You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईत रामनवमीला प्रक्षोभक गाणी अन् आक्षेपार्ह घोषणाबाजी? नक्की काय घडलं होतं?
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
देशभरात नुकताच रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. जागोजागी शोभायात्रा, रॅली काढण्यात आली. इतर सणावारांप्रमाणेच या शोभायात्रांमध्येही पारंपारिक वाद्यांबरोबरच डॉल्बी, डीजे, मोठमोठ्या स्पीकरचा वापर करण्यात आला.
राज्यात काही ठिकाणच्या शोभायात्रांमध्ये प्रभू श्रीरामांचे देखावे होते तर काही ठिकाणी भक्तिगीतांबरोबरच चित्रपटातील गाण्यांवर तरुणाई नृत्य करताना दिसली. रामनवमीचा मुंबईत देखील उत्साह पाहायला मिळाला.
परंतु, मुंबईत एका ठिकाणी काढण्यात आलेल्या रॅलीत प्रक्षोभक शब्द असलेली गाणी आणि आक्षेपार्ह शब्दांत घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंदली गेल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अंधेरी कुर्ला रोड येथुन मरोळ नाक्याच्या दिशेने एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन या ठिकाणी रामनवमी कार्यक्रमांच्या अनुषंगाने शोभा यात्रा मिरवणुकीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर ध्वनीक्षेपकाचा वापर करून त्याद्वारे अश्लिल शब्दरचनेचे गाणे वाजवल्याने सहार पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक 08/04/2025 रोजी गु.र.क्र. 327/2025 कलम 296, 3(5) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद असून तपासाधीन आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नक्की घटना काय आहे ?
मुंबईतील अंधेरी येथून रविवारी (6 एप्रिल) रामनवमी निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने शोभायात्रा निघाली होती. ही यात्रा अंधेरीतील शेरे पंजाब ते आरे कॉलनी येथील श्रीराम मंदिरपर्यंत निघाली होती.
या रॅलीत हजारोंच्या संख्येनं लोक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये ढोल या पारंपारिक वाद्याबरोबरच डीजेचाही समावेश होता.
ही रॅली पोलीस बंदोबस्तामध्ये निघाली होती. अखेरपर्यंत पोलिसांचा ताफा या रॅलीबरोबर होता. रॅलीमुळं रस्त्यावर मोठ्याप्रमाणात गर्दीही झाली होती. त्यामुळं मिरवणूक मार्गावरील दुकानं बंद होती.
याच रॅलीमध्ये एअरपोर्ट रोड मेट्रो व इतर परिसरामध्ये काही-काही मिनिटांच्या अंतरावर प्रक्षोभक गाणी लावण्यात आली, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे.
माहिती कशी समोर आली?
मुक्त पत्रकार आणि लेखक कुणाल पुरोहित यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवारी (7 एप्रिल) व्हीडिओ शेअर करत रॅलीत वाजविण्यात आलेल्या प्रक्षोभक गाण्यांची माहिती दिली. त्यांनी या रॅलीत आक्षेपार्ह शब्दांत घोषणाही दिल्या जात होत्या, असा दावा केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "मी काही तास मुंबई एअरपोर्टच्या परिसरात होतो. तिथे रॅलीमध्ये एका विशिष्ट समाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि प्रक्षोभक गाणी वाजवण्यात येत होती."
पुरोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "हजारोंच्या संख्येने जमलेल्या गर्दीत 20 ते 30 वयोगटातील तरुण, त्यात काही महिला आणि काही ज्येष्ठ नागरिक देखील होते.
त्या लोकप्रिय गाण्यांवर रॅलीत सहभागी झालेले लोक नाचत होते. जेव्हा जेव्हा गाण्यात एका विशिष्ट समाजाला स्पष्टपणे लक्ष्य केलं जात असे तेव्हा गाण्याचा आवाज वाढायचा."
"दर काही मिनिटांनी घोषणा सुरू होत्या. पोलीस संपूर्ण वेळ तिथेच होते. पण मी तिथे घालवलेल्या तासांमध्ये, त्यांना आवर घालण्याचा कोणताही प्रयत्न करताना पोलीस मला दिसले नाहीत," असं आपल्या पुढच्या पोस्टमध्ये पुरोहित यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे पुरोहित यांनी या प्रसंगांचे व्हीडिओही आपल्या पोस्टमध्ये शेअर केले आहेत.
