वास येणाऱ्या बुटांनी भारताला आयजी नोबेल पुरस्कार कसा मिळवून दिला?

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बुटांचा वास… प्रत्येक घराघरातील समस्या! म्हणजे अगदी शू रॅकमध्ये जरी असे शूज ठेवले तरी वास काही केल्या जात नाही. पण दोन भारतीय संशोधकांनी हा विषय केवळ गमतीत न घेता विज्ञानाच्या नजरेतून पाहिला. आणि त्यातूनच जन्माला आलं एक नवं संशोधन, ज्याने मिळवला आंतरराष्ट्रीय आयजी नोबेल (Ig Nobel) पुरस्कार.

जवळजवळ प्रत्येक घरात बुटांचा एक तरी जोड असतो, ज्याचा वास असह्य असतो. आता एका कुटुंबातील बुटांची संख्या विचारात घेतली म्हणजे प्रत्येकाचे बूट एका रॅकमध्ये ठेवले तर तो रॅक जितका वाईट असेल त्याहून वाईट असेल त्यातून येणारा वास.

पण आश्चर्य म्हणजे दोन भारतीय संशोधकांना यात फक्त वास दिसला नाही तर त्यांना यात संशोधनाची निकड दिसली. त्यांनी अभ्यास सुरू केला की दुर्गंधीयुक्त बूट आपल्या शू रॅक वापरण्यावर कसा परिणाम करतात. आणि या संशोधनामुळे ते थेट पोहोचले Ig नोबेल पुरस्काराच्या सन्मानापर्यंत. हा असा पुरस्कार आहे जो जगभरातील थोड्या हटके, गंमतीशीर, पण कल्पक संशोधनाला दिला जातो.

दिल्लीतील शिव नाडर विद्यापीठात 42 वर्षीय डिझाईनचे सहाय्यक प्राध्यापक विकाश कुमार आणि त्यांचा माजी विद्यार्थी 29 वर्षीय सार्थक मित्तल या दोघांच्या मनात पहिल्यांदा 'दुर्गंधीयुक्त बुटांचा' अभ्यास करण्याची कल्पना आली.

सार्थक मित्तल सांगतात की, होस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये अनेकदा रांगेत ठेवलेले बूट दिसायचे विशेषतः ट्विन शेअरिंग रूमच्या बाहेर. पहिली कल्पना साधी होती विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षक, सुबक शू रॅक डिझाईन का करू नये? पण जसजसा शोध पुढे गेला, तसतसं लक्षात आलं की खरी समस्या जागेची नसून बुटांचा असह्य वास ही होती. जागेपेक्षा हा वासच बुटांना बाहेर ठेवायला भाग पाडत होता.

"जागेचा किंवा शू रॅक नसण्याचा प्रश्न नव्हता तर होस्टेलमध्ये पुरेशी जागा होती. पण सततच्या वापरामुळे आणि घामट पायांमुळे बुटांना भयानक वास यायचा," असं मित्तल सांगतात. सध्या ते एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहेत.

मग या दोघांनी होस्टेलमध्येच सर्वेक्षण सुरू केलं आणि थेट एक प्रश्न विचारला की, "आपले स्नीकर्स जर एवढे दुर्गंधित असतील, तर त्याने शू रॅक वापरणेच त्रासदायक ठरत नाही का?"

या दोघांनी केलेल्या सर्वेक्षणात विद्यापीठात शिकणाऱ्या 149 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, त्यातील जवळपास 80% मुलं होती. आणि त्यातून जे निष्कर्ष समोर आले, ते खरं तर आपल्याला माहिती असले तरी आपण मान्य करायला कचरतो.

निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी मान्य केलं की कधी ना कधी त्यांना स्वतःच्या बुटांच्या किंवा इतरांच्या बुटांच्या वासामुळे नामुष्कीसारखे वाटलं आहे. जवळपास सगळेच विद्यार्थी शू रॅकमध्ये बूट ठेवतात. पण फार कमी लोकांना बाजारात मिळणाऱ्या बूट दुर्गंधीमुक्त करणाऱ्या प्रॉडक्ट्सबद्दल माहिती होती. त्यामुळेच लोक बुटांमध्ये टी-बॅग ठेवणं, बेकिंग सोडा शिंपडणं, डिओड्रंट स्प्रे करणं यासारखे घरगुती उपाय करायचे. पण हे उपाय फारसे उपयोगी ठरत नव्हते.

मग हे दोघेही वैज्ञानिक संशोधनाकडे वळले. आधीच्या संशोधनातून त्यांना माहिती होतं की यामागचं खरं कारण म्हणजे Kytococcus sedentarius नावाचा बॅक्टेरिया, जो घामट बुटांमध्ये वेगाने वाढतो.

त्यांनी केलेल्या प्रयोगात हे दिसून आलं की फक्त थोडंसं अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाचं शॉर्ट बर्स्ट दिलं, तरी हे जंतू मरून गेले आणि बुटांचा वास गायब झाला.

त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात लिहिलं आहे की, "भारतात जवळपास प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या प्रकारचा शू रॅक असतोच. जर असा रॅक मिळाला की जो बुटांना दुर्गंधीमुक्त ठेवेल, तर त्यातून वापरणाऱ्यांना एक उत्तम अनुभव मिळेल."

त्यांनी पाहिलं की 'दुर्गंधीयुक्त बूट' ही समस्या नसून, पारंपरिक शू रॅकला सुधारण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी एक संधी आहे.

आता यातून निष्कर्ष काय निघाला असेल ? तर हा काही नेहमीसारखा 'एर्गोनॉमिक्स रिसर्च पेपर' नव्हता, तर ही एक भन्नाट आणि वेगळीच आयडिया निघाली.

UVC लाईट लावलेला शू रॅक प्रोटोटाईप जो फक्त बूट ठेवण्यासाठी नाही, तर त्यांना निर्जंतुक देखील करेल. (इथे आपण समजून घेऊया की प्रकाशाचा पूर्ण स्पेक्ट्रम असतो, पण जंतूनाशक गुणधर्म फक्त UVC बँडमध्ये आढळतात.)

प्रयोगासाठी संशोधकांनी विद्यापीठातील अ‍ॅथलीट्स वापरत असलेले बूट घेतले ज्यांना अर्थातच 'खास गंध' होता. कारण बॅक्टेरियांची सर्वाधिक वाढ बोटांच्या अंगठ्याच्या भागात होत होती, म्हणून UVC लाईट तिथे केंद्रित करण्यात आला.

या अभ्यासात वासाचं प्रमाण आणि UVC प्रकाश देण्याचा कालावधी यांची तुलना करण्यात आली. परिणाम असा झाला की फक्त 2-3 मिनिटं UVC लाईट दिला, तरी बॅक्टेरिया नष्ट झाले आणि दुर्गंधी पूर्णपणे गायब झाली. पण हे इतकं सोपं नव्हतं. जर प्रकाशाचा डोस जास्त दिला, तर उष्णतेमुळे बुटांचा रबरच जळायला लागला.

संशोधकांनी फक्त UVC ट्यूब लाईट बुटांकडे लावली आणि "चला बघू काय होतं" असं म्हणत थांबले नाही तर त्यांनी प्रत्येक वासाच्या तीव्रतेची तपासणी केली. त्यात त्यांना निदर्शनास आलं की, सुरवातीला बुटांचा वास हा अतिशय तीव्र, एखाद्या नासलेल्या चीजसारखा होता.

दोन मिनिटांनंतर त्यांनी पुन्हा पडताळणी केली तेव्हा तो वास कमी होऊन हलक्या जळलेल्या रबरासारखा झाला होता. अखेर चार मिनिटांनंतर त्यांनी पाहिले तर दुर्गंधी पूर्णपणे गायब झाली होती आणि साध्या जळलेल्या रबरासारखा हलका वास शिल्लक राहिला होता. सहा मिनिटांनंतर बूट अजूनही दुर्गंधीमुक्त आणि थंड राहिले.

