गणेशोत्सव: जपानमधल्या 'गणपती'ची गोष्ट, जिथे 'कांगितेन'ची होते पूजा

मात्सुचियामा शोटेन मंदीर

फोटो स्रोत, janhavi moole/BBC

फोटो कॅप्शन, मात्सुचियामा शोटेन मंदीर
    • Author, जान्हवी मुळे,
    • Role, बीबीसी मराठी

उंदरावर, मोरावर किंवा अगदी मोटारगाडीत... कधी लहान बाळासारखा, कधी एखाद्या योद्ध्यासारखा किंवा अगदी डॉक्टर-संशोधकाच्या वेशात.. मंदिरात आणि मखरात गणपतीच्या मूर्तीची अशी हजारो रूपं पाहायला मिळतात.

पण जपानमध्येही 'गणपती'चं एक वेगळंच रूप आहे, ज्याची नियमित पूजा केली जाते आणि त्याला मोदकांसारखाच नैवेद्यही दाखवला जातो.

मात्र तिथे तो गणपती म्हणून नाही, तर कांगितेन (कांकीतेन किंवा शोतेन), बिनायक-तेन आणि गनाबाची अशा नावांनी ओळखला जातो.

हत्तीचं मस्तक आणि बाकीचं शरीर मानवाचं असा भारतातल्या गणपतीशी मिळताजुळता आकार असलेली ही देवता जपानमध्ये शतकांपासून पुजली जाते आहे.

कांगितेन जपानच्या स्थानिक कथांचा आणि प्रथांचा भाग बनला आहेच, शिवाय हजारो किलोमीटर दूर असलेल्या दोन देशांना जोडणाऱ्या इतिहासाचंही तो प्रतीक आहे.

जपानमध्ये गणपती कसा पोहोचला?

भारतातली अनेक प्रतीकं, चिन्हं, विचार, प्रथा आणि कथा बौद्ध धर्मासोबत भारतातून चीनमार्गे जपानमध्ये पोहोचली. जपानमधला 'गणपती' त्यातलाच एक आहे.

लेखक आणि पुराणकथांचे अभ्यासक देवदत्त पटनायक सांगतात की "साधारण आठव्या शतकात जपानमध्ये गणेशपूजेची प्रथा पोहोचली, त्याला एक बौद्ध भिक्खू कोबो दाईशी प्रामुख्यानं कारणीभूत ठरले होते."

"जपानमध्ये आज एक बुद्धिस्ट देवता म्हणून त्याची पूजा केली जाते. तो गणाबाची आणि बिनायका-तेन या नावानं ओळखला जातो. पण कांगितेन किंवा शोतेन हे त्याचं दुहेरी रूप जास्त लोकप्रिय आहे."

मात्सुचियामा मंदीराच्या आवारातील इतर देवतांच्या मूर्ती

फोटो स्रोत, janhavi moole

फोटो कॅप्शन, मात्सुचियामा मंदीराच्या आवारातील इतर देवतांच्या मूर्ती

कांगितेन या रूपातील ही देवता उघडपणे जपानमध्ये कुठेही पाहायला मात्र मिळत नाही. कारण स्त्री आणि पुरुष या दोन रूपांतील गणपती एकमेकांना आलिंगन देतानाचं हे रूप आहे. त्यामुळेच एक गूढ, तांत्रिक देवासारखंच कांगितेनची मूर्ती अगदी त्याची भक्ती करणाऱ्यांनाही थेट पाहता येत नाही.

ब्रिटिश म्युझियमच्या संग्रहालयात कांगितेनची एक मूर्ती आहे, मात्र एरवी ही मूर्ती किंवा तिचे फोटोही अगदी दुर्मिळ आहेत. इतकं या देवतेविषयी गूढ बाळगलं जातं.

जपानमध्ये ही देवता संपत्ती आणि प्रजोत्पादनाचंही प्रतीक आहे. त्यामुळे प्रेमाच्या शोधात असलेले तरूण आणि भरभराटीची कामना करणारे व्यापारी कांगितेनची पूजा करतात.

जपानच्या इतिहासात नारा युग नावानं ओळखल्या जाणाऱ्या काळात या देवतेची उपासना मोठ्या प्रमाणात केली जायची. तेव्हा या देशात कांगितेनची हजार एक मंदिरं असावीत असा अंदाज इतिहासकारांनी वर्तवला आहे.

टोकियोतलं 'कांगितेन'चं मंदिर

भारत आणि जपानचं नातं समजून घ्यायचं असेल, तर टोकियोतल्या कांगितेनच्या मंदिरात जरूर जा, असा सल्ला मला तिथल्या तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या एका मित्रानं दिला होता.

