गणेशोत्सव : पीओपी मूर्तींवरून दरवेळी चर्चा का होते? विसर्जनानंतर कृत्रिम तलावातल्या गाळाचं काय होतं?

गणेशमूर्ती

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, गणेशमूर्ती
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

गणेशोत्सवाचे वेध लागले की अलीकडे दरवर्षी एका गोष्टीची चर्चा वारंवार होते. प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपीच्या मूर्ती.

एकीकडे सगळेच सण, उत्सव पर्यावरणपूरक कसे बनतील यावर नवी पिढी विचार करताना दिसते. ज्याची पूजा करायची ती गणपती मूर्ती कशानं बनली आहे याविषयी जागरुकता वाढते आहे.

पण आजही मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर गणेशमूर्तींसाठी केला जातो. विशेषतः सार्वजनिक गणेशमूर्तींमध्ये.

अलीकडेच यासंदर्भात एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलं. ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ता रोहित जोशी आणि मातीच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या 9 कारागिरांनी ही याचिका दाखल केली होती.

त्यावर सुनावणी करताना कोर्टानं सरकारला निर्देश दिले आहेत की, गणेशमंडळं पीओपी मूर्तींचा वापर करणार नाहीत, याकडे लक्ष द्या.

पण अनेक मंडळांनी आधीच मूर्ती आणल्याही आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या तोंडावर पीओपी मूर्तींवर चर्चा होते आहे.

राज्यभरात सुमारे 1.20 कोटी गणेशमूर्तींचं विसर्जन केलं जातं आणि त्यातल्या 80 टक्केहून अधिक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसनं बनवलेल्या असतात, असं रोहित जोशी सांगतात.

एकट्या मुंबईचा विचार केला, तर महापालिकेच्या 2023 च्या आकडेवारीनुसार शहरात सुमारे 12 हजार गणेश मंडळं आहेत.

मूर्तींच्या विसर्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक महापालिका कृत्रिम तलावांचा वापर करतात.

पण, त्यातल्या गाळ आणि पाण्याची व्यवस्था योग्य पद्धतीनं ठेवली जात नाही, याकडं पर्यावरणप्रेमींनी लक्ष वेधलं आहे.

पीओपी काय असतं?

पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस ही एक प्रकारची पावडर आहे. जिप्सम (कॅल्शियम सल्फेट) या खनिजापासून ही पावडर तयार केली जाते.

अगदी काही शतकांपासून या प्लास्टर ऑफ पॅरिसचा किंवा त्यासारख्या पदार्थांचा वापर बांधकामात, मूर्ती किंवा खेळणी तयार करण्यासठी, नक्षीकामासाठी केला जातो.

पॅरिसच्या नोत्र दामच्या डागडुजीदरम्यान प्लास्टरची मूर्ती तयार करणारी कलाकार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पॅरिसच्या नोत्र दामच्या डागडुजीदरम्यान प्लास्टरची मूर्ती तयार करणारी कलाकार

हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यात शुक्ल चतुर्थी म्हणजे पहिल्या चतुर्थीला गणेशमूर्तीची पूजा केली जाते. ही गणेशमूर्ती मातीची असावी, अशी मान्यता आहे.

पंचांगकर्ते दा. कृ. सोमण त्यामागचं कारण सांगतात, “भाद्रपद महिन्यात शेतामध्ये धान्य तयार होतं. त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्याच गणपतीची पूजा केली जाते. म्हणूनच त्याला पार्थिव पूजा असं म्हणतात.

“शेतावर जाऊन तिथल्या मातीचा गणपती करावा आणि तिथेच त्याचं विसर्जन करावं असं शास्त्रात म्हटलं आहे. पण सर्वांनाच मूर्ती बनवता येत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात मूर्तीकारांकडून मूर्ती घेऊन घरी नेण्याची आणि तिथे स्थापन करून पूजा करण्याची प्रथा पडली.”

ग्राफिक्स
ग्राफिक्स

गणेशमूर्ती बनवण्यासाठी आधी प्रामुख्यानं शाडूच्या मातीचा वापर व्हायचा. त्याऐवजी पीओपीचा वापर नेमका कधी सुरू झाला, याची ठोस माहिती नाही. पण मागच्या काही दशकांत पीओपी मूर्तींचं प्रमाण बरंच वाढत गेलं.

पीओपीच्या मूर्ती जास्त आकर्षक बनतायत. या मूर्ती बनवायला तुलनेनं सोप्या असतात आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणं सहज शक्य असतं, असं पीओपी मूर्ती बनवणारे मूर्तीकार कुणाल पाटील सांगतात. त्यांची मूर्तीशाळा रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये आहे, जे शहर गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे.

“मातीच्या मूर्तीच्या तुलनेत पीओपीची मूर्ती जास्त पक्की असल्यानं लांबवरच्या प्रवासात तिचं नुकसान होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळेच मोठ्या आकारातल्या मूर्ती बनवण्यासाठी याचा वापर वाढला. शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत या मूर्ती स्वस्त असतात,” असं कुणाल सांगतात.

