अजित पवार यांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील? भाजप राष्ट्रवादीचं भवितव्य ठरवेल का?

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक अभूतपूर्व अशी पोकळी तयार झालेली आहे.
2023 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणं आणि त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वात एका मोठ्या गटानं पक्षावर दावा करत भाजपसोबत सत्तेत जाणं, हा घटनाक्रम आपण पाहिलेला आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना खास यश आल्याचं दिसलेलं नाही.
त्यातच, अजित पवार यांच्या अकस्मात जाण्यानं जी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, त्यातून प्रचंड गुंतागुंतीचे आणि राजकारणाची दिशा आणि दशा बदलू शकतील, असे कळीचे प्रश्न उभे राहिले आहेत.
आता राष्ट्रवादीचा 'दादा' कोण असेल? दोन्ही राष्ट्रवादी विलीन होतील का? अजित पवारांचे शिलेदार सत्ता सोडून परत माघारी फिरतील की शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच खेचून सत्तेसोबत आणतील?
या सगळ्यात, वर्चस्व गाजवायची संधी चालून आलेला भाजप पक्ष राष्ट्रवादीचं भवितव्य ठरवेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा मागोवा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अजित पवारांनंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचं भवितव्य काय?
2019 साली महाविकास आघाडीची स्थापना होऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा हटके प्रयोग झाला असला तरीही अजित पवार यांचा ओढा भाजपसोबत जाण्याचाच होता, हे पहाटेच्या शपथविधीतून दिसून आलं होतं.
त्यानंतर, गेल्या पाच-सहा वर्षातलं राजकारणही त्याच दिशेनं गेलेलं आपण पाहिलं.
मात्र, अजित पवार सत्तेसोबत गेले असले तरीही ते स्वत:ची वेगळी ओळख राखून होते. त्यांनी कधीही सत्तेतील भाजप-शिवसेनेप्रमाणे हिंदूत्वाची री ओढली नाही की 'फुले-शाहू-आंबेडकरां'चं नाव घेणं सोडलं नाही.
त्यांचा पक्ष किती पुरोगामी होता, हा प्रश्न सध्या अलहिदा पण त्यांनी सद्यकाळात सर्वार्थाने फायद्याची मानली जाणारी हिंदूत्वाची झूल पांघरली नाही, एवढं खरं.
शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व करू शकेल, असं एकमेव नेतृत्व हे अजित पवारच आहेत, असं मानून सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांसारखे पहिल्या फळीतील नेते त्यांच्यासोबत गेलेले होते.
मात्र, आता अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हे नेते काय करतील? ते सत्तेसोबतच राहतील, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अनुकूल असतील की राष्ट्रवादीची वाट सोडून भाजपवासी होतील, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आणि पोटप्रश्न निर्माण झालेले आहेत.
आता राष्ट्रवादीचा 'दादा' कोण?
या सगळ्याबद्दल आम्ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी चर्चा केली.
बीबीसी मराठीसोबत बोलताना ते म्हणाले की, खूप गुंतागुंतीचे आणि जटील असे हे प्रश्न आहेत. पण नेमकं काय होईल, याचा तातडीनं अंदाज बांधता येणार नाही.
पण सध्या पक्षासमोर प्राधान्याने विधिमंडळ पक्षनेता निवडणं आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडणं, या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं ते सांगतात.
ते सांगतात की, "पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडावा लागेल. सध्याची तातडीची गरज ती आहे. अर्थात, जो विधिमंडळ पक्षाचा नेता निवडलेला असेल, तोच उपमुख्यमंत्री असेल. कारण, उपमुख्यमंत्री पद हे त्या पक्षाच्या कोट्यातलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा येईल तो राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याचा."
"बाकीचे प्रश्न त्यानंतर उपस्थित होतात," असंही ते सांगतात.
याच प्रश्नाचं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार संजय जोग वेगळ्या पद्धतीनं करताना दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात की, अजित पवार यांच्यानंतर सर्व प्रश्नांचा सर्वंकष विचार करून, अजित पवार यांचा बारामती मतदारसंघातील पुढचा वारसदार कोण, राज्याचा उपमुख्यमंत्री कोण आणि पक्षबांधणीचं नेतृत्व करू शकेल, असा नेता कोण, याचा विचार पक्षाला करावा लागेल.
