अजित पवार, विजय रुपाणी ते संजय गांधी : हवाई अपघातात 'या' 8 राजकीय नेत्यांनी गमावले प्राण

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे.
नागरी विमान उड्डाण नियामक (DGCA) ने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एकूण पाच जण प्रवास करत होते. त्यामध्ये अजित पवार, त्यांचे स्वीय सहाय्यक, एक अंगरक्षक आणि दोन पायलट्सचा समावेश होता.
बुधवारी (28 जानेवारी) सकाळी आठ वाजता अजित पवार विशेष विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा अपघात झाला.
हे विमान VTSSK, LJ45 प्रकारचं चार्टर विमान होतं आणि मुंबईहून बारामतीला जात होतं.
बारामती विमानतळावर उतरताना रनवेजवळच विमानाला अपघात झाला. खाली कोसळताच विमानाने पेट घेतला. सकाळी 8:48 वाजता हा अपघात झाला. या विमानात अजित पवार यांच्यासह सुमित कपूर, शांभवी पाठक, विदित जाधव, पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते. त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा ज्या विमान अपघातात मृत्यू झाला, ते विमान लियरजेट-45 XR प्रकारचं विमान होतं.
लियरजेट 45 कुटुंबातली विमानं कॅनेडियन कंपनी बॅाम्बार्डिएरनं तयार केली आहेत. जगभरातील अनेक कंपन्या चार्टर फ्लाईटसाठी म्हणजे खासगी प्रवासासाठी ही विमानं वापरतात.
मध्यम आकाराचे लियरजेट-45 XR विमान बिझनेस जेट म्हणूनही ओळखले जाते. त्यात दोन हनीवेल TFE731-20AR/BR टर्बोफॅन इंजिनचा वापर केला जातो. या विमानातून एकावेळी साधारण आठ प्रवासी प्रवास करू शकतात. हे विमान एकदा पूर्ण इंधन भरलं तर साधारण 2,235 नॉटिकल मैलांपर्यंत, म्हणजे सुमारे साडेतीन ते चार हजार किलोमीटर रेंजमध्ये जलद प्रवास करू शकतं.

फोटो स्रोत, ANI
छोट्या धावपट्टीवरही उतरण्याची क्षमता असल्यानं भारतात खासगी चार्टर विमानसेवा या विमानाचा प्रामुख्यानं वापर करतात.
बारामतीत कोसळलेलं विमान नवी दिल्लीस्थित VSR एव्हिएशन या खासगी एयरलाईनच्या सेवेत होतं. 2010 पासून म्हणजे सोळा वर्ष हे विमान कार्यरत होते.
याआधी 2023 साली मुंबई विमानतळावर VSR कंपनीच्याच VT-DBL या लिअरजेट 45XR प्रकारच्याच विमानाला अपघात झाला होता. 14 सप्टेंबर 2023 रोजी मुसळधार पाऊस आणि कमी व्हिजिबलटीमध्ये उतरताना ते विमान रनवेवरून घसरून तुटलं होतं, पण आठही प्रवाशांचा जीव वाचवण्यात तेव्हा यश आलं होतं.
याआधीही, अनेक राजकारण्यांचा हवाई अपघातात मृत्यू झाला आहे. काही जण हेलिकॉप्टर अपघातात दगावले आहेत, तर काहीजण विमान अपघातात मृत पावले आहेत.
याआधी, भारतीय राजकारणातील कोणकोणत्या राजकारण्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाला आहे, हे जाणून घेऊया.
अजित पवार यांच्या व्यतिरिक्त या 7 नेत्यांचा हवाई अपघातात मृत्यू झाला.

12 जून 2025 मध्ये अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला होता.
या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेदेखील होते.

हा इतिहासातला अतिशय भीषण असा अपघात होता. विश्वास कुमार रमेश हे भारतीय वंशाचे एक ब्रिटिश प्रवासी या दुर्घटनेतून बचावले होते.