पीओपी आणि जलप्रदूषण

पीओपी हे नैसर्गिक खनिजापासून तयार केलं जात असल्यानं त्याचा पर्यावरणावर फारसा परिणाम होत नाही, असा दावा याच्या समर्थकांकडून केला जातो.

पण विसर्जनाच्या काळात मोठ्या प्रमाणात पीओपी पाण्यात मिसळतं.

पीओपीचे फायदे-तोटे

या पीओपीमधील सल्फेटचा परिणाम पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर होत असल्याचं आयआयटी मुंबईच्या सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड इंजिनियरिंगनं केलेल्या अभ्यासात 2007 सालीच समोर आलं होतं.

तसंच पीओपी पाण्यात विरघळण्यासाठी बराच काळ लागतो आणि त्याचा परिणाम पाण्यातील जीवांवर होतो असंही या अभ्यासात म्हटलं होतं.

त्यामुळेच 2008 साली पहिल्यांदा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घातली आणि मूर्तींविषयी तसंच त्यांचं विसर्जन कसं व्हावं याविषयी मार्गदर्शक सूचना करण्याचे निर्देश सरकारला दिले होते.

मात्र, ही बंदी लगेच अंमलात आली नाही आणि नंतरच्या काळात ती एकतर दरवेळी पुढे ढकलली गेली किंवा हा मुद्दा वरचेवर कोर्टासमोर गेला.

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं 2010 साली गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणल्या.

मग 2012 साली बंदीचा प्रश्न पुन्हा उच्च न्यायालयात गेला. 2020 सालीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरील, विशेषतः त्यांच्या विसर्जनावरील बंदी कायम राहिली.

गणेशमूर्ती

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, महापालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत सार्वजनिक गणेशमूर्ती बसवणारी किमान 12,000 मंडळे आहेत

2020 च्या मे महिन्यात केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं कुठल्याही देवाच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्लॅस्टर ऑाफ पॅरिसचा वापर करता येणार नाही असा आदेश काढला होता.

तसंच मूर्तिकार कोणत्याही देवतेच्या पीओपीच्या मूर्ती बनवणे बंद करतील, असं लेखी प्रतिज्ञापत्र याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सादर करावं असंही खंडपीठाने म्हटलं होतं.

मात्र तीन वर्षांनंतरही त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. मूर्तिकार अजूनही गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पीओपी वापरत असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं नमूद केलं आहे.

BBC

पीओपी मूर्ती बनवणाऱ्यांना “परावृत्त करणारं काही नाही, त्यांच्यावर कारवाई किंवा दंडाची तरतूद नाही. तुम्ही काही शिक्षा किंवा किमान दंड ठेवायला हवा, नाहीतर हे सुरूच राहील. मूर्तीकारांना कैदेत टाका, असं आम्ही म्हणत नाही, पण काही दंड तरी ठोठावा,” असं कोर्टानं म्हटलं आहे. हा कलाकारांच्या पोटाचाही प्रश्न आहे असंही कोर्टानं नमूद केलं आहे.

या प्रकरणी राज्य सरकार, महापालिका आणि अन्य दावेदारांना बाजू मांडण्यासाठी कोर्टानं वेळ दिला असून याविषयी पुढची सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

पण गणपती विसर्जन त्याआधीच होणार आहे आणि त्याचा परिणाम पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर होणार नाही याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे.

कृत्रिम तलावातलं विसर्जनही पर्यावरणाला घातक?

या सगळ्यादरम्यान, गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे आणि पीओपीऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्ती घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे.

काहींनी घरीच साध्या मातीचा गणपती बनवून बागेत विसर्जन करणे, लहान आकाराची मूर्ती बसवणे, धातूच्या मूर्तीची पूजा करणे किंवा दरवर्षी तीच मूर्ती पुन्हा सजवून बसवणे असे पर्याय शोधले आहेत. पण अशांची संख्या कमी आहे.

मूर्ती घ्यायला गेल्यावर नेमकी कोणती मूर्ती कुठली शाडूची आहे आणि कुठली पीओपीची हे आम्हाला कळत नाही, असं अनेक भाविक सांगतात.

गणेशमूर्ती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जलप्रदूषण कमी व्हावं म्हणून काहींनी लहान गणेशमूर्ती बसवण्याचा पर्याय स्वीकारला आहे.

तसंच काहीजण घरीच एखाद्या टाकीत किंवा पिंपात मूर्तीचं विसर्जन करतात, पण या पाण्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो.

नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेल्या मूर्तींवरचे रंग आणि सजावटीच्या वस्तूही पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे अशा मूर्तीही नदी, नाले, ओढे यात विसर्जित केल्या तर यातले विषारी घटक माणसाच्या तसंच प्राण्यांच्या शरीरात जाऊ शकतात.

