मुंबई लोकलमध्ये झालेल्या वादातून प्राध्यापकाची हत्या; संरक्षण मंत्र्यांच्या सेवेत असलेल्या वडिलांनी सांगितला घटनाक्रम

- Author, दिपाली जगताप, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(या घटनेतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात)
मुंबई लोकलमधील गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, आता याच गर्दीत उतरण्यावरून झालेल्या वादातून एका प्राध्यापकाची हत्या झाली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या प्राध्यापकाचे नाव अलोककुमार सिंह (वय 32 वर्षे) असे आहे, तर हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव ओंकार एकनाथ शिंदे (वय 27 वर्षे) असं आहे. आरोपी ओंकार चर्नी रोड येथून मुंबई लोकलमध्ये चढला होता, तर अलोककुमार अंधेरी येथून लोकलमध्ये चढले. दोघंही मालाड येथे रहायला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी आरोपीला रविवारी (25 जानेवारी) कोर्टात हजर केले. यानंतर कोर्टाने आरोपीला 30 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
32 वर्षीय अलोककुमार सिंह पत्नीसह मालाड येथे राहत होते. ते एन. एम. ज्युनियर कॉलेज या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून काम करत होते. तर आरोपी आपल्या आई वडील आणि भावासोबत मलाड कुरार विलेज याठिकाणी येथे राहतो. आरोपी मेटल पॉलिशिंगचं काम करतो.
मृत प्राध्यापकाच्या कुटुंबियांनी काय म्हटलं?
मृत अलोककुमार यांचे वडील अनिल सिंह हे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत तैनात होते. ही घटना घडली तेव्हाही ते राजनाथ सिंह यांच्यासोबत दिल्लीतच होते. पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी याबाबत राजनाथ सिंह यांना सांगितले आणि मग मुंबईत आले.
राजनाथ सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असल्यापासून अनिल सिंह हे त्यांच्यासोबत आहेत.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना अनिल सिंह म्हणाले, "अलोकला मालाड रेल्वे स्टेशनवर उतरायचं होतं. गर्दी खूप असते आणि उतरण्यासाठी घाई असते. महिला आधी दरवाजात जाऊन उभ्या राहतात. त्यांच्यामागेच अनिल उभा होता. तो महिलांना पुढे चला, पुढे चला म्हणत होता. मात्र, महिला समोर असल्यानं तो थोडं अंतर ठेऊन थांबलेला होता."

"त्यावेळी वाद झाला आणि आरोपीने अलोकला तुला सांगतो म्हटलं. तसेच उतरताना त्याने अलोकच्या पोटावर धारधार शस्त्राने वार केला. यानंतर अलोकसोबतच्या व्यक्तींनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो हात झटकून पळून गेला. रुग्णालयात जात असतानाच त्याचा मृत्यू झाला," अशी माहिती अनिल सिंह यांनी दिली.
"आरोपी गुन्हेगार आहे. सामान्य माणूस असं काही घडल्यावर कुणाची हत्या करू शकत नाही. सहमती किंवा असहमती असू शकते, मात्र कुणी कुणाची हत्या करत नाही," असंही नमूद केलं.
'मी देखील पोलीस, इतक्या लवकर मृत्यू होत नाही'
अनिल सिंह यांनी त्यांच्या पोलीस सेवेतील अनुभवाच्या आधारे इतक्या लवकर मृत्यू होत नाही, असं सांगितलं. ते म्हणाले, "माझ्या मुलाचा जीव वाचू शकला असता. मी देखील पोलीस आहे. मी अनेक लोकांना प्रथमोपचार केले आहेत. माझ्या मुलाला तात्काळ उपचार मिळण्यात उशीर झाला आहे, असं मला वाटतं. कधी हल्ला झाला, कितीवेळ तो तिथेच होता याची मला खात्रीलायक माहिती नाहीये."
"प्रथमोपचार मिळण्यात उशीर झाला आहे. त्याच्यावर एकाच ठिकाणी वार झाला आहे, अनेक ठिकाणी वार झालेला नाही. तो वार हृदय, किडनीच्या जवळ झाला. अंतर्गत रक्तस्राव जास्त झाला. रक्ताची कमतरता पडून रुग्णालयात जातानाच मृत्यू झाला."

