लिनी पुथुस्सेरी : निपाह व्हायरसला बळी पडलेली ही नर्स अशी ठरली ‘हिरो’

निपाह व्हायरस

फोटो स्रोत, DR DEEPU SEBIN/ TWITTER

फोटो कॅप्शन, लिनी पुथुस्सेरी यांचा मृत्यू म्हणजे त्यांनी कर्तव्य बजावताना दिलेलं बलिदान असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.

"मला नाही वाटत की मी तुला परत बघू शकेन. मला माफ कर. आपल्या मुलांना खूप चांगलं वाढव," 28 वर्षांच्या लिनी पुथुस्सेरी यांनी आपल्या नवऱ्याला लिहिलेल्या शेवटच्या पत्रातलं हे वाक्य आहे.

केरळमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या लिनी यांना निपाह (Nipah) व्हायरसची लागण झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची अनुक्रमे पाच आणि दोन वर्षांची मुलं पोरकी झाली आहेत.

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचे रुग्णं आढळले आणि या नव्या व्हायरसची भीती संपूर्ण देशात पसरली. या व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ जण दगावले आहेत.

निपाह व्हायरसची लागण झालेल्या तीन जणांच्या एका कुटुंबाची शुश्रूषा करण्याचं काम लिनी करत होत्या. त्यांनी रात्रभर या तीन जणांची काळजी घेतली. तिथंच त्यांना या व्हायरसची लागण झाली असावी, असा अंदाज आहे.

रविवारी लिनी यांना कणकण वाटू लागली. ही लक्षणं निपाह व्हायरसची असल्याचं लक्षात आल्यानंतर त्या स्वत: हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या.

आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ नये, म्हणून स्वत:ला वेगळं ठेवायला सांगायलाही त्या विसरल्या नाहीत, असं स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

'मी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होत आहे...'

लिनी यांचे पती सजिश बाहारीनमध्ये काम करतात. लिनी यांच्या आजारपणाबद्दल त्यांच्या भावानं साजिश यांना कळवल्यावर ते तातडीनं भारतात परत आले.

निपाह व्हायरस

फोटो स्रोत, SK MOHAN

फोटो कॅप्शन, केरळमध्ये आता या व्हायरसची लागण झालेल्या लोकांना वेगळं ठेवलं जात आहे.

बीबीसीला त्यांनी सांगितलं की, लिनी यांनीही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. "ती म्हणाली की तिला बरं वाटत नाहीये. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतेय, असं तिनं मला सांगितलं," सजिश पुथुस्सेरी म्हणाले.

ते रविवारी कोझिकोडला पोहोचले तेव्हा लिनी ICUमध्ये होत्या.

"तिला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून तिला ऑक्सिजन मास्क लावला होता. ती काहीच बोलू शकत नव्हती. पण तिनं माझा हात हातात घेतला आणि घट्ट पकडून ठेवला होता," पुथुस्सेरी सांगत होते.

पण त्या वाचू शकल्या नाही.

सोशल मीडियावरही शोक

दुसऱ्या दिवशी सकाळी लिनी यांचं निधन झाल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी लिनी यांनी सजिश यांच्या नावानं लिहिलेली चिठ्ठी त्यांच्या हाती दिली. सजिश यांनी स्थानिक मीडियाला ती चिठ्ठी दाखवल्यानंतर ती लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

लिनी यांचा मृतदेहदेखील कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यांच्यावर हॉस्पिटलच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.

निपाह व्हायरस

फोटो स्रोत, @vijucherian

लिनी यांचा मृत्यू म्हणजे त्यांनी समाजासाठी केलेला त्याग आहे, अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टरांनी तर तिचं वर्णन 'हिरो' असं केलं आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही लिनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. लिनी यांची निःस्पृह सेवा कायम लोकांच्या स्मरणात राहील, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

निपाहची दाहकता

जागतिक आरोग्या संघटनेच्या (WHO) 10 गंभीर आजारांच्या यादीत सर्वांत वरच्या क्रमांकावर असलेल्या निपाह व्हायरसनं केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात अचानक थैमान घालायला सुरुवात केली. या व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला आहे.

लागण झालेल्या इतर दोन पेशंटची प्रकृती अत्यवस्थ आहे तर 40 जणांना सतर्कता म्हणून इतरांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.

केरळमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपाययोजना सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू करण्यात आली आहेत.

निपाह व्हायरस

फोटो स्रोत, @INQUESTIONER

फोटो कॅप्शन, लिनी यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.

या व्हायरसचा संसर्ग प्राण्यांकडून मनुष्याला होतो. तसंच या व्हायरसचा छडा लावणंही कठीण आहे. ताप येणं, कणकण वाटणं, उलट्या होणं आणि डोकं दुखणं ही या व्हायरसची लागण झाल्याची काही लक्षणं आहेत. तसंच लागण झाल्यानंतर 24 ते 48 तासांमध्ये पेशंट कोमात जाण्याची शक्यता असते.

या व्हायरसची लागण झाल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण 70 टक्के एवढं आहे आणि सध्या तरी या व्हायरसवर कोणतीही लस नाही.

केरळमध्ये या व्हायरसची लागण झाल्याचा संशय असलेल्या 60 जणांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणुशास्त्र संस्थेत पाठवण्यात आले आहेत.

या संस्थेत पुढील तपासणी होऊन ही लागण निपाह व्हायरसचीच आहे का, याबाबत शिक्कामोर्तब केलं जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

निपाह व्हायरस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, अजून तरी या व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही.

आरोग्य विभागाचे कर्मचारी आता घरोघरी फिरून लोकांना सूचना देत आहेत. बाहेरची किंवा झाडाखाली पडलेली फळं खाताना काय काळजी घ्यायला हवी, याबाबत ते लोकांना सांगत आहेत, असं कोझिकोडेमधील आरोग्य विभागाचे अधिकारी यु. व्ही. जोस यांनी सांगितलं.

निपाह व्हायरस पसरतो कसा?

फळांवर जगणाऱ्या वटवाघुळांमार्फत निपाह व्हायरस पसरतो. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, या व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या विहिरींमध्ये वटवाघुळं मरून पडल्याचं आढळलं होतं. या अधिकाऱ्यांनी आता या विहिरींवर हिरवं आच्छादन टाकून त्या वापरासाठी बंद केल्या आहेत.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार निपाह व्हायरस भारतात पहिल्यांदा 2001 मध्ये आढळला होता. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 2007 मध्येही भारतात त्याची लागण झाल्याचं आढळलं. या दोन्ही वेळी मिळून सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला होता.

निपाह व्हायरस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, केरळमध्ये ज्यांना या व्हायरसची लागण झाली आहे, त्यांच्या घराच्या आवारातल्या विहिरी अशा प्रकारे बंद केल्या जात आहेत.

जगभरात निपाह व्हायरस पहिल्यांदा आढळला तो मलेशिया आणि सिंगापूरमध्ये. 1999 मध्ये इथं डुक्कर पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या डुकरांच्या संपर्कात आलेल्या लोकांना श्वसनाचा त्रास झाल्याचं जाणवलं होतं.

या व्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी या व्हायरचा प्रादुर्भाव झालेल्या भागातल्या डुकरांच्या किंवा वटवाघळांच्या संपर्कात येणं टाळायला हवं.

या व्हायरसवर अजूनही कोणतीही लस सापडलेली नाही.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)