प्रभाकर कांबळे : आपल्या कलेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'थँक्यू' म्हणणारा कलावंत

    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

(एप्रिल महिना हा सर्व जगभरात 'दलित हिस्ट्री मंथ' म्हणून ओळखला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म याच महिन्यात झाला म्हणून या महिन्याला 'दलित हिस्ट्री मंथ' म्हटलं जातं. व्यवस्थेविरोधात बंड करुन समतेचा विचार सांगणाऱ्या नायक-नायिकांची आठवण म्हणून दलित हिस्ट्री मंथ साजरा केला जातो. बीबीसी मराठी या निमित्ताने तुमच्यासाठी काही खास लेख घेऊन येत आहे.)

कल्पना करा की, तुम्ही पहिल्यांदा एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये चित्र पाहण्यासाठी गेला आणि तिथे एक तरुण आपल्या पायाचे अंगठे धरून उभा आहे. त्याच्या पाठीवर एकावर एक असे बांधून ठेवलेले मातीचे गाठोडे आहे. आणि त्या तरुणाच्या बाजूला काळ्या रंगाची भुकटी आणि काठी आहे. कुणीतरी येत आहे आणि त्या तरुणाला तो काळा रंग लावत आहे आणि काठीने बडवत आहे. एकामागून एक असे अनेक जण येत आहेत आणि काठीने बडवत आहेत.

ज्या गोष्टीचं वर्णन केलं ते प्रभाकर कांबळे यांच्या 'ह्युमन्स इन ऊना' नावाजलेल्या एका कलाकृतीचं सादरीकरण आहे.

2016 साली गुजरातमधील ऊनामध्ये दलित कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यावर प्रभाकर यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे हे सादरीकरण.

समोर काठी असेल तर ती कुणाला तरी मारण्यासाठी वापरली जाते आणि काळा रंग असेल तर तो फासण्यासाठी वापरला जातो. समाजात सुद्धा हिंसाच अशीच घडत जाते. असा संदेश ते या कलाकृतीतून दर्शकाला देतात आणि अंतर्मुख करतात.

कलाकार म्हटलं तर एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते आणि अमूर्त गोष्टींना आकार देणारा, त्यांना शब्दबद्ध करणारा, चित्रबद्ध करणारी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर तरळते. पण प्रभाकर कांबळे आपल्या कलाकृतीतून अमूर्त गोष्टीच व्यक्त करत नाहीत तर एक खंबीर सामाजिक भूमिका घेताना दिसतात.

त्यांच्या कलेचा सारांश अगदी काही शब्दांत मांडताना ते म्हणतात, "रस्त्याने जाताना जर का आपल्याला कुणी पत्ता सांगितला तर आपण त्या व्यक्तीला दोनदा थँक्यू म्हणतो आणि हजारो वर्षांच्या पिढान्-पिढ्यांच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणत नाहीत, हे कसं?"

व्हिज्युअल आर्टिस्ट (दृश्य-कलाकार) प्रभाकर कांबळे यांच्याशी बोलल्यावर आणि त्यांची कला पाहिल्यावर वाटतं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रभाकर यांनी मनापासून दिलेला हा 'थँक्यू' आहे.

आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांशी असलेल्या बांधिलकीतूनच 'ह्युमन्स इन ऊना' सारखी कलाकृती सादर होते.

माझ्यासारख्या कलेशी फक्त पाहण्यापुरता संबंध असलेल्या किंवा दुरुन अनुभवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही विचारलं कला म्हणजे काय तर मी फक्त एवढंच म्हणू शकेल, भान हरपून जायला लावणारी एखादी गोष्ट. अशी गोष्ट जिच्याकडे पाहिल्यावर, अनुभवल्यावर, ऐकल्यावर तुम्ही अवाक् होऊन जाता, स्तिमीत होऊन जाता अशा गोष्टीला कला म्हटलं जात असेल, इतकंच मी म्हणेल.

