जवस, भोपळा, सूर्यफूल आणि चिया सीड्स कशा खाव्यात? त्या कोणी खाऊ नयेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपक मंडल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारतात युट्यूबवर हेल्थ इन्फ्लुएंसर्स आणि गुरूंचा जणूकाही पूरच आला आहे. दर दुसऱ्या-तिसऱ्या व्हीडिओमध्ये भोपळा, सुर्यफूल किंवा इतर प्रकारच्या बिया खाण्याचे प्रचंड फायदे सांगितले जात असल्याचं दिसतं.
आपल्या आहाराशी फक्त फोडणी देणं आणि चटणीपर्यंत मर्यादित असणाऱ्या या बिया किंवा सीड्स आता युट्यूबवर 'सुपरफूड्स' बनल्या आहेत.
या बियांचे फायदे सांगणाऱ्या व्हीडिओंना लाखो व्ह्यूज मिळत आहेत.
मात्र आता प्रश्न निर्माण होतो की बिया खाणं हे फक्त एक नवीन 'फूड फॅड' (खाण्याच्या सवयींचा नवा ट्रेंड) आहे की, ते आरोग्यासाठी खरोखरंच फायदेशीरदेखील आहे.
या बियांचे फायदे जाणून घेण्याआधी या बियांमध्ये कोणकोणते पोषक घटक असतात? संशोधनातून त्याबद्दल काय माहिती समोर आली आहे, हे जाणून घेऊया.
बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर
जवळपास 70 टक्के भारतीय लोकांच्या आहारात फायबरचा पुरेसा समावेश नसतो.
भारतीयांच्या आहारात फॅट किंवा चरबीचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर फायबरचं प्रमाण मात्र कमी होत चाललं आहे.
वास्तविक फायबर म्हणजे तंतूमय पदार्थ ह्रदयरोग, स्ट्रोक, टाईप 2 मधुमेह आणि पोटाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात.
आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, फायबरयुक्त आहारामुळं तुमचा रक्तदाब योग्य राहण्यास मदत होते. तसंच त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीदेखील कमी होते.
डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरच्या अभ्यासातून समोर आलं आहे की, एखाद्या वयस्कर व्यक्तीनं किमान 25 ते 30 ग्रॅम फायबरचं सेवन केलं पाहिजे. मात्र सरासरी भारतीयाच्या आहारात फक्त 15 ग्रॅम फायबर असतं.

फोटो स्रोत, Getty Images
जर तुम्ही फायबर म्हणून बिया खाल्ल्या तर शरीरातील फायबरची कमतरता बऱ्याचअंशी भरून काढली जाऊ शकते.
कारण 20 ग्रॅम चिया सीड्समध्ये (सब्जा) 6.8 ग्रॅम फायबर असतं.
इतक्याच वजनाच्या जवसाच्या बियांमध्ये 5.4 ग्रॅम फायबर असतं. तर इतक्या वजनाच्या भोपळ्याच्या बियांमध्ये 1.3 ग्रॅम फायबर असतं.
हेल्दी फॅटचे स्त्रोत
अनेक बिया हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्सचे चांगले स्त्रोत असतात. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसनुसार, लोणी, तूप, चरबीयुक्त मांस किंवा चीजऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट्सचं सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. तसंच ह्रदयाला निरोगी ठेवण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो.
काही बियांमध्ये ओमेगा-3 फॅट एएलए म्हणजे अल्फा लिनोलेनिक ॲसिड असतं. ते ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचं मानलं जातं.
अर्थात माशांच्या तेलातदेखील हे ओमेगा-3 फॅट असतं. मात्र चरबीयुक्त मासे किंवा ओमेगा-3 फॅट असलेल्या गोळ्या खाल्ल्यामुळे जास्त फायदा होत नाही.
कारण शरीर त्याचा फक्त थोडासा भागच शोषून घेऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
चिया, जवस किंवा भांगच्या बिया म्हणजे हेम्प सीड्स (उत्तराखंडमध्ये त्याची चटणी खूपच प्रचलित आहे. यामुळे नशा होत नाही.) ओमेगा-3 फॅट्सचे मोठ्या प्रमाणात असतं.
नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल फाउंडेशनमधील न्यूट्रीशिन रिसर्चच्या गटप्रमुख डॉ. सीमा गुलाटी म्हणतात, "बियांमध्ये ओमेगा-6 देखील चांगल्या प्रमाणात असतं. हे देखील पॉली अनसॅच्युरेटेड फॅट असतं. ते चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. बिया या वनस्पतीजन्य प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत असतात."
आजारांपासून बचाव करण्यासाठी कशा उपयुक्त?
बियांमध्ये फक्त फायबर आणि फॅटच नसते, तर त्यामध्ये प्रोटीनदेखील असतं. बियांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील (इम्युनिटी सिस्टम) मजबूत होते.
आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला काही विशिष्ट जीवनसत्व आणि खनिजांची आवश्यकता असते. यापैकी अनेक यात बियांमध्ये असतात.
ब्रिटिश न्यूट्रीशन फाउंडेशनच्या सायन्स डायरेक्टर सारा स्टॅनर यांच्या मते, "सेलेनियमचंच उदाहरण घ्या. सेलेनियम नवीन इम्यून सेल (पेशी) बनवतं. संसर्गाशी लढण्यास त्याची मदत होऊ शकते. ते सूर्यफुलाच्या बियांमध्ये आढळतं."
त्या म्हणतात की, झिंकदेखील आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं खनिज असतं.