सोशल मीडियातून संमिश्र प्रतिक्रिया
कुणाल पुरोहित यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी समर्थनार्थ तर काहींनी विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यामुळं सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असं काहींनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे.
तर काहींनी यात विशिष्ट समाजाचा कोणीही उल्लेख केलेला नाही आणि देश विरोधी असलेल्या लोकांबद्दल ही गाणी आहेत, असं म्हणत रॅलीतील गाणी आणि घोषणांचे समर्थन केले आहे.
'सर्वांना शांततेत, आनंदात राहायचंय'
रॅलीमध्ये प्रक्षोभक घोषणाबाजी आणि गाणी वाजवण्यात आली, यासंदर्भात रॅली निघालेल्या परिसरातील नागरिक आणि दुकानदारांशी बीबीसी मराठीच्या टीमने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी या दुकानदारांनी आणि नागरिकांनी कॅमेरावर न बोलण्याची आणि नाव न सांगण्याच्या अटीवर संवाद साधला.
त्यावेळी एक नागरिक म्हणाले की, "अशाप्रकारे प्रक्षोभक गाणी आणि घोषणाबाजी करण्यात येत होती. हे फार दुर्दैवी आहे, असं व्हायला नको होतं. एकमेकांच्या भावना दुखावून काहीही होणार नाही.
"उत्तराला प्रतिउत्तर देणं हे सामाजिक सलोखा बिघडवण्यासारखं आहे. आम्ही काहीतरी बोलू पुन्हा ते काहीतरी बोलतील. त्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होईल. त्यामुळं हे घडल्यानंतर आता पुन्हा कोणीच यावर प्रतिक्रिया देऊ नये."
तर दुसरे एक दुकानदार म्हणाले की, "रॅली सायंकाळच्या वेळी जात होती. त्यावेळेला मोठ्या आवाजात प्रक्षोभक गाणी आणि घोषणा दिल्या जात होत्या. पोलिसांनी यावेळी हस्तक्षेप केला नाही.
"सुदैवानं काही अनुचित प्रकार घडला नाही. आता व्हीडिओ व्हायरल होत आहेत. समाजाबद्दल बोललं जातं, त्यावेळी साहाजिकच भावना दुखावतात. पण आम्हाला सर्वांना शांततेत आणि आनंदात राहायचं आहे."
पोलीस काय म्हणाले?
या प्रकारासंदर्भात डीसीपी सचिन गुंजाळ आणि सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनवणे यांच्याशी बीबीसी मराठीनं संपर्क साधला.
"हे व्हीडिओ आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याची सत्यता आम्ही तपासत आहोत. सध्यातरी कोणाची तक्रार आलेली नाही. यात काही कार्यवाही असेल तर आपल्याला कळवण्यात येईल," असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनवणे म्हणाले.
'आता सर्वांनी विचार करण्याची गरज'
दरम्यान, या रॅलीबाबतचे व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणारे कुणाल पुरोहित यांनी रॅलीत घडलेल्या घटनेची माहिती दिली.
ते म्हणाले की, "या यात्रेत अशी गाणी वाजवली गेली की ज्यात विशिष्ट समाजाबद्दल उघडपणाने राग आणि द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. रॅलीत माईकवर घोषणा दिल्या जात होत्या. अशा घोषणांचा उल्लेखही करता येणार नाही."
पुरोहित पुढे म्हणाले, "एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी येथून ही रॅली निघाली होती. अंधेरीत मोठमोठे कॉर्पोरेट कार्यालये आहेत, बहुराष्ट्रीय कंपन्यांची मुख्यालयं इथे आहेत.
"महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळही या भागातच आहे. ही यात्रा विमानतळाच्या बाहेरच होती. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात असे प्रकार होऊ शकत नाही असं म्हटलं जातं. परंतु, आता सर्वांनी विचार करण्याची गरज आहे."
दरम्यान, गेले काही दिवस औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादाची ठिणगी पडली.
याचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले होते.
औरंगजेबाच्या एका वक्तव्यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
पुढे 17 मार्च 2025 रोजी नागपूर येथे औरंगजेबच्या कबरी वरून हिंसाचाराची घटना सुद्धा घडली. या घटनेत बरंच नुकसान आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर प्रक्षोभक घोषणाबाजी, रॅली यांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज समाजातील सजग नागरिकांकडून व्यक्त केली जातेय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.