बोर्ड परीक्षा आणि CUET: दोन्ही परीक्षांची एकत्र तयारी कशी करावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रियंका झा,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच CUET चे नोंदणी फॉर्म भरणे सुरू झाले आहे. ही नोंदणी सुरू होताच सध्या 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीत मग्न असलेल्या विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे.
एकीकडे बोर्ड परीक्षेची तयारी करायची आहे, तर दुसरीकडे CUET चाही विचार करायचा आहे. अशा परिस्थितीत कशाचा अभ्यास करावा, कसा करावा आणि कशाला जास्त प्राधान्य द्यावे, असे प्रश्न सतावू शकतात. कारण बोर्ड परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढे नेणारी गोष्ट म्हणजे CUET.
दिल्लीत राहणारी लीना सध्या Pre-board म्हणजेच सराव परीक्षा देणार आहे. ती बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहे आणि त्याच वेळी CUET ची देखील तयारी करायची आहे.
आता प्रश्न असा आहे की CUET म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते आणि याच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांनी कोणती स्ट्रॅटेजी वापरावी जेणेकरुन त्यांना चांगला स्कोअर मिळेल आणि चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळेल.
'करिअर कनेक्ट' मालिकेच्या या भागात आपण लाखो विद्यार्थ्यांच्या अशाच काही समस्या समजून घेऊया आणि तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की या परीक्षेसाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असावी?
कॉलेज प्रवेशाचा मार्ग आहे CUET
देशभरातली वेगवेगळी केंद्रीय विद्यापीठं, राज्याची विद्यापीठं, खासगी आणि अभिमत युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश मिळवण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते, तिला CUET म्हणतात. 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' द्वारे (NTA) दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
देशातल्या 48 केंद्रीय विद्यापीठे, 36 राज्यांची विद्यापीठे, 26 अभिमत विद्यापीठे आणि 113 खासगी विद्यापीठांना CUET चा स्कोअर ग्राह्य धरला जातो.
या 223 विद्यापीठांशिवाय, 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, 'नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी' आणि 'राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी' सारख्या सात सरकारी संस्था सुद्धा याच परीक्षेच्या मार्कांनुसार प्रवेश देतात.
वयाची काही अट आहे का?
NTA ने प्रसिद्ध केलेल्या माहिती पत्रकानुसार CUET परीक्षा देण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा पास केली आहे, ते सर्वजण ही परीक्षा देऊ शकतात.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी परीक्षेसाठी वयाची अट नसली, तरी तुम्ही ज्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणार आहात, तिथे जर वयाचे काही नियम असतील, तर तुम्हाला ते पाळावे लागतील. म्हणजेच, ॲडमिशन घेताना त्या त्या कॉलेजच्या अटी लागू होतील.

फोटो स्रोत, Getty Images
CUET, JEE आणि CAT सारख्या परीक्षांची तयारी करून घेणारे शिक्षक अखिलेश सिंह सांगतात की, "तसं पाहायला गेलं तर या परीक्षेसाठी वयाची कोणतीही अट नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने बारावी नंतर 1 वर्षाचा गॅप घेतला असेल, तरीही तो ही परीक्षा देऊ शकतो. पण, जर कोणी बारावी मध्ये असतानाच याची तयारी केली, तर चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते. याचं कारण असं की, दरवर्षी या परीक्षेतली स्पर्धा वाढतच चालली आहे.
जे विद्यार्थी 3 विषयांसाठी रजिस्ट्रेशन करतील त्यांना 1,000 रुपये फी द्यावी लागेल. 3 विषयांनंतर अतिरिक्त विषय जोडल्यास प्रत्येक विषयासाठी 400-400 रुपये जास्त द्यावे लागेल. आरक्षित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम कमी आहे, ज्याची पूर्ण माहिती CUETच्या माहिती पुस्तिकेत दिली आहे.
सध्या एनटीएने म्हटले आहे की ही परीक्षा यावर्षी 11 ते 31 मे दरम्यान होऊ शकते. निकालाची तारीख अजून सांगितलेली नाही. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी आहे.
परीक्षेचा पॅटर्न काय आहे?
मागच्या वर्षी म्हणजेच CUET 2025 साठी देशभरातून एकूण 13 लाख 54 हजार 699 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते आणि त्यापैकी 10 लाख 71 हजार 735 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
हा पेपर 13 वेगवेगळ्या भाषांमध्ये झाला होता, ज्यामध्ये इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू या भाषांचा समावेश होता.