पण प्रभाकर सारखा अस्सल कलावंतच 'कला म्हणजे Dissent किंवा विद्रोह' असं म्हणू शकतो.

जीवनाकडे पाहण्याचा आणि कलेकडे पाहण्याचा ज्याचा दृष्टीकोन वेगळाच नाहीये अशीच व्यक्ती म्हणू शकते 'जीवनमूल्य हेच कलामूल्य'.

39 वर्षांचे प्रभाकर कांबळे हे दृश्य-कलाकार आहेत. म्हणजे ते चित्रकार आहेत, शिल्पकार आहेत, सादरीकरण करतात, इन्स्टॉलेशन्स करतात, सध्या ते एका चित्रपटावर काम करत आहेत म्हणजे थोडक्यात आपण असू म्हणू शकतो जी कला आपल्याला डोळ्यांनी पाहता येते त्या सर्व गोष्टी ते करतात म्हणून त्यांना चित्रकार किंवा शिल्पकार म्हणण्यापेक्षा दृश्य-कलाकार म्हणणे जास्त योग्य ठरते.

इतकंच नाही तर ते 'क्युरेटर' देखील आहेत. क्युरेटर म्हणजे एक अशी व्यक्ती जी इतर कलाकांराच्या कला सादर करण्यासाठी एक संकल्पना घेऊन येते. त्यात काय हवंय नको ते पाहते आणि मग त्या गोष्टीचं सादरीकरण वेगवेगळ्या आर्ट गॅलरीमध्ये केलं जातं.

प्रभाकर यांचा पहिला स्वतंत्र शो 2016 मध्ये मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी झाला त्यानंतर जगभरात अनेक ठिकाणी त्यांच्या कलेचे सादरीकरण झाले.

त्यानिमित्ताने त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबत काम केले आहे. प्रभाकर यांच्या कलाकृतीचे सादरीकरण लंडन, बर्लिन, बुसान (दक्षिण कोरिया), पॅरिस, आफ्रिका या ठिकाणी झाली आहेत.

प्रभाकर यांची ओळख केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला एक कलाकार इतकीच नाहीये तर त्यांच्या 'सेक्युलर आर्ट मूव्हमेंट' मधून ते देशभरातील अन्य कलाकारांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. हे सादरीकरण करताना त्यांना अनेक स्तरावर काम करावं लागतं.

त्यात कलाकाराचा परिचय करुन देणे, त्या कलाकाराची कला नेमकी काय आहे, त्याचा अर्थ काय, प्रतीकं कोणती वापरली गेली, याचे लिखाण देखील त्यांना करावे लागते. दृश्य कलेची नवीन परिभाषा काय असू शकते, यावर त्यांनी चर्चा सुरू करून कलेतील जुन्या रूढी परंपरांना आव्हान देत आहेत.

या लेखाच्या निमित्ताने बीबीसी मराठीने प्रभाकर यांच्याशी गप्पा मारल्या.

त्यांची चित्रं, त्यांची शिल्पकला आणि त्यामागची त्यांची भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता हे त्यांनी या मुलाखतीत उलगडून दाखवले. तेच या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

'आवड असल्याशिवाय कुणीच कलाकार होऊ शकत नाही'

प्रभाकर यांचे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील आणूर हे आहे. त्यांचे वडील आणूरहून इचलकरंजीला नोकरीसाठी आले. इचलकरंजी हे कपडा उद्योगासाठी नावाजलेले शहर आहे.

त्याच ठिकाणी प्रभाकर यांचे वडील यंत्रमाग कामगार होते. इचलकरंजीतील लेबर लेनमध्ये ते राहत. लहानपणापासूनच प्रभाकर यांना चित्रकलेची आवड होती.

'आवड असल्याशिवाय कुणी कलाकारच होऊ शकत नाही, ती पूर्वअटच समजायला हवी,' असं प्रभाकर सांगतात.