फोटो स्रोत, Getty Images
सारा म्हणतात, "झिंकदेखील नवीन रोगप्रतिकारक पेशी तयार करतं. ते शरीरात नॅचरल किलर सेल्स बनवतं. या पेशी विषाणूंशी लढण्यास मदत करतात. तसंच ते रोगप्रतिकारक पेशींमध्ये संवाद वाढवतं. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींना हे माहित होतं की शरीरातील रोगांशी कसं लढायचं आहे."
सारा यांच्यानुसार, पुरुषांना दररोज 9.5 मिलीग्रॅम आणि महिलांना 7 मिलीग्रॅम झिंकची आवश्यकता असते. 20 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये 1.5 मिलीग्रॅम झिंक असतं.
सारा म्हणतात की, कॉपर (तांबे) आपल्या शरीराला रोगप्रतिकारक पेशींचं रक्षण करण्यासाठी आणि त्यांची वाढ करण्यासाठी मदत करतं. 19 ते 64 वर्षांदरम्यान वय असलेल्या लोकांना दररोज 1.2 मिलीग्रॅम कॉपरची आवश्यकता असते. 20 ग्रॅम तिळामधून 0.5 मिलीग्रॅम कॉपर मिळतं.
फोलेट म्हणजे व्हिटामिन बी9 देखील रोगप्रतिकारक पेशी बनवण्यास मदत करतं. सूर्यफुल, तीळ आणि जवसाच्या बियांमध्ये ते भरपूर प्रमाणात असतं.
सारा म्हणतात की, व्हिटामिन बी6 अँटी बॉडीज तयार करतं. तसंच रोगप्रतिकारक पेशींना एकमेकींशी संवाद साधण्यास मदत करतं. अख्ख्या तिळामध्ये ते मोठ्या प्रमाणात आढळतं.
हाडं मजबूत करतात बिया
हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची आवश्यकता असते. भारतात प्रौढ पुरुष आणि महिला दोघांच्याही रोजच्या कॅल्शियमची गरज पूर्ण होत नाही.
प्रौढ लोकांना दररोज 800 आणि 1000 मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. मात्र भारतात प्रौढ व्यक्ती सरासरी 429 मिलीग्रॅम कॅल्शियमच घेतात.
चिया सीड्स, जवस आणि तीळ यामधून कॅल्शियमची गरज बऱ्याच अंशी पूर्ण होऊ शकते. यामुळे हाडं निरोगी राहतात.

फोटो स्रोत, Getty Images
अलीकडच्या काळात बिया खाण्याचा ट्रेंड वाढला आहे. लोक याला सुपरफूड प्रमाणे खात आहेत. बियांचं सेवन सुपरफूड प्रमाणे केलं पाहिजे का?
या प्रश्नाला उत्तर देताना डाएटिशियन आणि वेलनेस एक्सपर्ट, दिब्या प्रकाश म्हणतात, "बिया म्हणजे 'फूड फॅड' नाही. ते आपल्या जीवनशैलीमध्ये आधीपासून होते. मात्र आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण त्याला बाजूला सारलं होतं."
"आता पुन्हा एकदा लोकांना त्याची आवश्यकता जाणवू लागली आहे. पोषणाबाबत जागरुकता वाढल्यामुळे लोक आता बिया खाऊ लागले आहेत."

