देशातील एक टक्का श्रीमंत लोकांकडे आहे एवढी संपत्ती, अहवालात महिलांबाबत काय म्हटले?

कामगार महिला

फोटो स्रोत, Getty Images

एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील सर्वाधिक विषमता असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट 2026 मधून जगातील उत्पन्न आणि संपत्तीशी निगडीत आकडेवारी समोर आली आहे.

अर्थतज्ज्ञ लुकस चांसेल, रिकार्डो गोमेज-कॅरेरा, रोवाइडा मोशरिफ आणि थॉमस पिकेटी यांनी हा अहवाल तयार केला आहे.

या अहवालातून समोर आलं आहे की भारताच्या एकूण उत्पन्नातील जवळपास 58 टक्के भाग फक्त 10 टक्के लोकांच्या हाती येतो आहे.

तर उर्वरित 50 टक्के लोकांचा भारताच्या उत्पन्नातील वाटा फक्त 15 टक्केच आहे.

भारतात ही विषमता फक्त उत्पन्नाच्या बाबतीतच नाही. अहवालानुसार संपत्तीच्या बाबतीत ही दरी किंवा असमानता ही दरी आणखी मोठी आहे.

देशातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकांकडे देशातील जवळपास 65 टक्के संपत्तीची मालकी आहे. यातीलही टॉप एक टक्का श्रीमंत लोकांकडेच देशातील 40 टक्के संपत्ती आहे.

लिंगाच्या आधारे वेतनात असणारी विषमता जगातील सर्वच क्षेत्रांमध्ये आहे. अहवालात म्हटलं आहे की, पुरुषांपेक्षा अधिक काम करूनही महिलांना कमी वेतन मिळतं आहे.

भारताबद्दल अहवालात काय म्हटलं आहे?

2018 आणि 2022 नंतरचा हा तिसरा वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट आहे. हा अहवाल जगभरातील वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबशी निगडीत 200 हून अधिक स्कॉलर्सच्या मदतीनं तयार करण्यात आला आहे.

वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचे सह-संचालक थॉमस पिकेटी या अहवालाबद्दल म्हणाले, "हा अहवाल राजकीयदृष्ट्या आव्हानात्मक काळात आला आहे. मात्र हे आता आधीच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या समानतेसाठी चालवण्यात आलेली आंदोलनं सुरू ठेवतच आपण आगामी दशकांमध्ये सामाजिक आणि हवामान बदलांशी संबंधि आव्हानांना तोंड देऊ शकू."

ग्राफिक्स

या अहवालानुसार, 2014 ते 2024 दरम्यान भारतात उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून वरचे 10 टक्के लोक आणि खालच्या 50 टक्के लोकांच्या उत्पन्नातील तफावत स्थिर राहिली आहे.

अहवालात म्हटलं आहे की भारतातील सरासरी वार्षिक दरडोई उत्पन्न (पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणजे क्रयशक्तीच्या दृष्टीकोनातून) 6,200 युरो म्हणजे भारतीय रुपयानुसार जवळपास साडे सहा लाख रुपये आहे.

वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्टनुसार, भारतात प्रती व्यक्ती संपत्ती किंवा मालमत्ता जवळपास 28 हजार युरो आहे. भारतीय रुपयानुसार ती जवळपास 29 लाख रुपयांहून अधिक आहे.

महिलांच्या बाबतीत भेदभाव

या अहवालात म्हटलं आहे की, लिंगाच्या आधारे वेतनाच्या बाबतीत असणारी असमानता जगभरात आढळून येते. असंघटित क्षेत्रात ही समस्या अधिक आहे.

या अहवालात म्हटलं आहे की जर महिला घरात करत असलेल्या कामांच्या तासांचाही समावेश केला, तर त्या एका आठवड्यात सरासरी 53 तास काम करतात. तर पुरुष 43 तास काम करतात.

