बॉर्डर : 'गहू-तांदळाऐवजी आपण शेतात बंदुका का पेरतो?'; युद्धपटांवर सध्या काय चर्चा सुरू आहे?

युद्धपट

फोटो स्रोत, Prodip Guha/Getty Images

    • Author, वंदना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित 'बॉर्डर' आणि 'इक्किस' हे चित्रपट निव्वळ शौर्यकथा सांगत नाहीत तर ते युद्धाची भीषणता आणि त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या किंमतीबद्दलही भाष्य करतात. त्यासोबतच ते मानवतेचाही प्रश्न उपस्थित करतात.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित असलेले बॉलिवूडचे दोन चित्रपट या वर्षीच्या जानेवारीमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यातला पहिला चित्रपट आहे 'इक्किस' आणि आहे दुसरा 'बॉर्डर 2.'

बॉर्डर-2 मध्ये सनी देओलने मेजर जनरल हरदेव सिंग कलेर यांची भूमिका साकारली आहे. वरुण धवनने या चित्रपटात मेजर होशियार सिंग दहिया यांची भूमिका साकारली आहे तर दिलजीत दोसांझने निर्मलजित सिंग सेखॉन यांची भूमिका साकारलेली आहे.

1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाच्या 29 वर्षांनंतर 'बॉर्डर 2' हा चित्रपट आलेला आहे. पहिल्या 'बॉर्डर'मध्ये अक्षय खन्नाने सेकंड लेफ्टनंट धर्मवीर सिंगची भूमिका केली होती.

अक्षय खन्ना सध्या 'धुरंधर' चित्रपटातील 'रेहमान डकैत'च्या भूमिकेमुळे चर्चेत आहे.

'चांगला 'युद्धपट' हा युद्धविरोधी चित्रपटच'

1971 च्या युद्धावर बनवलेल्या 'इक्किस' या युद्धपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन आहेत.

त्यांनी पत्रकार बरद्वाज रंगन यांच्याशी झालेल्या संभाषणात म्हटलं होतं की, युद्धावर बनवलेला कोणताही चांगला चित्रपट हा प्रत्यक्षात युद्धविरोधीच असतो.

29 वर्षांपूर्वी, दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांच्या बॉर्डर चित्रपटात एक दृश्य होतं. त्यात सुनील शेट्टी (भैरों सिंग) विचारतो की, "तू सैन्यात का भरती झालास?"

त्यावर धर्मवीर सिंग (अक्षय खन्ना) म्हणतो, "माझ्या वडिलांनी मला शपथ घालत माझ्याकडून सैन्यात भरती होण्याचं वचन घेतलं होतं. देशप्रेमाच्या जोशात ते एकप्रकारे आपल्या मुलाला गणवेशाच्या बेडीत अडकवून गेले.

त्यांनी माझ्या हातात बंदूक सोपवली आणि सांगितलं की, त्या समोरच्या सैनिकाला गोळी घाल. तो समोरचा सैनिक, जो माझ्यासारखाच एका आईचा मुलगा आहे. खरं तर त्याला मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही. ज्यानं माझं खरं तर काहीही वाईट केलेलं नाही. ज्याचं नावही मला माहिती नाही. मग हे सगळं का आणि कशासाठी?"

भैरों सिंग (सुनील शेट्टी) यावर उत्तर देताना म्हणतो की, "कारण, जर तू त्याला मारलं नाहीस तर तो तुला मारून टाकेल?"

या चित्रपटामध्ये अक्षय खन्नानं साकारलेलं पात्र या युद्धात लढतंदेखील आणि युद्धभूमीवर धारातिर्थीदेखील पडतं.

'चला आपण शपथ घेऊया...'

'बॉर्डर'मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाबाबत फार मोठमोठे सीन होते. या चित्रपटात असंख्य संवाद होते, जे आपल्या देशासाठी मरण्याची इच्छा दर्शवणारे होते. या संवादांवर थिएटरमधून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.

उदाहरणार्थ, जेव्हा मेजर कुलदीपची भूमिका साकारणाऱ्या सनी देओलसमोर दोन पर्याय उभे राहतात. एक असतो, युद्धात जाणं किंवा त्याच्या मुलासाठी बदली थांबवणं, तेव्हा तो पत्नीला म्हणतो की, 'तुझा कुलदीप कधीही देशासाठी मुलाचं बलिदान देऊ शकतो.'

'बॉर्डर'मध्ये सनी देओलने मेजर कुलदीप चांदपुरी यांची भूमिका साकारली होती.

फोटो स्रोत, KULDEEP CHANDURI

फोटो कॅप्शन, 'बॉर्डर'मध्ये सनी देओलने मेजर कुलदीप चांदपुरी यांची भूमिका साकारली होती.