त्या म्हणतात, "आजच्या काळात बिया आवश्यक झाल्या आहेत. आपल्या सर्व बाजूंना प्रदूषणाचा हाहाकार आहे. आपण जंक आणि प्रोसेस फूडवर बरेचसे अवलंबून होत चाललो आहोत."
त्या पुढे म्हणतात की याप्रकारच्या अन्नामुळे लोकांच्या 'गट हेल्थ' म्हणजे पोट, मोठे आतड्यांपासून रेक्टमपर्यंत नुकसान होऊ शकतं. म्हणूनच बिया खाणं आवश्यक झालं आहे.
अर्थात त्या म्हणतात की बियांना सुपर फूडप्रमाणे खाऊन आपण आरोग्यविषयक समस्यांबद्दल निश्चिंत होऊ शकत नाही. बिया आपल्या रोजच्या आहाराचा भाग असल्या पाहिजेत.
वेगवेगळ्या बिया तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, ते जाणून घेऊया.
भोपळ्याच्या बिया (पंपकिन सीड्स)
भोपळ्याच्या बियांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असतं. हे तिन्ही घटक हाडांना निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, आयर्न आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतं.
यात अँटी ऑक्सिडंट घटक असतात. अँटी ऑक्सिडंट शरीरातील ऑक्सिडंट्स संपवतात. ऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींची हानी करतात.
तज्ज्ञांच्या मते, भोपळ्याच्या बियांमुळे कर्करोगाचा धोकादेखील कमी होऊ शकतो.
यात मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असल्यामुळे ह्रदयाचं आरोग्यदेखील चांगलं राखण्यास मदत होते. रक्तदाब कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यामध्येही या बिया फायदेशीर असतात.

फोटो स्रोत, Getty Images
झिंक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भोपळ्याच्या बिया रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवतात.
महिलांसाठी या बिया अतिशय फायदेशीर असतात. मेनोपॉजनंतर महिलांना जाणवणाऱ्या समस्या दूर करण्यामध्ये या बिया खूप उपयुक्त असतात.
भोपळ्याच्या बिया भाजून, पावडर बनवून किंवा सॅलडवर वरून टाकून खाता येतात.
तज्ज्ञांच्या मते, या बियांचं अतिरिक्त सेवन टाळलं पाहिजे. जास्त खाल्ल्यामुळे गॅस, डायरिया, पोटदुखी किंवा पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवू सकतात.
जर तुम्हाला या बियांची ॲलर्जी असेल, तर त्यासंदर्भात तपासणी नक्की करून घ्या.
जवसाच्या बिया (फ्लेक्स सीड्स)
तपकिरी रंगाच्या या बिया आरोग्यासाठी अतिशय चांगल्या असतात. जवसाच्या बिया सर्वाधिक पोषक बियांपैकी एक असतात.
जवसाच्या बियांमध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, मॅग्नेशियम आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतं.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी या बिया चांगल्या मानल्या जातात. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीदेखील त्या उपयुक्त असतात. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी त्या उपयुक्त ठरल्या आहेत.
या बियांमुळे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएलचं प्रमाण कमी होतं. तसच या बिया चांगल्या अँटी ऑक्सिडंट असतात. वजन कमी करण्यामध्ये देखील या उपयुक्त असतात.
महिलांना असलेल्या मासिक पाळीच्या समस्या दूर करण्यास या बियांचा फायदा होतो.

फोटो स्रोत, Getty Images
दिब्या प्रकाश म्हणतात, "तुम्ही एक छोटा चमचाभर जवसाच्या बिया चावून खाऊ शकतात. याशिवाय तुम्ही याची चटणीदेखील खाऊ शकतात."
बिहार आणि उत्तर प्रदेशात जवसाची चटणी खूप आवडीनं खाल्ली जाते. योगर्ट, सॅलड आणि सूपमध्ये देखील याचा वापर करता येतो.
जवसाच्या बिया खूप चाऊन खाल्ल्या पाहिजे. त्याचबरोबर पाणीदेखील प्यायलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला अपचन किंवा गॅसची समस्या होऊ शकते.
जर तुम्हाला जवसाची ॲलर्जी असेल तर याची तपासणी करून घ्यावी.
चिया सीड्स
चिया सीड्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या अंडाकार बिया असतात. या सलिवा हिस्पॅनिका वनस्पतीपासून मिळतात. ही वनस्पती मध्य अमेरिकेत सापडणाऱ्या मिंट प्रजातीतील वनस्पती मानली जाते.
चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड भलेही अलीकडे वाढला असेल. मात्र चांगलं आरोग्य आणि पोषणासाठी याचा वापर हजारो वर्षांपासून होत आला आहे. माया आणि एज्टेक संस्कृतीमध्ये देखील याचा उल्लेख सापडतो.
आपल्या शरीरातील मांसपेशीची वाढ आणि त्यांच्या चांगल्या देखभालीसाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं असतं.
चिया सीड्समध्ये प्रोटीन तयार करणारे सर्व आवश्यक नऊ अमिनो ॲसिड असतात.