ते सांगतात की, "छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आता थकलेले आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा राज्यात तितका प्रभाव नाही. हसन मुश्रीफ कागलच्या बाहेर यायला तयार नाहीत तर दत्ता मामा भरणे इंदापूरच्या पुढे गेलेले नाहीत. धनंजय मुंडेंची प्रतिमा आधीच प्रचंड डागाळलेली आहे तर सुनील तटकरे खासदार आहेत."
पुढे ते सांगतात की, "सुनील तटकरे खासदारकी सोडून उपमुख्यमंत्रिपदी आले तरी एका मंत्रिमंडळात मुलगी आणि वडिल दोन्हीही चालतील का? असाही प्रश्न तयार होतो," असं ते सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात की, "सध्या पक्षात असा एकही नेता नाहीये, जो अजित पवारांच्या बरोबरीचा आहे. परंतु राज्य पातळीवर पक्षाचे व्यवस्थापन करणारे सुनील तटकरे हे पडद्यामागील रणनीती आखण्यात पारंगत मानले जातात. त्यांना संधी दिली जाऊ शकते."
लोकमतचे संपादक संजय आवटे सांगतात की, "अजित पवार यांच्यानंतर नेतृत्व करणारा चेहरा असा असला पाहिजे की ज्याला पक्ष पण चालवता आला पाहिजे, संघटना सांभाळता आली पाहिजे, रसद पुरवता आली पाहिजे. असा चेहरा आता सध्या राष्ट्रवादीकडे नाहीये. सुनील तटकरे वा इतर कुणामध्येही या सगळ्या क्षमता नाहीयेत. प्रफुल्ल पटेल हे शेवटी वाटाघाटीचे गृहस्थ आहेत. ते मास बेस नेते नाहीत."
पार्थ, जय आणि सुनेत्रा 'पवार'; कुटुंबातील दावेदार कोण?
अजित पवार यांच्या कुटुंबीयांपैकी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अलीकडेच राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली. त्यात पराभूत झाल्यानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार केलं असल्याने त्या सध्या संसद सदस्य आहेत.
अजित पवार यांच्या दोन मुलांपैकी पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले होते.
त्यानंतर अलीकडेच ते मुळशी तालुक्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चर्चेत आले होते.
निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार राजकारणात फारसे सक्रिय दिसलेले नाहीत. शिवाय, बारामतीमध्येही त्यांचा थेट प्रभाव दिसून येत नाही.
अजित पवार यांचे धाकटे सुपूत्र जय पवार हेदेखील तसे सक्रिय राजकारणात फारसे दिसत नाहीत.
शिवाय, या तिघांनाही राजकीय तसेच संघटनात्मक कामांचा अनुभव नाही. त्यांच्याकडे 'पवार' अडनाव असणं, हेच त्यांचं सध्याचं सामर्थ्य आहे.
याच पार्श्वभूमीवर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजेच अजित पवार यांना निरोप दिल्यानंतर मैदानातून बाहेर पडताना पक्षाचा उत्तराधिकारी कोण असेल, याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.
एकप्रकारे त्यांनी या चर्चेला अधिकृतरीत्या तोंड फोडलेलं आहे.

फोटो स्रोत, Facebook/Parth Pawar
"अजित पवारांचा उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच असाव्यात. राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा अजित पवार या सांभाळतील ही सर्वांचीच भावना आहे," असं नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत.
आता तुतारी, घड्याळ वेगळं नाही, दोन्ही एकच, असल्याचंही झिरवाळ म्हणालेत. आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेल्याच आहेत आता इथून पुढे एकत्रच असणार यात शंका नाही, असंही झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे.
लोकमत (नागपूर आवृत्ती) चे संपादक श्रीमंत माने यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली.
ते म्हणतात, " 'पवार' कुटुंबाबाहेर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस चालवणं कठीण आहे. अजित पवार हे पक्षाचा मुख्य चेहरा होते आणि पवार कुटुंबाशी संबंधित असलेला सदस्यच हा पक्ष चालवू शकतो," असं ते सांगतात.
जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत आणि कुटुंबातीलच एखाद्याची निवड करायची असेल तर पार्थ हा सर्वांत मजबूत दावेदार आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे मांडतात.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "सुनेत्रा पवारही पार्थला प्रोत्साहन देतील. त्या पूर्वीपासूनच पार्थला राजकारणात पुढे केलं पाहिजे, याच मताच्या होत्या."
तर संजय आवटे सांगतात की, "सहानुभूतीची लाट असल्याने एक चेहरा म्हणून सुनेत्रा पवार यांना एखादं महत्त्वाचं पद देऊन पुढं आणलं जाऊ शकतं. पण, जय पवारच बारामती विधानसभेची जागा लढतील, अशी तयारी आधीही झालेली होती."
दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होईल?
झिरवाळ यांच्या विधानाप्रमाणे, दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्रित येतील का, हा प्रश्न कळीचा ठरतो.
मात्र, यापेक्षा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी भाजप राजी होईल का, हा प्रश्न विचारणं जास्त संयुक्तिक राहिल, असं संजय जोग सांगतात.
ते सांगतात की, "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरीही शरद पवार यांची भाजपसोबत न जाण्याची भूमिका आणि इतरांची सत्तेसोबत जाण्याची अभिलाषा यांचा विरोधाभासी ताळमेळ कसा घालणार? कारण, अजित पवार यांच्यासोबत सत्तेत गेलेले नेते परत अजिबात येणार नाहीत. सत्ता त्यांना नेहमीच प्रिय राहिलेली आहे. शिवाय, दुर्दैवाने, शरद पवारांचं आरोग्य त्यांना साथ देताना दिसत नाहीत," असंही संजय जोग सांगतात.

फोटो स्रोत, ANI
अजित पवारांचं नेतृत्व नसताना दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवार भाजपसोबत न जाण्याची आपली भूमिका कायम ठेवणार का? बदलत्या परिस्थितीत आणि वयाच्या या टप्प्यावर उर्वरित नेतेमंडळींवर निर्णय सोपवून ते एप्रिलमध्ये निवृत्ती जाहीर करणार का? आणि राष्ट्रवादीचं काय करायचं, हा प्रश्न शरद पवार दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींवर सोडतील का? असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात.
यासंदर्भात लोकमतचे संपादक संजय आवटे वेगळं विश्लेषण करताना दिसतात.
ते सांगतात की, आता अजित पवारांच्या सोबतचा जो गट आहे, त्याला सत्तेत रहायचंच आहे. अजित पवारांची जागा कोण घेईल, नेता कोण होईल, पक्षाचं काय होईल, हे सगळं नंतर, पण तो गट भूमिका बदलणार नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे.
पुढे ते सांगतात की, "राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालीच होतीच, उलट तिला अजित पवार यांच्या जाण्यामुळे अधिक बळ मिळेल. दोन्ही गटांमध्ये जो संघर्ष होता वा मानसिक अढी होती तीदेखील महापालिका निवडणुकीमुळे आता दूर झालेली आहे. आता यात शरद पवारांनाच अॅक्टिव्ह रोल करावा लागेल."
"शरद पवार तसेही एप्रिलमध्ये राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ते राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती जाहिर करतील आणि मग नवीन पिढी काय करतेय, ते बघूया, असं म्हणून पूर्ण राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची वाट मोकळी करतील," असा कयास संजय आवटे बांधतात.
'घड्याळ' पुन्हा काकांच्या हातावर जाणार?
या पार्श्वभूमीवर, अजित पवारांचे शिलेदार आता काय करतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, या मुद्द्याकडे विजय चोरमारे लक्ष वेधतात.
आतापर्यंत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनकरण करायचं का असा मुद्दा होता. शरद पवारांच्या पक्षानं आपल्यासोबत यावं, असा अजित पवार यांचा आग्रह फार सुरुवातीपासूनच होता, असं चोरमारे सांगतात.
"एकूण राष्ट्रवादी परिवारामध्ये शरद पवारांच्या नंतर नेतृत्व करण्याची क्षमता असलेला माणूस अजित पवार हाच होता. त्यामुळे, भविष्याच्या दृष्टीने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जाणं, कधीही चांगलं, असा या मंडळींचा दृष्टीकोन होता."

