डोपामाइन म्हणजे नक्की काय? मेंदूला 'हाय' वाटतंय, पण पुरेसं 'न्हाय'ही का वाटतं?

डोपामाइनबाबतचा मोठा गैरसमज: मेंदू आपल्याला कसा फसवतो?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, निकोले कुकुश्किन

डोपामाइनला अनेकदा 'आनंद देणारं रसायन' (प्लेजर केमिकल) असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात डोपामाइनबाबत बरेच गैरसमज आहेत. आपल्या मेंदूत हे रसायन म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर नेमकं काय काम करतं, याची खरी भूमिका काय आहे, याचा निकोले कुकुश्किन यांनी शोध घेतला आहे.

आपला मेंदू खूप उपयुक्त आणि महत्त्वाचा अवयव आहे. पण सध्या आपलं आणि आपल्या मेंदूचं नातं कुठेतरी बिघडल्यासारखं दिसतं.

माणूस म्हणून आपण अनेकदा स्वतःशीच युद्ध करतोय असं वाटतं. जी गोष्ट मिळू शकत नाही तीच आपल्याला हवी असते, आणि जी हवी असायला पाहिजे ती नकोशी वाटते.

वाईट सवयी लवकर जडतात, पण चांगल्या गोष्टींतला रस कमी होत जातो. आपण सतत विचार करत राहतो, एखाद्या गोष्टीत अडकतो, पटकन चिडतो आणि नंतर पश्चात्ताप करतो. जणू आपण आपल्या आयुष्याच्या अधिक चांगल्या, अधिक पूर्ण आणि नैसर्गिक रूपापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते कधीच पोहोचू शकत नाही.

आपण स्वतःच्या मेंदूसोबत इतके विस्कळीत म्हणजे चुकीचे का वागतो? यामागे एक खास पण अनेकदा चुकीच्या अर्थाने समजलं जाणारं रसायन (न्यूरोट्रान्समीटर) कारणीभूत आहे, डोपामाइन. आणखी हवं, अजून मिळवायचं,अशी ओढ आपल्यात निर्माण करण्याचं मुख्य काम डोपामाइन करतं.

डोपामाइन

फोटो स्रोत, Serenity Strull

आपण अनेकदा असं मानतो की, आजचं आधुनिक आयुष्य हे नैसर्गिक नाही, आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांना मिळालेला साधा, नैसर्गिक आनंद आपल्याला मिळत नाही. गुहेतील मानवांकडे फ्रेंच फ्राइज नव्हते, म्हणून त्यांना लठ्ठपणाची चिंता नव्हती, किंवा जबरदस्तीने जिमला जाण्याची गरजही पडत नव्हती.

ते आनंदाने जंगलात फिरत, कंदमुळे-फळं गोळा करत आणि भरपूर तंतूमय अन्न खात आपला दिवस घालवत. त्यांच्याकडे पैसा नव्हता, नोकरी नव्हती, लग्नसंस्था, धर्म किंवा अमली पदार्थही नव्हते. त्यामुळे असमानता, हिंसा, मत्सर, समाजातील वर्गवारी किंवा व्यसनं अशी संकटंही नव्हती.

जेव्हा आपण जंगलामधील साधं शिकारी जीवन सोडलं आणि शेती व संस्कृतीकडे गेलो, तेव्हापासूनच आपलं आयुष्य आपल्या शरीर-मेंदूच्या नैसर्गिक गरजांपासून दूर गेलं, असं आपल्याला वाटतं.

पण प्रत्यक्षात ही निष्काळजी, सुखी भूतकाळाचं चित्र खरं नाही. आपल्या शिकारी पूर्वजांच्या मानसशास्त्राबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही, पण एक गोष्ट नक्की सांगता येते, तेही आपल्यासारखेच चिडखोर आणि अस्वस्थ होते.