फोटो स्रोत, Getty Images
ऑगस्ट 2016 मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाली होती.
त्यानंतर 2021 च्या मध्यापर्यंत त्यांनी ही जबाबदारी निभावली.
विजय रुपाणी विद्यार्थी असल्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (ABVP) सक्रिय होते. तिथपासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण असा राहिला.

संजय गांधी हे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र होते. संजय गांधी यांना विमान चालवण्याची खूप आवड होती.
23 जून 1980 रोजी दिल्लीतील सफदरजंग विमानतळावर ते स्वत: खासगी विमान चालवत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला.
या विमानात त्यांच्या सोबत सुभाष सक्सेना हे सहवैमानिक होते. हे विमान कोसळून दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता.
संजय गांधी यांना 1976 मध्ये त्यांना हलकी विमाने चालवण्याचा परवाना मिळाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
इंदिरा गांधींचं सरकार सत्तेतून पायउतार होऊन जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्यांचा हा परवाना काढून घेण्यात आला होता. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांना पुन्हा परवाना प्राप्त झाला होता.

फोटो स्रोत, Nehru Memorial Library
रानी सिंह 'सोनिया गांधी - ॲन एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ' या पुस्तकात लिहितात की, "सक्सेना यांच्या नोकराने पाहिलं की, कोसळलेल्या विमानापासून चार फूट अंतरावर संजय गांधी यांचा मृतदेह पडलेला होता. उद्ध्वस्त झालेल्या विमानाखाली कॅप्टन सक्सेना यांचं खालचं शरीर अडकलेलं होतं. मात्र, डोकं बाहेर आलेलं होतं."
पुढे त्या लिहितात की, "इंदिरा गांधी स्वतः रुग्णवाहिकेत चढल्या आणि राममनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. डॉक्टरांनी दोन्ही वैमानिकांना मृत घोषित केलं."
अंत्यसंस्कारावेळी आपल्या भावना लपवण्यासाठी इंदिरा गांधींनी काळा चष्मा परिधान केला होता.

30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगांव तहसीलजवळील मोटा इथे झालेल्या विमान अपघातात काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचं निधन झालं होतं. सिंधिया कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होते.
त्यांच्यासोबत विमानात आणखी सहा जण होते. जिंदाल ग्रुपचे 10 सीटर चार्टर्ड विमान 'सेस्ना सी 90' ने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आग्र्यापासून 85 किमी अंतरावर हे विमान कोसळलं आणि त्यात बसलेल्या सर्व लोकांचा मृत्यू झाला होता.
माधवराव सिंधिया हे काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांची गणना तरुण आणि लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये केली जायची. काँग्रेसमध्ये त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, असंच तेव्हा राजकीय वर्तुळात मानलं जात होतं.

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि राष्ट्रपती केआर नारायणन यांनी दिल्लीतील सिंधिया यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केलं होतं.
राष्ट्रपती नारायणन यांनी त्यांचं वर्णन करताना म्हटलं होतं की, 'ते भारताच्या राजकीय आकाशातील सर्वात तेजस्वी ताऱ्यांपैकी एक होते.'
"नियती इतकी क्रूर असू शकते का?" असं पंतप्रधान वाजपेयी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं होतं.

2 सप्टेंबर 2009 रोजी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी सकाळी 8 वाजून 38 मिनिटांनी हेलिकॉप्टरने बेगमपेटहून निघाले होते.
त्यांना चित्तूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात सहभागी व्हायचं होतं.
वेळापत्रकानुसार त्यांना सकाळी साडेदहा वाजता तिथं पोहोचायचं होते. पण ते तिथे पोहोचलेच नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता होणं, ही राष्ट्रीय पातळीवरील एक खळबळजनक घटना बनली होती. केंद्र सरकारलाही याची माहिती देण्यात आली.

फोटो स्रोत, DGCA
राजशेखर रेड्डी ज्या हेलीकॉप्टरमधून प्रवास करत होते ते बेल-430 प्रकारचं होतं आणि ते बेपत्ता झालं होतं.
लष्कराच्या मदतीने नल्लामल्ला वनक्षेत्रात या हेलीकॉप्टरचा शोध घेण्यात आला. 3 सप्टेंबर रोजी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते, ज्यात त्यांच्यासहित इतर चार जणांचा मृत्यू झाला होता.