प्रभाकर यांची कलाकार आणि चळवळीतला कार्यकर्ता म्हणून जडण घडण आपल्या कुटुंबीयांकडूनच झाली. आंबेडकरी भजनं, जलसे यांचा प्रभाव त्यांच्यावर लहानपणापासूनच होता.

इचलकरंजीत त्यांच्या घरासमोरच ही भजनं, गीते गायली जायची त्यातूनच त्यांना आंबेडकरी विचार मिळाला.

आपल्या बालपणीच्या दिवसांबद्दल प्रभाकर सांगतात "शुक्रवार हा दिवस असायचा ज्या दिवशी सर्वांचे पगार व्हायचे. मग जेवण झालं की सर्व जण एकत्र भजन आणि गाणी म्हणण्यासाठी जमायचे. ते लहानपणापासून कानावर पडायचं. ते विचार त्या गाण्यातून यायचे. वाद्य कसं वाजवतात त्यातला इंटरेस्ट, गाणं कसं म्हणतात त्यातला इंटरेस्ट या गोष्टी कळाल्या. अजून त्यातलं कळावं म्हणून ते पुस्तकं वाचत गेलो. तिथून इंटरेस्ट वाढला."

"आंबेडकरी तरुणाच्या आयुष्यात चळवळ येत नाही, तर त्याच्या जन्मानेच त्याच्यासोबत ते आलेलं असतं. याच वातावरणात माझी जडण-घडण झाली."

"शाळेत गेल्यावर एक कला शिक्षक होते त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्याला खतपाणी मिळत गेलं. मग दहावी बारावी नंतर काय करायचं? तर आर्ट चांगलं आहे तर त्याला जाऊ असा एक विचार केला. माझ्या आई-वडिलांनी त्यात कुठलीही शंका न घेता मला प्रोत्साहन दिलं आणि मी पुढे गेलो."

दहावी झाल्यानंतर प्रभाकर यांनी साईन बोर्ड पेंटिंगची कामे करण्यास सुरुवात केली. त्या पैशातूनच त्यांनी शिक्षण पुढे सुरू ठेवले. मग बारावी आणि त्यानंतर आर्ट टीचर डिप्लोमापर्यंतच शिक्षण त्यांनी इचलकरंजीतच घेतलं.

ज्या प्रमाणे प्राथमिक शिक्षकासाठी डी. एड. म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन असतं त्याप्रमाणेच कला शिक्षक व्हायचं असेल तर आर्ट टीचर डिप्लोमा लागतो. तो पूर्ण झाल्यावर प्रभाकर यांनी नोकरीसाठीही प्रयत्न करून पाहिले पण काही कटू अनुभव आल्यावर त्यांनी स्वतंत्र काम करण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर येथील प्रसिद्ध शिल्पकार संजय तडसरकर यांच्याकडे त्यांनी उमेदवारी केली.

"माझं अनौपचारिक शिक्षण त्यांच्याकडेच झालं. एक दोन वर्षांसाठी त्यांनीच माझं पालकत्व घेतलं. त्यांनी मला मुंबईला जाण्यासाठी प्रोत्साहित केलं," असं प्रभाकर सांगतात.

प्रभाकर यांनी मुंबईत रहेजा कॉलेज ऑफ आर्ट्सला शिक्षण घेतलं. त्या ठिकाणी त्यांनी 'गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट अँड पेंटिंग' हा कोर्स केला. त्यानंतर त्यांनी 2013 मध्ये जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पोस्ट डिप्लोमा केला.

'अस्वस्थेतला चित्रबद्ध केलं'

भारतात जे तरुण-तरुणी करिअर म्हणून चित्रकला निवडतात. त्यांचं स्वप्न असतं की 'जहांगीर आर्ट गॅलरी'मध्ये आपला स्वतंत्र शो व्हावा. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांनी 2016 मध्ये प्रभाकर यांचा जहांगीरमध्ये पहिला शो झाला. या शो'ची कल्पना होती, 'अस्वस्थ मनाची आंदोलने.'