त्यामुळे या मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक स्रोतात होणार नाही, याकडे स्थानिक प्रशासनाने आणि सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचं मुंबई न्यायालयाच्या खंडपीठाने 2021 सालीच स्पष्ट केलं होतं.

गणेश मूर्तींचं दान करण्याचा उपक्रम काही ठिकाणी राबवण्यात येतो. मात्र, यातून जमा झालेल्या शेकडो मूर्तींचं काय करायचं, असा प्रश्न निर्माण होतो.

कृत्रिम तलावात होणारे गणेश विसर्जन.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कृत्रिम तलावात गणेशविसर्जनाला प्रतिसाद वाढतो आहे, पण या तलावातील गाळाचं काय करायचं हा प्रश्न उभा राहतो.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय त्याआधीच अनेक ठिकाणी अंमलात आणला जाऊ लागला आहे.

पण तो सगळीकडे लागू झालेला नाही. तसंच विसर्जनानंतर या तलावातलं पाणी आणि गाळ याचं काय होतं, हाही प्रश्नच आहे.

मिरा भायंदर महापालिकेनं हर्षद ढगे यांच्या आरटीआय याचिकेमध्ये याबाबत माहिती दिली आहे. मूर्तींच्या विसर्जनानंतर राहिलेला गाळ आणि पाणी समुद्रात किंवा खाडीत सोडलं, असं ते म्हणाले.

गेल्या वर्षी रोहित जोशी यांनीही ठाणे महापालिकेकडे अशीच विचारणा केली होती. ठाणे खाडी ही रामसर साईट, म्हणजे एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशी दलदलीची जागा आहे. तरीही तिथे गणेशमूर्तींचं मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असल्याचं त्यातून समोर आलं होतं.

18 सप्टेंबर 2023 रोजीच्या रोहित जोशी यांच्या आरटीआयला उत्तर देताना ठाणे महापालिकेनं खाडीकिनारी कुठे कुठे विसर्जन होतंय याची यादी दिली होती.

जिथे कृत्रिम तलाव आहेत, त्यातील पाणी प्रक्रिया करून पुढे नाल्यात सोडल्याचं महापालिकेनं म्हटलं होतं. तसंच विसर्जनानंतर कृत्रिम तलावात जमणारा गाळ प्रक्रिया करून ठाणे खाडीतच सोडला गेल्याची माहिती महापालिकेनं दिली होती.

ठाणे खाडीतील फ्लेमिंगो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ठाणे खाडीतील फ्लेमिंगो

आता यावर्षीच्या स्थितीविषयी बीबीसीनं ठाणे महापालिकेकडे विचारणा केली. महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी माहिती दिली आहे.

त्या म्हणाल्या, “CPCB च्या निर्देषांनुसार विसर्जनानंतर कृत्रिम तलावातलं पाणी वेगळं करून त्यातला गाळ तिथल्या तिथे बुजवला जायला हवा. आमच्याकडे कृत्रिम तलावात प्रामुख्यानं घरगुती मूर्तींचं विसर्जन केलं जातं. दोन फुटांपेक्षा मोठी मूर्ती आम्ही त्यात घेत नाही.

“गेल्या वर्षी यात शाडू मातीच्या मूर्तींचं प्रमाण साधारण साठ टक्के होतं. आम्ही विसर्जनानंतर यातला राडारोडा काढून तो ठा.म.पा.ची काही मैदानं आहेत तिथे व्यवस्थित ताडपत्री टाकून बुजवला.”

ठाण्यात यावेळी 9 विसर्जन घाट, 15 कृत्रिम तलाव, 10 मूर्ती स्वीकृती केंद्र, 49 ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था तयार केली आहे.

गणेशमूर्ती

फोटो स्रोत, Getty images

फोटो कॅप्शन, गणेशमूर्ती

मोठ्या आकाराच्या सार्वजनिक गणेशमूर्तींविषयी मनिषा सांगतात, “कोव्हिडच्या वेळेला चार फुटांचीच मूर्ती असावी असा एक चांगला मापदंड होता. कृत्रिम तलावाचा आकार तेवढा मोठा नसतो, त्यामुळे मोठ्या पीओपी मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करता येत नाही.

“आता कोर्टाच्या आदेशाची माहिती आम्ही सार्वजनिक मंडळांना पोहोचवली आहे आणि त्यांनी याचं पालन करावयास हवं सांगितलं आहे.”

ठाणे महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी फेब्रुवारीपासूनच गणेश मूर्तीकारांमध्ये पीओपी न वापरण्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मुंबई महापालिकेनं कोर्टासमोर निवेदन सादर करताना म्हटलं होतं की त्यांनी यावेळी मूर्तीकारांना 611 टन शाडू मातीचं वाटप केलं होतं. तसंच मूर्तीकारांना शाडूमातीच्या मूर्ती बनवण्यासाठी जागा दिल्याचीही माहिती बीएमसीनं कोर्टाला दिली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)