You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्यामुळे बायको साखळदंडातून मुक्त'; आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची संघर्षगाथा
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी
"मला माझ्या नवऱ्याकडं जायचंय असं मी त्यांना म्हणलं की ते मला मारहाण करायचे. मी त्याच्याकडं पळून जाऊ नये म्हणून त्यांनी माझे पाय लोखंडी साखळदंडानं बांधून ठेवले होते."
"मला दोन महिने तसंच एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. मला म्हणायचे तुझं आपल्या जातीवाल्यासोबत लग्न लावून द्यायचंय. त्यांनी माझा फोन सुद्धा काढून घेतला होता," छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या शहनाज ढगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला.
शहनाज यांचे पती सागर यांनीही त्याची मनःस्थिती सांगितली. ते म्हणाले, "ते दोन महिने मी खुप वेड लागल्यासारखं वागत होतो. इकडं तिकडं खुप पळापळ करत होतो. खुप लोकांकडं गेलो. कमिशनर साहेबांना पत्र पाठवलं. न्यायालयात गेलो."
"अख्खे दोन महिने त्यांनी माझ्या बायकोला आणि मुलाला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं. त्यांची तिथून सुटका करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्याची मला खुप मदत झाली."
आपले आईवडील आपल्याशी इतकं वाईट वागतील असं शहनाज यांना कधीही वाटलं नव्हतं.
आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे त्यांच्या वाटेला आलेली फरफट आणि एकत्र राहण्यासाठी कराव्या लागणारा संघर्षाची कहाणी सांगताना त्यांना सतत गहिवरून येत होतं.
दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर 29 जानेवारीला सागर यांनी त्यांची 22 वर्षीय पत्नी शहनाज आणि साडेतीन वर्षांचा मुलगा कार्तिक या दोघांची कायद्याच्या मदतीनं कशी सुटका केली? त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.
जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळील उस्मानपेठ परिसरात शहनाज यांचे आईवडील राहतात. त्या तिकडे गेल्या खरं परंतु तेव्हा त्या त्यांच्या पतीसोबत पुन्हा सासरी येऊ शकल्या नाहीत.
कारण शहनाज आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या कुटुंबियांनी घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं. त्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पायांना लोखंडी साखळदंडांनी बांधून, त्याला दोन कुलूपं लावून ठेवली होती.
शेवटी दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलीस आणि न्यायालयाच्या मदतीनं सागर यांनी शहनाज आणि कार्तिकला त्या कैदेतून सोडवलं आणि पुन्हा आपल्या घरी आणलं.
प्रकरण काय?
शहनाज ऊर्फ सोनल आणि सागर ढगे हे पती-पत्नी आपला साडेतीन वर्षांचा मुलगा कार्तिक याच्या सोबत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निसारवाडीमध्ये राहतात. 2020 मध्ये त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं होतं.
कारण शहनाज या मुस्लीम समाजातून येत असल्यामुळे दोघांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.
मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच सागर यांच्या घरच्यांचा राग निवळला होता, तर गेल्या एक वर्षापासून शहनाज यांचे आईवडील आणि इतर नातेवाईकही त्यांना अधूनमधून त्यांच्या निसारवाडीच्या घरी येऊन भेटू लागले.
त्यामुळे आता खऱ्या अर्थानं आपल्या सुखी संसाराला सुरुवात झाली असं शहनाज आणि सागर यांना वाटायला लागलं लागलं होतं. अशातच शहनाज या पती सागर आणि त्यांच्या लहानशा कार्तिकला घेऊन माहेरी गेल्या.
भेटायला माहेरी बोलावलं अन् बांधून ठेवलं
5 डिसेंबर 2024 ला शहनाज यांच्या आई मुमताज खालेद शहा यांनी फोन करून त्यांच्या पायावर दगड पडल्याचं सांगत शहनाज यांना भेटायला बोलवलं.
सागर ढगे सांगतात, "माझ्या मोठ्या मेहुणीची डिलीव्हरी झाली आहे आणि सासूच्या पायाला लागलं आहे असं त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं आणि भेटायला बोलवलं. म्हणून आम्ही काळजीपोटी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो."
"तिथं गेल्यावर त्यांनी गोड गोड बोलून मला जेवू घातलं. नंतर ते सगळे म्हणाले की, तुम्ही जा, मात्र आमच्या लेकीला तीन-चार दिवस माहेरी राहू द्या. म्हणून मी माझ्या मुलाला आणि बायकोला तिथंच सोडून संभाजी नगरला परत जायला निघालो."
