अजित पवार यांचा बारामतीमध्ये विमान अपघातात मृत्यू; अपघातग्रस्त विमान कोणत्या प्रकारचं होतं?

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, शरद पवार बारामतीकडे रवाना

फोटो स्रोत, ANI

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

बारामती विमानतळावर उतरताना धावपट्टीजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:48 वाजता हा अपघात झाला.

या विमानात अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदिप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला.

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, शरद पवार बारामतीकडे रवाना

फोटो स्रोत, ANI

पवार कुटुंबीय बारामतीमध्ये पोहोचले

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय दिल्लीहून बारामतीच्या दाखल झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारही मुंबईतून बारामतीला पोहोचले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांचे नेते, कार्यकर्ते बारामतीच्या दिशेने येत आहेत. अजित पवार यांचं पार्थिव सध्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलंय.

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच आज शासकीय सुटी जाहीर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, अजित पवार यांचा मृत्यू, बारामतीत विमान अपघातात त्यांच्यासह पाच जण दगावले

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेसाठी अजित पवार आज बारामती तालुक्यात सकाळी निरावागज येथे जाणार होते. त्यानंतर पणदरे, करंजेपूल, सुपा येथे त्यांच्या प्रचारासाठी भेटी आणि कार्यक्रम होणार होते.

या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या whatsap स्टेटसवर Devastated अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवारांचा अपघात झाला, ते विमान कोणत्या प्रकारचं होतं?

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, ते विमान लियरजेट-45 XR प्रकारचं विमान होतं.

लियरजेट 45 कुटुंबातली विमानं कॅनेडियन कंपनी बॅाम्बार्डिएरनं तयार केली आहेत. जगभरातील अनेक कंपन्या चार्टर फ्लाईटसाठी म्हणजे खासगी प्रवासासाठी ही विमानं वापरतात.

मध्यम आकाराचे लियरजेट-45 XR विमान बिझनेस जेट म्हणूनही ओळखले जाते. त्यात दोन हनीवेल TFE731-20AR/BR टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो. या विमानातून एकावेळी साधारण आठ प्रवासी प्रवास करू शकतात. हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारण 2,235 नॉटिकल मैलांपर्यंत, म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर रेंजमध्ये जलद प्रवास करू शकतं.

अजित पवारांचा अपघात झाला, ते विमान कोणत्या प्रकारचं होतं?

फोटो स्रोत, Getty Images

छोट्या धावपट्टीवरही उतरण्याची क्षमता असल्यानं भारतात खासगी चार्टर विमानसेवा या विमानाचा प्रामुख्यानं वापर करतात.

बारामतीत कोसळलेलं विमान नवी दिल्लीस्थित VSR एव्हिएशन या खासगी एयरलाईनच्या सेवेत होतं. 2010 पासून म्हणजे सोळा वर्ष हे विमान कार्यरत होते.

याआधी 2023 साली मुंबई विमानतळावर VSR कंपनीच्याच VT-DBL या लिअरजेट 45XR प्रकारच्याच विमानाला अपघात झाला होता. 14 सप्टेंबर 2023 रोजी मुसळधार पाऊस आणि कमी व्हिजिबलटीमध्ये उतरताना ते विमान रनवेवरून घसरून तुटलं होतं, पण आठही प्रवाशांचा जीव वाचवण्यात तेव्हा यश आलं होतं.

अपघात कसा झाला? याविषयी आतापर्यंत मिळालेली माहिती

फ्लाईट रडार या फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईटवरील माहितीनुसार अजित पवारांना घेऊन जाणारं विमान मुंबईहून उड्डाण केल्यावर साधारण 30-35 मिनिटानंतर बारामतीजवळ पोहोचलं होतं. पण विमानतळावर उतरण्याआधी या विमानानं आकाशात गोल फेरी मारली. पहिल्या प्रयत्नात उतरू न शकल्यानं ते पुन्हा धावपट्टीकडे वळताना दिसलं आणि तेव्हाच ते रडारवरून गायब झालं.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, अजित पवारांचं विमान कोसळताना प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?

कोसळल्यावर लगेचच इंधनानं भरलेल्या टँकचा स्फोट झाला आणि विमानानं पेट घेतला. स्थानिक वेळेनुसार सकाळी साधारण 8:48 च्या सुमारास ही घटना घडली.

बारामतीतल्या गोजूबावी गावाजवळचा विमानतळ 1996 पासून वापरात आहे. MIDC ने बांधलेला हा मोठा सुसज्ज विमानतळ नाही, तर याचा वापर लहान विमानांची वाहतूक आणि पायलट्सच्या ट्रेनिंगसाठी केला जातो. ज्या रनवे 11 वर म्हणजे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं, तिथे रनवेच्या आधी एक डिप्रेशन म्हणजे दरीसारखा थोडा खोलगट भाग असल्याचं अपघात स्थळाच्या फोटोंवरून दिसून येतं.

दिलदार मित्र सोडून गेला - देवेंद्र फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. राज्याचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालं असं ते म्हणाले आहेत.

अजित पवार

फोटो स्रोत, Facebook/AjitPawar

ते म्हणाले, "अतिशय अनाकलनीय परिस्थितीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खरं म्हणजे अजित दादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची, प्रश्नांची जाण असलेला नेता होता. जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती.

