आणि पर्यावरण कार्यकर्ते भीतीचा सामना करत आहेत. यामुळं, प्रदूषण आणि कायदेशीर संरक्षणाच्या बाबतीत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण जगभरात हीच स्थिती दिसून येत आहे.

कोलंबियाच्या ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनी इकोपेट्रोलनं शेकडो जलस्त्रोत आणि जैवविविधतेने भरलेले पाणथळ प्रदेश खनिज तेलानं प्रदूषित केले आहेत, असं बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला आढळून आलं आहे.

कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्यानं लीक केलेल्या डेटानुसार, 1989 ते 2018 पर्यंत 800 हून अधिक अशा साइट्सची नोंद केली गेली आहे. त्यात सूचित करण्यात आलं आहे की, कंपनी अशा भागांची माहिती किंवा अहवाल देण्यात अपयशी ठरली आहे.

बीबीसीला मिळालेल्या आकडेवारीनुसार, कंपनीकडून अनेक वेळा अशा ठिकाणी तेल गळती झाल्याचं आढळून आलं आहे.

कंपनी कोलंबियाच्या कायद्याचं आणि शाश्वत प्रगतीसाठी इथल्या उद्योगक्षेत्रातील तत्त्वांचे पालन करते, असा दावा इकोपेट्रोल कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

कंपनीची मुख्य रिफायनरी बरॅनकाबेरमेजा येथे आहे. ती कोलंबियाची राजधानी बोगोटापासून 260 किमी (162 मैल) उत्तरेस आहे.

कोलंबियाची सर्वात मोठी नदी, मॅग्डालेनाच्या किनाऱ्याला 2 किमी (1.2 मैल) लांब पसरलेले प्रक्रिया कारखाने, औद्योगिक चिमणी आणि साठवण टाक्या मोठ्या प्रमाणात दिसतात. महत्त्वाचं म्हणजे ही नदी लाखो लोकांसाठी पाण्याचा स्रोत आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'प्रदूषणाचा नदीतील वन्यजीवांवर परिणाम'

तेल प्रदूषणाचा नदीतील वन्यजीवांवर परिणाम होत असल्याचे तेथील मासेमारी समाजातील सदस्यांचं म्हणणं आहे.

मोठ्या क्षेत्रात नदीतील कासव, मॅनाटीस (समुद्री गाय) हा जलचर सस्तन प्राणी आणि स्पायडर माकडांचं घर संकटात आलं आहे. हा जगातील सर्वात जैवविविधतायुक्त देशांपैकी एक असलेल्या देशातील प्रजाती-समृद्ध हॉटस्पॉटचा भाग आहे. जवळपासच्या पाणथळ प्रदेशात जॅग्वारांसाठी संरक्षित निवासस्थानाचा समावेश आहे.

जेव्हा बीबीसीनं गेल्या जूनमध्ये या ठिकाणी भेट दिली, तेव्हा जलमार्गात असलेल्या तेलाच्या पाइपलाइनच्या परिसरात काही कुटुंबं एकत्रितपणे मासेमारी करत होते.

या नदीत पकडलेले काही मासे शिजवले तेव्हा त्यातून कच्च्या तेलाचा उग्र वास येत होता, असं एका स्थानिक व्यक्तीनं सांगितलं.

काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागावर इंद्रधनुष्यासारखी वर्तुळं दिसत होती. हे पाण्यात तेल मिसळल्यानं झालेल्या प्रदूषणाचं एक विशेष लक्षण होतं.

 युली वेलास्क्वेझ म्हणाल्या की, बॅरनकाबरमेजा भागात सापडलेल्या मृत प्राण्यांमध्ये मॅनाटीसचाही (जलचर सस्तन प्राणी) समावेश आहे

फोटो स्रोत, Yuly Velásquez

फोटो कॅप्शन, युली वेलास्क्वेझ म्हणाल्या की, बॅरनकाबरमेजा भागात सापडलेल्या मृत प्राण्यांमध्ये मॅनाटीसचाही (जलचर सस्तन प्राणी) समावेश आहे

एका मच्छिमारानं पाण्यात डुबकी मारली आणि घट्ट अशा गाळयुक्त चिखलानं माखलेली पाण वनस्पतीं मुळासकट बाहेर काढली.

त्याकडे लक्ष वेधून, या भागातील मासेमारी संघटनांची फेडरेशन 'फेडेपेसन'च्या अध्यक्षा युली वेलास्क्वेझ म्हणाल्या की, "हे सर्व वंगण (ग्रीस) आणि कचरा आहे जो थेट इकोपेट्रोल रिफायनरीमधून इथं येतो."