"मी अनेकांचे पोस्टमार्टम करून घेतले आहे, बघितले आहे, सोबत राहिलो आहे. इतक्या लवकर मृत्यू होत नाही. रुग्णालयात नेताना ट्रॅफिक असावी, त्यामुळे जास्त वेळ लागला असावा. तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं असतं, तर देवाच्या कृपेने त्याचा जीव वाचला असता."
"तो मागील 7-8 वर्षांपासून शिकवण्याचं काम करत होता. सध्या करत असलेली सरकारी नोकरी 2 वर्षांपासून करत होता. त्याने कधीच कोणाशी वादविवाद केला नाही. जर कधी त्याच्याशी असहमती व्यक्त केली, तर हसून तो विषय टाळायचा. आतापर्यंत त्याने कधीही कुणाशी वाद केलेला नाही," असंही अनिल सिंह यांनी नमूद केलं.
'धक्का मारायचं, थोबाडीत मारायची, पण थेट जीवच घेतला'
अलोककुमार यांच्या बहीण पूजा सिंह यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "तो काय माणूस होता जो काहीच वाद न करता मारून निघून गेला. तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा नव्हता. थोडी तरी माणुसकी असते. त्याने धक्का मारायचा होता, थोबाडात मारायची होती, डोक्यात टपली मारायची होती, पण त्याने थेट जीवच घेतला."

अलोककुमार यांच्या मेहुण्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "तो एक सामान्य मुलगा होता. एक शिक्षक होता. तो कधी कोणाशी बोलतही नव्हता. रेल्वे स्थानकातून आरोपी हत्या करून पळून जातो पोलीस काय करत होते? स्टेशनवर तो चाकू मारून पळून जातो स्टेशनवरून कोणी काही करत नाही. आमची मागणी आहे की, सगळ्यात आधी पोलिसांना निलंबित करा आणि आरोपीला पकडा."
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "हा अत्यंत शांत संयमी प्राध्यापक होता. त्याने कधीही कुणाशी भांडण, कुरापत केली नाही. तो आपल्या कामात मग्न असायचा. अशा संयमी प्राध्यापकाचा या दुर्दैवी घटनेत अंत झाला आहे. शिक्षक सेना त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे."
"याबाबत वडिलांना काहीच माहिती नव्हती. ते दिल्लीत राहतात. त्यांचे काका म्हणजे वडिलांचे थोरले बंधु मुंबईत असतात. त्यांच्याकडेच त्यांचं पालनपोषण झालं. त्यांचं बालपण आणि शिक्षण इथं मुंबईतच झालं. ते एका प्रतिष्ठित विद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांचं भविष्य उज्ज्वल होतं. अशा गुणवान व्यक्तीचा अंत होणं दुर्दैवी आहे," असं मत अभ्यंकर यांनी व्यक्त केलं.
रेल्वे प्रशासनाने काय सांगितलं?
पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "प्रकरणाचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत. घटना 24 जानेवारीला साधारण संध्याकाळी 05.30 वाजता घडली. जखमी अवस्थेतील प्रवाशाला आम्ही तत्काळ शताब्दी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्रवासी आणि आरोपीमध्ये मलाड स्टेशनवर उतरताना वाद झाला इतकीच माहिती सध्या आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत."
पोलिसांनी काय म्हटलं?
बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्ता खुपेरकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मलाड रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. मलाडला रेल्वे स्थानकावर उतरताना आरोपी आणि अलोककुमार यांच्यात उतरण्यावरून वाद झाला."
"संध्याकाळच्या वेळेत गर्दी असतेच. उतरण्याच्या वेळेला वाद झाला आणि त्यातून आरोपीने पोटात एक वार केला. वार केलेलं शस्त्र अद्याप मिळालं नाही, पण आरोपीने चिमटा होता असं सांगितलं. आम्ही सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने 25 जानेवारीला एक प्रेसनोट काढत या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताला 24 तासांच्या आत अटक केली आणि गुन्हा उघडकीस आणला असं म्हटलं.

पोलिसांनी प्रेसनोटमध्ये म्हटलं, "24 जानेवारीला अलोककुमार सिंह (32 वर्षे) अंधेरी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 03 वर सायंकाळी 5.25 वाजताच्या बोरीवली स्लो लोकल गाडीने गर्दीत उभे राहून प्रवास करत होते. ही गाडी 5.40 वाजताच्या सुमारास मालाड रेल्वे स्थानक फलाट क्र. 1 वर थांबत होती."
"त्यावेळी गाडीतील आरोपी ओंकार शिंदेचा (27 वर्षे) गाडीतून उतरण्याच्या कारणावरून अलोककुमार सिंह यांच्याशी शाब्दिक वाद झाला. त्यातून त्याने त्याच्याजवळील कोणत्यातरी धारधार तीक्ष्ण हत्याराने अलोककुमार यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस भोसकून गंभीर जखमी करून त्यांना जीवे ठार मारले."
"याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) नुसार बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदणी क्रमांक 81/2026 हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा तपास करून संशयित ओंकार शिंदेला 25 जानेवारीला कुरार व्हिलेज (मालाड पूर्व, मुंबई) परिसरातून ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे," असंही पोलिसांनी नमूद केलं.
आरोपीच्या वकिलांची बाजू घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठी करत आहे. ती आल्यानंतर अपडेट करण्यात येईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)












