या 'फ्रेंच' लोकांना परत अफ्रिकेत का जायचंय?

    • Author, नूर अबिदा, नताली जिमेनेझ आणि कर्टनी बेंब्रिज
    • Role, बीबीसी आफ्रिका आय

39 वर्षीय मेंका गोमिसचा जन्म फ्रान्समधलाच. फ्रान्सचा तो अधिकृत नागरिक आहे‌. पण त्याने आता सेनेगलला स्थायिक होण्याचा निर्णय घेतलाय.

त्याचे आई - वडील आणि इतर पूर्वज आफ्रिकेतील सेनेगलमधूनच युरोपात आले होते.

आता चांगलं आयुष्य जगण्याच्या शोधात तो पुन्हा सेनेगलला परतत आहे. फ्रान्सपेक्षा सेनेगलमध्ये आपल्याला भविष्यात जास्त संधी मिळतील, असं त्याला वाटतं.

फ्रान्स सोडून आफ्रिकेत जाऊ पाहणारा, गोमिस हा एकटा नाही. मागच्या काही काळात फ्रान्सला निरोप देऊन आफ्रिकेत स्थलांतर करणाऱ्या, आफ्रिकन वंशाच्या फ्रेंच नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे.

यामागे अनेक कारणं आहेत. पण फ्रान्समधील वाढता वर्णद्वेष आणि अतिरेकी राष्ट्रवाद ही यामागची प्रमुख दोन कारणं म्हणता येतील. या वाढत्या वर्णद्वेषामुळे फ्रान्समध्येच जन्मलेल्या आणि फ्रान्सचे अधिकृत नागरिक असलेल्या कृष्णवर्णीयांचं जगणं कठीण झालं आहे.

फ्रान्समधील आफ्रिकन वंशाच्या नागरिकांना आपल्याच देशात सुरक्षित आणि आनंदी वाटत नाही. त्यामुळे हे लोक मोठ्या संख्येनं आपल्या पूर्वजांच्या आफ्रिकन देशांमध्ये परतत आहेत.

बीबीसीने या स्थलांतराच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. 'मूक निर्गमन' नावानं हे स्थलांतर ओळखलं जात आहे. फ्रान्समध्ये जन्मलेले हे नागरिक आपल्याच देशात सुखी नसणं ही तशी चिंतेचीच गोष्ट म्हणावी लागेल.

मेंका गोमिस हा पॅरिसचा राहिवासी आहे. तो इथे एक स्वतःची छोटी ट्रॅव्हल एजन्सी चालवतो. फ्रान्समधून आफ्रिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना प्रवासाची सोय करुन देणं हे त्याचं काम आहे. नुकतंच सेनेगल मध्ये सुद्धा आपल्या कंपनीचं नवीन कार्यालय देखील त्याने सुरू केलंय.

“माझा जन्म याच देशात झाला होता. मी लहानाचा मोठा फ्रान्समध्येच झालो. पण इथली सामाजिक परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल नाही, हे मान्य करावंच लागेल. फ्रान्समध्ये वर्णद्वेष प्रचंड आहे. मी लहानपणापासून या वर्णद्वेषाचे चटके सोसत आलेलो आहे.

मला आठवतंय मी 6 वर्षांचा होतो तेव्हा पहिल्यांदा मला शाळेत निग्रो म्हणून हिणवलं गेलं. दक्षिण फ्रान्समधील बंदरावर वसलेल्या मर्सेली शहरातील शाळेत मी शिकायला होतो. त्यानंतर आजतागायत एकही दिवस असा गेला नसेल की मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात वर्णद्वेषाचा सामना केला नसेल.

माझा जन्म जरी फ्रान्समध्ये झालेला असला तरी मी मूळचा इथला नाही याची जाणीव मला वेळोवेळी करून दिली गेली,” बीबीसीशी बोलताना गोमिस म्हणाला.

गोमिसचे पूर्वज मूळचे आफ्रिकेतील सेनेगल देशाचे होते. गोमिसच्या आईने लहानपणीच सेनेगलमधून फ्रान्समध्ये स्थलांतर केलं होतं. त्यामुळे आपला मुलगा आता पुन्हा सगळा परिवार आणि मित्र मागे सोडून आफ्रिकेत का परतत आहे? हा त्याच्या आईलाही पडलेला मोठा प्रश्न आहे.