विवेकपूर्ण निर्णय घेणे किंवा अविवेकाने निर्णय घेणे, यामध्ये एक मनाची अवस्था असते. एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून या अवस्थेकडे आपण कसे पाहतो यावर चिंतन करुन त्यांनी ही चित्रे रेखाटली होती.

एक दर्शक म्हणून जेव्हा आपण या चित्रांकडे पाहतो तेव्हा आपलीच अस्वस्थता बाहेर पडत आहे असा भास होतो.

पहिल्या प्रदर्शनाबद्दल प्रभाकर सांगतात, "सामाजिक आणि राजकीय भूमिकेला आव्हान देणारी माझी भूमिका होती. त्यातून हा विषय मला सुचला. मी जे पाहत गेलो, जे अनुभवत गेलो त्यातून माझी कला देखील बदलत गेली. कॉलेजमध्ये असताना माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित मी चित्रं काढायचो. तो अनुभव खूप आतला होता. कॉलेजमध्ये असताना कधी कधी जेवण नाही मिळायचं. एक वेळेसच खायचं, कधी तिन्ही वेळेला वडापाव खाऊन दिवस काढायचा.

"एका पॉइंटनंतर हे बंद झालं. वेळेवर जेवण मिळायला लागलं, त्यानंतर प्रश्न असा पडला की आता तशी चित्रं आपण रेखाटू शकत नाहीत कारण पोट भरलं आहे. आधीच्या स्थितीत ते शक्य होतं पण बदललेल्या स्थितीत ते शक्यच नाही."

"त्याच वेळी चळवळीतही सक्रिय होतो. तर तेव्हा हे मनात आलं की चळवळीतलं जीवन आणि कलेतील जीवन हे दोन वेगळे जीवन आपण का जगत आहोत. या दोघांचे एकत्रीकरण होऊ शकते. त्यातून जे सामाजिक अनुभव आणि सामाजिक प्रश्न होते त्यावर मी विचार करू लागलो. तेच चित्रात येऊ लागलं," असं प्रभाकर सांगतात.

'कलाकृतीतून सामाजिक भाष्य'

कलाकाराने राजकीय किंवा सामाजिक भूमिका घ्यावी की नाही यावर अनेक वर्षांपासून वाद होत आहेत. काही कलाकारांचं असं म्हणणं असतं की कलेचं वेगळं प्रयोजन नसतं.

कलेसाठी कला हा एक त्यातला प्रवाह आहे तर दुसरा एक प्रवाह आहे की कलाकार हा समाजाचा भाग असतो त्यामुळे तो आजूबाजूला घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त कसा राहील? त्या घटनांचे प्रतिबिंब त्याच्या कलेतून झळकते.

प्रभाकर यांच्या कलाकृती सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या असतात.

2017मध्ये उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला . त्याची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटली होती. नंतर पुन्हा त्या पुतळ्याला निळा रंग देण्यात आला.

या घटनेवरील भाष्य म्हणजे प्रभाकर यांची 'डिसफिगरेशन ऑफ इमेजेस.'

हे एक कायनेटिक इंस्टॉलेशन आहे. या कलाकृतीचा गाभा यातील जिवंतपणा आहे. याचा व्हीडिओ देखील उपलब्ध आहे.

सुरुवातीला यंत्राची हालचाल होताना दिसते. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निळ्या रंगाचा सुट असलेला पुतळा दिसतो. काही सेकंदांच्या स्थिरतेनंतर ही कलाकृती हलू लागते. त्यानंतर ब्रशने पुतळा आपल्या डोळ्यादेखत भगवा होताना दिसतो.

