सोलापूरजवळचं 'चक्रव्यूह' आणि रोमन साम्राज्य यांचा संबंध काय? या रचना कोणी, कधी, कशा तयार केल्या?

फोटो स्रोत, Bharat Cheda
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, BBC Marathi Bilingual Correspondent
खरं तर काही वर्षांपूर्वीच सोलापूरमध्ये पक्षीनिरिक्षकांच्या एका समूहाला पिवळसर गवतामध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं जाणवलं होतं.
सोलापूरपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर बोरामणी गावाजवळ माळढोक पक्ष्यांसाठी राखीव अभयारण्य आहे. तिथून नजर संपेपर्यंत दूर पसरलेल्या गवताळ माळावर त्यांना ते दिसलं होतं.
"ती दगडांची एक रचना होती. 2022 च्या आसपास माझ्याकडे ड्रोन आला. त्यानं एक फोटो घेतला. चक्राकार असं काही होतं. आम्हाला ते काय आहे समजलं नाही. तो फोटो ओळखीच्या अभ्यासकांकडे पाठवला आणि नंतर आम्ही जवळपास ते विसरुन गेलो होतो," असं या परिसरात निसर्गसंवर्धनाचं काम करणारे भरत छेडा सांगतात.
तो फोटो कालांतरानं कोल्हापूरच्या सचिन पाटील यांच्यापर्यंत पोहोचला. दोन महिन्यांपूर्वी, डिसेंबर 2025 च्या दुसऱ्या आठवड्यात पाटील बोरामणीच्या या माळावर पोहोचले.
त्यावेळी त्यांनी जे पाहिलं त्यावर त्यांच्याही काही काळ विश्वास बसेना. पण अखेरीस उलगडा झाला. तो भारतभरात आजवर सापडलेला सर्वात मोठा 'चक्रव्यूह' होता.
केंद्रापाशी सुरू होऊन एकामागोमाग एक मोठी होत गेलेली एकूण 15 दगडांची वर्तुळं इथं होती. पुरातत्वशास्त्रात त्याला लॅबिरिन्थ (Labyrinth) असं संबोधलं जातं.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC Marathi
पुण्यात पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असणाऱ्या डेक्कन कॉलेजमधून पीएच् डी करत असणाऱ्या सचिन पाटील यांनी 2018 सालापासून आतापर्यंत अशी 11 लॅबिरिन्थ पश्चिम महाराष्ट्रात शोधली आहेत.
सचिन पाटील आमच्यासोबत पुन्हा बोरामणीच्या माळावर आले. तेव्हा "मी इथं पहिल्यांदा आलो तेव्हा एवढं गवत होतं की, मलाही हे लॅबिरिन्थ आहे की अजून काय हे समजत नव्हतं," असं ते आठवून म्हणाले.
"पण स्वच्छ केलं तेव्हा मलाही धक्का बसला. कारण मी भारतात पहिल्यांदा 15 सर्किट (वर्तुळांचं) क्लासिकल फॉर्म लॅबिरिन्थ पाहत होतो," असं पाटील म्हणाले.
ही एक अतिशय महत्वाची पुरातत्वशास्त्रीय घटना आहे. वरवर पाहता ती एक अनेक वर्तुळांनी बनलेली एक दगडांची रचना वाटेल.
पण ही रचना गेल्या हजारो वर्षांपासून जगभरातल्या अनेक देशांमध्ये, विविध संस्कृतींमध्ये सापडणारी एक समान रचना आहे. ही रचना आजही पुरातत्वाच्या अभ्यासकांसमोर अनेक कोडी घेऊन उभी आहे.
चक्रव्यूह (लॅबिरिन्थ) काय आहे? ती कोणी बनवली?
जवळपास 50 फुटांचा व्यास असणारं सोलापूरजवळच्या बोरामणीचं हे लॅबिरिन्थ हे अशा प्रकारचं भारतात सापडलेलं सर्वात मोठं वर्तुळाकार लॅबिरिन्थ अथवा चक्रव्यूह आहे.
आजवर महाराष्ट्रात बोरामणीसह 12 तर देशभरात जवळपास 70 लॅबिरिन्थस् सापडली असल्याचं सचिन पाटील सांगतात.
तामिळनाडूत गोदीमेडू इथं 56 फूट रुंदीचं एक लॅबिरिन्थ सापडलं आहे, पण ते आयताकृती आहे. पण जगभरात सापडणारी बहुतांश लॅबिरिन्थ ही वर्तुळाकार आहेत.
पण ती आहेत तरी काय? अगदी सहज बघितलं तर ती एकावर एक अशी अनेक वर्तुळांची अथवा भौमितीय आकारांची रचना आहे. काही दगडांनी घडवलेली रचना आहे, तर काही ठिकाणी ती खडकांवर, भिंतीवर कोरलेलीही आहेत.
अनेक ठिकाणी देवळं किंवा कॅथिड्रलसारख्या धार्मिक स्थळांवर कोरलेली अथवा चित्रित केलेली सापडतात.

