कर्णकर्कश आवाजाचा मुलांच्या मेंदूवर कसा होतो परिणाम? स्मृतीभ्रंश, मानसिक आजाराची वाढते शक्यता

लहान मुलगी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, ऑलिव्हिया होविट
    • Role, बीबीसी फ्युचर

न्यूयॉर्कमधील एका शाळेतील एका वर्गात आजूबाजूच्या आवाजाची पातळी एवढी जास्त होती की, शिक्षकांना अक्षरश: ओरडून शिकवावं लागायचं.

हा वर्ग न्यूयॉर्कच्या सबवे ट्रेनसाठी बांधलेल्या पुलाजवळ होता. मॅनहटनमधील पब्लिक स्कूल 98 या शाळेजवळून दिवसातून किमान 15 वेळा सबवे ट्रेन जायच्या. त्यामुळं वर्गात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सतत व्यत्यत यायचा.

लोकांनी पब्लिक स्कूल 98 या शाळेतील आवाजाच्या पातळीबद्दल अनेक वर्षे तक्रार केली. 1975 मध्ये सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या हर्बट एच. लेहमन महाविद्यालयातील मानसशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका अरलाइन ब्रॉन्झाफ्ट यांनी एक संशोधन प्रसिद्ध केलं.

त्यात त्यांनी मोठ्या आवाजाचा किंवा गोंगाटाचा विद्यार्थ्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामाचा ऊहापोह केला होता.

अरलाइन ब्रॉन्झाफ्ट यांना आढळलं की, शाळेच्या इमारतीच्या ज्या बाजूनं सबवे जात होती आणि जिथून जास्त आवाज यायचा त्या बाजूला बसणाऱ्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झाला होता.

या विद्यार्थ्यांची वाचनाच्या चाचण्यांमधील कामगिरी इमारतीच्या शांत बाजूस बसणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा खराब होती.

गोंगाटाच्या बाजूस बसणारे विद्यार्थी वाचन कौशल्यात शांत बाजूस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तीन ते चार महिने मागे होते.

ब्रॉन्झाफ्ट यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळं न्यूयॉर्कच्या संबंधित वाहतूक विभागानं सबवेचा आवाज कमी करण्यासाठी रुळांवर रबराचे पॅड बसवले.

तर शिक्षण मंडळानं शाळेत चांगलं शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी वर्गांमध्ये ध्वनी-शोषक साहित्याचा वापर केला.

ध्वनी प्रदूषण ही जगभरात वाढत चाललेली समस्या आहे. जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतशी शहरी भागात आवाजाची पातळी वाढत आहे.

संयुक्त राष्ट्रांनी याबाबत इशारा दिला आहे. शहरातील ध्वनी प्रदूषणामुळं जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्याचा परिणाम झाल्यानं युरोपियन युनियनमध्ये दरवर्षी 12,000 अकाली मृत्यू होत आहेत. ध्वनी प्रदूषणाचा अमेरिकेतील अंदाजे 10 कोटी लोकांवर परिणाम होत आहे.

बीबीसी
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

वायू प्रदूषणानंतर ध्वनी प्रदूषण हा आरोग्यासाठी सर्वात हानिकारक ठरणाऱ्या पर्यावरणीय घटकांपैकी एक आहे. खासकरून रस्त्यावरील रहदारीचा गोंगाट आणि विमानांचा आवाज याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

आवाजाच्या अशा वाढलेल्या पातळीमुळं तीव्र तणाव वाढतो, झोपेत अडथळे येतात आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते, असं आढळून आलं आहे.

गोंगाटाच्या किंवा वाढलेल्या ध्वनी पातळीचा त्रास याचा संबंध नैराश्य आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांशी आहे. तर आवाजाच्या वाढलेल्या पातळीमुळे किंवा ध्वनी प्रदूषणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

वहीवर लाल रंगात डेसिबलचा आकार काढणारा हात

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/BBC

फोटो कॅप्शन, प्रचंड गोंगाटाचा मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर हानिकारक परिणाम होतो

हेडफोनमधून संगीत ऐकणं, मोटरसायकल आणि लीफब्लोअर्स (पानं आणि गवत कापताना वापरले जाणारे ब्लोअर्स) मधून येणारा मोठा आवाज यामुळं कालांतरानं श्रवणशक्ती कमी होऊ शकते आणि टिनिटस (कानात आवाज येण्याचा आजार) होऊ शकतो.