इकोपेट्रोल, ज्याची 88 टक्के मालकी ही कोलंबियन राज्याची असून ही कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीमुळे नदीतील पाणी प्रदूषित होत असल्याचा मच्छिमारांचा दावा इकोपेट्रोलनं फेटाळला आहे.

बीबीसीच्या प्रश्नांना उत्तर देताना, इकोपेट्रोल कंपनीनं त्यांच्याकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची कार्यक्षम प्रणाली, त्याचबरोबर तेल गळतीसाठी प्रभावी आपत्कालीन योजना असल्याचं सांगितलं.

'चुकीचं घडतंय जाणवताच कंपनीविरोधात आवाज उठवला'

आंद्रेस ओलार्ट हे कंपनीचा डेटा शेअर करणारे व्हिसलब्लोअर आहेत. कंपनीकडून अनेक वर्षांपासून नदीत प्रदूषण सुरु आहे, असं ते म्हणतात.

ते 2017 मध्ये इकोपेट्रोलमध्ये रुजू झाले आणि सीईओंचे सल्लागार म्हणून काम करू लागले. ते म्हणतात की, त्यांना "इथं काहीतरी चुकीचं घडतंय" हे लगेचच लक्षात आलं.

ओलार्ट म्हणतात की, त्यांनी मॅनेजर्सला या "भयंकर" प्रदूषणाच्या डेटाविषयी प्रश्न विचारले.

परंतु त्यांनी "तुम्ही हे प्रश्न का विचारत आहात? तुम्हाला या कामाचं काय महत्त्व आहे, हे समजत नाही" अशी उत्तरं देऊन त्यांना अप्रत्यक्षरित्या यात लक्ष न घालण्याचं सुचवलं.

त्यांनी 2019 मध्ये ही कंपनी सोडली आणि अमेरिकेतील एन्व्हायर्नमेंटल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (ईआयए) ही एनजीओ आणि नंतर बीबीसीसोबत कंपनीचा डेटा शेअर केला. ही सर्व कागदपत्रं इकोपेट्रोल कंपनीच्या सर्व्हरवरून आल्याचं बीबीसीनं पडताळून पाहिलं आहे.

आंद्रेस ओलार्ट म्हणाले की, "इकोपेट्रोलमध्ये मी नोकरी सुरु केल्यानंतर इथं काहीतरी चुकीचं होत असल्याचं माझ्या लगेचच लक्षात आलं."
फोटो कॅप्शन, आंद्रेस ओलार्ट म्हणाले की, "इकोपेट्रोलमध्ये मी नोकरी सुरु केल्यानंतर इथं काहीतरी चुकीचं होत असल्याचं माझ्या लगेचच लक्षात आलं."
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जानेवारी 2019 च्या तारखेला त्यांनी शेअर केलेल्या डेटाबेसमध्ये कोलंबियामधील 839 निराकरणा न झालेल्या पर्यावरणीय प्रभाव असलेल्या स्थळांची यादी आहे.

इकोपेट्रोल 'या' शब्दाचा वापर त्या ठिकाणांसाठी करते जिथे तेल पूर्णपणे माती आणि पाण्यातून साफ झालेले नसते. हा डेटा दर्शवितो की, 2019 पर्यंत, यापैकी काही ठिकाणं एक दशकाहून अधिक काळ अशा प्रकारे प्रदूषित होते.

ओलार्ट यांचा असा आरोप आहे की, कंपनी काही ठिकाणं कोलंबियन अधिकाऱ्यांपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये "फक्त इकोपेट्रोलला माहीत" असं लेबल लावलेल्या नोंदी आहेत.

"तुम्ही एक्सेलमध्ये एक श्रेणी पाहू शकता, जिथे ते कोणत्या प्राधिकरणापासून लपवलेलं आहे आणि कोणते नाही ते दिसून येतं. यातून सरकारपासून गोष्टी लपवण्याची प्रक्रिया दिसून येते," असं ओलार्ट म्हणतात.

बीबीसीनं "केवळ इकोपेट्रोलला माहीत" म्हणून चिन्हांकित केलेल्या एका ठिकाणाचे चित्रण केले. ज्याची तारीख डेटाबेसमध्ये 2017 मध्ये नोंदवण्यात आली होती.

सात वर्षांनंतर, एक जाड, काळसर, तेलासारखा दिसणारा पदार्थ त्याच्या भोवती प्लॅस्टिक प्रतिबंधक अडथळ्यांसह दलदलीच्या एका भागाच्या काठावर दिसत होता.

