इराणच्या अंडरग्राऊंड 'मिसाईल सिटी' काय आहेत आणि इस्रायलला त्याचा धोका का आहे?

इराणच्या "क्षेपणास्त्रांच्या शहरां"पैकी एका शहराच्या आतील भाग, जिथे खैबर शेकन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे.

फोटो स्रोत, Tansim

फोटो कॅप्शन, इराणच्या "क्षेपणास्त्रांच्या शहरां"पैकी एका शहराच्या आतील भाग, जिथे खैबर शेकन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा साठा आहे.
    • Author, जुआन फ्रान्सिस्को अलोन्सो
    • Role, बीबीसी न्यूज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिकेनी इराणमधील फोर्डो आणि इतर आण्विक केंद्रांवर हल्ले केले आहेत. इराणमध्ये असलेली आण्विक केंद्रे कोणती? या आण्विक केंद्रांचा इस्रायलला धोका आहे का? हे या लेखातून आपण समजून घेऊ.

"विजयात भूगोलाचा वाटा असतो."

प्रुशियन लष्करी अधिकारी कार्ल वॉन क्लॉजविट्झ (1780-1831) यांचं हे निरीक्षण आहे. त्यांनी त्यांच्या 'ऑन वॉर' या पुस्तकात लिहिलं होतं की नद्या, जंगलं, डोंगर आणि इतर भौगोलिक वैशिष्ट्यं 'शत्रूच्या आगेकूचला' अडथळा आणण्याव्यतिरिक्त, 'शत्रूला न दिसता आपल्याला तयारी करण्याची संधी' देखील देतात.

इराणच्या सैन्यानं हा मुद्दा लक्षात घेऊन त्यानुसार व्यूहरचना केली आहे.

त्यानुसार, इराणच्या सैन्यानं त्यांच्या देशात पसरलेल्या खडकाळ डोंगरांचा फायदा घेत, त्यांच्या खाली भूमिगत बोगद्यांचं जाळं तयार केलं आहे. या बोगद्यांमध्ये त्यांनी त्यांची वेगवेगळ्या आकाराच्या आणि क्षमतांच्या क्षेपणास्त्रांचा साठा केला आहे.

या जमिनीखाली तयार केलेल्या व्यवस्थेला 'मिसाईल सिटीज' म्हणजे 'क्षेपणास्त्रांची शहरं' असं नाव देण्यात आलं आहे.

इस्रायलनं इराणवर बॉम्बहल्ला करून त्यांचा अणु कार्यक्रम नष्ट केल्याचा दावा करण्याच्या काही महिने आधी इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी या क्षेपणास्त्रांच्या शहरांमधील काही नवीन गोष्टी उघड केल्या होत्या.

ग्राफिक्स

इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) यांनी 'मिसाईल सिटीज' किंवा 'क्षेपणास्त्रांची शहरं' हा शब्दप्रयोग ते गेल्या कित्येक दशकांपासून बांधत असलेल्या भूमिगत रॉकेट किंवा क्षेपणास्त्रं तळांचं वर्णन करण्यासाठी वापरला आहे.

या भूमिगत तळांमध्ये देशभरात पसरलेल्या विस्तीर्ण, खोल, एकमेकांशी जोडलेल्या बोगद्यांची मालिका आहे. ती बहुतांशपणे डोंगराळ भागात आहे, असं बीबीसीच्या फरजाद सेफिकरन यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं.

या भूमिगत बोगदे किंवा तळांमध्ये बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांबरोबरच ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालीसारख्या व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जाते आणि साठवणूक केली जाते.

इराणचा दावा आहे की त्यांच्याकडे असे "अनेक" भूमिगत तळ आहेत, त्यातील अनेक तळ जमिनीखाली अर्ध्या किलोमीटर खोलीवर आहेत.

फोटो स्रोत, CORTESÍA DE SEPAHNEWS Vía GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, इराणचा दावा आहे की त्यांच्याकडे असे "अनेक" भूमिगत तळ आहेत, त्यातील अनेक तळ जमिनीखाली अर्ध्या किलोमीटर खोलीवर आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आयआरजीसीनं फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये फास्ट मोशन फुटेजमध्ये दिसतं की ट्रेलरला रॉकेट लाँचर जोडलेल्या जवळपास एक डझन ट्रकची रांग दिसते. ते ट्रक वळणदार बोगद्यांमध्ये उभे केलेले आहेत.