आता अजित पवार नसताना पुन्हा 'पवार' नावासाठी शरद पवारांकडे ही मंडळी जातील का?
या प्रश्नावर चोरमारे सांगतात की, "अशी उलटी गंगा वाहणं, व्यावहारिकदृष्ट्या फार कठीण आहे. कारण, जे लोक अजित पवारांसोबत सत्तेत गेलेत, त्यातील एखाद-दुसरा अपवाद वगळला तर सगळे केंद्रीय यंत्रणांच्या रडारखालचे लोक आहेत. त्यामुळे, ते सत्ता आणि भाजपला सोडणार नाहीत, हे स्पष्ट आहे. तशीच वेळ आली तर ते पक्ष सोडून भाजपमध्ये जातील," असं ते ठामपणे सांगतात.
संजय आवटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वरूप यानिमित्ताने स्पष्ट करतात.
ते सांगतात की, "दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं तर ते नैसर्गिकरीत्या सत्तेत येतीलच. त्यामुळे, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. राज्यात अजित पवारांनंतर कोण, हा चेहरा शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.
"कारण, तो चेहरा असा असला पाहिजे की ज्याला पक्ष पण चालवता आला पाहिजे, संघटना सांभाळता आली पाहिजे, रसद पुरवता आली पाहिजे. मूळात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाहीये तर ती आघाडी आहे. ठिकठिकाणच्या सरदारांनी एकत्र येऊन केलेली आघाडी आहे. त्यामुळे, ती सगळी आघाडी प्रामुख्याने सहकार क्षेत्रातल्या लोकांची आघाडी आहे. साखर कारखाने, सहकारी बँका, शैक्षणिक संस्था अशा सगळ्या संस्था हातात असणारे हे सगळे सरदार आहेत."
भाजपच्या हातात राष्ट्रवादीचं भवितव्य गेलंय का?
मात्र, या सगळ्या निर्णयप्रक्रियेवर भाजपचं वर्चस्व आणि प्रभाव असेल, असं स्पष्ट मत विजय चोरमारे व्यक्त करतात.
राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण असो वा महायुतीतील राष्ट्रवादीचा प्रमुख नेता असो, उपमुख्यमंत्रिपद असो वा एकूणातच राष्ट्रवादीचं भवितव्य असो, या सगळ्यातच आता भाजपला इंटरेस्ट असेल, असं ते सांगतात.
ते सांगतात की, "आता हा निर्णय फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचा राहणार नाही. अजित पवारांच्या जाण्यानंतर ती स्वायत्तता राष्ट्रवादीकडे उरलेली नाही. त्यात भाजपचा प्रभाव राहणारच आहे. भाजपला कोणता नेता सोयीचा राहिल, हेच भाजपकडून पाहिलं जाईल. अगदी कुणाही दुय्यम नेत्याला विधिमंडळ पक्षनेता केला जाऊ शकतो, ही क्षमता सध्या फडणवीसांमध्ये आहे," असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
यामागचं कारण सांगताना ते स्पष्ट करतात की, "बाकी सगळे नेते संस्थात्मक व्यवहारामध्ये अडकून आहेत. त्यामुळे, ते भाजपच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही."
हाच मुद्दा वेगळ्या प्रकारे संजय आवटे स्पष्ट करतात.
शरद पवारांना शरण आणणं, यातच भाजपला रस असेल, असं ते सांगतात.
ते सांगतात की, "भाजप लगेच काही करणार नाही. योग्य वेळेची वाट पाहिल. त्यांना शरद पवार आपल्यासोबत येणं, हे हवंच आहे. त्यांचा सगळ्यात मोठा विजय हाच असेल. त्यांचा पक्ष संपवण्यापेक्षा त्यांना आपल्यासोबत आणणं आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री करणं, ही कृती भाजपसाठी अधिक सोयीस्कर आहे."
"शरद पवारांच्या नावाला एक नॅशनल क्रेडिबिलीटी आहे आणि शरद पवारही भाजपसोबत गेले, याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर होऊ शकतो. एकूण विरोधी पक्षांचं मोरल यामुळे कमी होऊ शकतं. ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे," असंही ते सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)