फोटो स्रोत, Getty Images
चिया सीड्स वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि टाईप टू मधुमेहाचं व्यवस्थापन करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.
तज्ज्ञांच्या मते यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, ओमेगा 3 फॅटी ॲसिड, आयर्न आणि प्रोटीन असतं. यात अँटी ऑक्सिडंटदेखील मोठ्या प्रमाणात असतात.
ह्रदय निरोगी ठेवण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्या उपयुक्त असतात. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे हाडं मजबूत होतात.
या बियांमुळे शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं.
ज्या लोकांना चिया सीड्सची ॲलर्जी आहे, त्यांना उलटी, डायरिया होऊ शकतो, ओठ किंवा जीभेला खाज येऊ शकते.
तीळ
तीळ भारतीय आहारात पंरपरातगतरित्या प्राचीन काळापासून वापर होत आला आहे.
काळे आणि पांढरे तीळ भारतात फक्त अन्नाचाच नाही, तर पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचा देखील अविभाज्य भाग आहेत.
सीमा गुलाटी म्हणतात, "तीळ आणि इतर बियांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. आपल्या आहारात फार पूर्वीपासून याचा वापर होत आला आहे. यात मोठ्या प्रमाणात पोषक घटक आणि ऊर्जा असते. त्यामुळेच यांचं मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे."
तिळामध्ये व्हिटामीन बी, झिंक, कॅल्शियम, प्रोटीन आणि ओमेगा फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात.
मधुमेहाचं व्यवस्थापन करण्यामध्ये तीळ अतिशय फायदेशीर असतात.

फोटो स्रोत, Getty Images
तिळामुळे हाडं मजबूत होतात. ॲनिमियावर (रक्ताची कमतरता) उपचार करण्यासाठी तीळ उपयुक्त असतात.
महिलांसाठी तीळ अतिशय उपयुक्त असतात. कारण महिलांना ॲनिमियाची समस्या लगेचच होते.
तिळामुळे चांगलं कोलेस्ट्रॉलचं (एचडीएल) प्रमाण वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं (एलडीएल) प्रमाण कमी होतं.
केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी तीळ अतिशय चांगले असतात. तज्ज्ञांच्या मते, चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठीदेखील तीळ उपयुक्त ठरतात.
सूर्यफुलाच्या बिया (सनफ्लावर सीड्स)
भारतात सूर्यफुलाच्या बियांचा वापर फार पूर्वीपासून केला जातो आहे. मात्र सूर्यफुलाच्या बियांपासून तयार होणाऱ्या तेलापेक्षा या बिया जास्त पोषक असू शकतात.
यात व्हिटामिन ई असतं, तसंच कोलेस्ट्रॉल अजिबात नसतं. हाडं निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी या बिया अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडदेखील मोठ्या प्रमाणात असतं.
काही अभ्यासांनुसार, यामध्ये लिनोलिक ॲसिड (सीएलए) असतं. हे एक कर्करोगरोधक फॅटी ॲसिड आहे. लिनोलिक ॲसिड इतर अनेक गोष्टींमध्ये मिळू शकतं. मात्र तीळ, जवस आणि शेंगदाण्याच्या तुलनेत सूर्यफुलाच्या बियांमध्ये ते अधिक प्रमाणात असतं.