वाढती वाहतूक आणि शाळांमधील गर्दीमधून येणारा नको असलेला किंवा त्रासदायक आवाज म्हणजेच ध्वनी प्रदूषणाचा लहान बालकं आणि मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.

विशेषकरून ही बाब सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास पार्श्वभूमीतील मुलांच्या बाबतीत खरी आहे. कारण या मुलांना अधिक मोठ्या आवाजाच्या पातळीला तोंड द्यावं लागतं.

ब्यूनॉस आयर्स पासून ते बार्सिलोना पर्यत जगभरातील अनेक शहरांनी ध्वनी प्रदूषण हाताळण्यासाठी, मुलांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी शहरामधील हिरवे पट्टे वाढवून वाहनांची वेग मर्यादा कमी करून आणि ध्वनी मीटरचा वापर करून पादचाऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे.

बधीर करणारे रस्ते

अमेरिकेत आणि युरोपियन युनियनमध्ये प्रामुख्यानं रस्ते, रेल्वेमार्ग आणि विमानांची वाहतूक यातून ध्वनी प्रदूषण होतं आहे.

2022 च्या अभ्यासातून असं आढळून आलं आहे की, स्पेनमधील बार्सिलोनातील प्राथमिक शाळेतील रस्त्यावरील ट्रॅफिकच्या गोंगाटाचा सामना करावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष एकाग्र करण्याचा कालावधी कमी झाला आहे किंवा मंदावला आहे.

या गोष्टी प्रश्न सोडवणं, तर्क मांडणं, गणित आणि भाषेचे आकलन करणं यासारख्या शिक्षणातील अनेक महत्त्वाच्या पैलूंसाठी आवश्यक मानल्या जातात. साहजिकच स्मरणशक्ती कमी झाल्याचा किंवा एकाग्रता कमी झाल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो.

ध्वनिक्षेपकावर बोलणाऱ्या महिलेचं चित्र

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/BBC

फोटो कॅप्शन, रस्त्यावरील ट्रॅफिकच्या गोंगाटामुळे मुलांची कृतीशील स्मरणशक्ती आणि एकाग्रतेचा कालावधी यात घट होते
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या अभ्यासात स्पेनमधील बार्सिलोनातील 38 शाळांमधील 7 ते 10 वयोगटातील 2,700 मुलांची वर्षातून चार वेळा चाचणी घेण्यात आली आहे.

संशोधकांनी ध्वनी प्रदूषणाची सरासरी आधारभूत पातळी निश्चित करण्यासाठी शाळेच्या प्रत्येक वर्गातील विशिष्ट ठिकाणी असणारा बाहेरील आवाज मोजला.

त्यांनी सहा महिने या प्रक्रियेची पुनरावृत्ती केली. वर्षभराच्या कालावधीत संशोधकांनी मुलांची अल्पकालावधीसाठी स्मरणशक्ती आणि सतर्कचे किंवा लक्ष देण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी दर तीन महिन्यांनी कॉग्निटिव्ह टेस्ट घेतल्या. या चाचण्या त्यांनी ऑनलाईन पद्धतीने घेतल्या.

"मुलांच्या विकासादृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या टप्प्यांवर आवाजाच्या वाढलेल्या पातळीचा किंवा ध्वनी प्रदूषणाचा मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम होतो."

बार्सिलोनात करण्यात आलेला अभ्यास हा आधीच्या संशोधनावर आधारलेला होता. या अभ्यासातून असं आढळून आलं की, मेंदूच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर रस्ते, हवाई आणि रेल्वेमार्गावरील ट्रॅफिकमुळे निर्माण होणाऱ्या गोंगाटाचा मुलांच्या संज्ञानात्मक (cognitive)क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

वर्गातील अनावश्यक आवाजामुळं मुलांवर अनेक संभाव्य नकारात्मक परिणाम होऊ शकतात असंही अभ्यासात आढळळं आहे.