त्यानंतर समुद्रकिनाऱ्याचं दृश्य येतं, ज्यात ट्रकच्या मागच्या बाजूनं क्षेपणास्त्र समुद्रात डागलं जातं.

मात्र बीबीसीच्या लेखात नमूद करण्यात आलं आहे की इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं आहे की ही 'क्षेपणास्त्रांची शहरं' फक्त रॉकेट किंवा क्षेपणास्त्र साठवण्याचे तळ नाहीत, तर ते 'वापरात येणाऱ्या रॉकेटची निर्मिती करण्यासाठीचे' कारखाने म्हणून देखील काम करतात.

हे असे किती तळ आहेत आणि ते नेमके कुठे आहेत, याबद्दल माहिती नाही. मात्र, आयआरजीसी एरोस्पेस फोर्सचे कमांडर, जनरल अमिर अली हाजिझादेह यांनी त्यांचे नवीन तळ सादर करताना सांगितलं की त्यांच्याकडे असे 'अनेक' तळ आहेत.

इस्रायलनं अयातुल्ला अली खामेनी यांच्या राजवटीविरोधात सुरू केलेल्या सध्याच्या लष्करी मोहिमेच्या सुरुवातीला मारले गेलेल्या इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये जनरल अमिर अली हाजिझादेह यांचाही समावेश होता.

ग्राफिक्स

इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी, इस्रायलच्या संभाव्य हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही भूमिगत 'क्षेपणास्त्रांची शहरं' बांधली आहे. उदाहरणार्थ, 13 जून पासून इराणवर होत असलेले हल्ले.

'उपग्रहांना छडा लावता येऊ नये यासाठी इराणनं क्षेपणास्त्र साठवण्यासाठी आणि त्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी हे तळ बांधले आहेत,' असं बेहनम बेन तालेब्लू यांनी बीबीसीला सांगितलं. ते वॉशिंग्टन डी.सी. मधील फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसी या थिंक टँकमध्ये इराणवरील कार्यक्रमाचे संचालक आहेत.

दिवंगत जनरल हाजिझादेह यांनी ज्या व्हिडिओमध्ये यातील शेवटच्या तळांना दाखवलं दाखवलं होतं. त्यात ते म्हणाले होते की हे भूमिगत तळ 500 मीटर खोलीवर बांधलेले आहेत आणि त्याला काँक्रिटच्या अनेक थरांनी मजबूती देण्यात आली आहे.

जर या तळांबद्दलची ही वैशिष्ट्यं खरी असतील, तर अमेरिकेच्या सैन्याला देखील त्यांच्या सर्वात शक्तीशाली बॉम्बनं ते नष्ट करण्यात अडचण येईल, असं मायकल एलमर यांनी 2021 मधील एका लेखात मान्य केलं होतं. ते अमेरिकेचे माजी मरीन आणि लंडनमधील ग्रे डायनामिक्स या इंटेलिजन्स फर्ममध्ये विश्लेषक आहेत.

मात्र जर अमेरिकेच्या सैन्याला इराणच्या सैन्यानं खडकांमध्ये खोदून तयार केलेल्या प्रक्षेपण तळांवर (त्यांच्या काही क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण करण्यासाठी) हल्ला करण्यात यश आलं तर हे भूमिगत तळ निरुपयोगी ठरू शकतात, असं ते म्हणाले होते.

इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध आकाराच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेले डझनावारी ट्रक अनेक किलोमीटर लांबीच्या बोगद्यांमध्ये आहेत.

फोटो स्रोत, Cortesía SEPAHNEWS vía Getty Images

फोटो कॅप्शन, इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध आकाराच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेले डझनावारी ट्रक अनेक किलोमीटर लांबीच्या बोगद्यांमध्ये आहेत.

मात्र बेन तालेब्लू यांनी म्हटलं होतं की या तळांना नष्ट करण्यातील इस्रायल किंवा अमेरिकेसमोरील मुख्य आव्हान म्हणजे या तळांचा ठावठिकाणा शोधणं.

"आम्हाला आधी ते शोधावे लागतील. सध्यातरी, हे तळ नेमके कुठे आहेत ते आम्हाला माहित नाही," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

पॅट्रिक्चा बॅझिलझिक, सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज (सीएसआयएस) या अमेरिकेतील आणखी एका थिंक टँकमध्ये मिसाईल डिफेन्स प्रोजेक्टचे संचालक आहे. त्यांनीदेखील असंच मत व्यक्त केलं.