"नंतर मी जेव्हा बसमध्ये बसलो, तेव्हा माझ्या बायकोचा मला फोन आला. फोनवर ती वेगळंच काहीतरी बोलत होती. मला थोडा संशय आला. मी तिला असं का बोलतेस, अचानक काय झालं असं विचारलं. तिनं नंतर फोन करते सांगून लगेच फोन ठेवून दिला. नंतर तिचा फोन बंद लागला."
"त्यानंतर मी दोन दिवस तिच्या फोनची वाट पाहिली, पण तिचा फोन आलाच नाही. तिच्या वडीलांनी तिचा फोन घेऊन तो बंद करून ठेवला होता," असं सागर यांनी सांगितलं.
दरम्यान दोन दिवसांनी म्हणजे 7 डिसेंबरला सागर ढगे आपली पत्नी आणि मुलाला आणायला पुन्हा त्यांच्या सासुरवाडीला गेले.
ते सांगतात, "मी त्यांना परत घ्यायला गेलो, तर तिथं शहनाजच्या घरच्यांनी मला मारहाण केली. मला मारून टाकायच्या धमक्या दिल्या."
"मला बघितल्यावर माझा लहान मुलगा माझ्याकडे पळत आला. मी त्याला उचलून घेतलं, तर त्यांनी लगेच त्याला माझ्या हातातून हिसकावून घेतलं आणि मला हाकलून दिलं."
तुझा आणि आमचा धर्म वेगळा असल्यामुळं आम्ही आमच्या मुलीला परत तुझ्यासोबत पाठवणार नाही असं सांगून त्यांना हकलून दिल्याचं सागर यांनी सांगितलं.
'त्यांनी माझे पाय साखळदंडानं बांधले'
सागर ढगे यांना तर त्यांच्या सासरच्यांनी हाकलून दिलं. मात्र शहनाज आणि त्यांचा मुलगा कार्तिक तिथंच होता. त्यांना तर नंतर जीवघेण्या त्रासाचा सामना करावा लागला.
शहनाज सांगतात, "सागर मला घ्यायला आल्यावर असं सगळं करायचं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. त्यांनी ते तसंच केलं. मला धरून ठेवलं. मुलाला हिसकावून घेतलं."
"तेव्हा मला सगळ्या गोष्टींचा अंदाज आला आणि मग मी सागर यांना सांगितलं की हे मला असं पाठवणार नाहीत. तुम्ही आधी पोलीस स्टेशनला जा, तक्रार करा."
तर सागर सांगतात, "मग मी पोलिसांकडं गेलो. त्यांनी मला सांगितलं की तुझं आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे आपल्याला कोर्टाच्या मदतीनं पुढं जावं लागेल. मग मी एक वकील लावला आणि कोर्टाची मदत घेतली. त्यावेळी माझे आईवडील देखील माझ्यासोबत होते."
शहनाज यांनी सांगितलं की, असं सगळं होईल याचा त्यांना अजिबात संशय आला नव्हता. गेल्या एक वर्षापासून ते सगळे एकमेकांना भेटायचे, फोनवर बोलायचे. सगळं काही चांगलं झालं असं त्यांना वाटत होतं.
त्या सांगतात, "मी सतत नवऱ्याकडं जायचंय असं म्हणायला लागले म्हणून त्यांनी 10 दिवसांनी माझे पाय लोखंडी साखळदंडानं बांधून टाकले. त्याला दोन कुलूपं लावली."
"नवऱ्याकडं जायचंय म्हणालं की ते मला मारहाण करायचे. जातीतल्या एखाद्या मुलासोबत माझं लग्नं पण लावून द्यायचं म्हणत होते. ते सुरुवातीला माझ्या मुलाला पण माझ्यापासून लांब ठेवायचे. पण मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलाला माझ्यासमोर ठेवलं नाही तर मी माझ्या जीवाचं बरंवाईट करेल."
'मला घ्यायला पोलिसांची गाडी तरी पाठवा'
या काळात शहनाज आणि सागर यांना एकमेकांशी संपर्क करण्याचा कोणताच पर्याय नव्हता. कारण शहनाज यांचा फोन त्यांच्या घरच्यांनी काढून घेतला होता. मात्र संधी मिळताच त्यांनी सागर यांना फोन केला आणि त्यांना त्याच्यासोबत चालू असलेल्या अत्याचाराची सगळी हकीकत सांगितली.