उदाहरणार्थ मुलांमध्ये अशी अवस्था येते ज्यात त्यांना परिस्थिती बदलण्याची क्षमता नसल्यासारखं वाटतं. त्यातून मुलांमध्ये एकप्रकारची असह्य असल्याची (learned helplessness) भावना निर्माण होते. त्यांच्या आसपासच्या वातावरणावर नियंत्रणाच्या अभावामुळं शिकण्याची प्रेरणा किंवा उत्साह नसतो, त्याचं लक्ष किंवा एकाग्रता कमी होते.

गोंगाट किंवा मोठा आवाज म्हणजे काय?

बार्सिलोनात करण्यात आलेल्या अभ्यासातून पहिल्यांदाच आवाजातील चढउताराच्या परिणामांची तपासणी करण्यात आली. यात संशोधकांना आढळलं की, वर्गाबाहेरील ट्रॅफिकमधून येणाऱ्या कारच्या हॉर्नच्या किंवा इंजिनाच्या आवाजात अचानक होणाऱ्या चढउतारांमुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता अधिक असते. बाहेरून येणाऱ्या आवाजात चढउतारांचा विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होतो.

यामुळं आवाजाची पातळी सरासरी आवाजापेक्षा कमी असली तरी वर्गातील महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांकडून सुटू शकते किंवा चुकवली जाऊ शकते. कारण त्यांच्या क्षमतेवर ध्वनी प्रदूषणाचा परिणाम झालेला असतो.

मारिया फोरास्टर या बार्सिलोनात करण्यात आलेल्या अभ्यासातील प्रमुख लेखिका आहेत.

त्या महामारी विज्ञानातील (epidemiology)संशोधक असून ध्वनी आणि आरोग्यावरील तज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते, आवाजाच्या चढउतारांची मोजणी करण्यासाठी कोणतीही आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे नाहीत. त्यामुळं संशोधकांनी आवाजाच्या चढउतारांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं.

लहान मुलीचं चित्र

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/BBC

फोटो कॅप्शन, ट्रॅफिकच्या गोंगाटाचा मुलांच्या मेंदूचा विकास होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यांच्या काळातील संज्ञानात्मक क्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो

वर्गात शिकवण्यासाठी चांगलं वातावरण राहावं आणि शिकण्यासाठी चांगली स्थिती राहावी यासाठी आवाजाची पातळी 35 डेसिबल्सपेक्षा कमी असण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)केलेली आहे. इथं लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, बार्सिलोनातील निम्म्याहून जास्त लोकसंख्येला सकाळी 8 ते रात्री 10 वाजेदरम्यान 65 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाजाला सामोरं जावं लागतं.

"जी मार्गदर्शक तत्वं उपलब्ध आहेत त्यामध्ये आवाजामधील चढउतार आणि सर्वोच्च पातळीचा उल्लेख नाही. प्रत्येक वेळी आवाजाची सर्वोच्च पातळी विद्यार्थ्यांच्या लक्ष देण्याच्या किंवा एकाग्रतेच्या कालावधीवर आणि कृतीशील स्मरणशक्तीवर परिणाम करू शकते," असं फोरास्टर सांगतात.

फोरास्टर यांच्या आणखी एका अभ्यासात आढळलं की, वातावरणातील आवाजाशी जास्तीचा संबंध आल्यास मुलांच्या मेंदूतील जो श्रवणविषयक भाग असतो त्याच्या कार्यात्मक परिपक्वतेमध्ये अडथळे येऊ शकतात. मेंदूतील हा भाग आवाजाशी संबंधित माहितीवर प्रक्रिया करतो.

लंडनमधील बर्कबेक विद्यापीठाच्या 2019 च्या एका अभ्यासात शाळेतील वर्गांमधील आवाजाच्या परिणामांचं विश्लेषण करण्यात आलं.

या अभ्यासातून आढळून आलं की, खासकरून 5-11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जर निवडक लक्ष देण्याची क्षमता (आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची आणि अनावश्यक गोष्टी टाळण्याची क्षमता) कमी प्रमाणात असली आणि विचार, भावनांवर नियंत्रण ठेवण्याची आणि प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करण्याची क्षमता कमी प्रमाणात असली तर त्यांच्यावर आवाजाचा अधिक परिणाम होतो.