किंवा जेव्हा धर्मवीर सिंग (अक्षय खन्ना) युद्धभूमीवर शेवटच्या घटका मोजत असतो आणि तो आपल्या अंध आईचा चेहरा आठवतो, ती त्याच्यासाठी लग्नाची तयारी करत असते. तेव्हा प्रेक्षकांच्याही डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहत नाही.

पण त्याच चित्रपटाच्या शेवटी, जेव्हा 'मेरे दुश्मन मेरे हमसाये...' हे गाणं वाजतं, तेव्हाही कित्येक लोक आजही भावनिक होतात.

या गाण्यामध्ये गीतकार लिहितात की, गहू आणि तांदळाऐवजी आपण आपल्या शेतात या बंदुका का पेरतो? एकीकडे दोन्ही देशांच्या रस्त्यांवर काही भुकेली मुलं रडत आहेत. तर, चला आपण शपथ घेऊया की, आता युद्धचं होऊ नये.

बॉर्डर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध सुरू झालं होतं. नंतर या युद्धावर आधारित 'शेरशाह' हा चित्रपट बनवण्यात आला.

'शेरशाह' हा चित्रपट कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कथेवर आधारित होता. त्यांना कारगिल युद्धातील बलिदानासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं.

निर्मलजीत सिंग सेखॉनच्या भूमिकेत दिलजीत

बॉर्डर-2 बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित चित्रपट आहे.

फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन (दिलजीत दोसांझ) 1971 च्या युद्धादरम्यान श्रीनगरमध्ये तैनात होते.

पंजाबमधील लुधियानाच्या इसेवाल गावात जन्मलेले निर्मलजीत सिंग सेखोन हे भारतीय हवाई दलाचे एकमेव परमवीर चक्र विजेते आहेत.

निर्मलजीत सिंग सेखों हे भारतीय हवाई दलाचे एकमेव परमवीर चक्र विजेते आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, निर्मलजीत सिंग सेखों हे भारतीय हवाई दलाचे एकमेव परमवीर चक्र विजेते आहेत.

पंजाबमधील लुधियानाच्या इसेलवाल गावात जन्मलेले निर्मलजीत सिंग सेखोन 1971 च्या युद्धादरम्यान श्रीनगरमध्ये तैनात होते.

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या एका नोंदीनुसार, "14 डिसेंबर 1971 रोजी जेव्हा पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाला, तेव्हा आकाशात सहा पाकिस्तानी विमानं घिरट्या घालत होती. याच दरम्यान, फ्लाइंग ऑफिसर सेखोन यांनी उड्डाण केलं.

आकाशात झालेल्या संघर्षानंतर, पाकिस्तानी विमानांना माघार घ्यावी लागली आणि भारतीय तळांवर हल्ला करण्याचा त्यांचा मनसुबा सोडून द्यावा लागला. मात्र, याच संघर्षादरम्यान फ्लाइंग ऑफिसर सेखोन यांचं विमान कोसळलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

चित्रपटात मृत्यू, पण खरे धर्मवीर जिवंत

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बॉर्डर-2 प्रमाणे, बॉर्डर चित्रपटातही मुख्य पात्र असलेले अक्षय खन्ना आणि सुनील शेट्टी यांचा युद्धभूमीवर मृत्यू झाला असल्याचं दाखवण्यात आलं होता.

मात्र, वास्तवात, लुधियानाच्या घुडानी कलान गावात जन्मलेले धर्मवीर सिंग कर्नल पदावर पोहोचले आणि मे 2022 मध्ये त्यांचं निधन झालं.

कर्नल धर्मवीर सिंग यांनी 2017 मध्ये हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, "1997 मध्ये जेव्हा बॉर्डर प्रदर्शित होणार होता, तेव्हा दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांनी मला फोन करून सांगितलं होतं की, सेन्सॉर बोर्ड हा चित्रपट प्रदर्शित करत नाहीये कारण त्यात त्यांचं पात्र शहीद झालेलं दाखवण्यात आलेलं आहे."

"जे.पी. दत्ता म्हणाले की, मला फॅक्स करावा लागेल की याबाबत त्यांना कोणताही आक्षेप नाही. अनेकांनी मला कायदेशीर कारवाई करण्यासही सांगितलं. पण मी सर्वांना सांगितलं की हे सभ्य वर्तन ठरणार नाही."

त्याचप्रमाणे, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील निवृत्त बीएसएफ हिरो नाईक भैरोंसिंग राठोड यांची भूमिका सुनील शेट्टी यांनी बॉर्डरमध्ये साकारली होती आणि प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू 19 डिसेंबर 2022 रोजी झाला.

1972 मध्ये त्यांना लष्कर पदक देण्यात आलं.

राझी चित्रपटातील सहमत, जिला युद्ध नकोय...