CUET ची रचना अशी आहे की ज्यामध्ये 3 सेक्शन असतात.
एज्युकेशन कंपनी IMS चे CUET प्रोग्राम डायरेक्टर जतिंदर वोहरा म्हणतात:
"पहिला सेक्शन लँग्वेज सेक्शन आहे, ज्यामध्ये 13 भाषा आहेत. यात इंग्लिश, हिंदी, गुजराती, पंजाबी, उर्दू, आसामी सारख्या भाषा आहेत. बहुतेक युनिव्हर्सिटीमध्ये भाषेचा पेपर अनिवार्य असतो. काही युनिव्हर्सिटी अशा आहेत जिथे याची गरज नसते, पण दिल्ली युनिव्हर्सिटी सारख्या टॉप सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये हे गरजेचं आहे. काही कोर्सेस आहेत, जसं की BA इंग्लिश ऑनर्स, त्यासाठी इंग्लिश घेणं गरजेचं आहे पण साधारणपणे बहुतेक कोर्सेसमध्ये स्टुडंट्स या 13 पैकी कोणतीही भाषा निवडू शकतात.
दुसऱ्या सेक्शनमध्ये डोमेन सब्जेक्ट्स असतात. यामध्ये जे विषय विद्यार्थी बारावी मध्ये शिकत आहेत, ते विषय घेऊ शकतात, जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, इकॉनॉमिक्स, अकाउंटन्सी वगैरे.
तिसऱ्या सेक्शनमध्ये GAT म्हणजेच जनरल ॲप्टिट्यूड टेस्ट येते. हा जनरल नॉलेज, रिझनिंग आणि गणिताशी संबंधित पेपर आहे. पण हा पेपर अनिवार्य नाही. मात्र, राज्य विद्यापीठांचे पात्रतेचे निकष पूर्ण करण्यासाठी किंवा आपला स्कोअर अधिक सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना हा पेपर देण्याचा सल्ला दिला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
विद्यार्थ्यांना हे सर्व म्हणजेच 37 पेपर द्यावे लागत नाहीत. NTA सांगते की, एखादा विद्यार्थी लँग्वेज आणि GAT मिळून जास्तीत जास्त 5 पेपर देऊ शकतो.
पण हे पेपर नेमके कसे द्यायचे, हे त्या युनिव्हर्सिटीच्या कोर्सवर अवलंबून असते.
जतिंदर वोहरा हे समजावून सांगताना म्हणतात, "दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये बीकॉम ऑनर्स खूप लोकप्रिय आहे. जर एखाद्याला यात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याला एक भाषा घ्यावी लागेल, गणित किंवा अकाउंटन्सीपैकी एक पेपर द्यावा लागेल आणि इतर दोन डोमेन विषय द्यावे लागतील. पण कदाचित बनारस युनिव्हर्सिटीसाठी काही वेगळे पेपर द्यावे लागू शकतात, जे तिथल्या कोर्सनुसार असतील.
अखिलेश सिंह डोमेन कोर्स निवडताना काळजी घेण्याचा सल्ला देतात. डोमेन सब्जेक्ट म्हणजे ते विषय जे स्टुडंट बारावी मध्ये निवडतात. जसं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, अकाउंटन्सी, हिस्ट्री, बायोलॉजी वगैरे.
त्यांचे म्हणणे आहे की, "डोमेन पेपर तेच असायला हवेत, जे विद्यार्थ्याने बारावीमध्ये शिकण्यासाठी निवडले होते. जर कोणी यापेक्षा वेगळे विषय निवडले, तर CUET मध्ये प्राधान्य त्यांनाच मिळते ज्यांनी तो विषय निवडला होता. न शिकणाऱ्यांचेही काही मार्क्स कापले जातात आणि मग त्यानुसार कटऑफ बनतो.
प्रत्येक विषयात 50-50 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 5 नंबर मिळतील आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 नंबर कापला जाईल. तसेच, प्रश्न सोडला तर काहीही मिळणार नाही आणि मार्क्स सुद्धा कापले जाणार नाहीत. एकूण 5 पेपर असतात, त्यामुळे 250 मार्क्सचा पेपर होतो. प्रत्येक विषयाचा पेपर सोडवण्यासाठी 60 मिनिटे मिळतात.
काय असतो सिलॅबस?
लीना सीबीएसई बोर्डात शिकत आहे, त्यामुळे सीयूईटीमध्ये एनसीईआरटीशी संबंधित प्रश्न विचारले जातील की नाही, याची तिला काळजी नाही.