पॅट्रिक्चा बॅझिलझिक यांच्या मते, "भूमिगत लक्ष्यांवर हल्ला करणं कठीण असतं. मात्र ते अशक्य नसतं."

"इस्रायलला इराणच्या हवाई क्षेत्रावर वर्चस्व मिळवता आल्यामुळे त्यांच्या लढाऊ विमानांना या "क्षेपणास्त्रांच्या शहरांवर हल्ला करता येणं शक्य होईल. त्यामुळे इराणच्या शस्त्रास्त्रांची आणखी हानी होईल," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

इराणनं फक्त त्यांच्या क्षेपणास्त्रांसाठीच भूमिगत तळ तयार केलेले नाहीत. तर त्यांच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याचा काही भाग आणि अगदी काही जहाजं देखील भूमिगत तळांमध्ये लपवली आहेत.

ग्राफिक्स

इराणनं या भूमिगत तळांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये खैबर शेकन, हाज कासीम, इमाद, सेजिल, कादर-एच आणि पावेह क्रूझ क्षेपणास्त्रं आहेत.

इराणनं दावा केला आहे की या रॉकेट किंवा क्षेपणास्त्रांनी ते 2,000 किलोमीटर अंतरावरील देशांवर हल्ला करू शकतात. म्हणजेच ही क्षेपणास्त्रं इस्रायल, सौदी अरेबिया, भारत, रशिया किंवा चीनपर्यंत पोहोचू शकतात.

इराणनं एप्रिल 2024 मध्ये इस्रायलवर हल्ला केला होता, तेव्हा इमाद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता. त्यात मध्य इस्रायलमधील नेवातिम हवाई तळाचं नुकसान झालं होतं.

इराणनं त्यांची लढाऊ विमानं आणि युद्धनौकांचं संरक्षण करण्यासाठीदेखील बंकर्स बांधले आहेत.

फोटो स्रोत, Cortesía del Ejército iraní vía Getty Images

फोटो कॅप्शन, इराणनं त्यांची लढाऊ विमानं आणि युद्धनौकांचं संरक्षण करण्यासाठीदेखील बंकर्स बांधले आहेत.

यूएस इस्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर (आयएसडब्ल्यू) च्या अहवालांनुसार, सध्या सुरू असलेल्या संघर्षात इराणच्या सैन्याकडून सेजिल सारख्या क्षेपणास्त्रांचा वापरदेखील करण्यात आला आहे. इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीनं ही क्षेपणास्त्रं हाणून पाडली आहेत.

सेजिल हे 18 मीटर लांबीचं दोन टप्प्यांचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं आहे. 1990 च्या दशकात इराणच्या वैज्ञानिकांनी ते विकसित केलं होतं. ते सर्वात लांब पल्ल्याच्या (2,000 किलोमीटर) क्षेपणास्त्रांपैकी एक आहे.

सेजिल क्षेपणास्त्राच्या वापरातून इस्रायली हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना इराणला येत असलेल्या अडचणी दिसून येतात. कारण इराणला त्यांच्या भूप्रदेशातून खूप आतल्या ठिकाणांवरून क्षेपणास्त्र, रॉकेटचा मारा करावा लागतो आहे.

इस्रायलच्या सैन्यानं (आयडीएफ) दावा केला आहे की अयातुल्लाह अली खामेनी यांच्या राजवटीविरोधात त्यांनी सुरू केलेल्या सध्याच्या लष्करी मोहिमेच्या सुरुवातीपासून इराणच्या निम्म्या ते दोन तृतियांश क्षेपणास्त्र प्रक्षेपकांना नष्ट केलं आहे.

ग्राफिक्स

सेजिल क्षेपणास्त्राच्या बाबतीत, सीएसआयएसनं इशारा दिला आहे की सेजिल क्षेपणास्त्र आणि इराणच्या शस्त्रागारात असलेली इतर क्षेपणास्त्रं अण्वस्त्रं वाहून नेऊ शकतात. सध्या ही क्षेपणास्त्रं फक्त पारंपारिक स्फोटकं वाहून नेत आहेत.

मात्र यातून हा प्रश्न उपस्थित होतो की, ही "क्षेपणास्त्रांची शहरं" इस्रायल नष्ट करू पाहत असलेल्या इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमाशी जोडलेली आहेत का? बीबीसी तज्ज्ञांशी बोलल्यावर, त्यांनी आम्हाला खात्री दिली आहे की याचा कोणताही पुरावा नाही.

