भारतात आढळले प्राणघातक निपाह विषाणूचे रुग्ण, आशियातील देश सतर्क; जाणून घ्या लक्षणं

- Author, केली एनजी
पश्चिम बंगालमध्ये निपाह या प्राणघातक विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे आशियातील काही भागांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही देशांनी विमानतळावरील तपासणीच्या उपाययोजना अधिक कठोर केल्या आहेत.
थायलंडनं पश्चिम बंगालमधून विमानं येत असलेल्या 3 विमानतळांवर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे, तर नेपाळनं देखील काठमांडू विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची आणि भारताच्या लागून असलेल्या सीमेवरून जमिनीमार्गे येणाऱ्यांची चेक पॉईंटवर तपासणी सुरू केली आहे.
पश्चिम बंगालमधील 3 आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या सुरुवातीला निपाह विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 110 जणांचं विलगीकरण करण्यात आलं आहे.
हा विषाणू प्राण्यांमधून मानवामध्ये पसरू शकतो. या विषाणूवर कोणतीही लस नसल्यामुळे किंवा त्याच्यावर कोणतंही औषध नसल्यामुळे त्याचा संसर्ग झाल्यानंतरचा मृत्यूदर खूप जास्त म्हणजे 40 ते 75 टक्क्यांपर्यंत आहे.
निपाह विषाणू काय आहे आणि त्याची लक्षणं कोणती आहेत?
निपाह विषाणू डुक्कर आणि मोठ्या वटवाघळांकडून (फ्रुट बॅट्स) मानवामध्ये संक्रमित होऊ शकतो. तसंच, दूषित अन्नाद्वारे देखील तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) निपाह विषाणूचा समावेश टॉप 10 प्राधान्यक्रमाच्या आजारांमध्ये केला आहे. यात कोविड-19 आणि झिका विषाणूचाही समावेश आहे. या विषाणुमुळे मोठ्या प्रमाणात साथ पसरू शकते.
या विषाणूचा सुप्त काळ (इन्क्युबेशन पीरियड) म्हणजे विषाणूचा संसर्ग झाल्यापासून ते त्याची लक्षणं प्रथम दिसण्यापर्यंतचा कालावधी 4 ते 14 दिवसांचा असतो.

ज्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होतो, त्यांच्यामध्ये विविध प्रकारची लक्षणं दिसतात. तर काहीवेळा कोणतंही लक्षण दिसत नाही.
याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, उलटी होणं आणि घसा दुखणं किंवा घसा खवखवणं यांचा समावेश असू शकतो. काहीजणांमध्ये या लक्षणांनंतर सुस्ती येणं, शुद्ध हरपणं आणि न्युमोनिया या गोष्टी होऊ शकतात.
काही गंभीर प्रकरणांमध्ये एन्सेफॅलायटिस होऊ शकतो. ही एक प्राणघातक स्थिती असून यात मेंदूला सूज येते.
आजपर्यंत, या आजारावर उपचार करण्यासाठी कोणतंही औषध किंवा लस मंजूर झालेली नाही.
यापूर्वी निपाहचे उद्रेक कुठे झाले होते?
निपाहचा पहिला लक्षात आलेला उद्रेक 1998 मध्ये झाला होता. तो मलेशियातील वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये झाला होता. नंतर तो शेजारच्या सिंगापूरमध्ये पसरला होता. ज्या गावात पहिल्यांदा हा विषाणू सापडला किंवा त्याचा संसर्ग लक्षात आला, त्या गावाच्या नावावरूनच त्याला हे नाव देण्यात आलं आहे.
या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तसंच 10 लाख डुकरांना मारण्यात आलं होतं. यामुळे शेतकरी आणि गुरं, पशुधनाच्या व्यवसायात असणाऱ्या लोकांचं मोठं आर्थिक नुकसानदेखील झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अलीकडच्या वर्षांमध्ये बांगलादेशला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. तिथे 2001 पासून निपाहमुळे 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतातदेखील हा विषाणू आढळला आहे. 2001 आणि 2007 मध्ये पश्चिम बंगालमध्ये या विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद झाली होती.
अगदी अलीकडच्या काळात, केरळ निपाहच्या उद्रेकाचं केंद्र बनलं होतं. तिथे 2018 मध्ये निपाहची 19 प्रकरणं नोंदवण्यात आली होती. त्यापैकी 17 अतिशय गंभीर स्वरुपाची होती. तर 2023 मध्ये निपाहचा संसर्ग झालेल्या 6 पैकी 2 रुग्णांचा नंतर मृत्यू झाला होता.
निपाहसंदर्भात आता काय होतं आहे?
गेल्या आठवड्यापर्यंत निपाहचा संसर्ग झाल्याची खातरजमा झालेल्या किमान 5 रुग्णांची नोंद झाली होती. त्या सर्वांचा संबंध बारसातमधील एका खासगी हॉस्पिटलशी होता. त्यातील 2 नर्सवर इंटेन्सिव्ह कोरोनरी केअर युनिट (ह्रदयाशी संबंधित गंभीर स्थिती हाताळणारा अतिदक्षता विभाग) मध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 1 नर्सची प्रकृती 'अतिशय गंभीर' असल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी राज्याच्या आरोग्य विभागाचा संदर्भ देत दिलं आहे.
भारताबाहेर अद्याप कोणताही रुग्ण आढळलेला नाही. मात्र अनेक देश यासंदर्भात खबरदारीची पावलं उचलत आहेत.
रविवारी (25 जानेवारी) थायलंडनं बँकॉक आणि फुकेतमधील 3 आंतरराष्ट्रीय विमानतळांवर पश्चिम बंगालमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली. पश्चिम बंगालमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवाशांना त्यांच्या आरोग्याविषयीची स्थिती जाहीर करण्यात सांगण्यात आलं आहे.
उद्यानं आणि वन्यजीव विभागानंदेखील नैसर्गिक पर्यटन स्थळांवर अधिक कडक तपासणी सुरू केली आहे.
जुराई वोंगस्वास्दी रोग नियंत्रण विभागाच्या प्रवक्त्या आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की थायलंडमधील निपाहचा उद्रेक रोखण्याबद्दल थायलंडमधील अधिकाऱ्यांना 'चांगला आत्मविश्वास' आहे.
नेपाळनं देखील काठमांडू विमानतळावर येणाऱ्या आणि भारताबरोबरच्या सीमेवरून येणाऱ्यांची चेक पॉईंटवर तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, तैवानमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी निपाह विषाणूचा समावेश 'कॅटेगरी 5 डिझीज' म्हणजे '5 व्या श्रेणीतील रोगा'त करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
तैवानमधील आरोग्य व्यवस्थेनुसार 5 व्या श्रेणीत समाविष्ट केलेले आजार हे नव्यानं उदयाला आलेले किंवा दुर्मिळ संसर्ग असणारे आजार असतात. या आजारांमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका असतो. त्यासाठी लगचेच त्याची नोंद करणं आणि त्याच्या नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करणं आवश्यक असतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