डोपामाइन

फोटो स्रोत, Getty Images

आयुष्याबद्दलची ही असमाधानी असण्याची भावना नवीन नाही. उलट, ती मुद्दाम तयार झालेली आहे, आणि ती रचना मानवी संस्कृतीपेक्षाही खूप जुनी आहे, इतकी जुनी की माणसाच्या प्रजातीपेक्षाही खोल आहे.

हीच रचना आपल्याला कायम अस्वस्थ ठेवते. ती आपल्याला सतत डिवचत राहते, उत्तेजित करते. जणू एखाद्या अतिप्राचीन, चेतनावादी भूतकाळातून येणारा आवाज कानात कुजबुजतोय की... तुझ्याकडे जे आहे, त्यापेक्षा आयुष्यात अजून काहीतरी अधिक आहे.

आपल्याकडे जे काही आहे त्यावर आपण समाधानी नसतो. आपल्याला नेहमी अधिक काहीतरी हवं असतं.

हे समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूच्या दोन भागांकडे पाहावं लागेल - मेंदूचा बाह्य भाग (सेरेब्रल कॉर्टेक्स) आणि बक्षीस प्रणाली म्हणजेच रिवॉर्ड सिस्टिम (ज्यामध्ये डोपामाइनही येतं), जे आपल्याला वेगवेगळ्या दिशांकडे नेतात.

डोपामाइन नसेल तर मेंदू कसा वागेल?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे आपला मेंदू समजून घेण्याची यंत्रणा. तो आपल्यासाठी जगाचं एक मॉडेल तयार करतो आणि मग त्याला बाह्य जगाशी जुळवण्याचा प्रयत्न करतो किंवा बाह्य जगाला आपल्या कल्पनेशी जुळवतो. त्याला नेमकी खरी माहिती नको असते, तर फक्त आपल्याला हवा असणाऱ्या गोष्टींसोबत वास्तव जुळवणं महत्त्वाचं असतं, तेही कोणत्याही परिस्थितीत.

सेरेब्रल कॉर्टेक्स जेव्हा आपल्या विचारांशी सगळं जुळवण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्याला कधी कधी अडचण येते, याला 'डार्क रूम प्रॉब्लेम' म्हणतात. म्हणजे, तो विचार करतो की, जर अंधाऱ्या खोलीत बसलो आणि बाहेर काहीही दिसलं नाही, ऐकू आलं नाही, तर काहीही समजून घ्यायचं किंवा बदलायचं नाही.

स्पष्ट आहे, मेंदूचा हा भाग अपूर्ण आहे. काहीतरी असायला हवं जे कॉर्टेक्सला अंधाऱ्या खोलीत बसून न राहता, बाहेरच्या जगात नवनवीन गोष्टी, आश्चर्य, उद्दिष्टे आणि यश शोधण्यासाठी पुढे ढकलेल.

आणि खरंच, मेंदूत असा दुसरा भाग आहे ज्याचं काम फक्त हे ढकलणं म्हणजे पुश करणं आहे. याला बक्षीस प्रणाली (रिवॉर्ड सिस्टिम) म्हणतात, आणि डोपामाइन हे त्याचं मुख्य साधन आहे, जे आपले निर्णय आणि प्रेरणा मार्गदर्शन करण्यासाठी वापरतं. डोपामाइन हेच आपल्याला पुढे ढकलत राहतं, कधी चांगल्या तर कधी भयानक पद्धतीने.

हे समजून घेण्यासाठी, डोपामाइन नसेल तर काय होतं ते पाहणं उपयुक्त ठरेल.

1915 ते 1926 या काळात एन्सेफलायटिस लेथर्जिका नावाचा एक रहस्यमय रोग जगभर पसरला.

हा रोग बहुधा सामान्य घशातील संसर्गामुळे झाला होता, ज्यामुळे काही रुग्णांमध्ये त्यांच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीने मेंदूवर हल्ला केला. यामुळे लोक जड आळशीपणा किंवा टॉर्पोर होत - पूर्ण कोमाच्या अवस्थेत नाही, पण बाहेरून ते जणू जाणीव नसल्यासारखे होते.

