दोन मिनिटांत झोप येऊ शकते का? 'मिलिट्री स्लिप मेथड' काय आहे? तिचा उपयोग होतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, केट बॉवी
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
काही लोकांना झोप येण्यासाठी फार वाट पाहावी लागते तर काही लोकांना झोपच येत नाही. जगातल्या लाखो लोकांना ही समस्या भेडसावतेय.
लवकर झोप यावी यासाठी प्रत्येकजण अक्षरशः झगडतोय. जवळपास पाच ते पन्नास टक्के लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो असं काही अभ्यासांमधून दिसून आलं आहे.
काही लोक रात्ररात्र या कुशीवरुन त्या कुशीवर वळत राहातात. पण त्यांना झोप येत नाही. मग झोप यावी यासाठी काही पद्धती आहेत का यावर अभ्यास केला जातो. तसे काही उपाय सुचवले जातात. पण सध्या मिलिट्री स्लिप मेथड या पद्धतीची चर्चा जोरात सुरू आहे.
टिकटॉकसह अनेक समाज माध्यमांत ही पद्धती व्हायरल झाली असून तिच्या व्हीडिओना लाखो व्ह्यूज येत आहेत.
ही पद्धत वापरली तर दोन मिनिटांत झोप लागेल असा दावा केला जातोय.
परंतु बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी बोलताना तज्ज्ञांनी या प्रकारामुळे झोपण्याच्या क्षमतेचं नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली आहे. कारण यामुळे अवाजवी अपेक्षा तयार होतात.
सामान्य लोक प्रयत्न करू शकतील अशा सैनिकांच्या खऱ्या स्लिपिंग टिप्सबद्दलही तज्ज्ञांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला माहिती दिली.
मिलिट्री स्लिप मेथड काय आहे?
अमेरिकेतील 'ट्रॅक अँड फिल्ड कोच' लॉयड बड विंटर यांनी 1981 साली आपल्या 'रॉलेक्स अँड विन' या पुस्तकात या पद्धतीची माहिती दिली होती.
दुसऱ्या महायुद्धाच्यावेळेस विंटर यांनी 'अमेरिकन नेव्ही पायलट ट्रेनिंग स्कूल'च्या विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती विकसित केली होती. चांगली झोप मिळावी आणि योग्य कामगिरी करता यावी यासाठी या पद्धतीचा विकास करण्यात आला होता.
6 आठवडे ही पद्धती वापरली तर पायलट कोणत्याही वेळेस, कोणत्याही स्थितीत 2 मिनिटांत झोपू शकतो, असं विंटर म्हणाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
त्यासाठी त्यांनी काही क्रमही सांगितला होता.
- सुरुवातीला डोकं, चेहरा, जबडा याना एकेक करुन शिथिल करा. त्याचवेळेस अगदी खोल श्वास घ्या.
- खांद्याना सैल सोडत खोल श्वास घ्या आणि तो अगदी हळूहळू सोडा
- पूर्ण हाताला बिछान्यावर शिथिल करा. त्याची सुरुवात दंडापासून कोपरापर्यंत मग मनगट आणि शेवटी हाथ अशी करा. दुसऱ्या हातालाही असंच शिथिल करा.
- मग पायाचे स्नायू सैल करा. मांड्यांपासून पायाच्या कोपरापर्यंत स्नायू शिथिल करा. असंच दुसऱ्या पायाचं करा.
- आता डोकं शांत ठेवा. कोणत्याही विषयावर विचार करू नका. एखादं शांत चित्र मनात आणा. जसं की स्तब्ध तळं, वसंत ऋतूतला एखादा दिवस असं चित्र डोळ्यासमोर आणा.
- गरज पडलीच तर 'विचार करू नकोस' हे वाक्य मनातच म्हणा. कमीत कमी 10 सेकंद तरी दुसरा विचार येण्यापासून स्वतःला थांबवा
तज्ज्ञ म्हणतात, दोन मिनिटांत झोपणं अशक्य
इतक्या लवकर झोप येण्याची अपेक्षा करणं म्हणजे झोप येण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासारखं आहे असं काही तज्ज्ञांचं मत आहे.
मिलिट्री न्यूरोसायंटिस्ट आणि निद्रातज्ज्ञ डॉ. ॲलिसन ब्रॅगर सांगतात, "दोन मिनिटांत झोप येण्याचा दावा करणं एक 'धोकादायक' गोष्ट आहे."
"सामान्यतः झोप येण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला सरासरी पाच ते 20 मिनिटं लागतात. त्यामुळे फक्त दोन मिनिटांत झोप येण्याचा आग्रही प्रयत्न केल्यास चिडचिड होऊ शकते आणि निद्रानाशही ओढावू शकतो."
ब्रॅगर सांगतात, "दोन मिनिटांत झोपी जाणं खरंच अशक्य आहे. तात्काळ झोप येण्याच्या या प्रयत्नात निराश व्हाल. तरीही एखाद्याला दोन मिनिटांत झोप आली तर ती व्यक्ती गेल्या काही दिवसांत झोपलेली नाही किंवा तिला एखादा निद्राविकार असू शकतो."
ब्रॅगर सांगतात, "काही सैनिक याचा वापर करत असल्याचं त्यांना माहिती आहे. पण सैनिकांचं काम अतिशय थकवणारं असतं त्यामुळे ते काही मिनिटांत झोपी जातात, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही."