फोटो स्रोत, Sachin Patil
"मूळत: त्याची रचनाच अशी आहे की, लॅबिरिन्थमध्ये कायम एकच रस्ता असतो. तो सर्वात बाहेरच्या परिघावरुन आत केंद्रबिंदूपाशी येतो किंवा शेवटापर्यंत जातो.
जगभरात कुठेही सापडो, जवळपास प्रत्येक वेळी त्यांची रचना (डिझाईन) अगदी एकसारखीच आहे आणि तसं का? हे अजूनही गूढच आहे," असं इंग्लंडहून आमच्याशी बोलतांना जेफ सवार्ड म्हणाले.
जेफ सवार्ड हे गेल्या पाच दशकांपासून जभरातल्या लॅबिरिन्थसचा अभ्यास करत आहेत. ते स्वत: 'सेरड्रोईया' नावाचं केवळ लॅबिरिन्थस् आणि त्याच्यावरील संशोधनाला वाहिलेलं प्रकाशन संपादित आणि प्रकाशित करतात.
शिवाय 'लॅबरिंथोस' हे ऑनलाईन अर्काईव्हसुद्धा ते चालवतात. तिथं आजवर संशोधन केलेले या विषयाचे संदर्भ सगळ्यांसाठी खुले आहेत.
जेफ सांगतात की, जगाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक संस्कृतींमध्ये इतिहासात विविध काळात लॅबिरिन्थस् सापडली आहेत. त्यांच्याबद्दल अनेक प्रश्नांचा उलगडा व्हायचा आहे.
ती कोणी केली? ती सर्वत्र एकसारखीच, बहुतांश एकाच डिझाईनची कशी आहेत? ती करण्यामागचं कारण काय? असे एक ना अनेक, असंख्य प्रश्न आहेत.

फोटो स्रोत, BBC Marathi
"ती जगभरात आढळतात, ॲरिझोना, आइसलँड, आर्क्टिक रशिया, संपूर्ण युरोप, उत्तर आफ्रिका आणि आशियापर्यंत सापडतात.
विशेषतः भारत किंवा श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळमध्ये, आणि इंडोनेशियातील सुमात्रा आणि जावासारख्या ठिकाणांपर्यंतही पसरलेली आहेत.
जिथे कुठे हे चक्रव्यूह अथवा लॅबिरिन्थस् आढळतात, तिथे सगळ्यांची रचना अगदी एकसारखीच असते आणि ते एक गूढच आहे," असं जेफ सांगतात.
जगभर, भारतात सापडणारी लॅबिरिन्थस्
चक्रव्यूह किंवा लॅबिरिन्थस् ही रचना गेल्या अनेक शतकांपासून विविध संस्कृतींमध्ये आढळत आली आहे.
त्यांना त्या-त्या भागात विविध दंतकथा अथवा मिथकंही चिकटली आहेत. त्या कथा आजही सांगितल्या जातात.