युद्ध आणि हेरगिरीवर आधारित असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये शौर्य ही गोष्ट नेहमीच एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. भारत आणि पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' चित्रपटाला प्रशंसा आणि टीका दोन्हीला सामोरं जावं लागलं.

ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पंकज शुक्ला यांना असं वाटतं की, सिनेमा हा स्वतःची एक वेगळी कथा घेऊन येतो. ती कथा मानवतेला वाचवणारी असते.

मात्र, या विषयावर मतभेद आहेत. अनुराग अवस्थी यांनी भारतीय सैन्यात कर्नल म्हणून काम केलं आहे.

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते लिहितात की, "इक्किस हा चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या शौर्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांच्या अनावश्यक 'शांततावादी विवेकावर' अधिक केंद्रित आहे."

'राजी'मध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'राझी'मध्ये आलिया भट्टने मुख्य भूमिका साकारली होती.

तर दुसऱ्या बाजूला, ज्येष्ठ चित्रपट पत्रकार अजय ब्रह्मतेज म्हणतात की, "इक्किस ही केवळ अरुण खेत्रपाल यांच्या हौतात्म्याची कहाणी नाही, तर ती युद्धाच्या भयावहतेसह मानवतेचीही कहाणी आहे. ती क्षमाशीलतेची कहाणी आहे. शेवटी, ती युद्धाच्या विरोधात जाते."

जेव्हा युद्ध आणि हेरगिरीवर आधारित चित्रपटांचा विचार केला जातो, तेव्हा 'राझी' हा चित्रपटदेखील प्रकर्षाने आठवतो.

हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या एका वास्तविक जीवनातील भारतीय गुप्तहेर महिला एजंटवर आधारित कादंबरीवर बेतलेला होता.

या चित्रपटातील सहमत (आलिया भट्ट) पाकिस्तानामध्ये एका गुप्तहेर म्हणून राहते आणि एका पाकिस्तानी सैनिकाशी लग्न करते. आणि तिथून भारतासाठी हेरगिरी करतो.

चित्रपटात तिचं पात्र एका ठिकाणी म्हणतं की, देशापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही, अगदी मी स्वतःही महत्त्वाची नाही.

'इथे ना नात्यांची किंमत, ना एखाद्याच्या आयुष्याची. '

'राझी' चित्रपटामधील एका दृश्यामुळे अनेक प्रेक्षकांना अस्वस्थ वाटलं होतं.

ते दृश्य म्हणजे सहमत आपलं सर्वस्व गमावल्यानंतर एक प्रश्न उपस्थित करते, "तुमचं हे जग मला समजत नाही. इथे ना नात्यांची किंमत आहे, ना एखाद्याच्या आयुष्याची. मी पूर्णपणे तुमच्यासारखी होण्यापूर्वी, मला या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल. मला माझ्या घरी जायचं आहे."

अगदी याचप्रमाणे बॉर्डर हा चित्रपट देखील युद्धाबाबतची आणि सैनिकांची कथा असूनही, या सैनिकांच्या स्वप्नांना, बॅरेकमध्ये झालेल्या मैत्रीला आणि त्यांच्या मनात अपूर्ण राहिलेल्या सुप्त इच्छा आकांक्षांनाही जागा देताना दिसतो.

बॉर्डर

फोटो स्रोत, Getty Images

वाळवंटात जेव्हा दीर्घ प्रतीक्षेनंतर या सैनिकांना पत्र येतात, तेव्हा 'संदेसे आते हैं,' हे नऊ मिनिटांचं गाणं प्रत्येक सैनिकाच्या मनातली कथा सांगून जातं.

इथे बॉर्डरमधला एक सीन आठवतो. खरं तर हा सीन त्याच्या लांबीमुळे चित्रपटातून काढून टाकावा लागला होता.

सनी देओलने रणवीर इलाहाबादियासोबतच्या पॉडकास्टमध्ये सांगितलंय की, "युद्ध संपल्यानंतर, मी तिथे बांधलेल्या एका मंदिरात जातो. त्याच्या मागे युद्धात उद्ध्वस्त झालेला एक टँक असतो. मला तिथे मारले गेलेले सगळे सैनिक बसलेले दिसतात. मी त्यांना म्हणतो, तुम्ही सगळे सध्या ज्या जगात आहात तो स्वर्ग आहे, कारण तिथं कोणतंही युद्ध होत नाही."

अशा चित्रपटांबाबत सोशल मीडियावर वादविवाद सुरूच आहेत.

या चर्चेला सारांशरुपानं व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार पंकज शुक्ला म्हणतात की, "धुरंधर चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओजने केली होती आणि 'इक्किस'चे वितरणही जिओ स्टुडिओजनेच केलेले होते.

दोन्ही चित्रपटांचा नफा आणि तोटा हा एकाच कंपनीला गेलेला आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांची तुलना करून सोशल मीडियावर आपापसांत भांडू नका."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)