पटनायक यांनी 'नाईन्टीनाईन थॉट्स ऑन गणेशा' या पुस्तकात त्याविषयी लिहिलं आहे. त्यानुसार चीनमध्ये गणपतीचा फारसा प्रभाव दिसत नाही, पण जपानी समाजातील काही लोकांमध्ये मात्र ही देवता लोकप्रिय झाली.

कांगितेन भारतातल्या गणपतीपेक्षा किती वेगळा आहे? आणि बौद्ध धर्माशी त्याचं नातं काय सांगतं? असे प्रश्न मनात घेऊनच मी हे मंदिर पाहण्यासाठी गेले.

मात्सुचियामा शोटेन मंदीर

फोटो स्रोत, janhavi moole/BBC

फोटो कॅप्शन, मात्सुचियामा शोटेन मंदीर

असाकुसा परिसरात तेव्हा दुपारची वेळ झाली होती. खरं तर हा भाग एरवी पर्यटकांनी गजबजलेला असतो, कारण असाकुसामध्येच सेंसो-जी हे प्रसिद्ध मंदिर आणि पारंपरिक जपानी वस्तूंची एक छान बाजारपेठही आहे.

पण या गजबजाटापासून दूर, मात्सुशियामा नावाच्या छोट्याशा टेकडीवर कांगितेनचं मंदिर आहे. सुमिदागावा नदीकाठचा एक छानसा पायरस्ता तुम्हाला तिथे घेऊन जातो.

नदीपलीकडे टोकियो स्काय ट्री टॉवर आणि बाकीच्या आधुनिक इमारती आणि अलीकडे परंपरेच्या जुन्या खाणाखुणा असं या शहराचं दुहेरी रूप न्याहाळत मी या टेकडीपाशी पोहोचले.

झाडांच्या आड चढावावरून वर जाताना मंदिराविषयी माहिती देणारे फलक आणि काही जुन्या मूर्ती दिसतात. शेजारीच पाण्याचा झरा आणि छोटीशी बाग आहे.

काही पायऱ्या चढून गेल्यावर मी मुख्य मंदिरापाशी पोहोचले. मंदिरात आतमध्ये सर्वांना प्रवेश आहे, पण गर्भगृहात अगदी मोजक्या लोकांशिवाय कोणीच जाऊ शकत नाही, असं तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं.

मी भारतातून आले आहे, हे कळल्यावर ते गणपतीविषयी बोलू लागले आणि आस्थेनं चौकशी करू लागले. मंदिराविषयी आणि कांगितेनची पूजा कशी केली जाते, याविषयी माहिती देऊ लागले.

"हा तुमचा गणपतीच आहे, पण आमच्याकडे तो गुप्त देव आहे. इथे अनेक तरुण तरुणी लग्नाची मनोकामना बाळगून इथं येतात आणि कांगितेनला दाईकोन (एक प्रकारचा जपानी मुळा) वाहतात. व्यापारी लोक भरभराटीच्या आशेनं छोटे बटवे कांगितेनला वाहतात."

गणपतीपेक्षा कांगितेन वेगळा आहे का?

जपानमध्ये कांगितेनकडे विघ्नकर्ता म्हणून पाहिलं जातं, आणि म्हणून त्याला खूश करण्यासाठी त्याची पूजा केली जाते.

कांगितेन जपानमध्ये ज्या तिबेटी वज्रयान बौद्ध पंथाद्वारा पोहोचला, त्यातही विनायकाचं रूप विघ्नकर्त्याचं आहे. या पंथातील कथांमध्ये विनायकावर अवलोकितेश्वरानं (बोधिसत्वानं) मिळवलेल्या विजयाचा उल्लेख आहे.

कांतिगेन देवतेची मूर्ती

फोटो स्रोत, © The Trustees of the British Museum

फोटो कॅप्शन, कांतिगेन देवतेची मूर्ती

भारतातही गाणपत्य पंथाचा उदय झाला त्याआधी विनायक हा विघ्नकर्ता देव म्हणून पूजला जात होता, असं अभ्यासक सांगतात.

म्हणजे दोन्ही देशांत दोन वेगळ्या पद्धतीनं या देवतेचा विचार रूजत गेला आणि भारतात एक प्रमुख देवता बनलेला गणपती, जपानमध्ये कांगितेन या उपदेवतेच्या रूपात पूजला जाऊ लागला.

तो भारतातून बौद्ध धर्मासोबत जपानला गेला, याविषयी दुमत नाही. पण आजच्या भारतातील हिंदू आणि जपानमधील बौद्ध धर्मात या हत्तीचं मस्तक असलेल्या देवतेचे गुणधर्म बरेच वेगळे झाले आहेत हे वास्तव आहे.