आपण जे काही करतो, ते फक्त मूलभूत प्रतिसादांशिवाय - जसं की जेवताना अन्न चावणं, त्यामागे डोपामाइनची प्रेरणा असते. (Credit: Serenity Strull)

फोटो स्रोत, Serenity Strull

फोटो कॅप्शन, आपण जे काही करतो, ते फक्त मूलभूत प्रतिसादांशिवाय - जसं की जेवताना अन्न चावणं, त्यामागे डोपामाइनची प्रेरणा असते.

काही रुग्ण कधी कधी एक-दोन शब्द बोलायचे; काही जण जर त्यांच्याकडे चेंडू फेकला तर पकडायचे; अन्न तोंडात ठेवलं तर चावायचे, पण स्वतःहून कधीच अन्न घेऊन खाण्याचा प्रयत्न करत नव्हते. आज आपल्याला समजतं की, हा रोग मेंदूत सबस्टँशिया निग्रा नावाच्या भागाला प्रभावित करायचा, म्हणजे मेंदूतला एक असा भाग जो डोपामाइन तयार करतो.

एका रुग्णाची गोष्ट अशी आहे, ती एक तरुण, श्रीमंत महिला होती, नंतर रोझ आर या नावानं ती ओळखली गेली. 1926 मध्ये ती झोपली आणि तिने एका अभेद्य किल्ल्यामध्ये बंदिस्त असल्याचं दुःस्वप्न पाहिलं. हे दुःस्वप्न 43 वर्षे अखंड सुरू राहिलं.

1969 मध्ये, युवा न्यूरॉलॉजिस्ट ऑलिव्हर सॅक्सला न्यूयॉर्कमधील माउंट कार्मेल हॉस्पिटलमध्ये सुमारे 80 एन्सेफलायटिस लेथर्जिका (सुस्तपणा) रुग्णांची जबाबदारी देण्यात आली, ज्यात रोझ आर देखील होती.

त्याला लक्षात आलं की, काही रुग्णांची लक्षणं पार्किन्सन्स रोगाच्या तीव्र रूपासारखी आहेत. त्यामुळे त्याने त्यांना एल-डोपा नावाचं नवीन औषध द्यायचा निर्णय घेतला. औषध सुरु केल्याच्या काही दिवसांत, रोझ आर आणि इतर रुग्ण जागे झाले, उभे राहिले, फिरायला लागले आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी संभाषण सुरू केले, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

सॅक्ससाठी आश्चर्य म्हणजे, रुग्णांचं जागं राहणं जास्त काळ टिकले नाही. रोझसाठी ते फक्त सुमारे एक महिना चालले. काही रुग्ण थोडा जास्त काळ व्यवस्थित राहिले, पण शेवटी त्यांचीही अवस्था हळूहळू बिघडली. शेवटी 1979 मध्ये, म्हणजे आणखी दहा वर्षांनी, रोझला अन्न गिळताना अडथळा आला आणि तिचं दुःस्वप्न संपलं.

डोपामाइन

फोटो स्रोत, Getty Images / ma_rish

एल-डोपा हे औषध सॅक्सने रोझ आरला काही काळ दैनंदिन जीवनात परत आणण्यासाठी वापरले, ते डोपामाइन तयार होण्यापूर्वीचं रसायन आहे. सॅक्सला तेव्हा याचा नेमका प्रभाव समजला नाही, पण नंतरच्या संशोधनानुसार आपण अंदाज लावू शकतो की रोझ आरच्या मेंदूमध्ये काय घडत होतं. तिच्या सबस्टँशिया निग्रा नावाच्या डोपामाइन तयार करणाऱ्या भागातील बहुतांश पेशी मृत होत्या, पण काही न्यूरॉन्स अजूनही जिवंत होते.

उरलेले काही न्यूरॉन्स एल-डोपाला प्रत्यक्ष डोपामाइनमध्ये रूपांतरित करण्यास सक्षम होते. डोपामाइनची वर्षानुवर्षे कमतरता सहन केलेल्या रोझच्या मेंदूने, अगदी लहानशी मात्रा मिळताच जोरदार प्रतिक्रिया दिली.