या कलाकृतीबद्दल प्रभाकर सांगतात, "निळ्या रंगाचं पॉलिटिकल प्रेझेन्स प्रचंड चार्ज्ड आहे. बाबासाहेबांना भगवा रंग लावणे ही क्रिटिकल मूव्ह आहे, ही बोल्ड मूव्ह आहे. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की आम्हाला आंबेडकर हवे आहेत, पण आम्हाला जसे हवे तसे ते हवेत. म्हणून त्यांनी त्यांना भगवा रंग लावला."

"या कलाकृतीचं मी कायनॅटिक इंस्टालेशन्स केलंय. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती जेव्हा ही कलाकृती पाहतो तेव्हा ही गोष्ट त्या वर्तमानात व्यक्तीसमोर घडत आहे. तुम्ही या घटनेचे साक्षीदार आहात. ही कलाकृती तुमच्या विवेकाला प्रश्न विचारते. आता तुम्ही तुमच्या सदसद्विवेक बुद्धीला तुम्ही स्वतः आव्हान द्या. हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. अशी त्यामागे संकल्पना होती," असं प्रभाकर समजावून सांगतात.

प्रभाकर यांच्या अनेक कलाकृती आपल्या विचारांना आव्हान देतात. कोरोनाच्या काळात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले.

यात पायी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. यावर प्रतिक्रिया म्हणून प्रभाकर यांनी 'ब्रोकन फूट' ही कलाकृती सादर केली आहे. ही कलाकृती म्हणजे एक लाकडी पायाचे दुभंगलेले शिल्प आहे.

जर पाय मोडलेला असेल तर आपण त्यावर उभे राहू शकत नाहीत. तसंच जातिव्यवस्था, गरिबी यामुळे आपण एक समाज म्हणू उभे राहू शकत नाहीत असं त्यांनी या कलाकृतीतून मांडलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिव्यवस्थेचं वर्णन करताना म्हटलं आहे की 'जातिव्यवस्था ही मडक्यांच्या उतरंडीप्रमाणे असते.'

हाच धागा पकडून प्रभाकर यांनी 'उतरंड' ही सीरिज केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे जातीचे उच्छेदन किंवा निर्मूलन हा संदेश यातून अभिप्रेत आहे.

प्रभाकर हे प्रखर लोकशाहीवादी आहे. संपूर्ण विश्वात स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नांदावी याबाबत ते आग्रही आहेत. एक माणूस म्हणून आपण सर्वांनीच लोकशाहीवादी असावे अशी भूमिका ते मांडतात. त्यांच्या कलेच्या वैश्विक मांडणीची झलक 'सप्रेसिव्ह' या त्यांच्या कलाकृतीत पाहायला मिळते.

एक खुर्ची आहे. त्यावर जगाचा नकाशा आहे आणि त्यावर एक कृत्रिम बुलेट. समोर एक डफ आहे. याचा अर्थ उलगडून सांगताना प्रभाकर म्हणतात की डफ हे जगभरातील आंदोलनांचे आणि अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. तर खुर्ची आणि त्यावरील जगाचा नकाशा हे जागतिक सत्ताकेंद्रांचे प्रतीक आहे. त्यावर असलेली बुलेट हे दर्शवते की जगभरातील आंदोलने चिरडण्यासाठी सत्ताकेंद्रे बळाचा वापर करतात.

स्वतःच्या कलाकृतींवर काम करतानाच प्रभाकर हे इतर कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या कामाचे सादरीकरण करण्यासाठी झटतात. त्यातूनच ते क्युरेटर बनले.

'सेक्युलर आर्ट मूव्हमेंट' आणि क्युरेशन्स'

सेक्युलर आर्ट मूव्हमेंट कशी सुरू झाली याबाबत प्रभाकर सांगतात, "आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गौतमीपुत्र कांबळे यांनी 2014 मध्ये 'सेक्युलर मूव्हमेंट' सुरू केली. जातिअंताचा लढा, सामाजिक लढा हा अनेक अंगांनी देता येऊ शकतो असा विचार त्यांनी केला."

