'आमच्या कष्टातून ही चप्पल बनलीये, तिला कोल्हापूरचं नाव पाहिजे'

    • Author, गणेश पोळ, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

कोल्हापुरी चप्पल सध्या चर्चेत आहे, कारण इटालियन फॅशन हाऊस 'प्राडा'नं एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरीसारख्याच चपलेचा वापर केला. काहींना हा कोल्हापुरीचा सन्मान वाटला, पण अनेकांनी या शोमध्ये कोल्हापूरचाच काय तर भारताचाही साधा उल्लेखही नाही, यावर आक्षेप घेतला.

या सगळ्याविषयी कोल्हापूरच्या लोकांना आणि विशेषतः ही चप्पल बनवण्याच्या व्यवसायात असलेल्यांना काय वाटतं?

कोल्हापुरी चप्पल ही महाराष्ट्रासाठी केवळ एक पायताण किंवा सांस्कृतिक प्रतीक नाही, तर इथल्या माती आणि सामाजिक परिस्थिती यांच्याशी तिचं नातं आहे.

काही शतकांचा इतिहास असलेली ही चप्पल शाहू महाराजांच्या काळात प्रसिद्धीला आली.

आज वेगवेगळ्या जाती-समुदायांतले व्यावसायिक कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय करतात. पण, कर्रकर्र आवाज करणारी अस्सल कोल्हापुरी चप्पल तयार करणारे बहुतांश हात हे मात्र चर्मकार समुदायातले आहेत.

त्यामुळेच प्राडाच्या शोमध्ये कोल्हापूरचा उल्लेख न करता ही चप्पल वापरली गेल्याचं समजल्यावर इथल्या कारागिरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापूरच्या सुभाषनगरमधल्या रहिवासी प्रभा सातपुते ठणकावून सांगतात, "चर्मकारांच्या कष्टाने तयार केलेली ही चप्पल आहे. ही चप्पल कोल्हापुरात बनतेय. याला कोल्हापुराचं नाव दिलं पाहिजे."

सकाळचं किचनमधलं काम उरकून प्रभा सातपुते घरासमोर मोठ्या चामड्याला हवे त्या आकारात कापत होत्या. गेली अनेक वर्ष त्या घरगुती पातळीवर हा व्यवसाय करतात.

"कष्टाची फळं ज्याची त्यालाच द्या. कारण नसताना इतरांचं कष्ट तुम्ही बडवून घेऊ नकोसा," प्रभा असं सांगतात तेव्हा त्यांच्या बोलण्यात चपलेविषयीची एक खास तळमळ दिसत होती.

प्रभाच नाही, तर कोल्हापूरमध्ये अनेकांच्या मनात प्राडाची बातमी कळल्यावर अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

इथे घराघरात किंवा चहाची टपरी, वडापावची गाडी, मंडई किंवा शाळेतली मुलं असं तुम्ही कुणाला जरी विचारलं तरी त्यांच्या बोलण्यातून नाराजी स्पष्ट दिसत आहे.

असं वाटणं साहजिकच आहे, कारण या चपलेला कोल्हापूरच्या मातीतला दीर्घ इतिहास आहे.

सातशे वर्षांचा इतिहास

कोल्हापुरात चपलेऐवजी 'कोल्हापुरी पायताण' म्हणून याची खास ओळख आहे.

चामड्यापासून बनवलेली आणि कधीकधी नैसर्गिक रंगात रंगवलेली ही चप्पल आकारानं मजबूत आणि महाराष्ट्रातल्या उष्ण, खडकाळ वातावरणातही बराच काळ टिकणारी.

सपाट चप्पल, लाकडी तळ, अंगठा, पट्टा आणि अंगठ्याला जोडणारी पट्टी असा आकार. काही चपलांना चामड्याची वेणी, चामड्याच्या चकत्या, जर आणि गोंडा लावूनही सजवलं जातं.

हा साधा, सुबक, नक्षीदार आकार ही कोल्हापुरीची खास ओळख आहे.

या चपलेचा उगम नेमका कुठे आणि कधी झाला, याबद्दल ठोस पुरावे नाहीयेत. पण साधारण तेराव्या शतकापासून कोल्हापुरी चपलेचे संदर्भ सापडतात.

चालुक्य राजवटीचा तो काळ होता आणि कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागात तेव्हापासून या चपलांचा वापर व्हायचा. आधी या चपला कापशी, अथनी, अशा वेगवेगळ्या गावांच्या नावांनी ओळखल्या जात. कारण तिथले कारागीर या चपला बनवायचे.

पण शाहू महाराजांच्या काळात या चपलेला कोल्हापुरी चप्पल म्हणून खास ओळख मिळाली, असं इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात.

