ध्वनी प्रदूषण : आवाजाच्या दणदणाटाचा तुमच्या आरोग्यावर 'असा' परिणाम होतो

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांमध्ये सणासुदीच्या काळात किंवा एखाद्या विशेष प्रसंगी मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासांनी डोकं वर काढलं आहे. वास्तविक ध्वनी प्रदूषण हा प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात शेवटी विचार केला जाणारा प्रकार आहे, परंतु आता ध्वनी प्रदूषण हे सर्वात पुढे आलेलं आणि अग्रक्रमाने विचार करायला लावणार, काळजी करायला लावणारं प्रदूषण झालं आहे.
एकेकाळी ध्वनी प्रदूषण आणि लेसर किरणांच्या प्रदूषणांना निग्लेक्टेड पोल्युटंट म्हणजे दुर्लक्षित प्रदूषकं म्हटलं जाई. आता ही परिस्थिती पूर्ण बदललेली आहे.
जगभरात अनेक ठिकाणी विविध कारणास्तव, प्रचारसभांत, सण-समारंभात आणि इतर विशेष प्रसंगी मोठ्या आवाजाचा वापर केला जातो.
यात पार्ट्यांमध्ये होणारा गाण्यांचा आवाज, सण-आंदोलन तसेच मिरवणुकांमध्ये वापर केल्या जाणाऱ्या वाद्यांचा, डॉल्बीसारख्या ध्वनी प्रक्षेपण यंत्रणेचा समावेश आहे.
ध्वनी प्रदूषण ही जगभरात वाढत चाललेली समस्या आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी शहरी भागात आवाजाची पातळी वाढत आहे.
संयुक्त राष्ट्रांनी याबाबत इशारा दिला आहे. शहरातील ध्वनी प्रदूषणामुळं जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्याचा परिणाम झाल्यानं युरोपियन युनियनमध्ये दरवर्षी 12,000 अकाली मृत्यू होत आहेत. ध्वनी प्रदूषणाचा अमेरिकेतील अंदाजे 10 कोटी लोकांवर परिणाम होत आहे.
या दणदणाटामुळे नक्की काय होतंय?
डॉल्बी साऊंड किंवा कोणत्याही वाद्यांच्या अतिरेकी सलग दणदणाटाचा आपल्या आणि प्राण्याच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. हे आवाज अचानक कानावर येणं किंवा सलग काही काळ कानावर आदळणं या दोन्हीचेही विपरित परिणाम होतात.
कान बधीर करुन टाकणारे आवाज सर्व वयोगटातल्या त्रासदायक असतात त्यातही लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींना याचा जास्त त्रास होतो.
ज्येष्ठ नागरिकांवरही त्याचा परिणाम होतो. याचं सर्वात आधी दिसणारं लक्षण म्हणजे हृद्यात धडधड वाढणे आणि रक्तदाबावर परिणाम होणे.
तज्ज्ञांच्या मते, हृद्यावर ताण आल्यामुळे मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्यापर्यंत हा त्रास जाऊ शकतो किंवा स्ट्रोकचाही त्रास होऊ शकतो.
यानंतर दुसरा परिणाम दिसतो तो आपल्या जीवनशैलीवर. दणदणाट करणाऱ्या आवाजामुळे आपली झोप विचलित होते. एकदा झोप विस्कळीत झाली की त्याचा आपल्या रोजच्या दिनक्रमावर आणि आरोग्यावर थेट परिणाम दिसून येतो.
सतत कानावर आदळणाऱ्या आवाजामुळे चिडचिड वाढणे, एकाग्रता कमी होणं आणि डोकेदुखीसारखे त्रास उद्भवतात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य हातात हात घालून जात असल्यामुळे दोन्हीपैकी एकही विस्कळीत झाल्यास व्यक्तीला त्याचा दुहेरी त्रास होतो. अपुऱ्या झोपेमुळे, विश्रांती अपुरी झाल्यामुळे मोठा फटका बसतो.
हेडफोनमधून संगीत ऐकणं, मोटरसायकल आणि लीफब्लोअर्स (पानं आणि गवत कापताना वापरले जाणारे ब्लोअर्स) मधून येणारा मोठा आवाज यामुळे कालांतरानं श्रवणशक्ती कमी होऊ शकते आणि टिनिटस (कानात आवाज येण्याचा आजार) होऊ शकतो.
वाढती वाहतूक आणि शाळांमधील गर्दीमधून येणारा नको असलेला किंवा त्रासदायक आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषणाचा लहान बालकं आणि मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.
या प्रदुषणाचा त्रास कसा टाळता येईल?
ध्वनी प्रदुषण किंवा सणासुदीच्या काळात होणाऱ्या दणदणाटाचा त्रास टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ते प्रदूषण होणंच टाळणं. पण बहुतांशवेळा ते आपल्या हातात नसतं. त्यामुळे काही उपाय करण्याची गरज भासते.
डॉ. शीतल राडीया यांनी बीबीसी मराठीला या उपायांबद्दल माहिती दिली. डॉ. राडीया या मीरा रोड येथील वोकहार्ट रुग्णालयात ओटोरिनोलॅरिन्गोलॉजिस्ट (कर्णनासाकंठविकारतज्ज्ञ) आहेत. त्या सांगतात, शक्य असेल तर तुम्ही या दणदणाटापासून दूर गेलं पाहिजे. जर ते शक्य नसेल तर दारं-खिडक्या लावून त्याची तीव्रता कमी केली पाहिजे. हा गोंगाट कमी करणारे इअरफोन्स, इअरप्लग्ज तसेच इअर मफ्स मिळतात. त्याचा वापर करता येईल. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींसाठी हा उपाय केला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईतील शाल्बी रुग्णालयातील इएनटी स्पेशालिस्ट (कान-नाक-घसा तज्ज्ञ) डॉ. भाविक शहासुद्धा हा इअरप्लगचा उपाय सुचवतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "या आवाजावर सर्वोत्तम उपाय म्हणजे इअर प्लग किंवा इअर मफ वापरणे. स्पीकरच्या आवाजाच्या क्षेत्रात जास्त वेळ राहू नका. आपले कान 80 डेसिबल सहन करू शकतात. सामान्य माणसाचे कान 75 ते 80 डेसिबल आवाज सहन करू शकतात.
गर्दीच्या ठिकाणी आपण 110 डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीत ध्वनी व वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता गणेशोत्सव मंडळांच्या व्यवस्थापनाने घ्यावी. ज्या लोकांना हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी जास्त आवाज असलेल्या ठिकाणी राहू नये. गर्भवतींनी डीजेच्या आवाजापासून दूर राहावे."

