तुळजापूरमध्ये ड्रग्जचं मोठं रॅकेट उघड, 35 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापुराज साडेतीन शक्तीपिठांपैकी संपूर्ण एक पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान आहे. मात्र या तुळजापुरात ड्रग्जविक्री करणाऱ्यांचं मोठं रॅकेट पोलिसांनी पकडलं आहे.

पोलिसांनी कारवाई करत 35 ड्रग्जविक्रेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी आरोपींमध्ये पुजारी असल्याची चर्चा झाली. त्यावर पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांनी काही पुजाऱ्यांची नावं आल्यानं संपूर्ण समाजाला बदनाम करू नये, असं म्हटलं आहे.

तसंच हे आरोपी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नाहीत. त्यापैकी काही मंदिरातही येत नसल्याचं स्पष्टीकरणही पुजारी समाजाच्या वतीनं देण्यात आलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

तुळजापूर येथील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे, युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड या 3 आरोपींना 45 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 59 पुड्या ड्रग्जसह 14 फेब्रुवारीला तामलवाडी येथे रंगेहात अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासला गती मिळाली.

आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या 3 आरोपींना ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबई महिला तस्कर संगीता गोळे हिला 22 फेब्रुवारीला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि काहींना ताब्यात घेतले.

त्यांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून संतोष खोतला 27 फेब्रुवारी, तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली.

सोलापूरहून ड्रग्ज खरेदी करणारे सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे व संकेत शिंदे या 4 जणांना 18 ग्रॅम ड्रग्ज असलेल्या 30 पुड्या ड्रग्जसह 4 मार्चला अटक करण्यात आली.

पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके या दोघांना 23 मार्चला, राहुल कदम-परमेश्वर याला 24 मार्चला अटक केली. त्या दिवशी 4 गोपनीय व नवीन 6 अशी 10 जणांची नावे उघड केली. गजानन हंगरकर याला 25 मार्चला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी कोर्टात 26 मार्चला नवीन 10 आरोपींची नावे जाहीर केली.

अशा एकूण 35 आरोपींचा समावेश पोलिसांनी आपल्या फिर्यादीत केला. त्यापैकी 14 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य 21 आरोपी आणखी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

कोण आहेत आरोपी?

  • फरार आरोपी (21)

माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे, अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे, शाम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सोंजी, आकाश अमृतराव, दुर्गेश पवार, रणजित पाटील, नाना खुराडे व सोलापूर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 21 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

  • कारागृहातील आरोपी (14)

यातील अमित उर्फ चिमू आरगडे, युवराज दळवी, संदीप राठोड, संगीता गोळे, संतोष खोत, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, सयाजी चव्हाण, सुमित शिंदे, ऋतूराज गाडे, संकेत शिंदे, पुणे येथील सुल्तान उर्फ टिपू शेख व सोलापूर येथील जीवन साळुंके, राहुल कदम - परमेश्वर, गजानन हंगरगेकर हे 14 जण धाराशिव जेलमध्ये आहेत.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा घटनाक्रम

  • 15 फेब्रुवारी 2025: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्ज जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली.
  • फेब्रुवारी 2025 अखेर: तपासादरम्यान, ड्रग्ज विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली, जी या ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते.
  • मार्च 2025: पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली, ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की, आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले.
  • मार्च 2025: पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक करण्यात यश आले. या दरम्यान, तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी 10 आरोपींची नावे समोर आली, ज्यामुळे फरार आरोपींची संख्या 21 वर पोहोचली.
  • मार्च 2025: तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचे समोर आले, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले.
  • एप्रिल 2025: या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली, ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली. या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहितीही समोर येत आहे. मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले. कारण यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते. आतापर्यंत या प्रकरणात 35 आरोपी निष्पन्न झाले असून 21 आरोपी अजूनही फरार आहेत.

आरोपी देवीची पूजा करणारे नियमित पुजारी आहेत का याबाबत माहिती घेतली नाही. माहिती घेऊन या प्रकरणात जे कोणी पुजारी दोषी असतील त्यांच्यावर मंदिर संस्थान कार्यवाही करणार असल्याचा इशारा मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिला आहे.

आरोपीचा धंदा किंवा जात बघून आरोपी ठरवला नाही : पोलीस अधीक्षक

यात आरोपीचा धंदा किंवा जात बघून आरोपी ठरवला नाही, तर त्याचा गुन्ह्यात समावेश आहे म्हणून त्याला आरोपी ठरवलं आहे.

त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहिलं जाईल आणि कारवाई करू, असं सांगत धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कार्यवाहीचे संकेत दिले.

या प्रकरणानंतर पुजारी देखील संतप्त झाले आहेत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही करा. आमचं काहीच म्हणणं नाही, पण सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, असं मत भोपी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम यांनी मांडले.

राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते यांचा या प्रकरणाशी सबंध असल्याने जाणूनबुजून या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील अमर कदम यांनी केला.

सुरुवातीपासून या प्रकरणातील आरोपींची जवळीक ही राजकीय नेत्यांशी दिसून आली होती. तुळजापूर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते हे आरोपी असून त्यांच्यासोबतचे फोटो देखील समोर आले होते.

यावर या ड्रग्ज विक्रेत्यांची नावे सांगा आपली नावे गुप्त ठेवण्यात येतील आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील, असं आमदार राणा पाटील म्हणाले होते.

तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासोबत देखील 2 आरोपींचे फोटो समोर आले होते.

यावर खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, "दररोज हजारो लोक माझ्यासोबत फोटो काढतात. मी लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांना फोटो नाकारु शकत नाही. मी फोटो काढायच्या आधी त्यांना पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र तर मागू शकत नाही ना."

इतकंच नाही तर माझा सख्खा भाऊ जरी दोषी आढळला, तर त्याला फासावर लटकवा, अशी स्पष्ट भूमिका ओमराजेंनी मांडली.

मागील काही दिवसांपासून आपण या ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात आवाज उठवतोय. संसदेत देखील याप्रकरणी आपण मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे आरोपी कोणीही असो, त्याच्यावर कारवाई व्हावी, म्हणून ओमराजे सगळ्यात पुढे असेल, असं खासदार निंबाळकर म्हणाले.

तुळजापूर सारख्या पवित्र ठिकाणी अशापद्धतीने ड्रग्ज विक्री केली जातेय आणि रॅकेट सक्रिय असल्याचं कळल्यावर महाराष्ट्रातून आलेल्या भाविक भक्तांनी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले की, असं होणं चुकीचेच, पावित्र्य जपलं पाहिजे. काही पुजाऱ्यांचं नाव समोर येत आहे, अशाने पूजाऱ्यांवरील विश्वास उडून जाईल, असं काही भक्तांनी आपलं मत मांडले.

'परंड्यात मोठे मासे, इकडे लक्ष द्या'

मागील 2-3 वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात ड्रग्ज विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातल्या त्यात परंडा तालुक्यात काही मोठे मासे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी परांड्याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी केली आहे.

याठिकाणी खुलेआमपणे ड्रग्ज विक्री केली जात आहे. त्यामुळे किशोरवयीन मुले व्यसनाधीन होत आहेत. अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे परंडा शहरात सक्रिय असलेल्या पेडलर्सवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परंडाचे नागरिक करीत आहेत.

पोलिसांची सर्व ठिकाणी करडी नजर असून कोणालाही सोडलं जाणार नाही, असं पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले.

आरोपींची संख्या आणखी वाढू शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)