'टेबलटॉप रनवे' काय असतो? अजित पवार यांच्या अपघातानंतर बारामती विमानतळ चर्चेत

बारामती

फोटो स्रोत, ANI

अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाला बारामतीच्या विमानतळावर उतरताना झालेल्या अपघातामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

VT SSK या चार्टर विमानाला 28 जानेवारीला सकाळी 8:46 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला होता, त्याची तपासणी भारतातील एयरक्राफ्ट अ‍ॅक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात (AAIB) ही संस्था करते आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं दिली आहे.

विमानातील ब्लॅक बॉक्सेसची पडतळाणी केल्यावरच अपघाताचं कारण स्पष्ट होईल.

मात्र, या अपघातानंतर बारामती विमानतळ, इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टिम, 'टेबलटॉप रनवे' तसंच हवाई वाहतूक सुरक्षा असे अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत.

या सगळ्या संज्ञांचा अर्थ काय आहे? बारामतीतील विमानतळ कसा आहे? जाणून घेऊयात.

टेबलटॉप रन वे काय असतो?

टेबलटॉप रन वे म्हणजे असा रन वे जो एका पठारावर असून त्याच्या टोकांना उतार व दरीसारखा खोलगट भाग असतो. डोंगराळ भागात, किंवा टेकड्यांच्या माथ्यावर असे रनवे असतात.

त्यामुळे विमान उतरवताना वैमानिकांना रनवे टेकडीखालच्या भागातील जमिनीच्या पातळीवरच असल्याचा भास होऊ शकतो आणि त्यातून अपघात होण्याची शक्यता असते.

तसंच अशा रन वेची खालच्या जमिनीपासूनची उंची जितकी जास्त, तितका हवेच्या प्रवाहांचा प्रभाव जास्त जाणवू शकतो.

टेलविंड (विमानाच्या किंवा वाहनाच्या मागून वाहणारा वारा, जो वाहनाला पुढे ढकलू शकतो), पाऊस, धुकं, दिशेचा अंदाज चुकणं अशा गोष्टी टेबलटॉप रन वेवर लँडिंग करताना अडचणींत आणखीनच भर घालू शकतात.

8 ऑगस्ट 2020 रोजी कालिकत (कोळीकोड) विमानतळावर लँडिंगसाठी जात असलेलं विमान.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 8 ऑगस्ट 2020 रोजी कालिकत (कोळीकोड) विमानतळावर लँडिंगसाठी जात असलेलं विमान. टेकडीच्या माथ्यावर विमानतळ आहे, तर खाली एयर इंडियाचं अपघातग्रस्त विमान.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संस्था ICAO च्या शब्दकोशात टेबलटॉप रनवेचा उल्लेख नाही. पण भारतात अशा विशिष्ट भौगोलिक रचना असलेल्या विमानतळांसाठी हा शब्द वापरला जातो.

डीजीसीए म्हणजे भारतातील नागरी हवाई वाहतूक नियामक संस्थेच्या माहितीनुसार देशात केरळमधील कोळीकोड आणि कण्णूर, कर्नाटकातील मंगलोर इथले आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच मिझोरममधील लेंगपुई, हिमाचलमधील शिमला आणि सिक्कीममधील पॅक्याँग इथल्या विमानतळावर टेबलटॉप रन वे आहेत.

याआधी 2020 साली एअर इंडियाच्या IX1344 या दुबईहून आलेल्या विमानाला कोळीकोड विमानतळावर उतरताना अपघात झाला होता.

तर मंगलोरमध्ये 22 मे 2010 रोजी एयर इंडिया एक्स्प्रेस विमानाला असाच अपघात झाला होता आणि ते विमान रनवेवरून घसरून पुढे दरीत कोसळलं होतं.

नेपाळच्या लुकला इथून उड्डाण करणारे विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नेपाळच्या लुकला इथून उड्डाण करणारे विमान

जगात अमेरिका, पोर्तुगाल, फ्रान्ससह अनेक देशांत अशा प्रकारचे काही विमानतळ आहेत.

नेपाळमध्ये लुकला इथला तेनझिंग-हिलरी विमानतळ टेबलटॉप रन वे आणि पर्वतराजीमुळे जगातल्या सर्वात खडतर विमानतळांपैकी एक समजला जातो.

बारामतीचा विमानतळ कसा आहे?