"या चपलेला एक प्रतिष्ठेचं स्थान मिळावं म्हणून शाहू महाराज स्वत: ही चप्पल आवर्जून घालायचे."

ते माहिती देतात की कोल्हापूर शहरातील जवाहरनगर आणि सुभाषनगर इथं महाराजांनी हा व्यवसाय वाढवण्यासाठी तरतूद केली. चर्मकार समुदायाला जमिनी दिल्या. चपलेसाठी लागणारे चामडे कमवण्यासाठी विशेष व्यवस्थाही केली.

त्यानंतर कोल्हापूरचं नाव या चपलेशी जोडलं गेलं आणि ही चप्पल कोल्हापूरची ओळख बनली. अलीकडेच या चपलेला जीआय मानांकनही मिळालं.

कशी बनते अस्सल कोल्हापुरी चप्पल?

कोल्हापूरच्या गावांतील चर्मकारांनी परंपरेनुसार हातानं ही चप्पल तयार करण्याची खास पद्धत जपली आहे.

त्याची सुरुवात म्हशीच्या कातड्यापासून होते. बाभळीची साल आणि चुन्यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून म्हशीच्या कातड्यावर प्रक्रिया (tanning) केली जाते.

दुसऱ्या टप्प्यात कातड्याला हवे त्या आकारात कापले जाते. तिसऱ्या टप्प्यात सुती किंवा नायलॉन धाग्यांनी सर्व भाग हाताने शिवले आणि विणले जातात.

चौथ्या टप्प्यात पारंपरिक नक्षी, छिद्रकाम यांचा समावेश होतो. शेवटी नैसर्गिक तेलांचा वापर करून चपलांना चमक आणि लवचिकता दिली जाते.

अलीकडच्या काळात यातल्या काही कामांसाठी मशीनचा वापर केला जातो आहे. पण बहुतांश कामं आजही हातानेच केली जातात.

महाराष्ट्रात पारंपरिक पोशाखासोबत ही चप्पल हमखास घातली जाते. तर रोजच या चपलांचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

प्राडाच्या शोमुळे वाद

23 जून 2025 इटलीत मिलान फॅशन वीक या फॅशन जगतातल्या महत्त्वाच्या सोहळ्यात प्राडा या इटालियन फॅशन हाऊसनं त्यांचं 'मेन्स स्प्रिंग समर 2026 कलेक्शन' सादर केलं.

त्यात एका मॉडेलनं घातलेल्या चपला आपल्या कोल्हापूरी चपलांसारख्या दिसतायत, असं काही भारतीयांनी सोशल मीडियावर नमूद केलं.

काहींनी कोल्हापुरी चप्पल आता ग्लोबल झाली अशी प्रतिक्रिया दिली. पण बहुतेकांना या शोमधनं कोल्हापूरचा आणि अगदी भारताचाही उल्लेखच टाळणं खटकलं.

कोल्हापुरी किंवा भारतीय चपला न म्हणता काही पाश्चिमात्य लोकांनी या चपलांचा उल्लेख टो रिंग सँडल्स म्हणून केला, तेही अनेकांना रुचलं नाही.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली.

त्यांना दिलेल्या उत्तरात फॅशन शोमध्ये घालण्यात आलेली चप्पल ही भारतीय परंपरागत चपलेवरून प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आल्याचं प्राडानं मान्य केलं आहे.

प्राडाचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबलिटी प्रमुख लॉरेन्झो बर्टेली म्हणतात की, "सध्या हे कलेक्शन केवळ डिझाईनच्या पातळीवर आहे आणि यातल्या कोणत्याही वस्तू व्यावसायिकरीत्या बाजारात उतरवायच्या की नाही, याचा निर्णय अजून झालेला नाही."

प्राडा आपल्या डिझाईनच्या बाबतीत जबाबदार पावलं उचलण्यासाठी कटीबद्ध आहे आणि या संदर्भात भारतीय कारागिरांसोबत चर्चा करण्यासाठीही आम्ही तयार आहोत, असंही बर्टेली म्हणाले.

पण भारतीय कारागिरांचा किंवा वारशाचा उल्लेख न करता एखादं वस्त्र-प्रावरण जगासमोर मांडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही, याचीही आता चर्चा होते आहे.

फॅशनच्या जगातला 'सांस्कृतिक गैरव्यवहार'

2024च्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आलिया भटनं एक लेहंगासदृश्य वेश परिधान केला होता.

स्वतः आलियानं त्याचं वर्णन 'भारतीय साडीवरून प्रेरणा घेऊन तयार केलेला वेश' असं केलं. पण हा पोशाख तयार करणाऱ्या 'गुची'नं मात्र त्याचा उल्लेख गाऊन असा केला होता, जे अनेकांना रुचलं नाही.

