जेव्हा राजशेखर रेड्डींचं हेलिकॉप्टर अचानक गायब झालं आणि 25 तासांच्या शोधानंतर त्यांचा मृतदेह सापडला

फोटो स्रोत, YSR CONGRESS PARTY / AIRFORCE / BSN MALLESWARA RAO
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे.
बुधवारी (28 जानेवारी) सकाळी आठ वाजता अजित पवार विशेष विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला.
हे विमान VTSSK, LJ45 प्रकारचं चार्टर विमान होतं आणि मुंबईहून बारामतीला जात होतं.
बारामती विमानतळावर उतरताना रनवेजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:48 वाजता हा अपघात झाला.
या दुर्दैवी घटनेने इतिहासातील काही विमान अपघातांच्या आठवणी ताज्या केल्या, ज्यामध्ये महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना प्राण गमवावे लागले होते. असाच भीषण अपघात होता आंध्र प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा. रेड्डी यांचं हेलिकॉप्टर हवेतच गायब झालं होतं आणि तब्बल 25 तास याची शोधाशोध सुरू होती...
नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया.
2 सप्टेंबर 2009…बुधवार
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री हैदराबादमध्ये नसले की, सी ब्लॉकमध्ये फारशी गजबज नसायची. पण त्यादिवशीची सकाळ वेगळी होती. 11 वाजल्यापासूनच तिथे प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं.
तत्कालीन मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरने सकाळी आठ वाजून 38 मिनिटांनी बेगमपट इथून उड्डाण केलं होतं. त्यांना चित्तूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं. वेळापत्रकानुसार त्यांनी साडे दहा वाजता तिथे पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते पोहोचले नाहीत.
इलेक्ट्रॉनिक मीडियावर बातम्या येऊ लागल्या...रेड्डी यांच्या हेलिकॉप्टरचा संपर्क होत नाहीये, एटीसीला त्यांच्या हेलिकॉप्टरची माहिती मिळत नाहीये.
पण काही वेळातच साक्षी समूहासह अनेक चॅनेल्सवर मुख्यमंत्री सुरक्षित असून रस्त्याने चित्तूरला जात असल्याची बातमी चालू लागली.
तोपर्यंत राज्याचे गृहमंत्री सबिता इंद्रा रेड्डी, अर्थमंत्री रोशैय्या आणि इतर ज्येष्ठ मंत्री तसंच राज्याचे मुख्य सचिव रमाकांत रेड्डी सचिवालयात पोहोचले होते. ते सर्वजण माहिती घेत होते.
याच गोंधळात मुख्यमंत्री सचिवालयात पोहोचलेल्या पत्रकारांमध्ये अफवा पसरू लागल्या. एटीसीशी हेलिकॉप्टरचा संपर्क नल्लामल्लाच्या जंगलाच्या भागात तुटला होता. त्यामुळे माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचं अपहरण केलं का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
अशाप्रकारच्या तर्कवितर्कामुळे सरकारने दुपारी एक निवेदन प्रसिद्ध केलं.

फोटो स्रोत, Getty Images
सरकारने आपल्या निवेदनात म्हटलं होतं की, हेलिकॉप्टर बेपत्ता आहे आणि मुख्यमंत्र्यांचाही तपास लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हेलिकॉप्टमध्ये मुख्यमंत्र्यांशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव सुब्रमण्यम आणि मुख्य सुरक्षा अधिकारी एएससी वेस्लेही होते.
मुख्यमंत्री असलेलं हेलिकॉप्टर गायब होणं राष्ट्रीय पातळीवरही मोठी बातमी बनली होती. केंद्र सरकारलाही सतर्कतेचा इशारा दिला गेला. राज्य सरकारने सहा जिल्ह्यांमध्ये अलर्टची घोषणा करत शोध अभियानासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न सुरू केले.