त्यातूनच 2017 मध्ये पाचगणीला त्यांनी फुले-आंबेडकरी विचारांच्या कलाकारांसाठी एक वर्कशॉप घेण्यात आला होता. राज्यातील एकूण 35 कलाकार त्यात सहभागी झाले होते. प्रभाकर हे देखील त्यात होते.

तेव्हापासून ते फुले-आंबेडकरी विचारांच्या कलाकारांचे कन्वेनर आहेत. 2019 ला अजिंठ्याच्या पायथ्याशी 'सेक्युलर आर्ट मूव्हमेंट' या बॅनरखाली एक वर्कशॉप घेण्यात आला. भारतातून अनेक कलाकार यात आले आणि आजही ते सेक्युलर आर्ट मूव्हमेंटशी जोडले गेले आहेत. या कलाकारांच्या कलाकृती सादर करता याव्या म्हणून प्रभाकर हे क्युरेटर देखील बनले.

क्युरेटर म्हणजे काय, क्युरेशन्स काय असतं हे विचारल्यावर प्रभाकर सांगतात, "क्युरेटर म्हणजे अशी व्यक्ती असते की आजच्या सामाजिक काळाला अनुसरून, ऐतिहासिक संदर्भ घेत एक समांतर विचार घेऊन प्रदर्शनाची संकल्पना मांडणे, त्या दृष्टीने कलाकारांची आणि त्यांच्या कलेची निवड करून त्याचे प्रदर्शन घडवणे. तसं त्यावेळी काहीच नव्हतं. मुख्य प्रवाहातील कला जगातीत हा आवाज असणारे, हा विचार सांगणाऱ्या कलाकारांचे प्रधिनित्वच अगदी नगण्य होते हा विचार मनात आला आणि मी क्युरेशन्सकडे वळलो."

"ज्या व्यवस्था मानवाला गुलाम बनवतात, भेदभावाला खतपाणी घालतात त्यामध्ये नैतिक हस्तक्षेप करणे हे सेक्युलर आर्ट मूव्हमेंटचे ध्येय आहे. गुलामीचे समर्थन करणारी व्यवस्था आणि गुलामीचा विरोध करणारी व्यवस्था यातले तुम्ही कोण आहात?" असा प्रश्न ते कलाकारांना विचारतात.

"सेक्युलर आर्ट मूव्हमेंटचा लढा हा मानवतेसाठीच आहे. समानतेसाठीच आहे. समानतेकडे जाण्यासाठी त्यासाठी आपण सर्व मिळून कार्य करू शकतो हा या चळवळीचा अर्थ आहे," असं प्रभाकर यांना वाटतं.

सेक्युलर आर्ट मूव्हमेंटमध्ये काम करत असताना तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो असे विचारले असता प्रभाकर सांगतात की, "आमच्यावर हा आरोप होतो की कलेतच आम्ही जात आणली. आम्ही जात आणलेली नाहीये तर जात पूर्वीपासूनच अस्तित्वात होती या बाबीकडे बऱ्याचदा लोकांचं दुर्लक्ष होतं.

"सुरुवातीला जेव्हा दलित साहित्य आलं तेव्हा दलित साहित्याला देखील असंच हिणवलं गेलं. लोक तुमचं दुखणं विकत घेऊन का वाचतील असं त्यांना म्हटलं गेलं. आज आंबेडकरी साहित्याचे विक्रम होताना दिसत आहेत. जगात पुस्तकांच्या विक्रीचा असा कुठलाही विक्रम नसेल जो चैत्यभूमीवर रचला गेला नसेल."

"कलेचे प्रयोजन काय याची व्याख्या देखील अभिजनांनीच केली आहे आणि तीच सरसकट सर्वांवर लादली जाते. कलेला इतकं संकुचित केलं जाऊ शकत नाही. कला हा तुमचा विद्रोह नोंदवण्यासाठी देखील असते तेही तितकंच महत्त्वाचं आहे," असं प्रभाकर आवर्जून सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)