अखिलेश सिंह सांगतात की, एनटीएने हे आधीच स्पष्ट केले आहे की सीयूईटीचा अभ्यासक्रम बारावीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांवर आधारित असेल.
अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांचे काय जे सीबीएसई ऐवजी दुसऱ्या कोणत्याही बोर्डातून बारावी करत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
अखिलेश सिंह म्हणतात, "एनसीईआरटीचा स्वतःचा अभ्यासक्रम खूप सविस्तर असतो. अनेकदा स्टेट बोर्ड एनसीईआरटीकडून अभ्यासक्रम घेतात, पण काही विषयांमध्ये थोडा बदलही असतो. एनटीएने आधीच हे सांगितले आहे की आमचा पूर्ण पेपर एनसीईआरटीच्या आधारावरच असेल. त्यामुळे विद्यार्थी स्टेट बोर्डाचा असो किंवा सीबीएसईचा, त्याला हाच सल्ला दिला जातो की त्याने डोमेन सब्जेक्टचा नीट अभ्यास केलेला हवा."
तर, जतिंदर वोहरा यांच्या मते डोमेन पेपरमध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम 90-95% एनसीईआरटीशी मिळताजुळता असतो.
सीयूईटीचा निकाल पर्सेंटाईलमध्ये येतो. मात्र, हे पर्सेंटाईल ठरवण्यामागे वेगवेगळे फॅक्टर्स असतात.
अखिलेश सिंह म्हणतात, "हा एक कंपॅरेटिव्ह स्कोअर असतो. समजा एखाद्या मुलाला एखाद्या विषयात 90 पर्सेंटाईल मिळाले आहेत, तर तो पेपर संपूर्ण भारतात जितक्या मुलांनी दिला, त्यापैकी 90 टक्के मुले त्याच्या मागे आहेत. म्हणजेच 90 पर्सेंटाईल मिळवणारा मुलगा टॉप 10 पर्सेंटाईलमध्ये आहे."
कोणत्या गोष्टींची घ्यायची काळजी?
लीनाची इच्छा आहे की तिने सायकॉलॉजी ऑनर्स शिकावे आणि तेही दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सर्वोत्तम कॉलेजमधून.
ती सांगते, "मी 2 महिन्यांपूर्वी CUET ची तयारी करायला सुरुवात केली होती. पण सध्या माझे पूर्ण लक्ष बोर्ड परीक्षेवर आहे. मी टाईम मॅनेजमेंटने ही अडचण थोडी कमी केली आहे. जसं की मी वीकडेमध्ये (सोमवार ते शुक्रवार) फक्त बोर्डाच्या विषयांचा अभ्यास करते. वीकेंडला (शनिवार-रविवार) CUET ची तयारी करते. मी रिझनिंग आणि बेसिक मॅथ्सवर फोकस करत आहे, जेणेकरून चांगला स्कोअर मिळेल."
ती पुढे म्हणाली, "हा समतोल राखण्यासाठी एक शेड्युल बनवा की किती वेळ CUET ला द्यायचा आहे आणि किती वेळ बोर्डाला. जी काही स्ट्रॅटेजी बनवाल, मग त्यानुसारच पुढे चला."
तर अखिलेश सिंह यांचे म्हणणे आहे जर कोचिंगचा पर्याय उपलब्ध नसेल तरी सराव चांगला करुन स्कोअर मिळवता येऊ शकतो.
चांगला स्कोअर मिळवण्यासाठी या टिप्स विद्यार्थ्यांना कामी पडू शकतील.
- एनसीईआरटीचा सिलॅबस लक्षपूर्वक वाचा. याचा इतका सराव करा की मनात कोणतीही शंका राहणार नाही.
- नियमितपणे मॉक टेस्ट देत राहा.
- मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सतत सराव करा.
- टाईम मॅनेजमेंट शिकणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण बोर्डाची परीक्षा 3 तासांची असते आणि CUET फक्त 1 तासाची.
जतिंदर वोहरा म्हणतात की, विद्यार्थ्यांना जी कोणती भाषा घ्यायची आहे किंवा त्यांनी घेतली आहे, त्यामध्ये वाचनाची सवय असायला हवी. सोबतच, डोमेन विषयांसाठी तुम्हाला सर्वात आधी बारावीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकांना फॉलो करायचे आहे आणि आपल्या बोर्डाची तयारी सुद्धा मनापासून करायची आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