राज्य पोलीस आणि केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं की, पोलिस, सीआरपीएफ आणि अँटी नक्षल पोलिस दलाला नल्लामल्लाच्या जंगलात पाठवायला हवं. सिकंदराबाद आणि बंगळुरूहून सैन्याचे हेलिकॉप्टर मागवण्यात आले. जंगलात एक सुखोई विमानही पाठवण्यात आलं, जे थर्मल इमेजिंग करू शकत होतं. तोपर्यंत राज्यात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलन करत होते.
मात्र, हवामान खराब होतं, त्यामुळे हेलिकॉप्टर जंगलात पाठवणं शक्य नव्हतं. सरकारने म्हटलं की, इस्रोच्या उपग्रहाच्या मदतीने हेलिकॉप्टरचा शोध लावला जात आहे.
पत्रकार बीएसएन मल्लेश्वर राव यांनी या सगळ्या घडामोडींचं वार्तांकन केलं होतं. बीबीसीसाठी लिहिलेल्या लेखात त्यांनी हा सगळा घटनाक्रम अतिशय सविस्तरपणे लिहिला आहे.
मी त्यादिवशी मुख्यमंत्री सचिवालयात सकाळपासूनच उपस्थित होतो. जिथे काम करत होतो त्या 'आंध्र ज्योति' वर्तमानपत्राच्या कार्यालयात मी संध्याकाळी पोहोचलो. तेव्हा मला कळलं की, एबीएन चॅनेलची एक टीम नल्लामल्लाच्या जंगलात जाणार आहे. मी त्या टीममधे होतो. मुख्यमंत्र्यांबद्दल काहीही माहिती मिळाली नव्हती. पण, हेलिकॉप्टरबद्दल माहिती मिळाली.
माझ्या ब्युरो चीफने मला म्हटलं की, तू प्रिंट मीडियाचा रिपोर्टर म्हणून नाही, तर टीव्ही चॅनेलचा रिपोर्टर म्हणून जात आहेस. माझ्या सोबत क्राइम रिपोर्टर सत्यनारायण, रिपोर्टर वामसी, फोटोग्राफर नारायण, कॅमेरामन श्रीनिवास उर्फ अक्की रामूदेखील होते. सत्यनारायण यांनी मला सांगितलं की, नल्लामल्लामध्ये एक-दोन दिवस राहायला लागू शकतं. त्यामुळे कपडेही सोबत घे.
आम्ही साडे तीन वाजण्याच्या सुमारास आत्मकुरू इथे पोहोचलो. तिते आरअँडबी गेस्ट हाऊसमध्ये आधीपासूनच मीडियाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. मी आमचा स्थानिक वार्ताहर कोठाचारी यांना फोन केला. ते आम्हाला आत्मकुरूमधल्या प्रेस कॉन्फरन्सच्या ठिकाणी घेऊन गेले.
'काहीच माहिती मिळत नव्हती'
आम्ही हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याबद्दल चर्चा केली आणि दोन टीम बनवल्या. सत्यनारायण, वामसी कोठाचारी आणि कॅमेरापर्सन श्रीनिवास त्या ठिकाणी चालले होते, जिथे कृष्णा नदीत तेलाचे तवंग दिसल्याची माहिती मिळाली होती.
मी, कुर्नूलचे ब्युरो इनचार्ज सुब्बाराव, फोटोग्राफर अजानेयूलू आणि कॅमेरामन रामू टाटा इंडिका कारने नल्लामल्लाच्या जंगलाकडे चाललो.
स्थानिक आणि राष्ट्रीय टीव्ही चॅनेलचेही अनेक पत्रकार पोहोचत होते. आत्माकुरूपासून नालाकालुवापर्यंत गेलो, तिथून सहा किलोमीटर आत गेल्यानंतर रस्त्यावर सगळीकडे चिखल होता. त्यातून कार चालवणं अवघड होतं. कार पुढे जाऊच शकत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही चक्क पायी जाण्याचा निर्णय घेतला."

फोटो स्रोत, Getty Images
दोन-तीन किलोमीटर पायी चालल्यानंतरही आम्हाला पोलीस दिसले नाहीत किंवा शोध घेणारे हेलिकॉप्टरही. त्यामुळे आम्हाला वाटलं की, मुख्यमंत्री सापडले असावेत. पण आम्ही थोडं आतमध्ये गेलो, तेव्हा हेलिकॉप्टरचा आवाज यायला लागला. याचाच अर्थ शोधमोहीम सुरू होती.
