पाकिस्तानी क्रिकेटपटू झाले अभिषेक शर्माचे फॅन, त्याच्याबद्दल 'ही' सुरूये चर्चा

फोटो स्रोत, Getty Images
20 चेंडूत 68 धावा, 7 चौकार, पाच षटकार आणि स्ट्राईक रेट? तब्बल 340 चा..
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेक शर्माने केलेल्या स्फोटक फलंदाजीची चर्चा केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही होत आहे. न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेकने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.
'द गेम प्लॅन' या युट्युब शोमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल म्हणाला, "मी मॅच बघायला सुरू केली आणि तेवढ्यातच मॅच संपूनही गेली."
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू, क्रिकेटतज्ज्ञ आणि अनेक विश्लेषकांनी अभिषेकचं तोंडभरून कौतुक केलंय. तो एक अत्यंत धडाकेबाज फलंदाज असून सध्याच्या काळातल्या सर्वोत्तम टी-20 खेळाडू असल्याचंही काहीजण म्हणाले आहेत.
अभिषेक शर्माने आतापर्यंत 36 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 38.39च्या सरासरीने 1267 धावा केल्या आहेत.
अभिषेकचा स्ट्राईक रेट 195.22 आहे तर या 36 सामन्यांमध्ये त्याने 86 षटकार आणि तब्बल 119 चौकार फाटकावले आहेत.
गुवाहाटीत झालेल्या मालिकेतील तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी 154 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताने केवळ 10 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य गाठलं आणि त्याबदल्यात फक्त दोन विकेट गमावल्या.
अभिषेक शर्मा व्यतिरिक्त, कर्णधार सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 57 धावा केल्या. ईशान किशनने 13 चेंडूत 28 धावा केल्या.
अभिषेक शर्माने फक्त 14 चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक जलद अर्धशतकाचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे.
युवराजने ही कामगिरी 2007च्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये केली होती. त्या सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला युवराजने 6 चेंडूत 6 षटकार फटकावले होते.
अभिषेकने सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत आता दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यानंतर युवराजने ट्विट करत म्हटलं की, "अजूनही 12 चेंडूत 50 धावा करू शकला नाहीस. पण मस्त खेळलास, अशीच प्रगती करत रहा."
युवराजच्या विक्रमी खेळीबद्दल अभिषेक म्हणाला..
युवराज सिंगला अभिषेक शर्माचा मार्गदर्शक मानलं जातं.
त्यानेच त्याच्या सुरुवातीच्या काळात अभिषेक शर्माला प्रशिक्षण दिलंय. क्रिकेट जगात युवराजला अभिषेकचा 'गुरू' मानलं जातं.
सामन्यानंतर युवराज सिंगच्या विक्रमाबद्दल अभिषेक शर्मा म्हणाला, "तशी कामगिरी करणे प्रत्येकासाठी खूप अवघड आहे. पण कधी काय होईल हे सांगता येत नाही. या मालिकेतसुद्धा खूप जण चांगली फलंदाजी करत आहेत. त्यामुळे भविष्यात असं घडू शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
अभिषेक शर्मा म्हणाला, "क्रिकेटमध्ये मी जे काही शिकलो ते मी युवी पाजी (युवराज सिंग) आणि रोहित भाई (रोहित शर्मा) कडून शिकलो. क्रिकेटमध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे."
माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा म्हणाले, "अभिषेक म्हणतो की तो कुठलाही प्लॅन करून फलंदाजी करत नाही. आणि तरीही पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार मारला. विचार करा याने प्लॅन केला तर काय होईल?"
न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान स्मिथ करताना म्हणाले, "हा फलंदाज काहीतरी वेगळा आहे. त्याला कशाचीही भीती नाही. हे अविश्वसनीय आहे."
पाकिस्तानमध्ये काय प्रतिक्रिया उमटली?
'द गेम प्लॅन' या शोमध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल म्हणाला, "युवराज सिंग हा गुरू आहे आणि अभिषेक त्याचा शिष्य आहे. दोघेही अद्भुत आहेत. दोघेही वेगवान गोलंदाजांचे कर्दनकाळ आहेत. त्याच्या काळात युवी कोणत्याही वेगवान गोलंदाजाची लय बिघडवायचा आणि आता त्याचा शिष्यही तेच करत आहे."
कामरान अकमल पुढे म्हणाला, "अभिषेक आणि भारताचे इतर फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत, त्यावरून मला विश्वास आहे की भारत भविष्यात एकदिवसीय सामन्यात 500 धावांचा पल्ला देखील गाठू शकेल."