लवकर झोप यावी यासाठी काय करावं?
'युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल'च्या 'स्लिप क्लिनिक'चे मुख्य डॉक्टर ह्युग सेल्सिक याबद्दल अधिक माहिती देतात. ते सांगतात, निद्रानाश झालेल्या लोकांना ही मिलिट्री पद्धती वापरली तर त्यांना आणखीच अपयश येईल.
ते म्हणतात, "याबद्दल जे रुग्ण माझ्याकडं येऊन सांगतात, त्यातल्या बहुतांश लोकांच्याबाबतीत त्याचा उपयोग झालेला नसतो. झाला असता तर ते माझ्याकडे आलेच नसते."

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "जर दीर्घकाळ निद्राविकार असेल तर चांगल्या झोपेला सर्वोत्तम गोष्ट समजण्याची चूक होऊ शकते. जर तुम्हाला दिवसभर तुम्ही तुमची काम चपळाईनं करत असाल आणि ताजंतवानं वाटत असेल तर तुम्हाला मिळत असलेली झोप तिचं काम निट करतेय."
साधारणतः आठ तास झोपणं आवश्यक मानलं जातं. पण डॉक्टर सेल्सिक यांच्यामते आठ तास झोपण्याची कल्पना एक मिथक आहे आणि त्यामुळे तोटाही होऊ शकतो.
आजवर यावर भरपूर जणांनी अभ्यास केला आहे. त्यातून प्रत्येक माणसाला लागणाऱ्या झोपेचा कालावधी वेगवेगळा असतो असं समजलंय.
डॉ. सेल्सिक सांगतात, "चपलेचा आकार सरासरी सहा असू शकतो. मात्र काही लोकांना आठ नंबरची चप्पल लागते, काहींना चार नंबरही चालते. त्याचप्रमाणे काही जणांना सात-आठ तासांपेक्षा जास्त झोप लागते. काहींना कमी. तुम्ही तुमच्या गरजेनुसार झोपलं पाहिजे."
तरिही लवकर झोप यावी असं वाटत असेल तर डॉ. सेल्सिक त्यासाठी तीन सल्ले देतात
- सकाळी झोपेतून उठण्याची वेळ एकच असावी. त्यामुळे झोपेतून जागं होण्याची वेळ निश्चित होते आणि त्यामुळे रात्री झोपण्याची वेळही निश्चित होईल.
- दिवसा झोपू नका, त्यामुळे रात्री झोप कमी येते.
- झोप आल्याशिवाय अंथरुणावर पडू नका. झोपेसाठी शरीर तयार नसेल तर तुम्ही दीर्घकाळ पडूनच राहाल. त्यामुळे संध्याकाळी बसून राहा. थोडावेळ या संधीकाळाच आनंद घ्या. डोळे मिटायला लागले की अंथरुणावर पडा.
सैनिकांच्या निद्रापद्धतीमधून आपण काय शिकू शकतो?
ब्रिटिश आर्मीचे निद्रातज्ज्ञ डॉ. ॲलेक्स रॉक्लिफ मिलिट्री स्लिप मेथड वर आक्षेप घेतात. ते म्हणतात, "या तंत्रातील मानसिक किंवा शारीरिक प्रक्रियेत मिलिट्रीशी संबंधित असं काही खास नाही,"
अर्थात ही पद्धत पूर्णपणे चुकीची नाही. कारण स्नायू शिथिल करणं, श्वसनाचे तंत्र आजही सैनिकांना शिकवलं जातं.
लष्करात असताना एकाच खोलीत 12 लोकांनी झोपणं कठीण असतं. सैनिकांच्या डोळ्यांवर मास्क असतो. कानात प्लग घातलेले असतात आणि कोलाहल असा जवळपास नसतोच.

फोटो स्रोत, Getty Images
सैनिक वापरत असलेल्या तंत्राचा उपयोग कठीण काळात काही लोकांना होऊ शकतो.
अतिशय तणावपूर्ण ड्युटीवर असलेल्या सैनिकांना रात्री चांगली झोप मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे वेळ मिळेल तेव्हा टेक्निकल नॅप घ्या असं सुचवलं जातं.
सामान्य माणसांना सैनिकांकडून एक गोष्ट मात्र नक्कीच शिकण्यासारखी आहे असं ब्रॅगर यांना वाटतं. झोपेचं चांगलं वेळापत्रक तयार झालं की मेंदूला आता आराम करण्याची वेळ झाली आहे असा संकेत मिळतो आणि त्यामुळे झोप लवकर येते.
नित्यक्रम तयार करणं आणि व्यत्यय कमी करण्यासाठी लष्करात शिस्तीचं अतिशय महत्त्वाचं योगदान असतं.
रात्री एकाचवेळेस अंथरुणावर पडणं, फोन बंद करणं, पुस्तक वाचणं आणि डोळे मिटायला लागले की दिवे मालवणं अशी सुरुवात तुम्ही करू शकता.
डॉ. ब्रॅगर सांगतात, "या सवयीला आपलं शरीर लवकर आत्मसात करतं. असं रोज केलं तर झोपण्यात कोणताही अडथळा येणार नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