याचं स्पष्टीकरण देताना गोमिस म्हणाला की, “आफ्रिका देखील कधीकाळी आजच्या अमेरिकेप्रमाणे समृद्ध आणि सधन होता. आज जरी आफ्रिकेची परिस्थिती बिकट असली तरी त्यात वेगाने सुधारणा होत आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आफ्रिका वेगाने प्रगती करेल. फ्रान्सपेक्षा आफ्रिकेत मला भविष्यात चांगल्या संधी मिळतील.

कारण आधीच विकसित असलेल्या युरोपियन देशांपेक्षा विकसनशील आफ्रिका माझ्यासारख्या छोट्या उद्योजकांना चांगल्या संधी प्रदान करू शकते‌. शिवाय काहीही झालं तरी तो माझ्या पूर्वजांचा प्रदेश आहे. त्यामुळे आफ्रिकेविषयी मला कायमच एक प्रकारचं ममत्व आणि आपल्या मूळ देशाप्रती एक जबाबदारीची जाणीव देखील वाटत आहे. ती पूर्ण करण्यासाठीच मी सेनेगलला परतण्याचा निर्णय घेतला आहे.”

सेनेगल आणि फ्रान्समधील संबंधांचा इतिहास तसा पाहिला तर फार जुना आणि तितकाच क्लिष्ट आहे. सेनेगल हे एक मुस्लीमबहुल राष्ट्र आहे.

एकेकाळी ती फ्रान्सची वसाहत होती. फ्रान्सने सेनेगलवर लादलेला वसाहतवाद आणि त्यातून झालेला गुलामांचा व्यापार या वेदनादायी इतिहासाची पार्श्वभूमी देखील या दोन देशांमधील संबंधांना आहे.

युरोपमधून आफ्रिकेत होणारं स्थलांतर ही तशी दुर्मिळ आणि नवीन गोष्ट आहे. स्थलांतरितांचा लोंढा खरं तर आफ्रिकेतून युरोपमध्ये वाहण्याचं प्रस्थ आहे. गरिबी आणि भूकबळीने ग्रासलेले सेनेगलमधील लोक चांगल्या आयुष्याच्या शोधात किती धोके पत्करुन बोटीने समुद्र पार करत युरोपात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, याचा एक सविस्तर आढावा आपल्या शोध पत्रकारितेतून काही दिवसांपूर्वी बीबीसीने घेतला होता.

आफ्रिकेतून समुद्रामार्गे जीव धोक्यात घालून युरोपात येणारे यातले काही निर्वासित फ्रान्समध्ये सुद्धा आश्रयाला येतात. निर्वासितांच्या सुरक्षिततेसाठी काम करणाऱ्या फ्रान्स सरकारच्या मंत्रालयानं दिलेल्या आकडीवारीनुसार मागच्या एकाच वर्षात फ्रान्समध्ये आश्रय मागणाऱ्या आफ्रिकन निर्वासिताची संख्या 1,42,500 इतकी आहे.

इतक्या मोठ्या निर्वासितांचा लोंढा स्वीकारणं फ्रान्सला शक्य नाही. तरीही यापैकी एक तृतीयांश लोकांच्या आश्रयाच्या विनंतीला आम्ही मान दिला, असं फ्रान्सचं सरकार सांगतं.

आफ्रिकेतून फ्रान्समध्ये इतक्या मोठ्या संख्येनं येणारा हा निर्वासितांचा लोंढा फ्रान्समधील राजकारण तापवणारा विषय ठरत आहे. बाहेरून येणारे हे स्थलांतरितांचे लोढे रोखण्यासाठी फ्रान्समधील अति उजव्या राष्ट्रवादी विचारसरणीचे लोक प्रयत्न करत आहेत. या अति उजव्या विचारसरणीला मिळणारा वाढता लोकानुनय आणि त्या अनुषंगाने मिळालेला राजकीय वरदहस्त फ्रान्समधील कायद्यांमध्येही परावर्तित होताना दिसत आहे.

स्थलांतरितांवर अनेक निर्बंध लादणारे नवीन कायदे फ्रान्सच्या सरकारनं अति उजव्या विचारसरणीच्या दबावात येऊन पारित केले आहेत. फ्रान्सचे नवनियुक्त पंतप्रधान मिशेल बर्निअर यांनीसुद्धा पदग्रहण केल्यानंतर स्थलांतरावर रोख लावण्यासाठी कायदे आणखी कडक करणार असल्याचं आश्वासन दिलं.