सकाळी आठ वाजता एडिटर श्रीनिवास यांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी कुर्नुल जिल्ह्यातल्या वेलुगोडच्या डोंगरांवर हेलिकॉप्टर मिळाल्याचं सांगितलं आहे.
आम्ही वेलुगोडच्या दिशेने निघालो. आठ किलोमीटर गेल्यानंतर डोंगर लागेल असं ग्रामस्थांनी सांगितलं. पण आम्हाला बराच वेळ चालूनही डोंगर सापडत नव्हता," मल्लेश्वर राव सांगतात.
जंगलात अडकलेले पत्रकार आणि हेलिकॉप्टरचा शोध
आम्ही चालत होतो, तेव्हा आम्हाला मीडियाचे अनेक लोक तसंच स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते दिसत होते. आम्ही डोंगराच्या दिशेने जात होतो, पण तिथे हेलिकॉप्टर नव्हतं.
इतरही माध्यमांचे पत्रकार, कुर्नुल रेंजचे डीआयजी तिथे पोहोचले होते. कुठे जायचं हे आम्हाला कळत नव्हतं.
त्याचवेळी आकाशात एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत होतं. आम्ही त्या दिशेने पुढे गेलो, तर एक डोंगर होता. तिथेच काही स्थानिक लोकही उपस्थित होते. आम्ही त्यांच्यासोबतच डोंगरावर चढलो. त्याचवेळी हेलिकॉप्टर दुसऱ्या डोंगराच्या दिशेने गेल्याचं दिसलं.
आम्ही जंगलात अडकलो होतो...
स्थानिक लोकांनी सांगितलं की, तुम्ही 15 किलोमीटर चाललात की श्रीशैलम हायवे लागेल. परत जाण्यासाठी 30 किलोमीटर चालावं लागेल.

फोटो स्रोत, DGCA
आम्ही श्रीशैलम हायवेकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोबाईलला सिग्नल मिळत होता. मी हैदराबादचे ब्युरो चीफ शशिकांत यांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की, आम्ही जंगलात अडकलो आहोत.
कुठे पोहोचलो आहोत आणि कुठे जायचं आहे, याची त्यांना माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, मीडिया चॅनेलचे पत्रकारही जंगलात बेपत्ता झाल्याचा अफवा पसरत आहेत. थोड्या वेळात सिग्नल मिळणं थांबलं.
थोड्या वेळाने मी पुन्हा शशिकांतला फोन केला, त्याचवेळी समोरच्या डोंगरावर पुन्हा हेलिकॉप्टरने घिरट्या घालायला सुरूवात केली होती. शशिकांतने मला त्या हेलिकॉप्टरच्या दिशेने जायला सांगितलं.
आम्ही एक टेकडी उतरून दुसरी चढायला लागलो. काही अंतर पुढे गेलो तोपर्यंत हेलिकॉप्टरने दिशा बदलली होती.
आम्ही जिथे होतो, तिथेच बसकण मारली. कुठे जायचं काही कळत नव्हतं, फोनवर सिग्नल नव्हता आणि डोक्यात ग्रामस्थांनी दिलेला इशारा होता...या भागात वाघांचा वावर असतो. तेवढ्यात पुन्हा एक हेलिकॉप्टर दिसलं. ते हवेत एका जागी स्थिर झालं होतं. आम्ही पुन्हा चालायला लागलो.
ती टेकडी उतरुन आम्ही दुसरी टेकडी चढलो तेव्हा आम्हाला दिसलं की, बचाव पथकं वेगाने हालचाली करत होती. आमची नजर हेलिकॉप्टरच्या अवशेषांकडे गेली.
हेलिकॉप्टर सापडलं आणि...
टेकडीला धडकलेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष विखुरले होते. मागचा भाग एकीकडे, पंख एकीकडे, इंजिनचा भाग तिसरीकडेच...