'कंपनीने फेटाळले सर्व आरोप'

प्रदूषणाविषयी माहिती लपवण्याचे किंवा माहिती रोखण्यासाठी कंपनीचे धोरण असल्याच्या आरोप इकोपेट्रोलचे 2017 ते 2023 पर्यंतचे सीईओ राहिलेले फेलिपे बेयॉन यांनी ठामपणे फेटाळले आहेत. ते बीबीसीशी बोलत होते.

"अशा गोष्टी शेअर करु नयेत म्हणून अशाप्रकारचे कंपनीचे कोणतीही धोरण किंवा कोणत्याही सूचना नाहीत, हे मी तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासानं सांगतो," असं ते म्हणाले.

घातपातामुळे तेल गळती होऊ शकते, असं कारण बेयॉन यांनी सांगितलं.

कोलंबियामध्ये सशस्त्र संघर्षाचा दीर्घ इतिहास आहे. बेकायदेशीर सशस्त्र गटांनी तेल उत्पादक समूहांना लक्ष्य केलं आहे. परंतु, डेटाबेसमध्ये सूचीबद्ध केलेल्या प्रकरणांपैकी फक्त 6 टक्के प्रकरणांमध्येच"चोरी" किंवा "हल्ला" प्रकरणांसाठीचा उल्लेख आहे.

ते असेही म्हणाले की, त्यांचा विश्वास आहे की तेव्हापासून तेल प्रदूषणाच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या समस्या सोडवण्यामध्ये "महत्त्वपूर्ण प्रगती" झाली आहे.

तथापि, इकोपेट्रोलनं सतत प्रदूषण केलं असल्याचं, एका वेगळ्या डेटात दिसून येतं.

पाण्याखालील वनस्पतींवरील गडद गाळ हे तेल प्रदूषणाचे संकेत असल्याचं युली वेलास्केझ सांगतात.
फोटो कॅप्शन, पाण्याखालील वनस्पतींवरील गडद गाळ हे तेल प्रदूषणाचे संकेत असल्याचं युली वेलास्केझ सांगतात.

बीबीसीने कोलंबियाच्या पर्यावरणीय नियामक प्राधिकरण, ऑटोरिडाड नॅशिओनल डी लायसेन्सिअस अँबिएंटेलेस (ॲनला) कडून मिळवलेल्या आकडेवारीनुसार, इकोपेट्रोलनं 2020 पासून दरवर्षी शेकडो तेल गळतींची नोंद केली आहे.

प्रदूषित साइट्सच्या 2019 डेटाबेसबद्दल विचारले असता, इकोपेट्रोलने कबूल केले की त्यांच्याकडे 839 पर्यावरणीय घटनांच्या नोंदी आहेत. परंतु त्या सर्वांचे "उकल न झालेले किंवा असत्यापित" म्हणून वर्गीकरण करण्यात आले होते.

2018 पासून वर्गीकरण न झालेले 95 टक्के प्रदूषित साइट्स (ठिकाणे) आता स्वच्छ करण्यात आले आहेत, असं कंपनीनं सांगितलं आहे.

कंपनीचं म्हणणं आहे की, सर्व प्रदूषण घटना व्यवस्थापन प्रक्रियेच्या अधीन आहेत आणि त्या सर्व घटनांचा अहवाल नियामक संस्थेला दिला जातो.

'प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी'

नियामकांच्या डेटामध्ये युली वेलास्केझ आणि मच्छिमार राहत असलेल्या बरॅनकाबेरमेजा क्षेत्रातील शंभराहून अधिक ठिकाणच्या तेल गळतीचा समावेश आहे.

मासेमारी करणाऱ्या वेलास्केझ आणि त्यांचे सहकारी या भागातील पाणथळ प्रदेशातील जैवविविधतेचे निरीक्षण करत असतात. ही जैवविविधताच मॅग्डालेना नदीला पोसते.

त्या म्हणाल्या की, इथल्या जीवजंतूचा संहार होत आहे. यावर्षी, तीन मृत मॅनाटीस (समुद्री गाय), पाच मृत म्हशी, दहा पेक्षा जास्त मृत मगरी सापडल्या. आम्हाला कासव, कॅपीबॅरास (कायबा), पक्षी, हजारो मृत मासे आढळले." गत जूनमध्ये त्यांनी ही माहिती दिली होती.

या सर्वांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट नाही. एल निनो, हवामान घटना आणि हवामान बदल हे घटक देखील असू शकतात.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघॅमच्या 2022 च्या अभ्यासानुसार, मॅग्डालेना नदीचं खोरं खराब करण्यामध्ये तेल उत्पादन आणि इतर औद्योगिक आणि घरगुती स्रोतांपासून होणारे प्रदूषण हे अनेक घटकांपैकी एक आहेत. यात हवामान बदलाचा देखील समावेश आहे.