30 एप्रिल 2011 रोजी इटानगरहून तवांगला जाणारे हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या दोरजी खांडू आणि इतर चार जणांना घेऊन बेपत्ता झालं होतं.
तब्बल पाच दिवसांच्या मोठ्या शोधानंतर शोध पथकांना त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले होते.
खांडू हे फोर सीटर सिंगल-इंजिन पवनहंस हेलिकॉप्टर AS-B350-B3 मधून प्रवास करत होते.

फोटो स्रोत, Getty Images
दोरजी खांडू यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे अवशेष अरुणाचल प्रदेशमधील लुगुथांग भागात, समुद्रसपाटीपासून 4900 मीटर उंचीवर आढळले होते.
डोंगराळ, बर्फाच्छादित अशा प्रदेशात तब्बल पाच दिवस हा शोध चालला होता. या शोधमोहिमेत भारत आणि शेजारील भूतानमधील तीन हजार सुरक्षा दलांसह दहा हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते.
लढाऊ विमाने तसेच लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने हा शोध घेण्यात येत होता.
तवांगहून उड्डाण केल्यानंतर 20 मिनिटांनी त्यांचं हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं. शोधपथकाला पाचव्या दिवशी अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष तसेच त्यात असलेल्या पाचही जणांचे मृतदेहही सापडले होते.

31 मार्च 2005 रोजी प्रसिद्ध स्टील उद्योगपती आणि राजकारणी ओ.पी. जिंदाल यांचं विमान अपघातात निधन झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंगदेखील होते. या दोघांसहित पायलटचाही मृत्यू झाला होता.
तेव्हा, ओ. पी. जिंदाल हे हरियाणात निवडून आलेल्या काँग्रेस सरकारमध्ये ऊर्जामंत्री होते, तर सुरेंद्र सिंग कृषिमंत्री होते.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील गंगोह शहराजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला होता.
चंदीगडहून दिल्लीला परतत असताना हा हेलिकॉप्टर अपघात झाला होता.

आंध्र प्रदेशच्या राजकारणामध्ये जीएमसी बालयोगी यांचं नाव फार आदरानं घेतलं जातं. अत्यंत लहानशा कारकिर्दीमध्ये बालयोगी यांनी आपला अमिट ठसा राजकारणावर उमटवला होता.
1991 साली अत्यंत तरुण वयात ते लोकसभेत निवडून गेले. मात्र पुढच्याच लोकसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु एका पोटनिवडणुकीत विजयी होऊन ते आंध्र विधानसभेत गेले आणि मंत्रीही झाले. याच काळात केंद्रात मोठ्या घडामोडी घडत होत्या.
1998 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बालयोगी विजयी होऊन गेले आणि त्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
तेलगू देसम पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यातही एन. चंद्राबाबू नायडू यांच्या विश्वासातील नेते म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी पुन्हा निवडणुका झाल्या. त्यातही ते विजयी झाले आणि पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष झाले.
अनेकपक्षांचं सरकार चालवणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर संसदेत अनेक आव्हानं होती. वादळी चर्चा, टोकदार विरोध आणि सर्व बाकांवरील सदस्यांचा टिपेला जाणारा स्वर यातून वाट काढत बालयोगी यांनी सभागृह चालवलं होतं. त्यांनी अनेक परदेश दौरेही केले.
मात्र 3 मार्च 2002 रोजी आंध्र प्रदेशात भीमावरम येथून परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. बालयोगी यांचं हेलिकॉप्टर आवश्यकतेपेक्षा कमी उंचीवर येऊ लागलं आणि शेवटी नारळाच्या झाडाला थडकून ते अपघातग्रस्त झालं. या अपघातात स्वतः बालयोगी, हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी यांचा मृत्यू झाला.
बालयोगी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अमलापूरम या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार झाल्या. 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत बालयोगी यांचे पुत्र जीएचएम बालयोगी अमलापूरमचे खासदार झाले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











