रशिया-युक्रेन संघर्ष: रशियाकडे किती आण्विक शस्त्रं आहेत?

"आण्विक दलाला 'स्पेशल अलर्ट'वर ठेवावं," असे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन लष्कराला दिले होते.
विश्लेषकांचं मात्र म्हणणं आहे की, युक्रेनसाठी इतर देशांनी ढवळाढवळ करू नये म्हणून रशिया प्रत्यक्षात अण्वस्त्र वापरण्याबाबत नव्हे तर केवळ इशारा देऊ इच्छित आहे.
आण्विक शस्त्र जवळपास गेल्या 80 वर्षांपासून अस्तित्वात आहेत. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक देश आण्विक शक्तीकडे पाहतात.
रशियाकडे किती आण्विक शस्त्रं आहेत?
अंदाजे आकडेवारीनुसार, फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट यांच्यानुसार, रशियाकडे 5 हजार 977 आण्विक शस्त्र आहेत. आण्विक स्फोट घडवणारी उपकरणं. यात निवृत्त झालेल्या आणि काढून टाकलेल्या 1500 उपकरणांचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उर्वरित 4 हजार 500 उपकरणांमध्ये बहुतांश सामरिक अण्वस्त्रं मानली जातात. काही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र किंवा रॉकेट्स, ज्यांच्यात दूरपर्यंत लक्ष्य करण्याची क्षमता आहे. ही शस्त्र सहसा आण्विक युद्धाशी संबंधित असतात.
शिवाय यात कमी पल्ल्यासाठी रणांगणात किंवा समुद्रात वापरली जाणारी इतर लहान आणि कमी विध्वसंक आण्विक शस्त्रही आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की रशियाकडे लांब पल्ल्यासाठी हजारो आण्विक शस्त्र तयार आहेत.

तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, साधारण 1500 शस्त्र आताच्या घडीला तैनात आहेत. ही शस्त्र क्षेपणास्त्र स्थळी आणि बॉम्ब तळांवर किंवा समुद्रात पाणबुड्यांवर तयार आहेत.
इतर देशांशी तुलना
9 देशांकडे आण्विक शस्त्र आहेत. यात भारत, चीन, फ्रांस, इस्रायल, उत्तर कोरिया, पाकिस्तान, रशिया, अमेरिका आणि युके हे देश आहेत.
चीन, फ्रान्स, रशिया, अमेरिका आणि यूके या देशांचा 191 राज्यांच्या अण्वस्त्रांचा प्रसार न करण्याच्या करारातही (Non-Proliferation of Nuclear Weapons) समावेश आहे.

या करारानुसार, या देशांना अण्वस्त्रांचा साठा कमी करायचा आहे. यामुळे 1970 आणि 1980 च्या दशकापासून या देशांमध्ये शस्त्रांचा साठाही कमी झाला आहे.
भारत, इस्रायल आणि पाकिस्तान या देशांनी किधीही NPT करार केलेला नाही. तर 2003 मध्ये दक्षिण कोरिया सुद्धा यातून बाहेर पडला.
या 9 देशांमध्ये इस्रायल असा एकमेव देश आहे ज्याने कधीही अधिकृतरीत्या आण्विक शक्ती असल्याचं मान्य केलं नाही. पण त्यांच्याकडे अण्वस्त्र असल्याचं मानलं जातं.
युक्रेनकडे आण्विक शस्त्रं नाहीत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आरोप केला असला तरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा कोणताही पुरावा नाही.
आण्विक शस्त्रं किती विध्वंसक असू शकतात?
आण्विक शस्त्रं ही अधिकाधिक विध्वंस करण्यासाठी तयार केलेली आहेत. विध्वंसाची तीव्रता अनेक घटकांवर अवलंबून असते. यात खालील तीन घटकांचा समावेश आहे.
- वॉरहेडचा आकार
- जमिनीपासून किती उंचावर स्फोट घडवण्याची क्षमता आहे
- स्थानिक वातावरण
पण अगदी छोट्या वॉरहेडमुळे सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं आणि दूरगामी परिणामही होऊ शकतात.

दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमामध्ये 1 लाख 46 हजार लोकांचा बळी घेणारा बॉम्ब 15 किलोटनचा होता.
आताचे आण्विक शस्त्र हे 1 हजार किलोटनपेक्षा अधिक असू शकतात.
आण्विक स्फोटाच्याजवळ असणाऱ्या क्षेत्रात वाचण्याची शक्यता फारच कमी आहे. एका आंधुक फ्लॅशनंतर प्रचंड मोठा आगीचा गोळा आणि स्फोटांची लाट अनेक किलोमिटरपर्यंत इमारती आणि संरचना उद्ध्वस्त करू शकते.
'न्युक्लिअर डिटरंट' म्हणजे काय आणि ते काम करतं का?
मोठ्या संख्येने आण्विक शस्त्र ठेवण्यासाठी युक्तिवाद केला जातो की, तुमच्या शत्रूला पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता असणं जी तुमच्यावर हल्ला करण्यापासून त्यांना रोखू शकते. 'एकमेकांचा खात्रीशीर विध्वंस' असंही याला म्हटलं जातं.
दरम्यान, आतापर्यंत अनेक आण्विक चाचण्या झाल्या आहेत आणि त्याची तांत्रिक गुंतागुंत आणि विध्वंसक शक्ती सातत्याने वाढवली जात असली तरी 1945 पासून सशस्त्र युद्धात आण्विक शस्त्रांचा वापर झालेला नाही.
आण्विक शस्त्र वापरण्यासाठी रशियाचे धोरण ठरलेले आहे आणि त्यासाठी खालील चार परिस्थितीचा विचार केला जातो.
1. रशियाच्या प्रदेशात किंवा सहयोगी देशांच्या प्रदेशात बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्यास.
2. आण्विक शस्त्रांचा किंवा सामूहिक विनाशकारी इतर शस्त्रांचा वापर रशियन फेडरेशन किंवा सहयोगी देशांमध्ये झाल्यास.
3. आण्विक क्षमतेला आव्हान देण्यासाठी रशियन फेडरेशनच्या सरकारी किंवा लष्करी भागात हल्ला केल्यास.
4. राज्याचे अस्तित्त्व धोक्यात आले असताना पारंपरिक शस्त्र वापरून रशियन फेडरेशनविरोधात आक्रमता दाखवल्यास.
आपण किती काळजी करण्याची आवश्यकता आहे का? तर आण्विक संघर्षाची शक्यता वाढली असली तरी ती कमी आहे.
पुतिन यांच्या धमकीकडे प्रत्यक्षात अण्वस्त्र वापरण्याऐवजी केवळ एक इशारा म्हणून पाहिलं जात असलं तरी परिस्थिती कधीही चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाबाजूने जरी चुकीचा अर्थ काढला किंवा परिस्थिती हाताबाहेर गेली तर चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो हा धोका कायम आहे.
यूकेचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, यूकेने आतापर्यंत तरी रशियाच्या वास्तविक आण्विक शस्त्रांच्यासंदर्भात कोणताही बदल पाहिलेला नाही.
गुप्तचर सुत्रांनी सांगितलं की, याकडे बारकाईने याकडे लक्ष ठेवले जाईल.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