ओलार्ट यांनी 2019 मध्ये इकोपेट्रोल कंपनी सोडली. ते आपल्या कुटुंबासमवेत बरॅनकाबेरमेजा जवळील आपल्या घरात राहायला गेले.

तिथे नोकरीच्या शोधासाठी त्यांनी त्यांच्या एका जुन्या परिचिताशी संपर्क साधला. त्यानंतर काहीच दिवसांत एका निनावी कॉलरने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले.

"त्यांना वाटत होतं की मी इकोपेट्रोलविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. पण असं काहीही नव्हतं," असे ते सांगतात.

बीबीसीला डेटाबेसमध्ये "केवळ इकोपेट्रोलला माहिती असलेल्या" एका ठिकाणी काळसर, तेलासारखा दिसणारा पदार्थ आणि प्रतिबंधात्मक अडथळे दिसले.
फोटो कॅप्शन, बीबीसीला डेटाबेसमध्ये "केवळ इकोपेट्रोलला माहिती असलेल्या" एका ठिकाणी काळसर, तेलासारखा दिसणारा पदार्थ आणि प्रतिबंधात्मक अडथळे दिसले.

ओलार्ट म्हणतात की, त्यानंतर आणखी धमक्या त्यांना आल्या, ज्यात एक नोट देखील होती, जी त्यांनी बीबीसीला दाखवली. त्यांना कळत नाही की, धमक्या कोण देत होते आणि इकोपेट्रोलने त्या धमक्या दिल्या आहेत, याचे कोणतेही पुरावे नाहीत.

इकोपेट्रोलच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर आम्हालाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, असं वेलास्केझ आणि इतर सात लोकांनी बीबीसीला सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, एक सशस्त्र गटाने त्यांच्या घरावर इशारा म्हणून गोळीबार केला आणि भिंतीवर स्प्रे पेंटने 'लिव्ह' (सोडून दे) हे शब्द लिहिले.

वेलास्केझ यांच्या सुरक्षेसाठी सध्या सरकारकडून सशस्त्र अंगरक्षक तैनात करण्यात आले आहेत. परंतु, त्यांना अजूनही जीवे मारण्याच्या धमक्या येतच असतात.

ओलार्ट यांनी वर्णन केलेल्या धमक्यांबद्दल इकोपेट्रोलचे माजी सीईओ बेयॉन यांना विचारलं असता, त्यांनी हे "पूर्णपणे अमान्य" असल्याचं म्हटलं.

"मला हे स्पष्ट करायचं आहे ... की कधीही, कोणत्याही वेळी, अशा प्रकारचा कोणताही आदेश दिला गेला नव्हता," असं बेयॉन म्हणाले.

वेलास्क्वेझ आणि ओलार्ट दोघेही जाणतात की, त्यांना येणाऱ्या धमक्या या खऱ्या आहेत. ग्लोबल व्हिटनेस या एनजीओनुसार, पर्यावरण रक्षकांसाठी कोलंबिया हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे. 2023 मध्ये तिथे 79 जणांची हत्या झाली होती.

इकोपेट्रोलची मुख्य रिफायनरी बरॅनकाबेरमेजा जवळील मॅग्डालेना नदीच्या किनाऱ्यावर पसरलेली आहे
फोटो कॅप्शन, इकोपेट्रोलची मुख्य रिफायनरी बरॅनकाबेरमेजा जवळील मॅग्डालेना नदीच्या किनाऱ्यावर पसरलेली आहे

एक्स्पर्ट्स म्हणतात की, अशा हत्यांचा संबंध कोलंबियाच्या दशकांपासून चाललेल्या सशस्त्र संघर्षाशी आहे. तिथे सरकारी सैन्य आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या निमलष्करी दलांनी डाव्या-बंडखोर गटांविरोधात लढा दिला आहे.

संघर्ष संपवण्याचा सरकारचा प्रयत्न असूनही, सशस्त्र गट आणि ड्रग कार्टेल्स देशाच्या काही भागांमध्ये सक्रिय आहेत.

सशस्त्र गटांच्या धमक्यांमध्ये इकोपेट्रोलच्या मॅनेजर्सचा सहभाग असेल यावर विश्वास नसल्याचं, कोलंबियामधील तेल विश्लेषक आणि आर्थिक पत्रकार मॅथ्यू स्मिथ म्हणतात.

खासगी सुरक्षा कंपन्या अनेकदा पूर्वीच्या निमलष्करी गटांच्या सदस्यांना कामावर घेतात आणि तेल सुविधांची सुरक्षा करण्यासाठी आकर्षक करार करतात, असं ते म्हणाले.