म्हणजेच ती तात्पुरती जागरूक झाली. पण नंतर मेंदूने स्वतःला पुन्हा रिकॅलिब्रेट म्हणजे जुळवून घेतलं आणि ही छोटी डोपामाइनची मात्रा सामान्य आयुष्याला पुरेशी ठरली नाही.

सरळ सांगायचं तर, एन्सेफलायटिस लेथर्जिका आपल्याला दाखवतं की, जेव्हा मेंदूतील डोपामाइन संपतं, तेव्हा मेंदू थांबतो. मेंदूतून डोपामाइन काढल्याने त्याला फक्त अर्धांगवायू होत नाही. म्हणजे ते फक्त थांबत नाही, तर काहीही करत नाही.

त्याऐवजी मेंदू अंधाऱ्या खोलीत बसल्यासारखा होतो, काहीही करायची किंवा अनुभवायची इच्छा नसते. जे काही आपण मूलभूत प्रतिसादांशिवाय करतो, जसं की अन्न तोंडात ठेवलं की चावणं, त्यामागे डोपामाइनची प्रेरणा असते.

जर डोपामाइन आपल्याला सतत मिळालं नसतं, तर आपण सगळे अंधाऱ्या खोलीतच बसून राहिलो असतो. पण डोपामाइनमुळे आपल्याला सतत काहीतरी करत राहायची इच्छा होते. आपले प्रत्येक जागे असलेले क्षण आपण क्रियाशीलपणे घालवतो, हे सगळं डोपामाइनमुळे आहे.

म्हणजे आपण रोज स्वतःशीच झगडत राहतो, आणि नेहमी चुकीच्या गोष्टी करायची इच्छा का वाटते, याची जबाबदारी डोपामाइनची आहे का? जर हे आपल्याला प्रेरणा देण्यासाठी आहे, पण मग हे इतकं वाईट काम का करतं?

याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला डोपामाइन खरंच नेमकं काय करतं, हे पाहावं लागेल.

डोपामाइन म्हणजे फक्त 'आनंदाचं रसायन' नाही'

काही लोक डोपामाइनला फक्त 'आनंद देणारं रसायन' समजतात. पण ही कल्पना चुकीची आहे.

समस्या अशी आहे की, डोपामाइन प्रत्यक्षात आनंद देत नाही. जर तुमचा एखादा मित्र ॲडरल घेत असेल (एडीएचडीच्या उपचारासाठी वापरणारं औषध जे डोपामाइन तयार करणाऱ्या न्यूरॉन्समधून डोपामाइन बाहेर काढतं), तर तो सांगेल की औषध त्याला जास्त लक्ष केंद्रित करायला, जास्त कामात व्यस्त राहायला मदत करतं, पण त्याला अतिशय आनंदी किंवा उत्साही वाटत नाही.

उंदरांवर केलेल्या अभ्यासातही हेच दिसून आलं आहे. अ‍ॅम्फेटामाइन (ॲडरलसारखं औषध) दिलं की उंदीर बक्षीस मिळवण्यासाठी जास्त कष्ट करतात, पण त्यांना खरंच आनंद किंवा मजा जास्त वाटत नाही, हे त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावरून आणि पायांच्या हालचालींमधून दिसून येतं.

थोडं अधिक सुसंगत सांगायचं तर, डोपामाइन म्हणजे 'हे जास्त कर' असं सांगणारं रसायन आहे. आनंद देण्याबद्दल नाही, तर स्मरणशक्तीशी संबंधित आहे. हे मेंदूला लक्षात ठेवायला मदत करतं की, कोणत्या कामांमुळे यश मिळालं.

