'आमच्यावर परिणाम होईल असं वाटलं नव्हतं'; इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायली जनतेला काय वाटतं?

इस्रायली नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वेरोनिका ओसिपचिक यांच्या घराचं क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात नुकसान झालं
    • Author, टॉम बेनेट
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, इस्रायल

रविवारी पहाटे (15 जून) इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एक क्षेपणास्त्र एका 10 मजली इमारतीवर धडकलं. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर लोक ढिगाऱ्याखाली अडकले.

बात याम हे इस्रायलमधील एक महत्त्वाचं शहर आहे. ते तेल अवीवच्या दक्षिणेला आहे. इस्रायलच्या उजव्या विचारसरणीच्या सत्ताधारी युतीला बात याम बऱ्याच काळापासून भक्कम पाठिंबा देत आलं आहे.

इराणकडून होत असलेल्या गंभीर स्वरुपाचं नुकसान होऊनदेखील बात याममधील स्थानिक लोकांनी इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याचं जोरदार समर्थन केलं आहे

इस्रायलनं इराणवर शुक्रवारी (13 जून) हल्ला करत या संघर्षाची सुरुवात केली होती.

या हल्ल्यात इस्रायलनं इराणमधील अणुकेंद्र, क्षेपणास्त्रांचे तळ, हवाई संरक्षण प्रणाली, विमानतळ आणि इतर पायाभूत सुविधा तसंच अणू केंद्रातील कर्मचारी आणि लष्करातील अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं होतं.

हल्ल्यात सापडलेल्या बात यामच्या नागरिकांच्या भावना

"हा हल्ला करणं आवश्यक होतं. मात्र त्याचा परिणाम आमच्यावर होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं," असं 33 वर्षांच्या वेरोनिका ओसिपचिक म्हणतात.

जिथे हा हल्ला झाला तिथून जवळपास 200 मीटर अंतरावर त्या राहतात.

वेरोनिका यांच्या फ्लॅटमधील खिडक्या आणि शटर या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. आजूबाजूच्या जवळपास सर्वच इमारतींचं अशा प्रकारचं नुकसान झालं आहे.

"या हल्ल्यानं आम्हाला धक्का बसला आहे," असं त्या म्हणाल्या. त्या एका खुर्चीवर बसलेल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी अन्न आणि प्रसाधन साम्रगीनं भरलेली बॅग होती.

बात याममध्ये इराणच्या ज्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नुकसान केलं आहे. ती हमास आणि हिजबुल्लाहनं गेल्या दीड वर्षात डागलेल्या रॉकेटपेक्षा खूपच शक्तीशाली आहेत. इराणची बहुतांश क्षेपणास्त्रं इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीनं पाडली आहेत.

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील इमारतीची अवस्था

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील इमारतीची अवस्था

ढिगाऱ्याखाली सुरुवातीला अडकलेल्या लोकांना काही तासांतच वाचवण्यात आलं. रविवारी (15 जून) उशीरापर्यंत, किमान तीनजण बेपत्ता होते.

"मला त्यांच्या डोळ्यात भीती दिसली. काजळी, राख आणि ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले राखाडी रंगाचे लोक बाहेर येत होते." असं सहाय्यक वैद्यकीय सेवा पुरवणारे ओरी लाझारोविक म्हणाले.

एवी 68 वर्षांचे आहेत. त्यांनी त्यांचं आडनाव सांगण्यास नकार दिला. ते बात याममध्येच जन्मले आणि वाढले आहेत.

ते म्हणाले, "आम्ही इराणवर हल्ला करत राहिलं पाहिजे. आम्हाला पुढे जात राहावं लागेल. नाहीतर ते आमच्यावर अणुबॉम्ब टाकतील."

"ते कमकुवत आहेत. त्यातुलनेत आम्ही खूप शक्तिशाली आहेत. इस्रायल जगात नंबर वन आहे," असं ते पुढे म्हणाले.

18 वर्षांचा एमिल माहमुडोव त्याच्याशी सहमत आहे. तो म्हणाला, "आम्ही ते आधीच करायला हवं होतं. बहुतांश इस्रायली लोकांना असंच वाटतं."

इस्रायल सरकारला लोकांचा पाठिंबा

इराणचा आण्विक कार्यक्रम संपुष्टात आणण्यासाठी हल्ला केल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ, इस्रायलमध्ये सत्तेत येणाऱ्या सरकारांनी इराण अण्वस्त्रं मिळवण्याच्या शक्यतेबद्दल धोक्याची घंटा वाजवली आहे. इराणनं मात्र याला नकार दिला आहे.