ओलार्ट यांनी इकोपेट्रोलचा एक अंतर्गत ई मेल शेअर केला आहे. ज्यात 2018 मध्ये, कंपनीने 2,800 पेक्षा जास्त खासगी सुरक्षा कंपन्यांना एकूण 65 मिलियन डॉलर दिल्याचे दिसून येते.

"खासगी सुरक्षा कंपन्या, त्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक आणि त्यांना त्यांचा करार कायम राखण्याची इच्छा, यामध्ये काहीतरी होईल असा धोका कायम असतो," असं स्मिथ म्हणतात.

इकोपेट्रोलचं कार्य सुरळीतपणे चालावं यासाठी समाजातील नेत्यांचं अपहरण करणं किंवा त्यांची हत्या करणे अशा गोष्टींचा समावेश असू शकतो, असं ते म्हणतात.

वेलास्क्वेझ यांनी त्यांना धमकावण्यात आल्याचं आणि घरावर गोळीबार केल्याचं बीबीसीला सांगितलं.
फोटो कॅप्शन, वेलास्क्वेझ यांनी त्यांना धमकावण्यात आल्याचं आणि घरावर गोळीबार केल्याचं बीबीसीला सांगितलं.

बेयॉन म्हणाले की, खासगी सुरक्षा कंपन्यांशी असलेल्या कंपनीच्या करारापूर्वी "योग्य काळजी घेतली गेली असेल" याची त्यांना खात्री आहे.

इकोपेट्रोलचं म्हणणं आहे की, त्यांचे कधीही अवैध सशस्त्र गटांशी संबंध नव्हते. आमच्याकडे एक मजबूत प्रक्रिया आहे. त्याचबरोबर काम करताना मानवी हक्कांचे नियमही पाळले जातात.

बीबीसीने ओलार्ट यांच्या नोकरीच्या काळापासूनच्या इकोपेट्रोलच्या माजी प्रमुखांसह इतरांशी संपर्क साधला. परंतु, त्यांनी या अहवालातील आरोप ठामपणे नाकारले आहेत.

'...तर आम्हीच आमच्या हत्येला कारणीभूत असू'

आता जर्मनीत राहणारे ओलार्ट इकोपेट्रोलच्या पर्यावरणीय कामकाजाबद्दल कोलंबियन अधिकारी आणि कंपनीकडे तक्रारी दाखल करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांना कोणताही ठोस परिणाम मिळालेला नाही.

त्यांनी इकोपेट्रोल आणि व्यवस्थापनाविरुद्ध त्यांच्या नोकरीशी संबंधित अनेक कायदेशीर खटले दाखल केले आहेत. अद्यापही त्याचे निराकरण झालेले नाही.

"मी हे माझ्या घराच्या, जमिनीच्या, माझ्या प्रदेशाच्या, माझ्या लोकांच्या रक्षणासाठी केलं," असं ओलार्ट म्हणतात.

बरॅनकाबेरमेजा परिसरात अनेकांसाठी मासेमारी ही एक महत्त्वाची उपजीविका आहे.
फोटो कॅप्शन, बरॅनकाबेरमेजा परिसरात अनेकांसाठी मासेमारी ही एक महत्त्वाची उपजीविका आहे.

बेयॉन यांनी कोलंबियासाठी इकोपेट्रोलच्या आर्थिक आणि सामाजिक महत्त्वावर भर दिला.

ते म्हणाले, "आमच्याकडे 1.5 दशलक्ष कुटुंबे आहेत, ज्यांना ऊर्जा उपलब्ध नाही किंवा जे लाकूड आणि कोळसा वापरुन स्वयंपाक करतात. माझा विश्वास आहे की कोलंबियन लोकांसाठी इतका महत्त्वाचा असलेला हा उद्योग न संपवता आपण तेल, वायू, सर्व ऊर्जा स्त्रोतांच्या स्वच्छ उत्पादनावर अवलंबून राहणं आवश्यक आहे."

...आणि युली वेलास्क्वेझ या त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असूनही इकोपेट्रोलविरोधात आवाज उठवणं सुरूच ठेवण्यावर त्या ठाम आहेत.

"जर आम्ही मासेमारीला गेलो नाही, तर आम्ही काहीच खाऊ शकणार नाही. जर आम्ही बोललो आणि तक्रार केली तर आम्हाला ठार मारलं जाईल... आणि जर आम्ही तक्रार केली नाही, तर आम्ही स्वतःचीच हत्या केल्यासारखं होईल.

कारण या प्रदूषणाच्या घटनांमुळे आमच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा नाश होत आहे," असं त्या म्हणतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.