आफ्रिकेतून युरोपात जाण्यासाठी तिथले लोक इतके उतावीळ असताना युरोपातून आफ्रिकेत होणारं हे उलट स्थलांतर अनेकांसाठी आश्चर्याची बाब आहे. आता हे उलट स्थलांतर करणाऱ्या लोकांची संख्या नेमकी किती आहे, याची अधिकृत आकडेवारी समोर येऊ शकत नाही.

कारण हे स्थलांतर फक्त आफ्रिकन वंश अथवा मुस्लीम धर्मीयच करतात. आणि वर्ण, वंश अथवा धर्माच्या आधारावर विभागलेली आकडेवारी मोजण्यावर अथवा प्रसिद्ध करण्यावर फ्रान्सचा कायदा आक्षेप घेतो. पण फ्रान्समधील उच्चशिक्षित असणारे मुस्लीम धर्माचे लोक, स्थलांतरितांची मुलं आणि कृष्णवर्णीय नागरिकच मोठ्या प्रमाणावर असं स्थलांतर करत असल्याचं अनेक अहवाल सांगतात.

आफ्रिकेतून फ्रान्समध्ये येणाऱ्या स्थलांतरितांविरोधात वाढता रोष फ्रान्समधील वर्णद्वेषाला बळकटी देत आहे. या वर्णद्वेषाचे चटके फ्रान्सचेच नागरिक असलेल्या आफ्रिकन वंशाच्या लोकांनाही बसत आहेत. फ्रान्समधून पुन्हा आफ्रिकेकडे परतण्यामागे हेसुद्धा एक कारण असल्याचं यातल्या अनेकांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

34 वर्षीय फॅन्टा गुरेसीने आपलं संपूर्ण आयुष्य फ्रान्समध्येच व्यतीत केलेलं आहे. पॅरिसबाहेरील व्हिलेमोम्बल गावात ती परिचारिका म्हणून काम करते. पण आता तिने सेनेगलला परतायचं ठरवलं आहे. तिचा जन्म आणि सगळं आयुष्य फ्रान्समध्येच गेलेलं असलं तरी तिच्या आईचा जन्म सेनेगल मध्येच झाला होता. इतका मोठा निर्णय घेण्यामागचं कारण ती सांगते,

“दुर्दैवानं मागच्या काही वर्षांपासून फ्रान्स हा देशच आमच्यासाठी वरचेवर असुर‌क्षित बनत चालला आहे. सांगताना वाईट वाटतं पण हेच कटू सत्य आहे. मला एक 15 वर्षांचा मुलगा आहे. दिवसागणिक मी अशा बातम्या पाहते/वाचते की काळजीने माझा जीव खालीवर होतो. काही दिवसांपूर्वीच माझा मुलगा रस्त्यावर त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत असताना पोलिस आले आणि जणू काही गुन्हेगार असल्याप्रमाणं त्यांनी माझ्या मुलाची चौकशी केली. सततचे असे अनुभव आणि टीव्हीवरील बातम्या पाहून मला माझ्या मुलाची काळजी सतावत राहते. एका आईसाठी तिच्या मुलाच्या सुरक्षेइतकं दुसरं काहीच महत्वाचं नसतं.”

या बातम्याही वाचा:

मागच्याच वर्षी जून महिन्यात फ्रेंच पोलीसांनी 17 वर्षांच्या नाहेल मर्झोकची गोळी झाडून हत्या केली. तो अल्जेरियन वंशाचा होता. या घटनेमुळे कृष्णवर्णीयांविरूद्ध पोलीस करत असलेल्या हिंसाचार अधोरेखित झाला. देशभरात या घटनेमुळे वादंग उठला. दंगली उसळल्या. अशा घटना फॅन्टा गुरेसीसारख्या कृष्णवर्णीय पालकांसाठी धोक्याचा इशारा बनून घोंघावत राहतात.