पुरातत्वशास्त्रज्ञ कुरुश एफ दलाल सांगतात, "जेव्हा एखादी संकल्पना एका जागेतून दुसऱ्या जागेत जाते, तेव्हा तिकडच्या परंपरेशी तिचा मिलाफ होतो आणि त्यातून नवं रूप तयार होतं. दुसरं म्हणजे, एखादी नवी संकल्पना, नवा विचार आला, जो आपल्या संस्कृतीतला नाही तर तो लोकांना आपला कसा वाटेल? यासाठी त्यातल्या आपल्याशी जुळणाऱ्या काही गोष्टींचा समावेश (internalise) केलेला असू शकतो."

कुरुश दलाल हे पाकशास्त्रीय मानववंशशास्त्राचेही अभ्यासक आहेत आणि ते या दोन्ही देवतांना दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याविषयीही माहिती देतात.

जपानच्या गणपतीचा नैवेद्य

गणपती आणि कांगितेनला दाखवला जाणारा नैवेद्य जवळपास एकसारखाच आहे.

कांगितेनला वाहिले जाणारे दाईकोन मुळे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कांगितेनला वाहिले जाणारे दाईकोन मुळे

गणपतीला पश्चिम भारतात, विशेषतः महाराष्ट्रात मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. जपानमध्ये कांगितेनला तळलेले 'कांगिदान' अर्पण केले जातात.

फक्त महाराष्ट्रात मोदकाच्या सगळ्या कळ्या जोडून टोक काढलं जातं, तर जपानमध्ये कांगिदानची पोटली बांधली जाते. इथे त्यात सारण म्हणून खोबरं आणि गूळ वापरतात, तिथे रेड बिन्सची गोडसर पेस्ट वापरली जाते.

मोदकाचं जपानी रूप 'कांगिदान'

फोटो स्रोत, Yogi Puranik

फोटो कॅप्शन, मोदकाचं जपानी रूप 'कांगिदान'

दलाल सांगतात, "गणेशाची भावना पोहोचली, त्यासोबत त्याचे मोदकही जपानला पोहोचले. प्रामुख्यानं पश्चिम भारतातला तळलेला मोदक जपानला कसा पोहोचला हे पाहणं जास्त उत्सुकतेचं आहे. चीनमधून बौद्ध धर्म जपानमध्ये जमिनीच्या मार्गानं पोहोचला, पण मोदक थेट व्यापाऱ्यांमार्फत समुद्राच्या मार्गानं पोहोचल्याचीही शक्यता आहे."

गणपती आणि कांगितेनचा 'शांततेचा संदेश'

गणपती आणि त्याचा मोदक जपानला कसा पोहोचला, याविषयी चर्चा करतानाच मात्सुशियामा मंदिरातले पुजारी म्हणाले होते, "आपण कितीही वेगळे आहोत असं वाटलं, तरी शेवटी सगळ्यांना एकत्र जोडणारे अनेक धागे असतात. ते जपत राहायला हवं. पूजा-अर्चा करण्यापेक्षाही हा विचार जास्त महत्त्वाचा आहे."

हजारो किलोमीटर दूर असलेले दोन भिन्न संस्कृती आणि भिन्न धर्मांचं पालन करणारे दोन देश या देवतेच्या कहाणीनं एकत्र आणले आहेत.

कांगितेनला वाहिले जाणारे बटवे

फोटो स्रोत, janhavi moole

फोटो कॅप्शन, कांगितेनला वाहिले जाणारे बटवे

कुरुश दलाल यांनाही ही गोष्ट म्हणूनच महत्त्वाची वाटते. भारतात जसे ज्यू, पारसी, मुस्लिम, ख्रिश्चन आले आणि या देशाचा भाग बनून गेले, तसाच बौद्ध आणि हिंदू धर्म पूर्वेकडे पसरला आहे, याकडे ते लक्ष वेधतात.

ते म्हणतात, "हे दोन्ही विचार तिथे एकमेकांमध्ये इतके मिसळून गेले आहेत, की त्यांना वेगळं करता येणार नाही. कांगितेन हिंदू केव्हा आहे, बौद्ध केव्हा आहे, हे आज सांगता येणार नाही.

"आजचा काळ dissenting religious intolerance म्हणजे तीव्र असहमतीदर्शक असहिष्णू धार्मिक विचारांचा आहे, असं म्हणावं लागेल. म्हणजे मला तुमचा धर्म आवडत नाही, इथवर लोक थांबत नाहीत तर त्यावर ते काहीतरी पावलं उचलताना दिसतात."

"पण कांगितेन आपल्याला दाखवून देतो, की एक काळ असा होता जेव्हा विचारांचा एकमेकांशी संगम होत होता, एक विचार शांततामय होता, तो दूरवर पसरला होता आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी स्वीकार केला गेला होता."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)