इंजिन पूर्णपणे जळालं होतं. मुख्यमंत्री वायएस राजशेखर यांचा मृतदेह इंजिनजवळ होतं. डोक्यावर असलेल्या विरळ केसांच्या आधारे त्यांची ओळख पटविण्यात आली.
बचाव पथकाने सांगितलं की, पायलटचा मृतदेह अजूनही सीटवरच आहे. दुसऱ्या पायलटचं शीर सापडलं आहे. सुरक्षा कर्मचाऱ्याची ओळख बंदुकीवरून पटवता आली. मी या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करत होतो.

फोटो स्रोत, DGCA
सगळे मृतदेह विखुरले होते, अवयव गोळा केले जात होते. काही भाग जळाले होते, कारण हेलिकॉप्टरला आग लागली होती. पण पावसामुळे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळालं नव्हतो. सगळ्या भागात दुर्गंध पसरला होता.
मृतदेहाचे तुकडे वेगवेगळ्या काळ्या पॉलिथिनमध्ये पॅक केले जात होते आणि ते पांढऱ्या कपड्यांमध्ये बांधले जात होते. हवेत एक हेलिकॉप्टर थांबलं होतं आणि दोरीच्या सहाय्याने ही गाठोडी त्यामध्ये पोहोचवली जात होती.
आम्ही बचाव पथकाच्या लोकांसोबत बोललो. ऑपरेशन इनचार्ज राजीव त्रिवेदींसोबत बोललो. त्यांच्याशी बोलत असतानाच जोराचा पाऊस सुरू झाला. आम्ही सगळे शॉट्स वगैरे घेऊन तिथून तातडीने निघालो.
राजीव त्रिवेदीही आमच्यासोबत निघाले.
दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये बातम्या होत्या...पिजन हिल भागात हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू.
हेलिकॉप्टरला अपघात कसा झाला?
मुख्यमंत्री सहसा ऑगस्टा हेलिकॉप्टरचा वापर करायचे. मात्र, राजशेखर रेड्डी यांनी जे हेलिकॉप्टर वापरलं ते बेल-430 होतं. त्यामुळे अनेकांनी नंतर घातपाताची शक्यता व्यक्त केली.
सरकारने डीजीसीएची तांत्रिक समिती स्थापन करून दुर्घटनेची चौकशी केली. आरके त्यागी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने 139 पानांचा अहवाल सादर केला. त्यामध्ये म्हटलं होतं की, गिअरबॉक्स खराब झाला होता आणि तो दुरुस्त करण्याच्या नादात पायलटचा हेलिकॉप्टरवरचा ताबा सुटला.

फोटो स्रोत, DGCA
उड्डाणाआधी हेलिकॉप्टरची जेवढी तपासणी करायला हवी होती, तेवढी केली गेली नसल्याचंही या समितीच्या अहवालात म्हटलं गेलं.
या अपघातात मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव सुब्रमण्यम, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सुरक्षा अधिकारी एससी वेस्ले आणि हेलिकॉप्टरचे पायलट एसके भाटिया, को-पायलट एम सत्यानारायण रेड्डी यांचाही मृत्यू झाला होता.
डीजीसीएच्या अहवालानुसार 2 सप्टेंबर 2009 ला नऊ वाजून 27 मिनिटं आणि 57 सेकंदाने कॉकपिटचा व्हॉइस रेकॉर्डर बंद पडला होता. गुरूवार म्हणजे 3 सप्टेंबरला सकाळी नऊ वाजून 20 मिनिटांनी हवाई दलाने हेलिकॉप्टर शोधलं.
मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर गायब झाल्यानंतर 25 तासांनंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्ली इथून राजशेखर रेड्डी यांच्या निधनाची घोषणा केली.
रेड्डी यांच्या अपघातानंतर हेलिकॉप्टर उड्डाणाच्या सुरक्षेसंबंधी नियमावली बनविण्यात आली.
(हा लेख बीएसएन मल्लेश्वर राव यांनी 2 सप्टेंबर 2021 ला बीबीसी हिंदीसाठी लिहिला होता.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)









