इराणनं ज्या हैफा शहरावर हल्ला केला, त्या शहराचं अदानींशी 'असं' आहे कनेक्शन

इस्रायलमधील हैफा शहर

फोटो स्रोत, AHMAD GHARABLI/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, इराणने केलेल्या हल्ल्यानंतर हैफा शहरातील परिस्थिती (16 जून 2025)

इराण आणि इस्रायलमधील हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. इस्रायलने इराणच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य करण्यासाठी अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत.

प्रत्युत्तरादाखल, इराणनेही क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यापैकी काही इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालीला भेदून निवासी भागात पोहोचले.

इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 224 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, इस्रायलमधील मृतांचा आकडा 24 वर पोहोचला आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की, इराणच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तेल अवीव, हैफा आणि इतर शहरांमधील रहिवाशांचा समावेश आहे.

इराणच्या हल्ल्यांमध्ये तेल अवीव आणि हैफा या इस्रायलच्या दोन प्रमुख शहरांना लक्ष्य करण्यात आले.

हैफा हे इस्रायलमधील उत्तरेकडील बंदर असलेलं शहर आहे. तिथे इस्रायलचे एक प्रमुख बंदर आणि तेल शुद्धीकरण कारखाना आहे.

याआधी, इराणच्या सरकारी टीव्हीने वृत्त दिले होते की, तेल अवीव, हैफा आणि इतर इस्रायली शहरांवर 'डझनभर इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन' हल्ला करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत, हैफाला लक्ष्य करण्यामागील कारणे काय आहेत आणि या शहराचा भारताशी काय खास कनेक्शन आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

इस्रायलसाठी हैफा शहर इतके खास का आहे?

इस्रायलशी संबंधित विषयांचे तज्ज्ञ असलेले ज्येष्ठ पत्रकार हरेंद्र मिश्रा सध्या जेरुसलेममध्ये आहेत.

बीबीसी प्रतिनिधी अभय कुमार सिंह यांच्याशी बोलताना हरेंद्र मिश्रा यांनी हैफा हे शहर इस्रायलसाठी किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं, "हैफा हे इस्रायलमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागात असलेले हे शहर केवळ लोकसंख्येच्या दृष्टीनेच नव्हे, तर आर्थिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे आहे."

ते म्हणतात की, 'या शहरात मायक्रोसॉफ्ट असो, गुगल असो किंवा इंटेल असो, सर्व हाय-टेक कंपन्यांची कार्यालये देखील आहेत.'

हैफामध्ये इस्रायलमधील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. त्यामुळे शहराची आर्थिक भूमिका आणखी महत्त्वाची बनते.

हैफा येथील तेल शुद्धीकरण कारखान्यावर इराणचा हल्ला

सोमवारी (16 जून) बीबीसीने तेल शुद्धीकरण कारखान्यातून धूर निघत असल्याचे दाखवणाऱ्या व्हीडिओची पुष्टी केली.

या व्हीडिओमध्ये इस्रायलचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना असलेल्या भागातून धुराचे लोट उठताना दिसत आहे. हा व्हीडिओ इराण हल्ल्यानंतरचा आहे.

बीबीसीने व्हीडिओमधील अनेक प्रमुख फ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केलं आणि त्या वृत्तसंस्थेच्या फोटोंशी तुलना केली. त्यातून रिफायनरीवर हल्ला झाल्याची पुष्टी झाली.

त्यानंतर बीबीसीने व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या प्रमुख वैशिष्ट्यांची आणि वृत्तसंस्थेच्या फोटोंची गुगल अर्थ आणि त्या परिसरातील जुन्या फुटेजशी तुलना केली.

इस्रायली मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिफायनरी चालवणाऱ्या बझान ग्रुपने म्हटले आहे की, रात्रीच्या वेळी इराणी क्षेपणास्त्रांनी त्यावर हल्ला केला होता. त्यामुळे पाइपलाइन आणि ट्रान्समिशन लाईन्सचे नुकसान झाले होते.

हैफा

फोटो स्रोत, AHMAD GHARABLI/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, हैफा शहरात जेथे इराणकडून हल्ला झाला तेथे मदतकार्य करताना इस्रायलच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बझान ग्रुपने असेही म्हटले आहे की, रिफायनरीत तेल शुद्धीकरणाचे काम सुरू आहे, परंतु साइटचे इतर भाग बंद करण्यात आले आहेत.