जिथे जिथे डोपामाइन सोडलं जातं, तिथे आठवणी चांगल्या राहतात, जणू डोपामाइन मेंदूला सांगत असतं: "पुढच्या वेळी हीच गोष्ट पुन्हा कर". याचं सर्वात स्पष्ट उदाहरण म्हणजे कौशल्य शिकणे, जे बेसल गँग्लिया नावाच्या मेंदूच्या भागात घडतं.

उदाहरणार्थ, जर कोणी डान्स म्हणजे नृत्य शिकत असेल, तर डोपामाइन यशस्वी डान्सरच्या हालचाली निवडून त्यांना आठवणीत ठेवतं. त्या हालचाली आता एकत्र जुळतात, जणू बेसल गँग्लियामधून एकदम सुरू (ट्रिगर) करता येतात, आणि मेंदूच्या कॉर्टेक्सला प्रत्येक हालचाल विचारायची गरज पडत नाही.

कुशल डान्सर फक्त गाण्याचा योग्य क्षण ओळखतो आणि त्याच्या हालचाली आपोआप सुरू होतात, विचार न करता. याला आपण 'मसल मेमरी' म्हणतो. प्रत्यक्षात ही बेसल गँग्लियामध्ये डोपामाइनच्या मदतीने तयार झालेली आठवण आहे, जी हळूहळू हालचाली अधिक नीट आणि यशस्वी बनवते.

'हे पुन्हा कर' हे डोपामाइनचं लॉजिक सेरेबल कॉर्टेक्ससह मेंदूच्या इतर भागांनाही लागू होतं. काहीतरी यश मिळाल्यावर डोपामाइन सोडलं जातं; जे न्यूरॉन्स आणि त्यांचे संबंध यशाकडे नेतात, ते मजबूत होतात. त्यामुळे पुढच्या वेळी आपण तेच विचार, तेच मार्ग, तेच वागणं पुन्हा पुन्हा वापरतो.

कॉर्टेक्समध्ये याचा अर्थ असा होतो की, फक्त कृती करणाऱ्या पेशींनाच (न्यूरॉन्स) नाही, तर त्या कृतीबद्दल विचार करणाऱ्या पेशींनाही मेंदू पुन्हा पुन्हा वापरतो. म्हणजेच, जे विचार आपल्याला उपयोगी वाटतात, त्या आपण पुन्हा पुन्हा करायला लागतो.

उंदरांवर केलेल्या अभ्यासानुसार, डोपामाइन फक्त बक्षीस मिळाल्यावर नाही तर आश्चर्य किंवा अनपेक्षित गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देतं. (Credit: Serenity Strull)

फोटो स्रोत, Serenity Strull

फोटो कॅप्शन, उंदरांवर केलेल्या अभ्यासानुसार, डोपामाइन फक्त बक्षीस मिळाल्यावर नाही तर आश्चर्य किंवा अनपेक्षित गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देतं.

उदाहरणार्थ, एखाद्या समस्येवर अचानक उपाय सुचला, तर मेंदूत डोपामाइनचा एक धक्का बसेल. त्या विचारात सहभागी असलेल्या मेंदूच्या पेशी आणि त्यांचे संबंध अधिक घट्ट होतात.

पुढच्या वेळी तो विचार किंवा उपाय सहज आठवेल. तसंच, एखाद्या गाण्याची ओळ मनाला लागली, तर डोपामाइन वाढतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीही तेच गाणं डोक्यात घोळत राहतं.

या स्पष्टीकरणानुसार, डोपामाइन आपल्याला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य कृती आणि विचार निवडायला मदत करतं. ध्येय साध्य झालं की ते मेंदूला सांगतं, 'हेच पुन्हा कर.'

पण यात एक वेगळाच मुद्दा आहे. प्रत्येक यशामुळे डोपामाइन वाढत नाही. जिथे यश अनपेक्षित असतं, तिथेच डोपामाइनचा जोरदार झटका बसतो किंवा स्फोट होतो.

माकडं आणि उंदरांवरच्या प्रयोगांतून दिसून येतं की डोपामाइन बक्षीस मिळाल्यावर नाही, तर त्या बक्षिसाच्या आश्चर्यावर जास्त वाढतं. यश जितकं अनपेक्षित, तितकं डोपामाइन जास्त.