अजितदादा एक अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण दिवस. असं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षं जातात. ज्यावेळेस ते राज्याच्या विकासात महत्त्वाचं योगदान देत होते अशाच काळात त्यांचं जाणं अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणार आहे. माझा एक दिलदार, दमदार मित्र सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावरही हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघत आहोत."

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, माझा एक दिलदार, दमदार मित्र सोडून गेला, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ते पुढे म्हणाले, "पंतप्रधान आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा करून मी संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ पसरली आहे. पुढच्या गोष्टी कुटुंबीयांशी चर्चा करून ठरवण्यात येतील. संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्यात येतील. आम्ही इतक्या जवळून, एवढ्या संघर्षाच्या काळात एकत्र काम केलेलं आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनंतर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, @narendramodi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनंतर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. "बारामती येथे झालेल्या विमान अपघातामुळे अत्यंत दुःख झाले. या अपघातात आपल्या प्रिय व्यक्तींना गमावणाऱ्या कुटुंबीयांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना शक्ती मिळो यासाठी मी प्रार्थना करतो.", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात, "अजित पवार हे लोकांचे नेते होते. जमिनीशी नातं जोडलेले नेते होते. महाराष्ट्राच्या लोकांच्या सेवेसाठी आघाडीवर येऊन कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मोठा आदर होता. प्रशासनाची जाण तसेच गरीब आणि तळागाळातल्या लोकांना ताकद मिळवण्यासाठी त्यांची धडपड उल्लेखनीय होती. त्यांचं अकाली जाणं अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे."

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, बारामतीत लँडिंगदरम्यान विमान कोसळलं

फोटो स्रोत, @PTI_News

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आज विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेच्या दुःखात त्यांच्यासोबत आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो."

'अविश्वसनीय - निःशब्द....सुन्न... भयानक...'

अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. 'अजितदादांची बातमी अविश्वसनीय - निःशब्द....सुन्न... भयानक...' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

अजित पवारांचं विमान कोसळलं

फोटो स्रोत, Getty Images

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ही धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर त्या लिहितात, "डोकं खूप खूप सुन्न झालं ऐकून ! विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे…… खूप"

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू, नेत्यांना अश्रू अनावर

प्रशासनावर अचूक पकड असलेला नेता गेला - राज ठाकरे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ते लिहितात, "प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे."

अजित पवार हे कमालीचे स्पष्टवक्ते होते. काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे. आश्वासनं देऊन स्वतः भोवती माणसांचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो.

अजित पवारांचं मला आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचं धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत, त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की."

तर ''एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,'' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.

"उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत", असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

"महाराष्ट्रात ते 'दादा' म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने 'दादा' होते.", अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अपघाताची योग्य चौकशी व्हावी -ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करून अजित पवार यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी लिहिलंय की, "अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मला तीव्र धक्का बसला आहे! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे, आणि मला खूप मोठं दुःख झालं आहे. त्यांचे काका शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि दिवंगत अजितजींच्या सर्व मित्र आणि अनुयायांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करते.या घटनेची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे."

अपघाताची योग्य चौकशी व्हावी -ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, @MamataOfficial

गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं की, "आज, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनडीएतील ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांचे एका अपघातात निधन झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झालं आहे.

गेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी अजित पवार यांनी केलेले समर्पण शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या) कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान आहे.

मी पवार कुटुंबाप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती शांती शांती."

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू, बारामतीत लँडिंगदरम्यान विमान कोसळलं

फोटो स्रोत, @Riteishd

फोटो कॅप्शन, अभिनेते रितेश देशमुख यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, "महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्षं राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अढळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे, ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो." अशी श्रद्धांजली वाहिली आहे.

Facebook/AjitPawar

फोटो स्रोत, Facebook/AjitPawar

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे की, "आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे मी खूप व्यथित झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि या घटनेमुळे दुखावलेल्या सर्वांप्रति मी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान स्मरणात राहील आणि या कठीण प्रसंगी शोकाकुल परिवाराला सामर्थ्य मिळो."

अजितदादा शब्दाचे पक्के होते- एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "आज महाराष्ट्रासाठी एक दुर्दैवी दिवस आहे. ही आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना आहे. अजित दादा हे शब्दाचे पक्के होते. मी मुख्यमंत्री असताना आणि ते उपमुख्यमंत्री असताना आम्ही एक टीम म्हणून काम केले. एक टीम म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि त्यात अजित दादांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती."

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना ही महाराष्ट्राची हानी आहे असं म्हटलं आहे. ते लिहितात, "विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजित दादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते.

पहाटेपासून कामात व्यग्र असणारे, प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते "दादा" होते."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं, "राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. सकाळीच अशी बातमी कानावर पडणे अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे."

या बातमीवर विश्वास ठेवणं अशक्य आहे असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते लिहितात, "बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज तिथल्या मातीत शांत झाला, यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. मा. अजितदादा यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे. जकारणातला खडा शब्द; जनतेत रमणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज हरपला. दादा महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही. "

ही बातमी सतत अपडेट होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)