फोटो स्रोत, Getty Images
आता ताबडतोब काय करता येईल?
- सार्वजनिक उत्सवादरम्यान सायलेंट झोन असलेल्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा वाजवू नका.
- ऑर्केस्ट्राचा आवाज रुग्णालयाच्या आवारात ऐकू येणार नाही याची काळजी घ्या.
- उत्सवात ध्वनिप्रदूषणाचा त्रास लहान मुलांना होणार नाही याची काळजी घ्या.
- निवासी भागात ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
- मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जाताना नेहमी इअरप्लग ठेवा.
सतत कानावर आवाज पडत असतील तर काय करावं?
काहीवेळेस सतत एखाद्या कामाचा किंना आदळाआपटीचा, गाण्यांचा आवाज कानावर आदळत असतो. डॉ. राडीया अशा स्थितीत काय करायचं याचा एक उपाय सुचवतात. त्या सांगतात अशावेळेस तुम्ही थोडा ब्रेक घेतला पाहिजे. त्या आवाजापासून अधूनमधून दूर गेलं पाहिजे. सतत कानावर आवाज आदळल्यास त्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
डॉ. शीतल राडीया सांगतात, “शक्य असेल तर घर साऊंड प्रुफ करण्याचा प्रयत्न करा. जाड पडदे किंवा ध्वनीचे तरंग टाळणाऱ्या टाइल्स लावणं शक्य असेल तर ते करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दणदणाटामुळे ऐकू येत नाही म्हणून मोठ्या आवाजात बोलणं, ओरडणं टाळा, त्यामुळे तुमचा त्रास वाढतो.”

फोटो स्रोत, Getty Images

फोटो स्रोत, Getty Images
मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने श्रवणशक्ती कायमची कमी होऊ शकते. मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतील पेशींचे नुकसान होते. त्याचा परिणाम शरीरावरच नाही तर मनावरही होतो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढून झोपेवरही परिणाम होतो. आवाजामुळे गर्भवती महिलांमध्ये तणाव निर्माण होतो. याचा परिणाम आई आणि तिचे बाळ दोघांवरही होऊ शकतो.
कान दुखायला लागले तर काय करायचं?
बहुतांशवेळा आवाजामुळे कान दुखायला लागले की काही घरगुती उपाय केले जातात. यामुळे अपायच होण्याची शक्यता असते.
डॉ. भाविक शहा याबद्दल सांगतात, “जर तुमच्या बाळाचे कान जास्त आवाजामुळे दुखत असतील तर खोबरेल तेल कधीही घालू नका. यासाठी तातडीनं वैद्यकीय सल्ला घ्या. कानाला खाजवण्यासाठी ‘इअर बड’ वापरून कान खाजवू नका. इअर बडच्या वापरामुळे कानातील नाजूक भागांना इजा होण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी घ्या. योग्य ती खबरदारी न घेतल्यास चिडचिड, विस्मरण, कामातील एकाग्रता कमी होणे, नैराश्य, थकवा, झोप न लागणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.”
चिडचिड कशामुळे होतेय?
ठणठणाटामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. "संगीताविषयी प्रत्येकाची एक आवड-निवड असतो. ते ऐकताना त्याचा आवाज कमी असावा की जास्त हाही चॉईस असतो. पण डीजे-डॉल्बीवाल्या संगीताने फक्त झिंग येते. ते संगीत कानाला गोड वाटतच नाही," असं कोल्हापूरमधल्या सायकोथेरेपिस्ट शुभांगी कारखानीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.
"त्यामुळे हा ठणठणाट ऐकला की सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास म्हणजे चिडचिड वाढणं. याचा झोपेवरही परिणाम होतो आणि त्यामुळे माणसं अजूनच वैतागतात. माझा स्वतःचा असा अनुभव आहे."
"आमच्या घरासमोर दहा दिवस गणपती असायचा. रात्रभर तिथे गोंगाट चालायचा, त्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा येणं, आळसावलेलं वाटणं आणि चिडचिड होणं अशी लक्षणं दिसायची. दुसरं म्हणजे ज्या लोकांची मानसिक स्थिती ठीक नसते, त्यांनी सततचा गोंगाट ऐकला तर मात्र त्यांच्यातला आजार बळावू शकतो. नैराश्यासारखा आजार असणाऱ्या लोकांना अजूनच त्रास होऊ शकतो," असंही त्यांनी सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