त्यामुळे 'हे पुन्हा कर' ही कल्पना बदलते. डोपामाइन म्हणजे 'अपेक्षेपेक्षा चांगलं झालं' असा संदेश, आणि डोपामाइन कमी होणं म्हणजे 'अपेक्षेपेक्षा वाईट झालं' असा संकेत आहे.

डोपामाइनचं काम फक्त 'हे पुन्हा कर' किंवा 'आनंद देणारं रसायन' एवढंच नाही, तर त्याचं अधिक सूक्ष्म स्पष्टीकरण आहे. पण तरीही ही मांडणी आपल्याला पुन्हा त्या 'अंधाऱ्या खोलीच्या समस्ये'कडेच घेऊन जाते.

मग प्रश्न असा पडतो की, आपण काय अपेक्षित मानायचं आणि सध्या जे घडतंय ते अपेक्षेपेक्षा चांगलं की वाईट, हे ठरवतं कोण? हे काम सेरेब्रल कॉर्टेक्स करतं.

मेंदूतील इतर कोणत्याही भागाकडे इतकी माहिती नसते की, उदाहरणार्थ, पैसा म्हणजे काय हे समजावं - आणि मानवी मेंदूत पैसा हा डोपामाइन मिळवण्याचा विश्वासू स्रोत आहे. त्यामुळे अनपेक्षित यश घडलं की, त्याची माहिती कॉर्टेक्स बक्षीस प्रणालीला देतो, आणि त्याच्या बदल्यात डोपामाइन मिळतं.

जर कॉर्टेक्सचं काम फक्त अपेक्षा आणि वास्तव जुळवणं असेल, तर तो स्वतः डोपामाइन का शोधतो? हा प्रश्न आपल्याला पुन्हा डार्क रूमच्या म्हणजे अंधाऱ्या खोलीच्या समस्येपर्यंत घेऊन जातो.

कारण डोपामाइन आनंद देत नसेल, तर मग आपण त्यामागे का धावतो, किंवा काहीही करायची इच्छा आपल्याला का होते, हे समजत नाही.

असं का होतं हे समजून घ्या

यावर अजूनही संशोधन सुरू आहे. माझ्या मते, सेरेब्रल कॉर्टेक्स आणि डोपामाइन यांचं नेमकं नातं काय आहे, हा मेंदूविज्ञानातील (न्यूरोसायन्स) आजही न सुटलेला एक मोठा प्रश्न आहे.

सध्या मी असं समजतो, पण कदाचित नंतर म्हणजे भविष्यात हे चुकीचं सिद्ध होऊ शकतं.

खरं तर कॉर्टेक्सला डोपामाइन कमी करायचं असतं, पण जेव्हा काहीतरी अनपेक्षितपणे यशस्वी होतं, तेव्हा आपोआप डोपामाइन मिळतं. मेंदू अशाच गोष्टींनी बनलेलं आहे!

हा मेंदूमध्ये डोपामाइनचा धक्का केवळ आनंद किंवा मजा देणारा सिग्नल नाही, तर तो असं सांगतो की 'हे सोडवा'. मेंदू सांगतो - काय अपेक्षित आहे आणि काय खरं आहे, ते जुळवा. किंवा परिस्थिती बदला, किंवा अपेक्षा बदला.

डोपामाइन कदाचित आपल्याला फक्त परिस्थिती स्वीकारण्याऐवजी काहीतरी बदलायला भाग पाडत असेल, म्हणजे आपल्याला काहीतरी करायला लावत असेल. पण सध्या कुठलंही संशोधन असं ठरवून सांगत नाही की, हे नक्की तसेच करेल.

डोपामाइन हे मेंदूतील एक रसायन आहे जे आपल्याला सांगतं,'हे समजून घ्या, आणि काहीतरी करा.' जेव्हा डोपामाइन पुरेसं असतं, तेव्हा आपल्याला लक्ष केंद्रित करता येतं, काम करायला प्रेरणा मिळते, आणि आपण समस्यांवर उपाय शोधतो.