त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जर 10 ते 15 मिनिटं लावली, तर हा वास पुन्हा तीव्र जळलेल्या रबरासारखा झाला आणि बूट गरम झाले. यातून दिसून आले की की विज्ञानात वेळेला अतिशय महत्व आहे.

शेवटी, या दोघांनी UVC ट्यूब लाईट लावलेली शू रॅकची डिझाईन सुचवली. पण पुढे काहीच घडलं नाही.म्हणून हा शोध इथेच थांबला नाही तर अमेरिकेतील Ig Nobel पुरस्कार समितीने त्याकडे लक्ष दिलं आणि संपर्क केला.

हा पुरस्कार Annals of Improbable Research या जर्नलद्वारे आयोजित केला जातो आणि Harvard-Radcliffe समूहांनी सह-प्रायोजित केला आहे.

34 वर्षांपासून दिला जाणारा Ig नोबेल पुरस्कार दरवर्षी 10 संशोधनांना दिला जातो. याचा उद्देश आहे, "लोकांना हसवणं, मग विचार करायला लावणं, असामान्य गोष्टींचा सन्मान करणं, कल्पकतेचा आदर करणं."

या पुरस्काराबद्दल विकाश कुमार सांगतात की, आम्हाला या पुरस्कारा बद्दल काहीच कल्पना नव्हती,"हा जुना 2022 मधील संशोधनाचा पेपर होता, आम्ही कधीच तो कुठेही पाठवलेला नाही. Ig नोबेल टीमने फक्त शोधलं, फोन केला.आणि यामध्येच हसण्यासारखं आणि विचार करण्यासारखं आहे."

हा पुरस्कार म्हणजे संशोधनाचे प्रमाणपत्र नाही तर विज्ञानाच्या मजेशीर बाजूचा उजाळा देण्यासाठी आहे. बहुतेक संशोधन हे कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त आवडीने केलेलं काम असतं, आणि हा पुरस्कार त्याला लोकांमध्ये लोकप्रिय करण्याचा मार्ग देखील आहे.

या वर्षी दोन भारतीय संशोधकांसोबत जगभरातील अजूनही असे भन्नाट विजेते होते, जसे जपानी जीवशास्त्रज्ञांनी दाखवले की गाईंना रंग दिला की माशांचा त्रास कमी होतो. टोगोमधील इंद्रधनुषी रंगाच्या पालींना चीज पिझ्झा फारच आवडतो हे संशोधन.

अमेरिकेतील बालरोगतज्ज्ञांनी शोधलं की लसणामुळे बाळांना आईचं दूध अधिक चवदार वाटतं. डच संशोधकांनी दाखवलं की अल्कोहोलचे सेवन परकीय भाषा शिकण्यात मदत करतो पण वटवाघुळ मात्र ते प्यायलं की उडताना गोंधळते.

एका इतिहासकाराने 35 वर्षं स्वतःच्या नखांच्या वाढीवर लक्ष ठेवलं. तर एक भौतिकशास्त्रज्ञ पास्ता सॉसचे गुपित काय आहे यावर अभ्यास करत होते. वास मारणाऱ्या बुटांसाठी मिळालेला पुरस्कार भारतीय संशोधकांसाठी नवा मापदंड ठरला.

विकाश कुमार म्हणतात की, "पुरस्कारामुळे एक जबाबदारीचे ओझंही आलंय आता आम्हाला लोक साधारणपणे विचार करत नाहीत अशा गोष्टींवर आणखी संशोधन करावं लागेल. प्रश्न विचारावे लागतील." म्हणजेच, आजचे वास मारणारे स्निकर उद्याचं क्रांतिकारी संशोधन ठरू शकतात!

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)