फोटो स्रोत, Getty Images
अभ्यासानुसार, व्हिटामिन ईच्या सेवनामुळे कर्करोगापासून बचाव होतो. सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ई मोठ्या प्रमाणात असतं.
सूर्यफुलाच्या बिया शरीरातील इन्फ्लेमेशन कमी करतात. तसंच त्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. कारण या बियांमुळे एलडीएल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं.
सूर्यफुलाच्या बिया थायरॉईडच्या समस्यांमध्येही उपयुक्त असतात.
महिलांसाठी अतिशय फायदेशीर
दिब्या प्रकाश म्हणतात की, बिया खाल्ल्यामुळे तरुण महिलांचा पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा आजारांपासून बचाव होऊ शकतो.
प्रजननाच्या वयात असलेल्या महिलांमधील सामान्य हार्मोनल समस्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) म्हणतात.
यात अनियमित किंवा प्रदीर्घ काळ मासिक पाळी, एंड्रोजन (पुरुष हार्मोन) ची उच्च पातळी आणि अंडाशयाच्या समस्यांमुळे शरीरावर मुरुम येऊ लागतात. शरीरावर खूप जास्त केस येऊ लागतात. वजन वाढतं आणि वंध्यत्व येऊ शकतं. टाईप टू मधुमेह आणि ह्रदयरोग देखील होऊ शकतो.
मात्र बिया खाल्ल्यामुळे इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचा धोका कमी होतो.
महिलांमधील मूड स्विंग, अनियमित मासिक पाळीची समस्या दूर करण्यासाठी बिया खाणं खूपच फायदेशीर असतं.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांमधील हाडांची घनता (बोन डेन्सिटी) कमी होण्यावर देखील बियांमुळे नियंत्रण राखलं जाऊ शकतं.
यामुळे इनफर्टिलिटीची शक्यता खूपच कमी होते. वजन वाढणं, मूड स्विंग, अनियमित मासिक पाळी आणि हाडांची घनता कमी होणं कमी होऊ लागतं.
दिब्या प्रकाश म्हणतात, "हल्ली किशोरवयीन आणि तरुण महिलांना देखील या समस्या होत आहेत. त्यामुळे जर त्यांनी सुरूवातीपासूनच बिया खाल्ल्या तर त्याचा त्यांना फायदा होईल. जास्त वयाच्या महिलांमध्ये मेनोपॉजमुळे निर्माण होणाऱ्या समस्या बिया खाल्ल्यामुळे कमी होतात."
त्या म्हणतात की, महिलांनी मासिक पाळीच्या अगोदरचे 15 दिवस जवसाच्या बिया किंवा भोपळ्याच्या बिया खाल्ल्या पाहिजेत. तर नंतरचे 15 दिवस तीळ खाल्ले पाहिजेत. तिळामुळे महिलांमधील प्रोजेस्ट्रॉन वाढतं. ते महिलांच्या प्रजनन प्रणालीसाठी चांगलं असतं.
किती आणि कशा खाव्यात?
दिब्या प्रकाश म्हणतात की, बियांचं सेवन खूप जास्त प्रमाणात करू नये. त्या कमी प्रमाणात खाल्ल्यावरच प्रभावी असतात.
त्या म्हणतात, तिळाचंच उदाहरण घ्या. तीळ अधिक प्रमाणात खाऊ नयेत. तीळ अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे वजन वाढू शकतं. जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि काहीवेळा बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे चार-पाच प्रकारच्या बियांना हलकेच भाजून त्या एकत्र कराव्यात. त्यानंतर दोन चमचे म्हणजे 20 ते 30 ग्रॅम बिया खाव्यात. त्यामुळे त्याचा अधिक फायदा होतो.
त्या म्हणतात की जवसाच्या बिया दोन प्रकारे खाता येतात. जवसाच्या कच्च्या बियांना हलकंच भाजून त्या खाता येतात. किंवा त्यांची पावडर बनवून खाता येते. यात फायटो एस्ट्रोजन असतं. ते महिलांच्या हार्मोनसाठी चांगलं असतं.
जवसाच्या बिया, महिलांनी पावडर स्वरूपात आणि पुरुषांनी भाजून खाल्ल्या पाहिजेत.

दिब्या प्रकाश म्हणतात, "ज्या पुरुषांच्या शरीरात थोडंफार एस्ट्रोजन हार्मोन तयार करण्याची प्रवृत्ती असते, त्यांच्यामध्ये जवसाच्या बियांच्या पावडरमुळे वक्ष मोठे होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पुरुषांनी जर भाजलेल्या जवसाच्या बिया खाल्ल्या, तर त्यांच्या शरीराला ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि फायबर मिळेल."
महिलांनी जर पावडर स्वरूपात त्याचं सेवन केलं, तर त्यांना एस्ट्रोजन वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल. हा फर्टिलिटीशी संबंधित हार्मोन असतो.
दिब्या प्रकाश म्हणतात की, बहुतांश लोकांना चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत माहित नसते. त्या रात्री भिजवून खाल्ल्या पाहिजेत. त्या तुम्ही दही, लस्सी किंवा स्मूदीमध्ये टाकून खाऊ शकता.
एक दिवसात 30 ग्रॅमहून अधिक चिया सीड्स खाता कामा नये. चिया सीड्स खात असताना अडीच ते तीन लीटर पाणी प्यायलं पाहिजे. नाहीतर ब्लोटिंग (पोट फुगणं) आणि गॅसची समस्या होऊ शकते. कारण चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं आणि त्यामुळे गॅसची समस्या होऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











