ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री, महाराष्ट्रातील आणखी कुणाला सन्मान जाहीर

लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर

फोटो स्रोत, Facebook/Raghuvir Khedakar

फोटो कॅप्शन, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारनं मानाच्या पद्म पुरस्कार्थींची घोषणा केली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश असून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 'हा तमाशाला मिळालेला पहिला पुरस्कार आहे,' लहानपणापासून आपण जे कष्ट केले याचे चीज झाले अशी भावना रघुवीर खेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, यंदा 13 जणांना पद्मभूषण पुरस्कार, तर 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

महाराष्ट्रातील या व्यक्ती ठरल्या पुरस्काराच्या मानकरी

  • रघुवीर खेडकर – (कला)
  • भिकल्या लडक्या धिंडा – (कला)
  • श्रीरंग देवबा लाड – (कृषी)
  • आर्मिदा फर्नांडीस – (वैद्यकीय)

तमाशा परंपरेचा वारसा पुढे नेणारे लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांनी आपल्या कलेने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आहे. त्यांना लोककलेतील योगदानासाठी याआधीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

याआधी लावणीला पद्म पुरस्कार मिळाले होते, पण तमाशाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार आहे अशी भावना खेडकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

पद्म पुरस्कार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हीएस अच्युतानंदन आणि अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार तर रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दिवंगत चित्रपट अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

त्यांच्यासोबत, आणखी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यामध्ये सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश केटी थॉमस, वायोलिन वादक एन राजम, साहित्य आणि शिक्षा क्षेत्राशी संबंधित पी नारायणन आणि केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पद्म पुरस्काराचे मानकरी

प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत जेएमएम नेते शिबू सोरेन, भाजपचे दिवंगत नेते विजय कुमार मल्होत्रा आणि माजी टेनिस प्लेयर विजय अमृतराज यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अलका याज्ञिक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे (फाइल फोटो)

पद्मश्री पुरस्कार -

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, अभिनेते आर. माधवन, जेएनयुचे माजी कुलपति आणि यूजीसीचे माजी चेअरमन एम जगदीश कुमार, क्रिकेटर रोहित शर्मा, दिवंगत चित्रपट आणि टीव्ही कलाकार सतीश शाह आणि माजी गोलंदाज प्रवीण कुमारसह एकूण 113 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्म पुरस्काराचे 3 प्रकार

पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात.

  • पद्म विभूषण
  • पद्म भूषण
  • पद्मश्री

पद्म विभूषण पुरस्कार हा भारतरत्नच्या नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान मानला जातो.

असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्म विभूषण पुरस्कार दिला जातो.

उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण पुरस्कार तर विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो.

पद्म पुरस्कार कसे दिले जातात?

पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली होती. 1978, 1979 आणि 1993 पासून 1997 पर्यंतची वर्षे वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.

कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, समाजसेवा, विज्ञान, नागरी सेवा, व्यापार यासह अनेक क्षेत्रांमधील विशिष्ट कामासाठी हे पुरस्कार दिले जातात.

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

सरकारनुसार, या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या कार्यात लोकसेवेचं मूल्य असलं पाहिजे.

दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कार समिती नियुक्त करतात. पद्म पुरस्कार समिती ज्या लोकांची पुरस्कारांसाठी शिफारस करते, ती नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवली जातात.

नाव घोषित झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रपती भवनात पुरस्कार समारंभ आयोजित केला जातो.

या पुरस्कारात राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेलं प्रमाणपत्र आणि एक पदक यांचा समावेश असतो.

पद्म पुरस्कार

फोटो स्रोत, PAdma puraskar

प्रत्येक पुरस्कार विजेत्याची थोडक्यात माहिती देणारी एक स्मरणिका देखील समारंभाच्या दिवशी प्रकाशित केली जाते.

पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला पदकाची एक रेप्लिका म्हणजे प्रतिकृती देखील दिली जाते. ही प्रतिकृती त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही कार्यक्रमात परिधान करता येते.

भारत सरकारनुसार, पद्म पुरस्कार म्हणजे कोणतीही पदवी नाही. या पुरस्काराचा उल्लेख आमंत्रण पत्रिका, पोस्टर, पुस्तकं यावर पुरस्कार विजेत्याच्या नावाआधी किंवा नंतर केला जाऊ शकत नाही.

पुरस्कार विजेत्यांना कोणतीही रोख रक्कम आणि रेल्वे किंवा विमान प्रवासात सूट मिळत नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.