एका घटनेनंतर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी केले होते 'न्युक्लियर ब्रीफकेस' सक्रिय; 'अणुयुद्ध' होता होता कसं टळलं?

फोटो स्रोत, Alamy
- Author, ग्रेग मॅकेव्हिट
25 जानेवारी 1995 रोजी नॉर्वेने उत्तर ध्रुवीय प्रकाशाचा म्हणजेच 'ऑरोरा बोरेलिस'चा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन रॉकेट लाँच केले. मात्र, रशियाला हे रॉकेट म्हणजे मॉस्कोच्या दिशेने येणारे अणुक्षेपणास्त्र असल्याचा संशय आला.
गोठवणाऱ्या थंडीच्या त्या दिवशी अवघ्या तासाभरासाठी जगाने शीत युद्धातील भीषण स्वप्नांचा अनुभव घेतला. एका सामान्य बुधवारी दुपारी उत्तर रशियातील रडार केंद्रांवरील लष्करी तंत्रज्ञांच्या स्क्रीनवर एक संशयास्पद हालचाल दिसली.
नॉर्वेच्या किनाऱ्याजवळून एक रॉकेट झपाट्याने वर जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते कुठे जात होते आणि ते धोकादायक होते का, असे प्रश्न निर्माण झाले. बर्लिनची भिंत कोसळल्यानंतर अण्वस्र तणाव संपला असावा, अशी अनेकांची समजूत होती.
आकाशातील हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्यांसाठी या घटनेचे परिणाम अत्यंत गंभीर होते. त्या भागातील अमेरिकन पाणबुडीवरून डागलेले एकच क्षेपणास्त्र 15 मिनिटांत मॉस्कोवर 8 अणुबॉम्ब टाकू शकते, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे आकाशातील हालचालींची ही माहिती तातडीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.
तेव्हा येल्त्सिन हे 'न्यूक्लिअर ब्रीफकेस' सक्रिय करणारे पहिले जागतिक नेते ठरले. या ब्रीफकेसमध्ये अणुबॉम्ब स्फोट करण्यासाठी लागणाऱ्या सूचना आणि तंत्रज्ञान असते.
दुसऱ्या महायुद्धानंतर अण्वस्त्रधारी देशांनी प्रतिबंधक धोरण अवलंबले आहे. यामागे मोठ्या अणुहल्ल्यामुळे दोन्ही बाजूंचा विनाश होईल, असा विचार आहे. त्या तणावपूर्ण क्षणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष येल्त्सिन आणि त्यांच्या सल्लागारांना प्रतिहल्ला करायचा की नाही, याचा तातडीने निर्णय घ्यावा लागला.
मात्र, या घटनांच्या मालिकेचा शेवट विनाशात झाला नाही. त्या संध्याकाळी उशिराच्या बातम्यांमध्ये हा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्यात आला. त्यात टॉम लेहरर यांच्या विनोदाने भरलेल्या 'We Will All Go Together When We Go' या गाण्याचाही उल्लेख होता.
राजकारणी, लष्करी प्रमुख आणि पत्रकारांची धावपळ
बीबीसीच्या न्यूज नाइट कार्यक्रमाचे सादरकर्ते जेरेमी पॅक्समन यांनी म्हटले, "कार्यक्रम संपवण्यापूर्वी सांगायला हवे की, रशियाच्या वृत्तसंस्थांनी सर्वोत्तम प्रयत्न केल्यानंतरही, आज अणुयुद्ध झाले नाही. दुपारी 1.46 वाजता इंटरफॅक्स या मॉस्कोस्थित वृत्तसंस्थेने रशियाने क्षेपणास्त्र पाडल्याची बातमी दिली."
"जगाचा अंत पाहायला मिळणार, असे वाटून पत्रकारांनी तातडीने संरक्षण मंत्रालयाशी संपर्क केला. मात्र तेथील प्रवक्त्याने शांतपणे सांगितले की, ब्रिटनने रशियावर कोणतेही क्षेपणास्त्र डागलेले नाही. अमेरिकेच्या प्रवक्त्यालाही नेमकी माहिती नव्हती. आमच्याकडे फक्त बातम्यांच्या बातम्या आहेत, असे ते म्हणाले."
