यंदा सोनं 2 लाखांवर आणि चांदी 3 लाखांवर जाईल का? सोन्या-चांदीचे दर किती वाढतील?

सोने, चांदी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

31 डिसेंबर 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव होता 1,35,000 हून अधिक, तर चांदीची किंमत होती 2,40,000 प्रति किलो.

2026 या नव्या वर्षासाठी सोन्या-चांदीचे भाव काय असण्याचा अंदाज आहे? सोनं दोन लाखांवर आणि चांदी तीन लाखांवर जाणार का? जाणून घेऊया या बातमीतून उत्तरं.

2025 या वर्षात सोनं आणि चांदीच्या दरांनी विश्लेषकांना आणि गुंतवणूकदारांना चकित केलं होतं.

सोन्याच्या किंमती 2025 मध्ये 65% वाढल्या तर चांदीच्या किंमतींमध्ये 180% वाढ झाली.

सोन्याचे दर इतके का वाढले होते?

सोन्याचे दर वाढले, कारण जगभरात अनेक संघर्ष सुरू होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टॅरिफ, ट्रेड वॉर, इतर धोरणं या सगळ्याचा परिणाम झाला, आणि जागतिक गुंतवणूकदारांचा डॉलरवरचा विश्वास घटला. बँक ऑफ अमेरिका आणि जगभरातल्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा परिणाम झाला.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं.

भारतातल्या सोन्याच्या दरांवर डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य, सण-लग्नसराईत वाढलेली मागणी याचाही परिणाम झाला.

सोनं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर क्रूड तेलाच्या किंमतींवर परिणाम झाला नाही, पण सोन्याचे दर मात्र उसळले.

चांदी इतकी का उसळली?

चांदीला जगभरातून असणाऱ्या मागणीपैकी 50% ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजकडून येते. जगभरातल्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी चांदी महत्त्वाची आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, इव्हीएस म्हणजे इलेक्ट्रिक व्हेईकल्स, हायब्रिड गाड्या, औषध उद्योग, सोलर पॅनल्स, एआयचं हार्डवेअर, 5G इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांमध्ये चांदीचा वापर होतो आणि यात चांदीला कोणताही पर्याय नाही.

सोलार पॅनल्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चांदीला जगभरातून असणाऱ्या मागणीपैकी 50% ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीजकडून येते, सोलार पॅनल्समध्येही चांदीचा वापर होतो.

जगामध्ये आता उत्पादन होत असलेल्या एकूण चांदीपैकी 70% चांदीचं उत्पादन म्हणजे दुसऱ्या एखाद्या धातूचं उत्खनन करताना होतं.

गेली पाच वर्षं या धातूसाठी मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी. शिवाय चांदीतली गुंतवणूक वाढलीय.

सप्टेंबर 2025 मध्ये अमेरिकेने चांदीचा समावेश क्रिटीकल मिनरल्स लिस्टच्या मसुद्यात केल्यानंतर अमेरिकेला पाठवण्यात येणारं चांदीचं प्रमाण वाढलं, त्याचाही परिणाम दरांवर झाला.

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : 2026 मध्ये सोनं, चांदीचे दर आणखीन किती वाढतील?

2026 मध्ये सोन्या-चांदीच्या दरांबद्दल काय अंदाज आहे?

तर सोनं-चांदीच्या किंमती वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अनेक गोष्टी अजूनही कायम आहेत. 2025 अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर $4,500/oz पोहोचला होता.

सोनं आणि इतर मौल्यवान धातूंचं मोजमाप होतं ट्रॉय औंस (Troy Ounce) या एककात. 1 ट्रॉय औंस म्हणजे 31.103 ग्रॅम.

2026 मध्ये सोन्याचे हे दर प्रति औंस 5000 डॉलर्सवर ($5,000/oz) जाण्याचा अंदाज बँक ऑफ अमेरिका, जेपी मॉर्गन, गोल्डमन सॅक्स यांनी मांडलाय.

म्हणजे, बँक ऑफ अमेरिकाने $5,000/oz इतका, जेपी मॉर्गनने $5,055/oz इतका तर गोल्डमन सॅक्सने $4,900/oz इतका अंदाज मांडला आहे.

आता हे औंस आणि डॉलर्समधले अंदाज आहेत. यातल्या औंसांचं ग्रॅम्समध्ये आणि डॉलर्सचं रुपयांत रूपांतर करून गणित केलंत, तर 5000 USD च्या अंदाजानुसार भारतातला दर होतो Rs 1,52,000/10 ग्रॅम.

सोनं चांदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतात जानेवारी 2026 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरांवर होईल, कारण भारतात सोनं आयात केलं जातं.

भारतात जानेवारी 2026 मध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरांवर होईल, कारण भारतात सोनं आयात केलं जातं. त्यामुळे जागतिक वित्तीय संस्थांनी मांडलेले अंदाज अगदी 2 लाखांच्या जवळ जाताना दिसत नाहीत. पण अनेक घटना सोन्याला उसळण घेण्यासाठी ट्रिगर ठरू शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांमुळे 2025 मध्ये जसा सोन्याच्या दरांवर परिणाम झाला होता, तेच 2026 च्या सुरुवातीलाही पहायला मिळालं.

अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर क्रूड तेलाच्या किंमतींवर परिणाम झाला नाही, पण सोन्याचे दर मात्र उसळले.

जगभरातल्या अनेक देशांनी आपल्याकडच्या परकीय चलनसाठ्यातला अमेरिकन डॉलर्सचा साठा कमी करत, सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिलेला आहे. आणि हा ट्रेंड कायम राहण्याचा अंदाज आहे.

चांदीचं काय?

चांदीच्या किंमतींमध्ये चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. कारण जगभरात दरवर्षी प्रक्रिया होणाऱ्या चांदीपैकी सुमारे 60 ते 70 टक्के चांदीवर एकट्या चीनमध्ये प्रक्रिया केली जाते.

जानेवारीपासून चीनमध्ये चांदीच्या पुरवठ्यासाठी कठोर परवाना पद्धती लागू केली गेलीय. त्यामुळे पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता असल्याचं मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसेसनी त्यांच्या अहवालात म्हटलंय.

चांदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगभरात दरवर्षी प्रक्रिया होणाऱ्या चांदीपैकी सुमारे 60 ते 70 टक्के चांदीवर एकट्या चीनमध्ये प्रक्रिया केली जाते.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना म्हटलंय, "डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर राहिला तर 2026 अखेरपर्यंत चांदीचा दर प्रतिकिलो 2.80 लाख ते 3.20 लाख रुपयांच्या दरम्यान राहू शकतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)