दुबईत सोनं स्वस्त का असतं? भारतातील सोन्यापेक्षा ते अधिक शुद्ध असतं का?

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सारदा मियापुरम
    • Role, बीबीसी रिपोर्टर

दुबईतून भारतात येणारे नातेवाईक किंवा मित्र यांच्याकडून सोनं विकत घेण्याच्या सूचनांबद्दल तुम्ही ऐकलंच असेल.

विशेषकरून भारतातून कामासाठी दुबईत गेलेले लोक जेव्हा भारतात परतताना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार सोनं खरेदी करतात, ही एक सामान्य बाब आहे.

"दुबईत सोनं स्वस्त असतं, ते अधिक चमकदार असतं आणि त्याची गुणवत्ताही चांगली असते," यामध्ये कितपत तथ्य आहे?

भारत आणि दुबईतील सोन्याच्या गुणवत्तेत खरोखरंच फरक असतो का? दोन्हीकडे असणाऱ्या सोन्याच्या दरात मोठा फरक असतो का?

भारतात सध्या 10 ग्रॅम सोन्याच्या दरानं 1.5 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिवसातून दोन वेळा सोन्याचे दर जाहीर करत असतं.

25 जानेवारीला रात्री 9:10 वाजता 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 1,56,710 रुपये होता.

कोणतं सोनं चांगलं, दुबईचं की भारतातील?

सुनील कुमार जैन हैदराबाद पॉट मार्केट ज्वेलर्स असोसिएशनचं सहसचिव आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, सध्या दुबईतील सोनं आणि भारतात उपलब्ध असलेल्या सोन्याच्या गुणवत्तेत कोणताही फरक नाही.

ते म्हणाले, "भारतात 1990 च्या दशकात, 18 कॅरेट सोनं सर्वात सामान्य होतं. त्यावेळेस आपल्याला 22 कॅरेट सोनं फारसं मिळत नव्हतं. ग्राहकांना देखील त्याबद्दल फारशी माहिती नव्हती."

"सराफदेखील चांगल्या गुणवत्तेचं सोनं देऊ शकत नव्हते. मात्र, भारतात हॉलमार्क व्यवस्था सुरू झाल्यावर, दुबईतील सोन्याची शुद्धता आणि भारतातील सोन्याची शुद्धता समान झाली आहे,."

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

दोन्ही देशांमध्ये सोन्याच्या कॅरेटची गणना आणि गुणवत्तेच्या नियंत्रणाबाबत अतिशय कठोर नियमांचं पालन केलं जातं.

मात्र, ते असंही म्हणतात की, दोन्ही देशांमधील (भारत आणि दुबई) सोन्याच्या दागिन्यांचं डिझाईन आणि दागिन्यांच्या उत्पादन पद्धतींमध्ये फरक असू शकतो.

"दुबईत, बहुतांश दागिने मशीनद्वारे बनवले जातात. तर भारतात, लोक पारंपारिक दागिन्यांना पसंती देतात. त्यामुळे इथे ते हातानं बनवले जातात," असं ते पुढे म्हणाले.

दोन्ही देशांमधील कॅरेटची गणना करण्याची पद्धत समान आहे का?

दोन्ही देशांमध्ये दागिने बनवण्यासाठी समान म्हणजे 22 कॅरेट (91.6 टक्के सोनं) 18 कॅरेटचे मानक वापरले जातात. सोनारांचं म्हणणं आहे की, जर सोन्याचं कॅरेट समान असेल, तर त्याची शुद्धतादेखील समानच असेल.

तांत्रिकदृष्ट्या सांगायचं तर सुनीन जैन म्हणाले की, 22 कॅरेट सोनं तुम्ही जगातून कुठूनही खरेदी केलं, तरी त्याची शुद्धता 91.6 टक्केच असते.

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी पुढे याबाबत सांगितलं की, "जेव्हा सोन्याचे दागिने बनवले जातात, तेव्हा 100 टक्के सोनं वापरलं जात नाही. सोन्यामध्ये इतर धातू मिसळूनच त्याचे दागिने बनवता येतात. इतर धातू मिसळल्यानंतर सोन्याची शुद्धता 91.6 टक्के असते. यालाच आपण 22 कॅरेट किंवा 916 सोनं म्हणतो."

"उर्वरित 8.4 टक्क्यांमध्ये तांबे, जस्त आणि चांदी यासारखे धातू मिसळलेले असतात. त्याचप्रमाणे, 18 कॅरेट सोन्याची (75 टक्के शुद्धता) गुणवत्तादेखील जगभरात समानच असते."

त्यामुळे, तुम्ही दुबईत सोनं खरेदी किंवा भारतात खरेदी करा, सोन्याची गुणवत्ता सारखीच असते.

मात्र, सोनारांचं म्हणणं आहे की, दागिने बनवताना सोन्यामध्ये कोणते धातू मिसळण्यात आले आहेत, त्यानुसार त्याचा रंग थोडासा वेगळा असू शकतो.

दुबईतील सोनं अधिक पिवळं का दिसतं?

सुनील जैन म्हणाले की, दुबई दागिने तयार करताना सामान्यपणे सोन्यामध्ये जस्त आणि चांदी मिसळलं जातं.