त्या सांगतात, "माझ्या दाजींचा मोबाईल चार्जिंगला लावलेला मला दिसला. घरात कोणी नाही हे पाहून मी माझ्या नवऱ्याला गुपचुप फोन लावला आणि माझ्यासोबत जे होत होतं ते सगळं सांगितलं."
इतक्या दिवसांनंतर आपल्या पत्नीचा आवाज ऐकल्यावर सागर यांच्या जीवात जीव आल्याचं त्यांनी सांगितलं. ते सांगतात, "दोन महिन्यांत फक्त एकदाच तिनं दोन मिनिटांसाठी मला फोन केला होता. ती मला फोनवर असं बोलली की, मला साखळदंडानं बांधून ठेवलंय. तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा आणि मला घ्यायला पोलिसांची गाडी पाठवा."
"मग मी तिला म्हणालो की, मी कोर्टात केस दाखल केली आहे. पोलीस लवकरच तुम्हाला घ्यायला येणार आहेत. मी तर खुप मेहनत करतोय तुम्हाला सोडवण्यासाठी. तेवढ्यात कोणी तरी रूममध्ये आलं आणि तिनं फोन ठेवून दिला. परत आमच्यात काहीच बोलणं झालं नाही."
अशी झाली सुटका
शहनाज जिथं अडकल्या होत्या तिथून बाहेर पडणं त्यांच्यासाठी फार कठीण होतं. त्यांना परत न पाठवण्यासाठी त्यांच्या घरच्यांनी शक्य असलेले सगळे प्रयत्नं केले होते. त्या सांगतात, "तिथून सुटायच्या आधी एकदा पोलीस मला कोर्टात हजर करण्यासाठी घ्यायला आले होते."
"त्यावेळी माझ्या आईनं पोलिसांची गाडी पाहिली. तिनं लगेच घराला आतून कुलूप लावलं. मी त्यांना म्हणाले की, मला कोर्टात हजर राहायचंय, तर ती मला म्हणे गप्प बस,आवाज करू नको. नंतर पोलिसांची गाडी गेल्यावर त्यांनी मला खुप मारलं."
"माझ्यामुळे त्यांना खुप त्रास होतोय असं ते सगळे सारखं म्हणायचे. वडील म्हणायचे की, जर कोर्टात आमच्या बाजूनं जबाब देणार असशील तरच जाऊ देईल. त्या पोराबरोबर जायचं नाही. त्याच्या पोराला पण त्याला देऊन टाकायचं. आपल्याला नको ते."
12 जानेवारीला कोर्टात शहनाज यांना हजर राहायला सांगितलेलं. मात्र शहनाज यांचे वडील एकटेच कोर्टात हजर झालेले. त्यावेळी त्यांनी सागर यांना सांगितलं की, काहीही केलं तरी मुलीला परत पाठवणार नाही.
शहनाज यांची सुटका ज्या दिवशी झाली तो दिवस आठवताना सागर सांगतात, "29 जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी माझ्या बायकोची आणि मुलाची सुटका झाली त्या दिवशी मी संभाजीनगरमध्ये कामावर गेलो होतो."
"मला भोकरदनवरून पोलीस उपनिरीक्षक बी.टी.सहाणे यांचा फोन आला. ते म्हणाले की, आज आम्ही शहनाजला औरंगाबादच्या कोर्टात हजर करणार आहोत."
"मी त्यांना म्हणालो की, मला तर 3 फेब्रुवारीची तारीख मिळाली आहे. तर ते म्हणाले की, लवकरात लवकर आम्ही कारवाई केली आहे. तू इकडे ये."
"मग मी माझ्या आईला बोलावून घेतलं आणि तिकडून सरळ आम्ही कोर्टात गेलो. न्यायालयानं आमच्या बाजूनं निकाल दिला."
अशा प्रकारे शहनाज यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
सोडवायला आलेल्या पोलिसांना आईनं मारले दगड
पोलीस शहनाज यांना त्यांच्या घरी घ्यायला गेले तेव्हा त्यांच्या आई आणि बहिणीनं त्यांना विरोध करण्याचा खुप प्रयत्न केला.
शहनाज सांगतात, "मी चुलीपाशी बसून स्वयंपाक करत होते. मला करमत नव्हतं, तर मी बसून बसून काम करत होते. तेव्हा दारातून पोलिसांची गाडी आलेली मला दिसली. ते पाहून मी घरात कोणाला काहीच बोलले नाही."