फोटो स्रोत, labyrinthos.net/
"या अशा प्रकारच्या रचना तयार करण्याचा उद्देश काय असतो? याचं एक असं उत्तर उपलब्ध नाही. कारण वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो," असं जेफ सांगतात.
"उदाहरणार्थ, अमेरिकेच्या नैऋत्येकडील ॲरिझोनामध्ये, एका पवित्र पर्वताच्या शिखराकडे जाणाऱ्या मार्गात ते वापरलं गेलं आहे, जिथं स्थानिक जमातीचा प्रमुख राहात असे. तो पर्वताच्या शिखरापर्यंत जाणारा इतका वळणावळणाचा मार्ग आहे की, कोणीही त्याच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करू शकत नाही."
"अफगाणिस्तानमध्ये एका राजवाड्याभोवतीच्या तटबंदीमध्ये असं चक्रव्यूह आहे. श्रीलंकेत एका शहराच्या संरक्षक भिंतीच्या आराखड्याच्या रुपात आहे. त्यामुळं अशा अनेक कथा आहेत आणि त्यांत बऱ्याच समान गोष्टी आहेत. पण लॅबिरिन्थ वापरण्यामागे एकच असं नेमकं कारण नाही," असं जेफ पुढे सांगतात.
जेफ यांच्या मते, लॅबिरिन्थस् ही हजारो वर्षांपासून सर्वत्र असली तरी अगदी अलिकडे त्यांच्या शोध आणि अभ्यास सुरू झाला आहे. भारतातही अलिकडे अभ्यासकांना ही गोष्ट आकर्षित करू लागली आहे आणि त्यांनी तशा नोंदी करणं सुरू केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"कर्नाटकात विजापूरमध्ये अशीच रचना सापडली आहे. गोव्यामध्ये उसळाई माळ इथं दगडांमध्ये कोरलेलं लॅबरिंथ पहायला मिळतं जे कातळशिल्पांच्या समूहात आहे. आंध्र प्रदेशात अप्पर गोदावरी जिल्ह्यात रॉक पेंटिंग्स मध्ये लॅबिरिन्थ मिळालं आहे. अशोकाच्या काळातल्या स्तंभांवर लॅबिरिन्थ मिळाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये लॅबिरिन्थला यमद्वार म्हणतात. म्हणजे मुक्तीचा मार्ग."
"अशा प्रकारचे लॅबिरिन्थ आपल्याला उत्तर भारतातही पहायला मिळतात. सगळ्यात जास्त लॅबिरिन्थआतापर्यंत दक्षिण भारतात रिपोर्ट झाले आहेत. दक्षिण भारतात जवळपास 30 ते 35 लॅबरिंथ आहेत," असं अभ्यासक सचिन पाटील सांगतात.
भारतात आणि अन्यत्र काही ठिकाणी यांचा संबंध स्थानिक दैवतकथांशीही जोडला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यालगत 12 लॅबिरिन्थस् रिपोर्ट झाले आहेत.

फोटो स्रोत, BBC Marathi
बोरामणीचं 'चक्रव्यूह'
सोलापूरजवळच्या माळढोक अभयारण्याला लागून बोरामणीजवळच्या माळावर तुम्ही गेलात तर नजर जाईल तिथपर्यंत सपाट प्रदेश आहे.
पिवळ्या पडलेल्या गवतावर बाभळीची बरीचशी झाडं आहेत आणि बाकी काही खुरटी झाडं. ब-याच पायवाटा नक्षी रेखाटत जावी तशा या माळरानावरुन पळतात.
बऱ्याच जुन्या रुळलेल्या वाटा असाव्यात. कारण तिथं आम्ही असतांना भटक्या समुहांचे घोड्यांना घेऊन दोन तांडे लांबवरुन चालत आले आणि विरुद्ध दिशेला निघून गेले.
याच माळावर हे 15 वर्तुळांचं हे चक्रव्यूह सापडलं. गवतामध्ये झाकलेलं होतं. पण आता ते काय आहे याचा उलगडा झाल्यावर, त्याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आल्यावर या माळावर येणा-यांची संख्याही वाढली आहे.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC Marathi
"ते निःसंशयपणे, आज माहिती असलेलं भारतातील सर्वात मोठं चक्रव्यूह आहे आणि 15 समकेंद्रित वर्तुळांच्या रचनेमुळे ते निश्चितपणे सर्वात गुंतागुंतीच्या उदाहरणांपैकी एक आहे.
योगायोगानेच असावी, पण ही रचना युरोपच्या अगदी उत्तरेकडील स्विडन, फिनलंड आणि आर्क्टिक रशियामध्ये आढळणाऱ्या रचनांसारखीच अगदी तंतोतत तशीच आहे. मात्र त्यांच्यात कोणताही संबंध नाही हे नक्की," असं जेफ सवार्ड सांगतात.
गेली काही वर्षं या रचनांचा पुरात्वीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे सचिन पाटील आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक पी डी साबळे यांच्यासहआम्ही या जागेला भेट दिली.
इथं या माळावर दगडांची रचना सापडल्याचं महत्व त्यांना माहिती आहे, पण अप्रूप वाटत नाही. कारण अशाच 12 रचना त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मिळाल्या आहेत.
ही सगळी अशा ठिकाणी मिळाली आहेत जिथून इतिहासकालीन व्यापारी मार्ग जात होते.