जागतिक चलन बाजार डळमळीत झाले होते. राजकारणी, लष्करी प्रमुख आणि पत्रकार माहिती मिळवण्यासाठी धावपळ करत होते. दुपारी 2.52 वाजता (जीएमटी) संभाव्य धोक्याची जाणीव असलेल्यांना पुन्हा श्वास घेता आला. इंटरफॅक्सने दुरुस्ती करत सांगितले की, रशियाच्या इशारा प्रणालीने क्षेपणास्त्राची नोंद केली असली, तरी ते रॉकेट नॉर्वेच्या हद्दीतच पडले होते.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर नॉर्वेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हे प्रक्षेपण शांततापूर्ण उद्देशाने करण्यात आले होते. ते नियमित वैज्ञानिक संशोधनाचा भाग होते. नागरी रॉकेट तळावरून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
उत्तर ध्रुवीय प्रकाशाबाबत माहिती गोळा करणे हा त्या रॉकेटचा उद्देश होता. हे रॉकेट रशियाच्या हवाई हद्दीपासून दूर, स्पिट्सबर्गेन या आर्क्टिक बेटाजवळ समुद्रात नियोजित ठिकाणी पडले.
संबंधित वृत्त चुकीचे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रशियाच्या संरक्षण सूत्रांनी इंटरफॅक्सला सांगितले की, हे प्रक्षेपण त्यांच्या रडार प्रणालीची चाचणी घेण्यासाठी होते की नाही, हे सांगणं घाईचं ठरेल.
1987 पासून रशिया आपल्या हवाई संरक्षण क्षमतेबाबत जास्त संवेदनशील होता. कारण त्यावर्षी पश्चिम जर्मनीतील मथायस रस्ट या तरुणाने एक लहान विमान उडवत 500 मैलांहून अधिक अंतर पार करून थेट क्रेमलिनजवळ उतरण्यात यश मिळवले होते. त्यावेळी शीत युद्ध संपले होते, पण काही रशियन अधिकारी अजूनही अण्वस्त्र धोका असल्याने अस्वस्थ होते, हे या घटनेतून दिसले.

फोटो स्रोत, Getty Images
'आमच्या नेहमीच्या प्रक्षेपणानं इतकं लक्ष वेधून घेतल्याचे कळल्यावर मला भीती वाटली,' अशी भावना नॉर्वेचे शास्त्रज्ञ कोल्ब्योर्न अडोल्फसेन यांनी व्यक्त केली. हा सर्व घटनाक्रम झाला तेव्हा ते एका बैठकीत होते आणि त्यांना भीती व्यक्त करणारे फोन कॉल्स येऊ लागले होते.
विशेष म्हणजे काही आठवडे आधीच नॉर्वेने या प्रक्षेपणाची माहिती रशियाला दिली होती. असं असतानाही हे घडलं हे आणखी आश्चर्यकारक होतं. अडोल्फसेन यांच्या मते, रशियाने अशी प्रतिक्रिया दिली असावी, कारण यावेळी पहिल्यांदाच अशा रॉकेटने 908 मैल उंचीपर्यंत जाणारी मोठी झेप घेतली होती. मात्र हे अनपेक्षित नव्हते, असे त्यांनी सांगितले.
14 डिसेंबरला परराष्ट्र मंत्रालयामार्फत सर्व संबंधित देशांना याची सूचना देण्यात आली होती. मात्र, ती योग्य ठिकाणी पोहोचली नाही. एका चुकलेल्या संदेशामुळे किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याची ही आठवण होती.
अशा प्रसंगांचा इतिहास
अणुयुगाच्या सुरुवातीपासून आपल्या कल्पनेपेक्षा जास्त वेळा अणुयुद्धाची शक्यता थोडक्यात टळली आहे. यात केवळ 1962 च्या क्युबा क्षेपणास्त्र संकटासारख्या मोठ्या घटनांचाच समावेश नाही. क्युबा संकट शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात अणुयुद्ध भडकण्याच्या सर्वात जवळचा क्षण होता.