"पोलीस माझ्याकडे आले आणि त्यांनी मला माझं नाव विचारलं. माझ्याजवळ बसलेल्या मुलाकडं पाहून त्यांनी मला विचारलं की हा तुझा मुलगा आहे का? मी हो म्हणाले. मग ते म्हणाले चला. त्यांनी माझा हात धरला आणि मला तिथून बाहेर काढलं."
शहनाज यांनी सांगितल्यानुसार, तो सगळा प्रकार पाहून त्यांची आई खुप चिडली आणि त्यांनी पोलिसांना दगडगोटे फेकून मारायला सुरुवात केली.
शहनाज यांना थांबवणं शक्य दिसत नाही हे पाहून त्यांच्या बहिणीनं शहनाज यांच्या लहान मुलाला धरलं. मग त्यांच्या आईनं पोलिसांना धमकवलं की, माझ्या पोरीला सोडा आणि याला घेऊन जा.
मात्र पोलिसांनी कार्तिक आणि शहनाज यांना त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि त्या दोघांना भोकरदन पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
'बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्यामुळे माझी बायको परत मिळाली'
या सगळ्या प्रकरणात कुणाची मदत झाली यावर बोलताना सागर ढगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला. ते म्हणाले, "न्यायालय आणि पोलिसांनी आम्हाला खुप मदत केली. या प्रकरणानंतर माझा कायद्यावर पूर्ण विश्वास बसलाय."
"बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्यामुळे मला माझी बायको आणि मुलगा परत मिळाले."
"आपल्या कायद्याची माहिती असेल तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. असा मोठा अत्याचार होत असेल, तर आपण कायद्याशिवाय दुसरं कुठंच जाऊ शकत नाही. माझ्याकडं हा कायद्याचा शेवटचा पर्याय होता."
महाराष्ट्रामध्ये आंतरधर्मीय विवाहावरून इतका वाद व्हायला नको, असं सागर ढगे यांना वाटतं.
ते सांगतात, "आम्हाला खुप त्रास झालाय. माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस सुद्धा तुरूंगात झालाय. माझ्या मुलाचं पहिलं वर्ष तुरुंगात पूर्ण झालंय. तो तीन महिन्यांचा होता तेव्हा आम्हाला पकडून तुरूंगात टाकलं होतं."
"2020 मध्ये आम्ही पळून जाऊन लग्नं केलेलं. तेव्हा शहनाज पूर्ण 18 वर्षांची होती. तरी तिच्या आईवडिलांनी तिला अल्पवयीन ठरवण्यासाठी खोटी जन्मतारीख असलेली कागदपत्रं दाखवून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला होता."
"मला तुरूंगात टाकण्यात आलं. तेव्हा शहनाज म्हणाली की, मला पण तुरूंगात टाका. तेव्हा माझ्या बायकोला सुधारगृहात ठेवण्यात आलं. जवळपास 9 महिने आम्ही तिघं तुरूंगात होतो. नंतर आम्हाला निर्दोष मुक्त करण्यात आलं."
पोलीस काय म्हणाले?
भोकरदनचे पोलीस उपनिरीक्षक बी.टी. सहाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आलापूरचं हे कुटुंब औरंगाबादमधील निसारवाडीत काही काळासाठी राहत होतं. तिथंच शहनाज आणि सागर संपर्कात आले. नंतर त्यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला.
दरम्यान लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या आईवडीलांनी त्या दोघांना गोड बोलून गावाकडं बोलवलं. त्यानंतर त्या मुलीच्या पायात बेड्या टाकून तिला घरात डांबून ठेवलं. तिच्या नवऱ्यानं उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली.
त्यानंतर न्यायालयानं सदर प्रकरणात आम्हाला आदेश दिले की, पीडित मुलीला आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या मुलाला आमच्या समक्ष हजर करा. आम्ही त्यांच्या घरी जाऊन प्रतिकार करून तसेच बळाचा वापर करून शहनाजला घराच्या बाहेर काढलं.
"शहनाजच्या पायात बेड्या होत्या. तिला पोलीस स्टेशनला आणून आम्ही तिच्या बेड्या काढून तिची सुटका केली. नंतर न्यायालयाच्या आदेशावरून तिला तिच्या पतीच्या ताब्यात दिलं."
आता शहनाज सुखरूप असून न्यायालयानं त्यांना संरक्षण दिलं आहे. तसेच सदर प्रकरणात शहनाज यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यामध्ये शहनाज यांच्या आई मुमताज बेगम खालेद, वडील खालेद शहा सिकंदर शाह, शाहीन शाकीर शहा, जाकेर खालेद शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)