उदाहरणार्थ, ॲम्फेटामाइन्स घेतल्यावर लोकांना 'टनेल व्हिजन' येते, म्हणजे त्यांचे लक्ष एका गोष्टीवर फक्त केंद्रित होते. पण जेव्हा डोपामाइन कमी असते, लोकांना प्रेरणा कमी वाटते, काम करण्याची इच्छा कमी होते, आणि आपण सुस्त होतो.

हेच डोपामाइन आपल्याला अनिश्चिततेबद्दल इतकं आकर्षित करतं.

हे फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही. या विषयावर कबुतरांवरही प्रयोग झाले आहेत, आणि नंतर इतर प्राण्यांवरही ते केले गेले आहे. या प्रयोगात कबुतरांना एक बटण दिलं जातं ज्याला ते चोच मारतात किंवा टोचतात (पेक), आणि त्यानंतर त्यांना काहीतरी बक्षीस मिळतं.

मग शास्त्रज्ञ बटण किती वेळा टोचावं लागेल याची संख्या बदलतात. जास्त टोचावं लागलं तर म्हणजे 50 किंवा 100 वेळा पेक केल्यानंतर कबूतरं थकतात आणि त्यांना पुन्हा ती कृती करायला आवडत नाही. म्हणजेच जास्त मेहनत लागली की प्राणीही थकतात आणि तेच काम पुन्हा करायला कमी उत्सुक असतात.

जर बटण टोकण्याची म्हणजेच टोचण्याची संख्या सांगितली नाही तर कबूतरं थांबत नाहीत. मग ते किती वेळा बक्षीस मिळतंय याची पर्वा न करता ते सतत टोचत राहतात. बक्षीस नाही तर रहस्य उलगडण्याची उत्सुकता त्यांना प्रेरित करते.

डोपामाइन म्हणजे मेंदूचा संदेश किंवा सिग्नल: 'हे समजून घे' किंवा 'हे सोडव', पण हे नक्की समजण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे. (Credit: Serenity Strull)

फोटो स्रोत, Serenity Strull

फोटो कॅप्शन, डोपामाइन म्हणजे मेंदूचा संदेश किंवा सिग्नल: 'हे समजून घे' किंवा 'हे सोडव', पण हे नक्की समजण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.

ही गोष्ट आणखी मजेशीर आहे. समजा तुम्ही काही कबुतरांना पिंजऱ्यात ठेवता आणि त्यांच्या समोर एक बटण लावता. यावेळी बक्षीस कधी मिळेल हे अगदी रँडम (अनियमित) ठेवलंय, किती वेळा बटण टोकलं त्याचा याच्याशी काही संबंध नाही.

सुरुवातीला काही कबुतर बटणाला टोचण्यास सुरुवात करतात. लवकरच सर्व कबुतरं हे करू लागतात. ते सतत बटणाला टोचत राहतात, कुठलाही नियम नसताना ते नियम शोधण्याचा प्रयत्न करतात. शेवटी, त्यांना वाटतं की त्यांच्या सततच्या टोचण्यामुळेच बक्षीस मिळतंय. विशेष म्हणजे हे खरं नसलं तरी त्यांना तसं वाटतं.

म्हणजेच, कबूतरं फक्त बक्षिसासाठी नाही, तर रहस्य उलगडायचं हे समजून घेण्यासाठी सतत प्रयत्न करतात.

हे सगळं आपल्याला खूप ओळखीचं वाटतं. जुगार आणि सोशल मीडिया लोकांना इतकं आवडतं की नंतर ते व्यसनी बनतात. कारण कधी फायदा होईल, किती होईल हे ठरलेलं नसतं. म्हणजे, नक्की बक्षीस नाही, पण आशा असते. त्यामुळे लोक सतत खेळत राहतात किंवा स्क्रोल करत राहतात.