महिलांच्या बाबतीत भेदभाव

फोटो स्रोत, Getty Images

अहवालात म्हटलं आहे की जर महिलांना वेतन मिळत नसलेल्या या कामांना बाजूला जरी ठेवलं तरीदेखील पुरुषांना प्रति तास मिळत असलेल्या वेतनाच्या तुलनेत महिलांना फक्त 61 टक्केच वेतन मिळतं.

जर वेतन मिळत नसलेल्या श्रमाला लक्षात घेतलं तर ही आकडेवारी फक्त 32 टक्क्यांवर येते.

अहवालात पुढे म्हटलं आहे की भारतात श्रम क्षेत्रातील महिलांचा सहभागदेखील खूपच कमी आहे. फक्त 15.7 टक्के महिलांचाच मनुष्यबळात समावेश आहे. या आकडेवारीमध्ये गेल्या एक दशकापासूनच कोणतीही सुधारणा झालेली नाही.

ग्राफिक्स

अहवालात म्हटलं आहे की जगभरात महिला आणि पुरुषांच्या जबाबदारीतील या असमान वाटपामुळे महिलांसाठी करियरच्या संधी मर्यादित असतात.

त्यामुळेच त्यांचा राजकारणातील सहभागदेखील कमी असतो आणि त्या कमी संपत्ती कमावतात.

अहवालानुसार, भारतात उत्पन्न, संपत्ती आणि लैंगिक असमानता खोलवर रुजलेली आहे. अर्थव्यवस्थेत सातत्यानं असलेली 'स्ट्रक्चरल डिव्हाईड' म्हणजे विभागणी त्यातून समोर येते.

अहवालातील इतर महत्त्वाचे मुद्दे

अहवालात म्हटलं आहे की विषमतेच्या बाबतीत जगभरातील अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती आहे.

अहवालानुसार, जगातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या 10 टक्के लोकांची कमाई उर्वरित 90 टक्क्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त आहे. म्हणजे 90 टक्के लोकांचा जगातील एकूण उत्पन्नातील वाटा फक्त 10 टक्के आहे.

संपत्तीच्या बाबतीत ही दरी आणखी मोठी आहे. कारण टॉप 10 टक्के श्रीमंत लोकांकडे जगातील एकूण संपत्तीच्या तीन चतुर्थांश संपत्ती आहे. तर कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांकडे जगातील फक्त दोन टक्के संपत्ती आहे.

ग्राफिक्स

अहवालानुसार, असमानता सातत्यानं वाढत चालली आहे. नव्वदच्या दशकापासून जगातील अब्जाधीशांच्या संपत्तीत वार्षिक पातळीवर आठ टक्क्यांची वाढ झाली आहे. लोकसंख्येतील खालच्या अर्ध्या भागाच्या संपत्ती वाढीच्या वेगापेक्षा हा जवळपास दुप्पट वेग आहे.

अहवालात म्हटलं आहे की, या दरम्यान, गरिबांनीदेखील प्रगती केली आहे. मात्र अब्जाधीशांच्या संपत्तीत होत असलेल्या वाढीच्या तुलनेत गरिबांच्या उत्पन्नात झालेली वाढ जवळपास नगण्यच आहे.

देशातील टॉप एक टक्का श्रीमंत लोकांकडे देशातील 40 टक्के संपत्ती

फोटो स्रोत, Getty Images

पैसे-संपत्तीची सरासरी लक्षात घेतली तर त्यासंदर्भातील आकडेवारीदेखील धक्कादायक आहे.

उदाहरणार्थ, खालच्या 50 टक्के लोकांकडे सरासरी जवळपास 6,500 युरोची संपत्ती किंवा मालमत्ता आहे. तर टॉप 10 टक्के लोकांकडे सरासरी जवळपास 10 लाख युरोची संपत्ती किंवा मालमत्ता आहे.

जगातील 56 हजार प्रौढ लोकांकडे सरासरी जवळपास एक अब्ज युरोची संपत्ती आहे. फक्त 56 लोकांची सरासरी संपत्ती (प्रति व्यक्ती) जवळपास 53 अब्ज युरो आहे.

अहवालात सूचना करण्यात आली आहे की योग्य धोरणांद्वारे ही विषमता कमी केली जाऊ शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)