बारामतीमधला विमानतळ हा टेबलटॅाप रनवे असल्याचं डीजीसीएनं कुठे अधिकृतपणे म्हटलेलं दिसत नाही, पण इथल्या रनवेच्या टोकाला उतार असल्याचं अपघातस्थळाच्या फोटोंमध्ये दिसतं.

ज्या रनवे 11 वर म्हणजे आग्नेय दिशेकडे जाणाऱ्या धावपट्टीवर अजित पवारांचं विमान उतरत होतं, तिथे रनवेच्या आधी एक डिप्रेशन म्हणजे दरीसारखा थोडा खोलगट भाग आहे.

त्यामुळे बारामतीच्या या विमानतळाला त्याच्या भौगोलिक स्थितीनुसार टेबलटॉप सदृश म्हणता येईल.

बारामतीत विमान कोसळलं ती जागा. वर माणसं उभी आहेत, तिथे रनवे आहे. हे विमान रनवेच्या थोडं डाव्या बाजूला खाली कोसळलं.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, बारामतीत विमान कोसळलं ती जागा. वर माणसं उभी आहेत, तिथे रनवे आहे. हे विमान रनवेच्या थोडं डाव्या बाजूला खाली कोसळलं.

बारामती शहरापासून साधारण दहा किलोमीटरवर गोजूबावी गावाजवळचा हा विमानतळ MIDC ने बांधला होता आणि तो 1996 पासून वापरात आहे.

451 एकरवर पसरलेल्या या विमानतळावरची धावपट्टी म्हणजे रन वे साधारण 1,770 मीटरचा असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

इतर मोठ्या विमानतळांसारखा हा सज्ज विमानतळ नाही, कारण याचा वापर लहान विमानांची वाहतूक आणि पायलट्सच्या ट्रेनिंगसाठी केला जातो.

तसंच इथल्या वैमानिक प्रशिक्षण अकादमीतील पायलट आणि प्रशिक्षकच येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांच्या संपर्कात राहतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारामतीतल्या विमानतळावर इंस्ट्रुमेंट लॅंडिंग सिस्टिम (ILS) नाही, हे अनेक तज्ज्ञांनी नमूद केलं आहे.

इंस्ट्र्यूमेंट लँडिंग सिस्टिम काय असते?

ILS ही रेडियो नेव्हिगेशन यंत्रणा आहे, जी विमानतळाजवळ आलेल्या विमानांना धावपट्टीवर योग्य ठिकाणी उतरण्यासाठी मार्गदर्शन करते.

रात्रीच्या अंधारात, किंवा खराब हवामानात दृश्यमानता कमी असताना ही सिस्टिम विमान योग्य आणि सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरण्यासाठी मदत करते.

साधारणपणे धावपट्टी वैमानिकांच्या दृष्टीक्षेपात येते, अशा अंतरावर ही यंत्रणा कार्यरत होते. त्यामुळे धावपट्टी नीट दिसली नाही, तर वैमानिक त्या क्षणी लँडिंग रद्द करून पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करतात.

बारामतीच्या विमानतळावर हवामानाची ताजी माहिती देणारी ऑटोमॅटिक यंत्रणाही कार्यरत नसल्याचं समोर आलं आहे.

विशेषतः दुर्गम भागातील विमानतळ तसंच टेबलटॉप रनवेवर उतरताना ILS सारखी यंत्रणा आणि ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स महत्त्वाची ठरू शकतात.

पण अनेकदा छोट्या एयरफील्ड्सवर अशा यंत्रणा कार्यरत नसतात आणि तिथे पायलटला या अद्ययावत उपकरणांच्या मदतीशिवाय रनवे नीट पाहूनच उतरावे लागते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बारामतीसारखे जे विमानतळ मुख्यतः वैमानिकांच्या ट्रेनिंगसाठी वापरले जातात, तिथे अशी यंत्रणा नसते - कारण सराव करणाऱ्या वैमानिकांना अशा उपकरणांशिवाय उड्डाण करण्याचं प्रशिक्षण घ्यायचं असतं.

अजित पवारांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून आता भारतीय हवाई दलानं बारामती विमानतळावर एयर ट्रॅफिक कंट्रोल आणि हवामानाची माहिती पुरवणारी यंत्रणा पुरवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कुठल्याही विमानासाठी टेक ऑफ म्हणजे उड्डाण आणि लँडिंग म्हणजे उतरणे या दोन प्रक्रिया सर्वात महत्त्वाच्या असतात आणि तेव्हाच अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते. अद्ययावत उपकरणं नसतील आणि टेबलटॉप रनवेसारखी भौगोलिक आव्हानं असतील, तर ही प्रक्रिया आणखी जटील बनते.