रावला ब्रह्मम आणि श्रीनिवास सोनाराच्या व्यवसायात 20 वर्षांपासून आहेत. यासंदर्भात त्यांनी स्पष्ट केलं की, "जेव्हा सोन्यामध्ये जस्त अधिक प्रमाणात मिसळलं जातं, तेव्हा त्याला अधिक पिवळा रंग येतो. त्यामुळेच ते अधिक चमकतं."

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी पुढे सांगितलं की, भारतात सोन्याचे दागिने तयार करताना त्यात अनेकदा चांदी आणि तांबं मिसळलं जातं. जेव्हा सोन्यामध्ये तांबे मिसळलं जातं, तेव्हा त्याला थोडासा लालसर रंग येतो.

सोन्यामध्ये किती प्रमाणात चांदी आणि तांबे मिसळण्यात आलं आहे, त्यानुसार त्याचा रंग बदलतो. मात्र सोन्याच्या रंगात बदल झाल्यामुळे त्याच्या गुणवत्तेत कोणताही बदल होत नाही.

सोन्याची गुणवत्ता कोण ठरवतं?

स्थानिक सोनार म्हणतात की पूर्वी भारतात सोन्याच्या गुणवत्तेबद्दल शंका होत्या.

भारतात 15 जून 2021 पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं आदेश दिले आहेत की एप्रिल 2023 पासून सोन्याच्या दागिन्यांवर 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (एचयूआयडी) नंबर असणं बंधनकारक आहे. 'BIS CARE'या ॲपद्वारे, ग्राहक हा नंबर टाकून सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता जाणून घेऊ शकतात.

करीमनगर येथील सोनार कांदुगुरी नागराजू म्हणाले की भारतात हॉलमार्क व्यवस्था लागू करण्यात आल्यानंतर, सोन्याच्या गुणवत्तेबद्दलच्या सर्वांच्या शंका दूर झाल्या आहेत.

हॉलमार्किंग ही मौल्यवान धातूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूमधील मौल्यवान धातूचं अचूक प्रमाण अधिकृतपणे प्रमाणित करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे अनेक देशांमध्ये मौल्यवान धातूंच्या वस्तूंच्या शुद्धतेची हमी मिळते.

सोनं

फोटो स्रोत, BIS

या प्रक्रियेचं प्राथमिक उद्दिष्टं मौल्यवान धातूमधील भेसळ रोखणं आणि उत्पादक कायदेशीर मानकांचं पालन करतात की नाही याची खातरजमा करणं आहे.

चेन्नईतील ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) हॉलमार्कसाठीचा परवाना जारी करतं.

हे सर्व परवानाधारक सराफ हॉलमार्क चिन्हाचा वापर करू शकतात. हॉलमार्कशिवाय कोणताही दागिना विकणं हा गुन्हा आहे.

बीआयएस मान्यताप्राप्त मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रांवर ग्राहक त्यांच्या दागिन्यांची तपासणी करून घेऊ शकतात.

दुबईमध्ये 'पारीक' नावाचं प्रमाणपत्र दिलं जातं. सोनं, चांदी आणि प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंच्या शुद्धतेची हमी देण्यासाठी हे प्रमाणपत्र दिलं जातं.

दुबईतील सोन्याचे दर कमी होतील का?

सुनील जैन म्हणाले की भारतातील आणि दुबईतील सोन्याच्या दरात फरक आहे. दुबईत सीमा शुल्क नसल्यामुळे सोन्याचे दर किंचित कमी आहेत.

सुनील जैन म्हणतात, "दुबईत सोन्याचे दर जरी कमी असले तरी, एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक सोनं तुम्ही भारतात आणलं, तर तुम्हाला त्यावर सीमाशुल्क भरावं लागतं. जर तुम्ही ते शुल्क लक्षात घेतलं, तर दुबईतील सोन्याचे दर भारतातील सोन्याच्या दरांइतकेच होतात. याचाच अर्थ, सोन्याच्या दरात फारसा फरक नाही."

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

हैदराबादमधील एका सीमाशुल्क अधिकाऱ्यानं सांगितलं की जे लोक परदेशात 6 महिन्यांपेक्षा कमी काळ राहिल्यानंतर भारत परत येतात, त्यांनी जर सोनं आणलं तर त्यांना 38.5 टक्के कर भरावा लागतो.

ते पुढे म्हणाले, "जे लोक 6 महिने ते एक वर्षाच्या कालावधीत परदेशातून परत येतात, त्यांना 13.75 टक्के सीमाशुल्क भरावं लागतं. मात्र काही जण सीमा शुल्क टाळण्यासाठी बेकायदेशीर मार्गानं सोनं आणतात."

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "ते तिथे कमी कालावधीसाठी परदेशात राहतात आणि 250 ग्रॅम सोनं आणतात. अशा प्रकरणांमध्ये जर त्यांनी 38.5 टक्के सीमा शुल्क भरलं नाही तर ते सोनं जप्त केलं जातं. जर त्यांनी एक किलोहून अधिक सोनं आणलं, तर त्यांना अटक होईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)