वायू प्रदूषणाने कॅन्सर कसा होतो? संशोधनातून झाले उघड

वायू प्रदूषण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स गॅलेघर,
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी.

हवेच्या प्रदूषणामुळे आपल्याला कॅन्सर (कर्करोग) कसा होतो, याबद्दलची कारणं शोधण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.

कॅन्सर कसा होतो, याबाबत आपले अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी हे संशोधन फायदेशीर ठरणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

लंडन येथील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटने हे संशोधन केलं. संबंधित संशोधन करणाऱ्या पथकाने केलेल्या अभ्यासानुसार, वायू प्रदूषण हे पेशींना नव्याने नुकसान पोहोचवण्याऐवजी आधीच क्षतिग्रस्त झालेल्या पेशींवर लक्ष्य करतं.

तज्ज्ञ प्रा. चार्ल्स स्वँटन यांच्या मते, "हे संशोधन आगामी काळात कॅन्सरसंदर्भात उपयुक्त ठरेल. कॅन्सरविरोधातील औषध शोधणंही यामुळे शक्य होऊ शकतं."

कॅन्सर होण्यासाठी आवश्यक असलेले घटक शरीरावर कशा पद्धतीने परिणाम करतात, हे या संशोधनात उघड झालं आहे.

आजवरच्या शास्त्रीय संशोधनांमध्ये सांगितल्याप्रमाणे कॅन्सरचा शरीरातील प्रवास हा एका निरोगी पेशीमार्फतच सुरू होतो. तुमचा आनुवंशिक इतिहास, डीएनए अथवा जेनेटिक कोडमध्ये झालेलं म्यूटेशन हे परमोच्च बिंदूपर्यंत पोहोचतं. त्यानंतर ती पेशी क्षतिग्रस्त होऊन कॅन्सर वाढीस लागतो.

पण या व्याख्येत काही समस्या आहेत. म्हणजे निरोगी पेशीमध्ये कॅन्सर कसा शिरकाव करतो याचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही.

शिवाय, कॅन्सरचं कारण ठरू शकणारे अनेक घटक (उदा. वायू प्रदूषण इ.) या लोकांच्या DNA ला नुकसान का पोहोचवत नाहीत, हासुद्धा प्रश्न आहे.

काय सुरू आहे?

संशोधकांच्या मते, त्यांनी एका नव्या कल्पनेचे पुरावे आपल्यासमोर मांडले आहेत.

त्यांच्या मते, पेशीच्या DNA मध्ये क्षति आधीपासूनच अस्तित्वात असते. आपली वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला ही क्षतिही वाढत जाते. पण त्याचं रुपांतर कॅन्सरमध्ये होण्यासाठी एखाद्या बाह्य घटकाची आवश्यकता भासू शकते.

कॅन्सर

फोटो स्रोत, US EPA

कधीच धुम्रपान न करणाऱ्या व्यक्तीलाही कॅन्सर कसा होऊ शकतो, हे शोधण्याच्या विचारातून हे संशोधन सुरू करण्यात आलं होतं.

धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याच्या घटना असंख्य आहेत. पण त्यासोबतच एकट्या युकेमध्ये 10 पैकी 1 कॅन्सरचं प्रकरण हवेच्या प्रदूषणासंदर्भातील आहे.

क्रिकच्या शास्त्रज्ञांनी पार्टिक्यूलेट मॅटरमुळे (PM 2.5) होणाऱ्या कॅन्सरबाबत शोध घेतला. या पार्टिकलचा आकार मानवी केसांच्या व्यासापेक्षाही कित्येक पटींनी कमी असतो.

संशोधनाअंतर्गत मानव आणि प्राणी यांच्यावर केलेले विविध प्रयोगांमधून त्यांनी खालील अनुमान आपल्यासमोर मांडले आहेत.

  • वायू प्रदूषणाचं प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी धुम्रपान न करताही फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे.
  • PM2.5 पार्टिकल्स श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांमार्फत ते हटवण्याचे प्रयत्न केले जातात. या प्रक्रियेदरम्यान इंटरल्युकिन-1-बीटा नामक रसायन फुफ्फुसांमार्फत सोडलं जातं.
  • या प्रक्रियेदरम्यान संबंधित भागाला सूज येते. तसंच फुफ्फुसांची स्थिती पूर्ववत करण्यासाठी पेशी जागृत होतात.
  • पण एखाद्या 50 वर्षीय व्यक्तीच्या फुफ्फुसातील प्रति 6 लाख पेशींपैकी किमान 1 पेशीमध्ये कॅन्सरग्रस्त म्यूटेशन आधीच झालेलं असतं.
  • वय वाढत जातं, तशा या पेशी तयार होऊ लागतात. कधी कधी आपण वरून निरोगी दिसत असलो तरी शरारांतर्गत रसायन निर्मितीमुळे ते तयार होऊ शकतात.