फोटो स्रोत, Sachin Patil
त्यामुळेच भारताच्या पश्चिम तटाशी विशेषत: युरोपातल्या रोमन आणि ग्रीक साम्राज्यांशी असलेल्या व्यापाराचा लॅबिरिन्थच्या कल्पनेचा भारतापर्यंत प्रवास करण्याशी संबंध असावा, अशी शक्यता अभ्यासकांना वाटते.
2000 वर्षांपूर्वीच्या व्यापाराशी संबंध?
जेफ सवार्ड यांच्या मते भारताच्या इतिहासात या रचनेचे (डिझाईन)चे स्वतंत्र संदर्भ सापडतात. या कल्पनेचा उगम कुठे झाला, तो स्थानिक होता किंवा ही कल्पना प्रवास करुन सर्वत्र पसरली, त्याची कारणं काय हे सगळे पुरातत्वीय पुराव्यांनी शोधण्याचे प्रश्न आहेत.
"भारतातील लॅबिरिन्थस् बद्दल जगभरात मोठं कुतूहल आहे. ते संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत. पण मोठा प्रश्न हा आहे की लॅबिरिन्थस् भारतात कसे पोहोचले. भारतीय इतिहासात खूप पूर्वीपासून त्याचे उल्लेख आढळतात.
उदाहरणार्थ, लॅबिरिन्थस् रचना ही 'चक्रव्यूह' नावाच्या युद्धरचनेचीही होती, ज्याचा उल्लेख महाभारतात आहे. नेमका तोच आराखडा नंतर या लॅबिरिन्थस् मध्येही दिसतो, जी विशेषतः भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळतात. पण मूळ प्रश्न आहे, तो हे कसं काय?" असं जेफ म्हणाले.

फोटो स्रोत, Sachin Patil
"आपल्याला निश्चितपणे माहिती आहे की 2000 वर्षांपूर्वी ग्रीक आणि रोमन साम्राज्यांतून, विशेषतः भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत होता.
रोमनांना लॅबिरिन्थस् बद्दल सर्व काही माहीत होतं. त्यांच्या परंपरांमध्ये ती लोकप्रिय कथा होती. शिवाय त्यांच्याकडे छोटी नाणी पाडली जात होती."
"उदाहरणार्थ, सम्राट ऑगस्टसने विविध प्रकारच्या पौराणिक गोष्टी असलेली नाण्यांची एक मालिका जारी केली होती. त्यापैकी एकावर लॅबिरिन्थ होता. त्या नाण्यांच्या मागील बाजूस, भारतात आढळणाऱ्या चक्रव्यूहांसारखीच हुबेहूब रचना असलेले चित्र आहे. त्यापैकी काही नाणी भारतात पोहोचली असतील, अशी कल्पना करणे फारसं आश्चर्यकारक ठरणार नाही," असं जेफ विस्तारानं सांगतात.
रोमन साम्राज्याशी भारतातल्या आणि त्यातही महाराष्ट्रातला सातवाहनांसारख्या तत्कालीन राजवटींचा व्यापारी संबंध होता, हे आजवरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
त्या काळातले इतिहासकालीन व्यापारी मार्ग कोणते होते, हेही पुढं आलं आहे.