गुचीनं त्यांच्या 2018 सालच्या कलेक्शनमध्ये शिखांच्या पगडीचा वापर केल्यामुळे त्यांच्यावरही टीका झाली होती.

तर 2024 मध्ये एका टिकटॉक युझरनं दुपट्टा किंवा ओढणीला 'स्कँडेनेव्हियन स्कार्फ' म्हटलं, तेव्हाही दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांनी त्याला आक्षेप घेतला.

एखाद्या वस्तू, कपडे किंवा आभूषणांना पाश्चिमात्य नाव द्यायचं पण त्याचं मूळ कुठलं आहे याचा उल्लेखही करायचा नाही, असं फॅशन जगात वारंवार होऊ लागलं आहे, असा सूर या प्रतिक्रियांमध्ये उमटला आहे.

यालाच 'कल्चरल अप्रोप्रिएशन' (सांस्कृतिक गैरव्यवहार) असंही म्हणतात, कारण अशानं एखाद्या गोष्टीचा मूळ वारसा पुसला जाण्याचा धोका आहे असं त्यांना वाटतं. कुणी हा 'फॅशनमधला वसाहतवाद' असल्याची टीका केली आहे.

तसंच भारतीय वस्तू परदेशी ब्रँडनी मार्केटिंग केल्यावरच जगभरात का पोहचतात, याचंही विश्लेषण करण्याची गरज अनेकांना वाटते आहे.

पण एखादी गोष्ट जगभर पोहोचते, तेव्हा तिच्या मूळ निर्मात्यांना आणि परंपरा जपणाऱ्या कारागिरांनाही याचं क्रेडिट मिळायला हवं यावर मात्र बहुतेकांचं एकमत होताना दिसतंय.

'कोल्हापुरी' कारागिरांचं काय?

प्राडा प्रकरणानंतर कोल्हापुरी चपलेच्या व्यापारात वाढ होईलही कदाचित, पण चपला तयार करणाऱ्या कारागिरांना मात्र अडचणींचाही सामना करावा लागतो आहे.

प्रभा सातपुते दहा वर्ष घरगुती पातळीवर काम करतायत, पण मोठं मशीन जास्त कोल्हापुरी चपलांचं उत्पादन करायचं, तर त्यांच्यासारख्या कारागिरांना बँकेकडून कर्ज मिळत नाही.

त्यांना कारण देण्यात आलंय, कोल्हापुरी चपलांचा छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी जी प्राथमिक व्यवस्था असायला हवी, ती त्यांच्याकडे नाही.

"ज्यांचे आधीच मोठे उद्योग सुरू आहेत, अशा लोकांनाच कर्ज मिळतंय. पण आमच्यासारखे कारागीर जे खऱ्या अर्थाने त्यांच्या हाताने चपला बनवतात त्यांना मात्र या योजनेतून डावललं जातंय.

"बँकवाले निरीक्षणासाठी आले की, ते आधीच मोठ्या सेटअपची अपेक्षा करतात. पण पैसे नसल्यावर आम्ही कुठून आणणार मोठ्या मशिनी? आम्ही मोठ्या कर्जाची अपेक्षा करत नाही. 2 किंवा 3 लाख रुपये दिले तरी आमचा व्यवसाय मोठा होऊ शकतो."

सरकारकडून लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. पण सातपुते यांच्या उदाहरणावरून अशा योजना तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचं दिसतंय.

"कारागीरांच्या कल्याणासाठी सर्व भागीदारांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे," असं ललित गांधी यांना वाटतं.

प्राडा कंपनीसोबत चर्चा करताना आम्ही हा मुद्दा ठळकपणे मांडल्याचं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

कोल्हापुरी चपला तयार करणं हे मेहनतीचं काम आहे. एकाच ठिकाणी बसून काम केल्याने अंगदुखी, पाठदुखीच्या व्याधी कायमस्वरूपी होतात.

दुसरीकडे, चामडं कमावणं आणि त्यावर हाताने मेहनत करून चपला तयार करण्याच्या कामाकडे नवीन पिढीने पाठ फिरवल्याचं दिसत आहे. कारण चामड्याच्या कामाला भारतीय समाजात श्रम प्रतिष्ठा नाही.

"कोल्हापुरी चपला विकण्याचा व्यवसाय कदाचित नफ्यात असेल, अनेक वर्षांपासून एखादं कुटुंब हा व्यवसाय करत असेल. पण चामड्यापासून चपला तयार करण्याच्या कामाकडे आजही आदराने पाहिलं जात नाही", असं व्यावसायिक भूषण कांबळे सांगतात.

प्राडाच्या शोनंतर कोल्हापुरी चर्चेत आल्यावर ही परिस्थिती बदलेल का? आत्ताच सांगता येणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)