हा खटला अजूनही न्यायप्रविष्ट आहे. पण या घटनेनं फ्रान्स हादरुन गेलं होतं. नाहेलच्या हत्येनंतर देशभरात दंगल आणि हिंसाचार झाला. नाहेलची हत्या हे फक्त एक निमित्त होतं. गेल्या अनेक वर्षांपासून फ्रासमध्ये कृष्णवर्णीयांसोबत होणारा भेदभाव आणि अत्याचारामुळे लोकांमधील असंतोष वरचेवर वाढत चालला होता‌. नाहेलच्या हत्येनंतर या असंतोषानं उग्र रूप धारण केलं.

काही दिवसांपूर्वीच फ्रान्समधील कृष्णवर्णीयांचं एक सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांपैकी 91 टक्के लोकांनी आपल्याला कधी ना कधी वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचं सांगितलं. ही आकडेवारी फ्रान्समधील वाढत्या वर्णद्वेषाचं धगधगीत वास्तव अधोरेखित करते.

नाहेलच्या हत्येनिमित्त उसळलेल्या दंगलीनंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगानं फ्रान्समधील वर्णद्वेषी हिंसेच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत पोलीस प्रशासनाची कान उघडणी केली होती. फ्रान्समधील सुरक्षा व्यवस्थाच आपल्या नागरिकांसोबत वर्णद्वेषी व्यवहार करत असल्याचा आरोप थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडून केला गेला.

फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र हे सर्व आरोप धुडकावून लावले. “फ्रान्सच्या पोलीस व्यवस्थेत वर्णभेद केला जात असल्याचे सगळे आरोप निराधार आहेत. फ्रेंच सरकार आणि पोलीस प्रशासन वर्ण किंवा इतर कुठल्याही आधारावर होणाऱ्या भेदभावाविरोधात कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे,” अशा शब्दात फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयानं संयुक्त राष्ट्रसंघाला डच्चू दिला.

मूळच्या कॉंगोलीस वंशाच्या ऑड्रे मोझिम्बा फ्रान्समध्ये शाळेत शिक्षिका आहेत. फ्रान्समध्ये घडणारे सामाजिक बदल कृष्णवर्णीय नागरिकांमधील अस्वस्थता वाढवत असल्याचं त्या सांगतात. पॅरिस बाहेरील एका गरिब कामगार वस्तीत त्या राहतात. या वस्तीमध्ये विविध वंशाचे लोक राहतात. दररोज त्या बस आणि ट्रेन पकडून कामाला जातात.

त्या दिवशी बीबीसीची टीमसुद्धा त्यांच्यासोबत प्रवास करत होती. सोबत त्यांची लहान मुलगी सुद्धा होती. शाळा जवळ आली तसं त्यांनी इतक्या वेळ चेहरा आणि डोक्याभोवती गुंडाळलेला आपला बुरखा काढून गुपचूप बॅगेत ठेवला. कामाच्या ठिकाणी आपली मुस्लीम ही ओळख न दाखवणंच त्यांना शहाणपणाचं वाटत असावं.

धर्मनिरपेक्ष फ्रान्समध्ये हिजाब परिधान करणं ही कायमच वादाला आमंत्रण देणारी गोष्ट राहिलेली आहे. 20 वर्षांपूर्वीच फ्रान्समधील सगळ्या सरकारी शाळांमध्ये हिजाब परिधान करण्यास बंदी घातली गेली होती. फ्रान्स सोडून सेनेगलला स्थलांतरित होण्यामागे हे सुद्धा एक कारण मोझिम्बा सांगतात.

“फ्रान्समध्ये मला काही स्थानच नाही, असं माझं म्हणणं नाही. पण जिथे माझ्या श्रद्धा आणि अस्मितेला जागा दिली जाईल, अशा ठिकाणी जाण्याची माझी इच्छा आहे. माझा धर्म आणि मूल्यव्यवस्थेचा आदर केला जाईल, असं वातावरण मला हवं आहे. जिथे मी मला हवा ते पेहराव घालून कामाला जाऊ शकेल. जिथे भीतीपोटी हिजाब काढून ठेवण्याची गरज पडणार नाही,” 35 वर्षांच्या ऑड्रे मोझिम्बा आमच्याशी बोलताना म्हणाल्या.