महत्त्वाचं म्हणजे, वरील संशोधनात डॉक्टरांनी एका उंदरावर केलेला प्रयोग यशस्वी ठरला आहे. यामध्ये त्यांनी वायू प्रदूषणाच्या संपर्कात आलेल्या एका उंदरावर औषधाचा वापर करून त्याच्या शरीरातील रसायन निर्मिती बंद केली.

संशोधन

फोटो स्रोत, Getty Images

याच माध्यमातून शरीरावर वायू प्रदूषणाचा कसा परिणाम होऊ शकतो, तसंच आपल्याला कॅन्सर कसा होतो, हे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं आहे.

क्रिक इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांच्या पथकातील डॉ. एमिलिया लिम सांगतात, "कधीही धुम्रपान न केलेल्या लोकांना आपल्याला कॅन्सर का झाला, याची कल्पना नसते. त्यांना याबाबत माहिती देण्यासाठी आमचं संशोधन उपयोगी ठरणार आहे.

"सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जगातील 99 % नागरिक WHO च्या निर्देशांकानुसार वायू प्रदूषणाचं प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी राहतात. त्यामुळे हे संशोधन आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे."

कॅन्सरसंदर्भात पुनर्विचार

पण कर्करोगासाठी फक्त म्युटेशन्स एकटेच कारणीभूत नाहीत, असं निरीक्षणातून आढळलेलं आहे. त्यांना एखादा आणखी घटक लागू शकतो.

प्रा. स्वँटन म्हणतात, प्रयोगातला हा सर्वात रोमांचक भाग आहे. हे गाठ तयार होण्यास कशी सुरुवात होते याचा पुनर्विचार करायला लावणारं आहे.

यामुळे रेण्वीय कर्करोग प्रतिबंधाचं नवं युग सुरू होऊ शकतं.

तुम्ही जर अतिप्रदुषित भागात राहात असाल तर कॅन्सरला प्रतिबंध करणारी गोळी घेणं ही गोष्ट अगदीच काल्पनिक राहिलेली नाही.

डॉक्टरांनी यापूर्वीच इंटरल्युकिन -1 -बिटा औषधाचा हृदयाशी संबंधित आजारांमध्ये वापर सुरू केला आणि त्यांना अगदीच अपघाताने हे समजलं की ते औषध फुप्फुसाचा कर्करोग थांबवतं.

सध्याची निरीक्षणं युरोपियन सोसायटी फॉर मेडिकल ऑन्कोलॉजीच्या परिषदेत शास्त्रज्ञांसमोर मांडण्यात आली.

या परिषदेतून प्रा. स्वँटन बीबीसीशी बोलताना म्हणाले, प्रदूषण एक ठळक उदाहरण आहे. पण येत्या दहा वर्षांत अशी 200 उदाहरणं सांगता येतील.

ते म्हणाले, "धुम्रपानामुळे कर्करोग कसा होतो हे सुद्धा पडताळून पाहाण्याची गरज आहे. जसे डीएनएला पोहोचणारी क्षती तंबाखूतील रसायनांमुळे होते की धुम्रपानामुळे तो दाही होतो?"

आश्चर्य म्हणजे कर्करोगासाठी म्युटेशन झालेला डीएनए हे एकमेव पुरेसं नाही तर त्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज आहे हे आयझॅक बेरेनब्लम यांनी 1947मध्येच मांडलं होतं.

डॉ. लिम सांगतात, "या थोर जैवशास्त्रज्ञांनी हे महान कार्य 75 वर्षांपूर्वीच करुन ठेवलंय पण त्याकडे दुर्लक्ष झालं."

कॅन्सर रिसर्च युकेचे मुख्य कार्यकारी मिशेल यांनी फुप्फुसाच्या कर्करोगासाठी धुम्रपानच मुख्य कारण असल्यावर भर दिला.

त्या म्हणाल्या, "शास्त्रज्ञ करत असलेल्या अविरत प्रयत्नांमुळे कर्करोग कसा वाढत जातो याबद्दलचं आपलं मत बदलत आहे. फुप्फुसाच्या कर्करोगामागे मुख्य कारण काय आहे याबद्दल आता आपल्याकडे बरंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)