गोंगाटामुळे कान बंद केलेल्या मुलाचं चित्र

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/BBC

फोटो कॅप्शन, ट्रॅफिकमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा खासकरून लहान मुलांवर परिणाम होतो

"जर मुलांची काम करतानाची स्मरणशक्ती कमकुवत असेल आणि त्यांचं निवडक लक्ष देण्याची क्षमता आणि विचार किंवा भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता या दोन्ही क्षमता फारशा चांगल्या नसतील तर त्यांच्याभोवती असलेल्या आवाजाचा त्यांच्यावर अधिक परिणाम होईल, ते अधिक विचलित होतील," असं नताशा किरखम सांगतात.

त्या लंडनमधील बर्कबेक विद्यापीठात विकासात्मक मानसशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि या अभ्यासाच्या सह-लेखिका आहेत.

"प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत जेव्हा मुलांच्या अवतीभोवती खूप गोंगाट असतो, तेव्हा त्यांची शैक्षणिक कामगिरी फारच वाईट असते हे आम्हाला ठाऊक आहे," असं त्या सांगतात.

गरीब वस्त्यांमध्ये अनेकदा खूप जास्त प्रमाणात ध्वनी प्रदुषण असतं. 2023 च्या एका अभ्यासातून आढळलं की, टेक्सासमधील शाळांमधील कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आणि मोफत किंवा स्वस्तातील अन्नासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचा (म्हणजेच गरीब विद्यार्थ्यांचा) रस्त्यांवरील गोंगाटाशी खूप जास्त प्रमाणात संपर्क येतो.

"कमी संसाधनं असलेल्या गरीब वस्त्यांमधील शाळेत गेल्यामुळे आणि इतर घटकांमुळे गोंगाटाच्या संपर्कात आल्यानं शिकण्यावर खरोखरंच प्रचंड विपरित परिणाम होऊ शकतो," असं किरखम सांगतात.

गोंगाट आणि तणाव यांच्याशी सततचा संबंध असल्यास त्याचे आयुष्यभरासाठीचे परिणाम असू शकतात, असं संशोधनातून दिसतं.

"जर आवाजामुळे तुम्हाला सतत जाग येत असेल त्यामुळे तणावाला शरीरातील कोर्टिसोल हार्मोन्सद्वारे दिला जाणारा प्रतिसाद वाढू शकतो. (या हार्मोनमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि परिणामी मेंदूकडून होणारा ग्लुकोजचा वापरदेखील वाढतो.) परिणामी कालांतरानं बालपणापासून ते प्रौढत्वापर्यत शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर अत्यंत हानिकारक परिणाम होऊ शकतात," असं इरोइस ड्युमॉन्थिल म्हणतात. ते लंडनमधील बर्कबेक विद्यापीठात कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्सचे प्राध्यापक आहेत.

"बालपणी गोंगाटाशी खूप जास्त संबंध आल्यामुळे प्रौढावस्थेत स्मरणशस्क्ती आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो" - इरॉइस ड्युमॉन्थिल

गोंगाटाशी दीर्घकाळ सततचा संपर्क आल्यामुळे शरीरातील मध्यवर्ती मज्जासंस्थेवर आणि मेंदूमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यातून ह्रदयविकार, ह्रदयविकाराचा झटका, स्मृतिभ्रंश आणि संज्ञानात्मक घसरण होण्याची शक्यता वाढते.

"म्हणूनच बालपणात गोंगाटाशी संपर्क आल्यामुळे प्रौढावस्थेत स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते," असं ड्युमॉन्थिल सांगतात.

कार-मुक्त परिसर

प्रचंड गोंगाटपासून मुलांचा बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शाळांच्या आसपासची वाहतूक कमी करणं, असं फोरास्टर सांगतात.

यासाठी शहरांचे योग्य नियोजन आणि आखणी केली पाहिजे. व्यस्त रस्त्यांपासून शाळा दूर ठेवल्या पाहिजेत, आणि शाळेच्या परिसरात उद्याने आणि हिरवा परिसर वाढवला पाहिजे. यामुळे देखील मुलांना शिकण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होऊ शकते, असं त्या सांगतात.