इराणनं इस्रायलवर त्यांच्या अनेक मोठ्या आणि सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे, त्यातील काही क्षेपणास्त्रांना इस्रायलच्या प्रसिद्ध आयर्न डोम या हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यश आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणनं इस्रायलवर त्यांच्या अनेक मोठ्या आणि सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे, त्यातील काही क्षेपणास्त्रांना इस्रायलच्या प्रसिद्ध आयर्न डोम या हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यश आलं आहे.

"केरमानशाहसारखे इराणचं मुख्य क्षेपणास्त्रं तळ, त्यांच्या अणुकार्यक्रमाशी थेट जोडलेले नाहीत. कारण या तळांवर पारंपारिक क्षेपणास्त्रं आहेत," असं सिद्धार्थ कौशल म्हणाले. ते युकेच्या रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट (आरयूएसआय) मध्ये रिसर्च फेलो आहेत.

"असं असलं तरी, इराणला जर अण्वस्त्रं विकसित करायची असतील तर शहाब-3 किंवा खोरमशाहर सारखी क्षेपणास्त्रं अण्वस्त्रांच्या माऱ्यासाठी उपयुक्त ठरतील," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

बेन तालेब्लू यांनी त्यांच्या वतीनं ठामपणं सांगितलं की, "जर इराणला खरोखरंच अणुकार्यक्रमातून अण्वस्त्रं विकसित करायची असती, तर तसं करण्यासाठी त्यांच्याकडे आधीच त्या क्षमतेची क्षेपणास्त्रं आहेत."

ग्राफिक्स

अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेचा अंदाज आहे की इराणकडे विविध क्षमता आणि पल्ल्याची जवळपास 3,000 क्षेपणास्त्रं आहेत. त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रं भूमिगत तळांमध्ये आहेत, असं वृत्त आयएसडब्लूनं दिलं आहे.

तर इस्रायलच्या सैन्याला वाटतं की इराणकडे 2,000 क्षेपणास्त्रांचा साठा आहे. त्यांनी नमूद केलं आहे की 13 जूनपासून इराणनं त्यातील जवळपास 370 क्षेपणास्त्रं वापरली आहेत.

आयएसडब्लू या थिंक टँकला वाटतं की इराणनं मोठ्या संख्येनं मोबाईल क्षेपणास्त्र प्रक्षेपक, विमानविरोधी संरक्षण प्रणाली आणि लष्करी अधिकारी गमावल्यामुळे त्याचा परिणाम ते इस्रायलला देत असलेल्या प्रत्युत्तरावर होतो आहे.

इराणच्या अनेक क्षेपणास्त्रांना इस्रायलच्या प्रसिद्ध हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यश आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणच्या अनेक क्षेपणास्त्रांना इस्रायलच्या प्रसिद्ध हवाई संरक्षण प्रणालीला भेदण्यात यश आलं आहे.

कारण इराणनं अलीकडच्या काही दिवसांमध्ये इस्रायलवर मारा केलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या त्यांनी पहिल्या दिवशी मारा केलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत कमी आहे.

मात्र, बीबीसी याबाबतीत तज्ज्ञांनी बोलल्यानंतर, त्यांनी सांगितलं की इराणच्या तथाकथित "क्षेपणास्त्रांच्या शहरांचा" इस्रायलला असलेला मोठा धोका कायम आहे.

"या तळांना इस्रायलनं लक्ष्य केलं आहे आणि यापुढेही ते तसं केलं जाईल. कारण या तळांवरून सोडण्यात आलेली क्षेपणास्त्रं इस्रायलच्या हद्दीत पोहोचू शकतात," असं बेन तालेब्लू म्हणाले.

बॅझिलझिक यांनी असंच मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "क्षेपणास्त्रांचे हे तळ नष्ट केल्यामुळे इस्रायलच्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देण्याची इराणची क्षमता आणखी मर्यादित होईल."

या आठवड्यात, इस्रायलनं लढाऊ विमानांद्वारे आणि क्षेपणास्त्रांद्वारे इराणमधील क्षेपणास्त्र तळांपैकी खोरामाबाद, केरमनशाह आणि तब्रिझ या तीन भूमिगत तळांवर हल्ला केल्याचं सीएसआयएसच्या अहवालात म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)