इन्स्टाग्रामवरील कोणत्या फोटोला जास्त लाइक्स मिळतील किंवा टिकटॉक वरील कोणता व्हीडिओ जास्त व्हायरल होईल, हे तुम्हाला माहीत नसतं. जुगाराचे अड्डे आणि सोशल मीडिया नेटवर्क्स ही अनिश्चितता वाढवतात. बक्षीस अगदी अनियमित वेळेला मिळतं. त्यांना कबुतरांवरील या प्रयोगांची माहिती आहे आणि ते त्याचा फायदा घेतात.

डोपामाइन

फोटो स्रोत, Getty Images

समजा तुमचे सगळे लाइक्स आठवड्यातून एकदाच, ठरलेल्या वेळेला एकत्र मिळाले, तर कसं वाटेल याचा विचार करा. बहुधा तो दिवस येईल याचीच तुम्हाला भीती वाटू लागेल. कारण बहुतेक वेळा ते अपेक्षेइतकंही चांगलं वाटणार नाही, आणि अनेकदा निराशाच होईल.

या दृष्टिकोनातून पाहिलं तर, आपण जे काही केलं तरी आपली प्रेरणा नेहमीच गोंधळलेली का वाटते, हे समजायला लागतं. डोपामाइन जगाला 'चांगलं' आणि 'वाईट' असं सोप्या पद्धतीने विभागत नाही. तसं असतं तर काम खूप सोपं झालं असतं- चांगल्या गोष्टी करा, वाईट टाळा आणि कायम उत्साही राहा.

पण प्रत्यक्षात डोपामाइन अचानक मिळालेल्या यशाची नोंद घेतं-ते यश आपण जसं ठरवतो तसं. आणि मग ते मेंदूला सांगतं, "हे कसं घडलं ते समजून घे, जेणेकरून पुढे हे यश पुन्हा पुन्हा मिळेल आणि त्याचं आश्चर्य वाटणार नाही."

हे ऐकायला थोडंसं निराशाजनक वाटू शकतं. जर डोपामाइन मेंदूला खरंच हेच सांगत असेल, तर आपण काहीही केलं तरी शेवटी कंटाळा येणार आणि समाधान मिळणार नाही - आणि तेच त्याचं काम आहे. पण याकडे पाहण्याचा एक चांगला मार्गही आहे.

कंटाळवाणेपणाची भीती आणि असमाधानाची जाणीवच आपल्याला नवीन गोष्टी करायला प्रवृत्त करते. आणि नवीन गोष्टी करताना आपल्याला कधीतरी अनपेक्षित, अचानक आनंदाचे क्षण मिळतात. हेच ते दुर्मिळ आणि अनिश्चित आनंदाचे क्षण असतात, जे आपलं आयुष्य जगण्यासारखं बनवतात.

उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहिलं तर ही एक खूप बुद्धिमान रचना आहे. समजा दोन प्राणी आहेत- एक आहे त्यात पूर्ण समाधानी आहे, आणि दुसरा जो लवकर कंटाळतो आणि नेहमी काहीतरी नवीन शोधत राहतो. दीर्घकाळ कोणता प्राणी जास्त टिकेल? बहुतेक वेळी दुसराच.

डोपामाइन म्हणजे भविष्यात बदल होणारच, यावर लावलेली एक पैज आहे. उत्क्रांती अशाच अस्वस्थ, असमाधानी, सतत नवीन गोष्टी शोधणाऱ्या प्राण्यांना साथ देते. कारण ते एका जागी स्थिरावत नाहीत, पुढे जात राहतात आणि शेवटी अधिक यशस्वी ठरतात.

मनःशांतीबद्दल बोलायचं झालं तर, ती नसली तरी आयुष्य चालू शकतं.

(हा लेख निकोले कुकुश्किन यांच्या वन हँड क्लॅपिंग या पुस्तकातील एका उताऱ्यावर आधारित आहे. हे पुस्तक प्रथम ऑक्टोबर 2025 मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालं आहे.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.