बार्सिलोनात या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी तिथे तथाकथित सुपरिलेस किंवा सुपरब्लॉक्सचा वापर केला जातो आहे. या विशिष्ट प्रकारच्या रचनेत वाहतूक किंवा वाहनांसाठी बंदी असलेले छोटे परिसर असतात, तिथे हिरव्यागार जागा असतात. तिथं लोक व्यायाम करू शकतात किंवा एकत्र येऊ शकतात.

(यात परिसराची रचना अशा पद्धतीनं केली जाते की वाहनांच्या वापराची जागा कमी होते आणि त्या परिसराच्या फक्त परिघावरील रस्त्यांवर वाहनांचा परवानगी दिली जाते)

1993 मध्ये या प्रकारच्या शहर रचनेची संकल्पना पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करणे हा या शहर रचनेच्या संकल्पनेमागचा उद्देश आहे. त्यासाठी यात कार पेक्षा सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. त्याचबरोबर पार्किंग एरिया पेक्षा क्रिडांगणं आणि झाडांना प्राधान्य दिलं जातं.

सेन्सर्स आणि सोनोमीटर्सच्या साहाय्यानं वर्षभरात गोळा केलेल्या आणि 2021 च्या अहवालात संकलित करण्यात आलेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील निवासी परिसरांमधील ध्वनी आणि वायू प्रदूषणात सुपरब्लॉक्समुळे घट झाल्याचं दिसून आलं आहे.

सॅन अँटोनी सुपलब्लॉकच्या निर्मितीमुळं दिवसा असणाऱ्या सरासरी गोंगाटात किंवा ध्वनी प्रदूषणात 3.5 डेसिबल्सची म्हणजेच 5.2 टक्क्यांची घट झाली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी देखील सुपरब्लॉक्सची रचना उपयुक्त आहे.

ध्वनी प्रदूषणापासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी बार्सिलोनामध्ये कार-मुक्त परिसर लागू करण्यात आला आहे

फोटो स्रोत, Emmanuel Lafont/BBC

"शाळांभोवतीचं ट्रॅफिक कमी करणं हा मुलांचा ध्वनी प्रदूषणापासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो."

फोरास्टर सांगतात, "वायू प्रदूषण आणि गोंगाटाशी येणारा संपर्क कमी करण्यास सुपरब्लॉक्स निश्चितपणे उपयुक्त आहेत. कारचा वापर करण्यास अटकाव करून आणि पादचाऱ्यांना प्राधान्य देऊन सुपरब्लॉक्स शहरातील एकूणच ट्रॅफिक कमी करण्यास मदत करतात."

2030 पर्यत 503 सुपरब्लॉक्स निर्माण करण्याची योजना बार्सिलोना आखत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा एक भाग म्हणून ही योजना असणार आहे. शहरातील तीनपैकी एका रस्त्याचं रुपांतर ट्रॅफिक नसलेल्या शांत, हिरव्यागार परिसरात करण्याचं आणि शहरातील 80 टक्के प्रवास कारशिवाय पायी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं किंवा मोटरसायकलनं केला जाईल याची खातरजमा करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

ब्युनोस आयर्स, व्हिएन्ना, लॉस एंजेलिस आणि बोगोटासारखी जगभरातील शहरं बार्सिलोनाप्रमाणंच सुपरब्लॉक्सची निर्मिती करत आहेत.

शाळा आणि शाळेच्या आसपासच्या शांत परिसराचा आणखी एक फायदा असू शकतो. तो म्हणजे मुलं आनंदी राहण्याचा. किरखम यांच्या मते, गोंगाटामुळं फक्त मुलांच्या शिकण्यावरच परिणाम होत नाही तर त्यांच्या भावनांवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

किरखन यांनी कोरोनाच्या संकट काळात केलेल्या एका होम स्कूलिंगच्या अभ्यासातून असं आढळलं की, गोंगाट किंवा कोलाहल असलेल्या घरांमधील आणि गोंगाट असणाऱ्या वर्गात शिकणाऱ्या किशोरवयीन मुलांना सर्वसाधारणपणे गोंगाट अधिक त्रासदायक वाटतो.

"गोंगाटामुळे फक्त लक्ष विचलित होत नाही तर त्यासंदर्भात एक भावनिक घटकसुद्धा असतो. अशावेळी मुलं चिडचिड करतात," असं किरखम सांगतात.