त्याच शोमध्ये माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू बासित अली म्हणाले, "अभिषेकसारखे तरुण भारतीय फलंदाज निर्भय आहेत. त्यांच्यावर कसलाही दबाव दिसत नाही. टी-20 मध्ये कोणीही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. मला वाटतं की अभिषेक शर्माची स्वच्छ फटकेबाजी आणि मोठ्या धावसंख्येमुळे त्याला 'मास्ट्रो' (उस्ताद) म्हटलं पाहिजे."

फोटो स्रोत, Getty Images
अभिषेक पाकिस्तानातही लोकप्रिय
अभिषेक शर्मा पाकिस्तानमध्येही लोकप्रिय झाला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानी नागरिकांनी गुगलवर शोध सर्वाधिक शोधलेल्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक अव्वलस्थानी होता.
अवघ्या दीड वर्षांच्या कारकिर्दीत अभिषेकने स्फोटक फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानात लोकप्रियता मिळवली आहे. पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये अभिषेकबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
गुगल सर्चमध्ये अभिषेकने बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रऊफ सारख्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना देखील मागे सोडलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अभिषेक शर्माने 2025मध्ये अनेक तडाखेबंद खेळ्या केल्या. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने 40.75च्या सरासरीने 163 धावा केल्या होत्या आणि त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 161चा होता. भारताने या मालिकेत 2-1च्या फरकाने विजय मिळवला होता.
त्याचवर्षी आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध फक्त 39 चेंडूत अभिषेकने 74 धावा काढून भारताचा विजय सुकर केला होता. त्यानंतरच टी-20 प्रकारात भारताचा उगवता तारा म्हणून अभिषेकची चर्चा सुरु झाली होती.
युवराज आणि सेहवागच्या मिश्रा शैलीची झलक
क्रिकेटच्या तज्ज्ञांना अभिषेकमध्ये युवराज आणि सेहवाग यांचं मिश्रण दिसतं. अनेकांना असं वाटतं की सेहवागचा आक्रमकपणा आणि युवराजची पल्लेदार फटकेबाजी अभिषेकच्या फलंदाजीत दिसून येते.
अभिषेकवर युवराज सिंगचा मोठा प्रभाव दिसतो. हे दोघे पहिल्यांदा रणजी स्पर्धेत भेटले होते. पंजाब क्रिकेट असोसिएशनची इच्छा होती की अभिषेक आणि शुभमनला रणजी ट्रॉफीमध्ये संधी द्यावी. त्याकाळात युवराज सिंग त्याच्या आजारावर मात करून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होता आणि बीसीसीआयच्या सूचनेनुसार रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी परतला होता.
युवराज सिंगला सांगण्यात आलं की 19 वर्षांखालील संघात खेळणारी दोन मुलं येत आहेत. त्यातला एक सलामीवीर फलंदाज (शुभमन गिल) आहे आणि दुसरा डावखुरा फिरकी गोलंदाज (अभिषेक शर्मा) आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीचे प्रतिनिधी भरत शर्मा यांनी 2025 च्या आशिया कपमध्ये अभिषेक शर्माच्या प्रभावी कामगिरीनंतर त्याचे वडील राजकुमार शर्मा यांच्याशी संवाद साधला होता.
त्यावेळी राजकुमार शर्मा म्हणाले होते, ''युवराज म्हणाला मला फलंदाज हवा आहे कारण गोलंदाज माझ्याकडे आधीपासून आहेत. निवडकर्त्यांनी युवराजला सांगितलं की या दोघांनाही संधी दिली पाहिजे. एका सामन्यात पंजाबचे तीन-चार खेळाडू लवकर बाद झाले आणि त्यावेळी युवराज मैदानात फलंदाजी करत होता. त्याने सांगितलं की अभिषेकला पॅड घालून फलंदाजीसाठी पाठवा. त्यानंतर अभिषेक मैदानात उतरला आणि युवराज थक्क होऊन बघत राहिला. युवराजने 40 धावा केल्या होता आणि अभिषेकने येऊन आक्रमक पद्धतीने शतक झळकावलं.''
राजकुमार शर्मा म्हणाले की, युवराज सिंगने मैदानावरच अभिषेकला विचारलं की तो त्याच्यासोबत सराव करेल का? अभिषेक म्हणाला की तो युवराजला त्याचा आदर्श, त्याचा देव मानतो आणि त्याला पाहूनच तो खेळायला शिकला आहे. तेव्हापासून युवराज सिंग अभिषेकला प्रशिक्षण देत आहे.
त्याचे वडील म्हणाले, "युवराज त्याला प्रशिक्षण देत आहे. तो माझ्या मुलाची पूर्ण काळजी घेतो. त्याने त्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवले आहे. जर एखाद्या जागतिक दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूने तुम्हाला प्रशिक्षण दिलं तर कल्पना करा की एखादा खेळाडू किती पुढे जाऊ शकतो. ही फक्त सुरुवात आहे!"
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