फ्रान्समधील मुस्लीमद्वेष मागच्या काही काळात प्रचंड वाढला आहे. फ्रान्स सोडून इतर देशांमध्ये स्थलांतर केलेल्या 1000 फ्रेंच मुस्लिमांचं नुकतंच सर्वेक्षण केलं गेलं. या सर्वेक्षणातील भाग घेतलेल्या बहुतांश जणांनी फ्रान्समधील मुस्लीम द्वेष वरचेवर आणखी कडवा होत असून त्यामुळे फ्रेंच मुस्लीम नागरिक फ्रान्स सोडून जात असल्याचं सांगितलं.

2015 साली इस्लामिक मूलतत्ववाद्यांनी पॅरिसमधील विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ला केला. यात 130 लोक मारले गेले. या घटनेनं फ्रान्स हादरुन गेला. तेव्हापासून फ्रान्समधील मुस्लीम द्वेषाने जोर पकडला आहे.

ओलिव्हर इस्टेवेस मुस्लीमद्वेषामुळे होणाऱ्या या स्थलांतराचे अभ्यासक आहेत. त्यांनी या विषयावर ‘Report France, You Love It But You Leave It’ नावाने एक सविस्तर अहवालाच प्रसिद्ध केला आहे. बीबीसीशी बोलताना ओलिव्हर म्हणाले की, “ धर्मनिरपेक्षतेचा एककल्ली अट्टाहास आणि नोकरीच्या ठिकाणी केला जाणारा भेदभाव हे दोन घटक या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत.

या मुस्लीम द्वेषामुळे फ्रेंच मुस्लीमांना स्थलांतर करायला भाग पाडलं जात आहे. यातून शेवटी फ्रान्सचंच नुकसान होणार आहे. कारण स्थलांतर करणारे हे बहुतांश फ्रेंच मुसलमान उच्चशिक्षित आहेत. इतक्या मोठ्या संख्येनं हे लोक देश सोडून गेले तर फ्रान्स या कुशल मनुष्यबळाला मुकणार आहे.”

“बऱ्याच वर्षांपूर्वी माझा जन्म होण्याआधीच माझे वडिल आफ्रिकेतून इथे आले होते. आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी रोजगाराच्या शोधात ते इथे आले. इथेच त्यांनी आमचं पालन पोषण केलं. स्वतःचं आणि आमचं आयुष्य घडवलं. पण ते मला नेहमी सांगायचे की तुझं मूळ कधी विसरू नकोस. मी वडिलांचे ते शब्द अजूनही विसरलेले नाही,” फटोमाटा म्हणाली.

पॅरिसमध्येच जन्मलेल्या आणि वाढलेल्या 34 वर्षीय फटोमाटा सायला ओलिव्हर मांडत असलेल्या या विश्लेषणाचं प्रातिनिधिक उदाहरण आहेत. फटोमाटा पेशाने एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे.

पुढच्या महिन्यात त्या आपलं बस्तान फ्रान्समधून सेनेगलमध्ये हलवणार आहेत. आपल्या कौशल्याचा वापर करुन पश्चिम आफ्रिकेत नवीन व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. आपलं मूळ आणि वारसा त्या विसरलेल्या नाहीत. आफ्रिकेच्या विकासात योगदान देण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण त्यांचे बंधू अब्दुल यांना आपल्या बहिणीचा निर्णय काही पटलेला नाही.

“मला तिची चिंता वाटते. पण तो सर्वस्वी तिचा निर्णय आहे. तिला जे हवंय ते मिळावं ही माझी मनोमन इच्छा आहे. पण आफ्रिकेत जाण्यामागचा तिचा तर्क मला कळत नाही. आमचं सगळं आयुष्य फ्रान्समध्येच गेलेलं आहे. अफ्रिकेशी तसं पाहता आमचं काही नातं उरलेलं नाही. फक्त आमचे पूर्वज आफ्रिकेत राहत होते. आम्ही तर फ्रान्समध्येच जन्मलो. लहानाचे मोठे झालो. त्यामुळे पुन्हा आपल्या मूळाकडे परत जायचा युक्तीवाद मला तरी पटलेला नाही. आफ्रिका म्हणजे काही आमचं मूळ नव्हे. तिथल्या संस्कृती आणि वातावरणाशी आम्ही दोन्ही भावंडं आता अनभिज्ञ आहोत. पण माझी बहिण कुठलं दिवास्वप्न घेऊन आफ्रिकेत निघाली आहे, हे कळायला मार्ग नाही. ब्लॅक पँथर अथवा कॉमिक बूक्समध्ये रेखाटलेल्या वकांडाची रम्य कल्पना घेऊन कदाचित ती निघाली आहे. पण ते काय वास्तव नव्हे. आफ्रिकेशी आता आमचं काही नातं फारसं उरलेलं नाही,” आपल्या बहिणीविषयी असलेली चिंता आणि असहमती अब्दुलच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होती.