तेल शुद्धीकरण कारखान्याव्यतिरिक्त, हैफामध्ये इस्रायलचे बंदर देखील आहे. त्यामुळेच हे शहर अनेक प्रकारे महत्त्वाचे ठरते.

हरेंद्र मिश्रा म्हणतात, "हैफा बंदर खूप महत्त्वाचे आहे. तिथून मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होते. आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले, तर इस्रायलचा बाह्य जगाशी पहिला संपर्क याच शहरातून स्थापित झाला."

2023 मध्ये अदानी समूहाने हैफा येथील एक बंदरही विकत घेतले. या बंदरातील 70 टक्के भाग अदानी समूहाकडे आहे, तर 30 टक्के हिस्सा इस्रायलच्या गॅडोट समूहाकडे आहे.

शहराच्या लोकसंख्याशास्त्राचे स्पष्टीकरण देताना हरेंद्र मिश्रा म्हणतात की, सुमारे 4 लाख लोकसंख्या असलेले हे शहर सहअस्तित्वाचे एक मॉडेल देखील मानले जाते.

"येथे अरब लोकसंख्या बरीच आहे. यामध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन दोघेही आहेत. बहाई समुदायाचे एक धार्मिक स्थळ देखील आहे. दिल्लीत कमळ मंदिर आहे तसेच येथे बहाई बाग आहे."

हैफा येथे बहाई जागतिक केंद्रदेखील आहे.ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.

इराणकडून फक्त तेल अवीव आणि हैफाच का लक्ष्य?

इराण हैफाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला लक्ष्य करत आहे हे शक्य आहे का? यावर हरेंद्र मिश्रा म्हणतात, "मला वाटते की इराण अशा शहरांना लक्ष्य करत आहे ज्यांचे धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्व सर्वाधिक आहे. इराणणे जेरुसलेमला आतापर्यंत लक्ष्य केलेले नाही कारण ते अनेक धर्मांसाठी पवित्र स्थान आहे."

ते म्हणतात की, इराणची क्षेपणास्त्रे बहुतेक निवासी भागात पडली आहेत.

इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, आतापर्यंत बहुतेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली आहेत, परंतु 10-12 क्षेपणास्त्रे निवासी भागात पडली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.

हैफा आणि तेल अवीव सारखी शहरे दाट लोकवस्तीची आहेत. त्यांना इस्रायली अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते. जेरुसलेममध्ये लोकवस्ती दाट आहे, पण तिथे इस्लामिक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे कदाचित इराणने अद्याप त्यावर हल्ला केलेला नाही, असेही ते नमूद करतात.

भारताचा हैफाशी 'संबंध'

भारत आणि हैफा यांच्यातील संबंधाची मुळे 1918 च्या एका ऐतिहासिक कथेशी जोडलेली आहेत.

पहिल्या महायुद्धादरम्यान, ब्रिटिश साम्राज्याच्या वतीने लढणाऱ्या भारतीय घोडदळ सैन्याने तुर्की, जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरीच्या संयुक्त सैन्याच्या ताब्यातून हैफा शहर मुक्त केले होते.

हरेंद्र मिश्रा म्हणतात की, या इतिहासाला इस्रायलमध्येही पूर्ण मान्यता मिळाली आहे. "हा इतिहास हैफातील शाळांमध्ये शिकवला जातो. जर तुम्ही मुलांना 'हैफा हिरो' कोण आहे असे विचारले तर ते मेजर दलपत सिंगचे नाव घेतील."

हैफा

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, हैफामधील बंदराचा फोटो (संग्रहित)

या युद्धात जोधपूर लान्सर्सचे कमांडर मेजर दलपत सिंग शेखावत मारले गेले आणि नंतर त्यांना मिलिटरी क्रॉसने सन्मानित करण्यात आले.

या लढाईत ब्रिटीश सरकारच्या वतीने लढताना 44 भारतीय सैनिक मारले गेले. हे घोडदळाच्या शेवटच्या मोठ्या लढाईचे उदाहरण म्हणून इतिहासात देखील पाहिले जाते.

हरेंद्र म्हणतात, "भारतीय दूतावास आणि हैफा नगरपालिका दरवर्षी एकत्रितपणे हैफा दिन साजरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते, तेव्हा त्यांनीही तिथे जाऊन भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली."

राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती चौकाचे नाव बदलून तीन मूर्ती हैफा चौक करण्यात आले आहे. 2018 मध्ये भारतात झालेल्या या समारंभाला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू देखील उपस्थित होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)