2020 मध्ये बीबीसी फ्युचरने एक वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यात स्थलांतरित होणारे हंस, चंद्र ते अगदी संगणकीय बिघाड आणि अंतराळातील हवामानापर्यंतच्या विविध कारणांमुळे खोटे धोक्याचे इशारे कसे दिले गेले याचा आढावा घेण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
1958 मध्ये एका विमानाने चुकून एका कुटुंबाच्या बागेत अणुबॉम्ब टाकला होता. त्यात फक्त त्यांच्या कोंबड्यांचाच मृत्यू झाल्यानं मोठं नुकसान टळलं. 1966 मध्ये अमेरिकेची 2 लष्करी विमाने स्पेनमधील एका दुर्गम गावात कोसळली. त्यापैकी एका विमानात 4 अण्वस्त्रे होती.
अगदी 2010 मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाचा त्यांच्या 50 क्षेपणास्त्रांशी काही काळासाठी संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेणं किंवा स्वयंचलित प्रक्षेपण थांबवणे अशक्य झाले होते.
धोकादायक क्षण
त्यावेळी अनेक रशियन नागरिकांनी येल्त्सिन यांनी पहिल्यांदा अण्वस्त्राची ब्रीफकेस वापरल्याच्या घोषणेला केवळ दिखाऊपणा मानले. चेचन युद्धावरून लक्ष हटवण्यासाठी हे सांगितले गेले, असे त्यांचे मत होते.
"काल मी पहिल्यांदा माझी काळी ब्रीफकेस वापरली," असे येल्त्सिन यांनी इंटरफॅक्सला दुसर्या दिवशी सांगितले.
"माध्यमे आमची सेना कमकुवत असल्याचे सांगत असल्याने कदाचित कुणीतरी आमची चाचणी घ्यायचे ठरवले," असेही त्यांनी म्हटले.

फोटो स्रोत, Getty Images
न्यूज नाइटचे नॉर्वे रॉकेट प्रकरणावरील वृत्त हलक्याफुलक्या स्वरात होते. मात्र या घटनेचे महत्त्व किती, यावर मतभेद आहेत.
एका माजी सीआयए अधिकाऱ्याने याला अण्वस्त्र युगातील सर्वात धोकादायक क्षण म्हटले. लष्करी सल्लागार पीटर प्राय यांनी म्हटले की, कोणत्याही अण्वस्त्रधारी देशाच्या नेत्याने इतक्या गंभीर परिस्थितीत प्रथमच प्रत्यक्ष धोका समजून ब्रीफकेस उघडली होती.
असं असलं तरी, संयुक्त राष्ट्रांच्या अण्वस्त्र निशस्त्रीकरण अभ्यासक पावेल पोडव्हिग यांनी या घटनेला 10 पैकी 3 गुण दिले. शीत युद्धाच्या काळात याहून गंभीर घटना घडल्या होत्या, असे ते म्हणाले.
"दुसऱ्या दिवशी येल्त्सिन यांच्यासाठी हा ब्रीफकेसचा प्रसंग तयार केला असावा," अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
रशियाचे अण्वस्त्र तज्ज्ञ व्लादिमीर द्वोरकिन यांनी 1998 मध्ये वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, या इशाऱ्यामुळे कोणताही धोका नव्हता. एकच क्षेपणास्त्र डागले गेल्याच्या संकेतावर कोणीही निर्णय घेत नाही, असेही त्यांचे मत होते.
या घटनेनंतर 5 दिवसांनी बीबीसी रेडिओने सांगितले की, रशियाने हा इशारा गैरसमजामुळे झाल्याचे मान्य केले आहे आणि तो पुन्हा होऊ नये, असे म्हटले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने नॉर्वेने योग्य पद्धतीनेच कारवाई केल्याचे आणि त्यात कोणताही वाईट हेतू नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी संकट टळले. मात्र तरी एक निरुपद्रवी हवामान संशोधन रॉकेट इतकं भीतीचं वातावरण निर्माण करू शकते, हे चिंताजनक आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