सेनेगलची राजधानी असलेल्या डाकारमध्ये आमची भेट 35 वर्षांच्या सलामाटा कोन्टे यांच्यासोबत झाली. गोमिस यांनी सुरू केलेल्या ट्रॅव्हेल एजेन्सीत त्या व्यवसायिक भागिदार आहेत. फ्रान्समधून स्थलांतर करत आफ्रिकेत स्थायिक होऊन नवा व्यवसाय उभारण्यामागचा त्यांचा उद्देश समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

सेनेगल मध्ये येऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याआधी सलामाटा पॅरिसमधील एका बँकेत उच्च पदी चांगल्या पगारावर कामाला होत्या.

“3 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा फ्रान्समधून सेनेगल मध्ये आले. मूळची सेनेगलची असून देखील जेव्हा इथले लोक मला 'फ्रेंची' म्हणून हिणवायला लागले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. माझा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. पण वर्णावर आधारित भेदभावामुळे फ्रान्समध्ये मी नाकारले गेले. इथे मूळ देशात आल्यावर इथले माझे लोकही मला आपलं मानायला तयार होत नव्हते. मला वाटलं की कुठे अडकून पडले आहे. इकडे आड तिकडे विहीर, अशी माझी स्थिती झाली होती,” सलामाटा सेनेगल मध्ये आल्यावर त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे सांगत होत्या.

“इथे येऊन राहायचं असेल तर काही गोष्टी समजून घेणं तुम्हाला भाग आहे. पहिली म्हणजे नम्रपणा बाळगायला तुम्ही शिकलं पाहिजे. अन्यथा इथले लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत. हा माझा पहिला धडा होता. पण एक महिला उद्योजक म्हणून या नवीन देश आणि संस्कृतीशी जुळवून घेणं मला अजूनही अवघड जात आहे. विशेषत: इथले लोक पुरूषसत्ताक मानसिकतेचे आहेत. इथल्या पुरूषांना एका महिलेनं नेतृत्व केलेलं आवडत नाही. एक महिला कंपनीची सीईओ असू शकते, ही गोष्टच त्यांना पटत नाही. या लिंगभेदाचे कटू अनुभव मी आजही घेत असते. इथला माझ्या गाडीचा ड्रायव्हर देखील एक महिला मला आदेश कसा काय देऊ शकते? अशा अर्विभावात वागू लागतो. उद्योग क्षेत्रात नेतृत्व करणारी एक यशस्वी महिला, ही बाब इथल्या पुरूषी मानसिकतेला रूचणारी नाही. त्यामुळे असे अनेक विचित्र अनुभव मला इथे येत असतात. फ्रान्समध्ये स्थलांतरित कृष्णवर्णीय म्हणून जगणं कठीण झालं होतं‌. पण इथे एक महिला म्हणून उद्योग क्षेत्रात पाय रोवण्यातही अनेक आव्हानं आहेत. पण मी हार मानलेली नाही. कुठल्याही क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणं महिलांसाठी पुरूषांपेक्षा जास्त कठीण आहे. पण मी हे आव्हान आता स्वीकारलंय,” अडचणींमधून मार्ग काढत यशस्वी होण्याचा दृढनिश्चय सलामाटाच्या बोलण्यातून झळकत होता.

सेनेगलमध्ये स्थायिक होऊन त्यांना आता 3 वर्ष होत आली आहेत. लवकरच त्यांना सेनेगलचं अधिकृत नागरिकत्वसुद्धा मिळेल.

सलामाटाचा ट्रॅव्हल एजन्सीचा व्यवसाय अगदी उत्तम सुरू आहे. तिने आता पुढच्या उपक्रमाची तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. खास सेनेगलसाठी नवं डेटिंग ॲप बनवण्याची आपली कल्पना आता प्रत्यक्षात आणण्याचा मार्गावर ती आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)