गाझामधील युद्धामध्ये इस्रायलच्या सैन्यानं केलेल्या कारवाईबाबत बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर इस्रायलमधूनच टीका होते आहे. मात्र तसं असतानाही, त्यांचे मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँट्झ, एविगडोर लिबरमन आणि यायर लॅपिड यांनी इराणवरील हल्ल्याला पाठिंबा दिला आहे.

चॅथम हाऊस मिडल ईस्ट प्रोग्रॅमचे, प्राध्यापक योस्सी मेकेलबर्ग म्हणतात, "इराणला अण्वस्त्रं मिळवण्यापासून रोखण्यासाठी इस्रायलच्या सरकारला नेहमीच पाठिंबा मिळाला आहे."

पण, ते म्हणतात, "गाझामध्ये हमासशी लढण्यापेक्षा, अगदी लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहशी लढण्यापेक्षा किंवा इराणशी थेट मर्यादित संघर्ष करण्यापेक्षा हा संघर्ष खूप मोठा आहे."

बात याममध्ये किमान 100 जण जखमी झाले आहेत
फोटो कॅप्शन, बात याममध्ये किमान 100 जण जखमी झाले आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते पुढे म्हणतात, "या संघर्षाचं रुपांतर आता पूर्ण युद्धात होतं आहे. 20 महिने युद्ध, संघर्ष केल्यानंतर (हमास आणि हिजबुल्लाहविरोधात) आता इस्रायलमध्ये युद्धाबाबत थकव्याचं वातावरण आहे."

"जर आणखी लोक मृत्यूमुखी पडले, जर लोकांना शेल्टरमध्ये बराच काळ राहावं लागलं आणि जर पुन्हा एकदा हे न संपणारं युद्ध बनलं," तर या युद्धाला इस्रायलमधून असणारा पाठिंबा कमी होऊ शकतो, असं ते म्हणाले.

रविवारी (15 जून) दुपारी, राष्ट्रीय सुरक्षा मंत्री, अती उजव्या विचारसरणीचे, इतामार, बेन ग्विर बात याममध्ये हल्ल्याचा फटका बसलेल्यांना भेटण्यासाठी पोहोचले. अलीकडेच बेन यांच्यावर "पॅलेस्टिनींविरोधात हिंसाचार भडकावल्याबद्दल" ब्रिटिश सरकारनं निर्बंध लागू केले आहेत.

बेन यांच्याबरोबर सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांची तुकडी होती. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यामुळे ज्या रस्त्यावर अनेक दुकानांच्या खिडक्या फुटल्या होत्या, तिथे त्यांनी अनेक दुकानदारांशी हस्तांदोलन केलं.

त्यापैकी एकजण त्याच्या बेकरीसमोर प्लास्टिकच्या खुर्चीत बसला होता. त्यांनी त्यांचं नाव सांगण्यास नकार दिला. ही बेकरी ते 29 वर्षांपासून चालवत आहेत. ते म्हणाले की, तिथे लूटमार होऊ नये म्हणून ते तिथं बसले आहेत.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमधील परिस्थिती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानमधील परिस्थिती

इराणविरोधात नवी आघाडी सुरू करण्याच्या बाजूचे तुम्ही आहात का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, ते हात हलवत म्हणाले, "अर्थातच, हा काय प्रश्न झाला का?"

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीदेखील रविवारी (15 जून) बात यामला भेट दिली. ते आल्यानंतर तिथे "बीबी, इस्रायलचा राजा" अशा घोषणा दिल्या जात होत्या.

या घोषणा, बायबलमधील डेव्हिड एक लढाऊ राजाबद्दलच्या एका लोकप्रिय गाण्यावर आधारित होत्या. हे गाणं अनेक ज्यू मुलं शाळेत शिकतात.

काही तासांनंतर, नेतन्याहू यांनी संध्याकाळी भाषण दिलं. त्यात त्यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी राष्ट्राला सांगितलं, "हा एक कठीण दिवस आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की, आपल्याला कठीण दिवसांना तोंड द्यावं लागेल."

इराणविरोधातील संघर्षात व्यापक पाठिंबा असूनदेखील, जर हा संघर्ष वाढतच गेला आणि त्यामुळे नागरिकांचे मृत्यू होतच राहिले, तर इस्रायलमधील जनता आणखी किती कठीण दिवस सहन करू शकेल याचा विचार करायला हवा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)