भारतीय हवाई दलातले माजी पायलट आणि सीनियर कमांडर महेश खैरनार ILS का महत्त्वाची आहे, याविषयी सांगतात,

"ILS किंवा इतर लँडिंग सिस्टिम्समुळे वैमानिकांचं वर्क लोड कमी होऊन जातं. खराब हवामान, कमी दृश्यमानता, भौगोलिक रचना अशा अनेक गोष्टींचं भान ठेवून उड्डाण करताना ही प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरते. कारण सगळं एकाच वेळी मॉनिटर करत वैमानिकांना उड्डाण करायचं असतं."

"फक्त ILS सारखी यंत्रणा विमानतळावर असून उपयोगाची नसते, तर तिथे उतरणारी विमानंही त्यासाठी कम्पॅटिबल आहेत ना, हे महत्त्वाचं ठरतं."

बारामतीसारख्या विमानतळांवर मोठ्या हवाई कंपन्यांसारखे शेड्यूल्ड ऑपरेटर्स चालत नाहीत. म्हणजे वेळापत्रकानुसार नियमित वाहतूक होत नाही. तिथे क्वचितच महत्त्वाच्या विमानांचं लँडिंग होतं.

त्यामुळे या विमानतळावर अशा यंत्रणा बसवलेल्या दिसत नाहीत. याचं आणखी एक कारण म्हणजे ही यंत्रणा बरीच महाग असते.

टेबलटॉप रन वे का आहेत धोक्याचे?

हवाई वाहतूक तज्ज्ञ नितीन जाधव यांनी 2020 मध्ये कोळीकोडमधील अपघातानंतर बीबीसीशी बोलताना टेबलटॉप धावपट्ट्यांच्या सुरक्षिततेवर भाष्य केलं होतं.

"टेबलटॉप रन वे वर सावधगिरी बाळगूनच लँडिंग करावं लागतं. पठारावरील रनवेवर उतरण्यासाठी वैमानिकांना विशेष प्रशिक्षण घ्याव लागतं.

"माझी भारत सरकारला एकच विनंती आहे. जिथे जिथे असे विमानतळ आहेत, तिथे काही ना काही तांत्रिक उपाय करता येण्यासारखे असतील ते लवकरात लवकर करा, म्हणजे असे अपघात पुन्हा होणार नाहीत,"

कोळीकोडमधल्या अपघातानंतरचं दृश्य.

फोटो स्रोत, SN Rajeesh

फोटो कॅप्शन, कोळीकोडमधल्या अपघातानंतरचं दृश्य.

टेबलटॉप विमानतळांवर रन वे एण्ड सेफ्टी एरिया वाढवणं, ILS बसवणं, असे उपाय करण्याची चर्चा वारंवार झाली आहे, आणि मोठ्या विमानतळांवर तशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

2022 मध्ये देशातल्या अन्य टेबलटॉप रन वेंचा सुरक्षा आढावा DGCA नं सुरू केला होता.

अशा आव्हानात्मक धावपट्ट्यांवर कसं उतरायचं याची स्टँडिंग ऑपरेटिंग प्रोसिजर – नियमावली तयार केली जाते, पण ती सातत्यानं अपडेट करणं, स्थानिक हवामानाची ताजी माहिती वैमानिकांनी मिळणं आणि लँडिंगसाठी शक्य तेवढी सपोर्ट सिस्टिम उभारणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

भारतात एकीकडे हवाई वाहतूक क्षेत्रात वाढ होते आहे, आणि गेल्या दशकभरात अनेक लहान ठिकाणी विमानतळ उभारण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे अधिक बारकाईनं लक्ष देण्याची गरज असल्याचं वारंवार बोललं जातं.

"पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे की सामान्य माणसालाही उड्डाण करता यावं आणि त्याअंतर्गत UDAN (उडे देश का आम नागरीक) योजना लागू करण्यात आली. त्यामुळे अनेक लहान विमानतळ उभारण्यात येत आहेत, ही चांगलीच गोष्ट आहे.

"पण त्याचवेळी अशा लहान विमानतळांवर उतरण्यासाठी किंवा टेकऑफसाठी आणखी चांगल्या सुविधा कशा मिळतील, त्याक्षणीच्या ताज्या हवामानाची माहिती कशी मिळत राहील हेही पाहायला हवं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)