फोटो स्रोत, BBC Marathi
"पुरातत्वीय पुराव्यांबद्दल विचाराल तर आता धाराशिव जिल्ह्यात असलेलं 'तगर' म्हणजे आजचं 'तेर' इथं रोमन साम्राज्याशी असलेल्या व्यापाराचे पुरावे अतिशय ठळकपणे सापडले आहेत," असं डॉ. गर्गे सांगतात. बोरामणीच्या लॅबिरिन्थपासून सध्याच 'तेर' हे साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे.
इसवी सनाच्या पहिल्या - दुसऱ्या शतकात सुरू असलेल्या या व्यापारी मार्गांबद्दल सांगताना डॉ. गर्गे यांनी म्हटलं की, "आताचं जे नालासोपारा आहे तिथे सोपारा नावाचं बंदर होतं. शुपरका या नावानं ते प्रसिद्ध होतं. कोकणपट्टीवर अनेक बंदरं होती. तिथून नाणेघाट हा एक क्रॉसिंग पॉईंट होता.
सोपारा-कल्याणमधून आल्यावर नाणेघाटमार्गे आपण घाटमाथ्यावर जुन्नरमध्ये येतो. जुन्नर हे पण रोमन व्यापाराशी संबंधित ठिकाण आहे. त्याचप्रमाणे नाशिकमार्गे पैठण अथवा प्रतिष्ठानकडे जात असत."
"भूमध्य सागरातून जो काही दक्षिण भारतात व्यापार झाला तो व्यापार नालासोपारा या एकाच बंदरातून झाला नाही. त्याच्यामध्ये अगदी राजापूरच्या बंदराचाही उल्लेख येतो.
मग राजापूरच्या बंदरातून मग अणुस्कुरा घाट आणि अणुस्कुरा घाटातून कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये तर पोसायडन ही ग्रीक समुद्रदेवता सापडली आहे. तिथून पुढे मिरज, पंढरपूर आणि तेर, असा तो प्रवास मार्ग असावा," असं मत सचिन पाटील यांनी मांडलं.

फोटो स्रोत, Sachin Patil
"हे व्यापारी समुद्रातून यायचे, तेव्हा सह्याद्रीच्या उंच कपारी आहेत, तिथं गोंधळून जायचे. आम्ही पहिली 11 लॅबिरिन्थस् सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शोधली आहेत ती अशाच ठिकाणी आहेत जिथे दृष्टीला अडथळा आहे.
सरळ समोर फारसं काही दिसत नाही. एकदम उंच भाग आहे किंवा दुसरीकडे सखल प्रदेश आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गोंधळ होतो आहे, तिथे लॅबिरिन्थस् आहेत," म्हणजे दिशादर्शनासाठी व्यापारी मार्गावर ही वर्तुळं असावीत असा कयास प्रा.पी डी साबळे मांडतात.
त्यामुळे बोरामणीच्या या भारतातल्या सर्वात मोठ्या लॅबिरिन्थचा काळ 2000 वर्षांच्या आसपास असावा असा अंदाज सचिन पाटील व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Bharat Cheda
"क्लासिकल फॉर्मचा जर विचार केला तर ते पहिल्या - दुसऱ्या शतकाशी जोडता येतं. तेव्हा सातवाहनाचा कालखंड हा दख्खनेत आहे. रोमन व्यापारी हे त्यावेळेस व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात भारतात येत होते.
त्यामुळे जास्तीत जास्त जवळीक ही रोमन संस्कृती, क्रेट बेटांवरचं नाणं आणि सातवाहन काळातील व्यापारी संबंध यांचाच आहे. सर्वसाधारणपणे आत्तापासून 2000 वर्षं, म्हणजे पहिल्या शतकाशी," असं पाटील म्हणतात.
पण अर्थात, केवळ बोरामणीचंच नव्हे तर तर जगभरातली सगळीच लॅबिरिन्थस् अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं घेऊन बसली आहेत.
ही नक्की कोणी निर्माण केली? जगभरातल्या सगळ्याच संस्कृतींमध्ये ती एकसारखी कशी आहेत? या कल्पनेचा प्रवास कसा झाला? त्यामागचं कारण एकच आहे की वेगवेगळं? असे अनेक प्रश्न.
या प्रश्नांच्या उत्तरांना अधिक पुरातत्वीय संशोधनाशिवाय पर्याय नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)








