असरानी : 'कॉमेडीचा अर्थ फक्त हसवणं नाही' असं म्हणणारा विनोदवीर, असा होता प्रवास

अभिनेते असरानी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, अभिनेते असरानी

अभिनेते असरानी यांचं वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. असरानी यांचे खासगी सचिव बाबूभाई यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

बाबूभाई यांच्या माहितीनुसार, असरानी गेल्या चार दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात उपचार घेत होते. आज (20 ऑक्टोबर) दुपारी सुमारे 3 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान त्यांचं निधन झालं.

मुंबईच्या सांताक्रूझ भागातील शास्त्रीनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह जवळचे लोक उपस्थित होते.

असरानी 84 वर्षांचे होते. त्यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी होतं. 1941 साली राजस्थानमधील जयपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता.

'कॉमेडीचा अर्थ फक्त हसवणं नाही'

याच वर्षी ऑगस्ट महिन्यात बीबीसी हिंदीच्या 'कहानी जिंदगी की' या मुलाखतपर कार्यक्रमात अभिनेते असरानी यांची मुलाखत पार पडली. यात त्यांनी त्यांच्या प्रवासातील अनेक प्रसंग उलगडले होते.

एफटीआयआयमधून बाहेर पडून संघर्ष, नंतर शिक्षण आणि त्यानंतर सातत्याने ऑडिशन देणे अशा गोष्टींनी त्यांच्या प्रवासाला आकार दिला. कदाचित म्हणूनच भूमिका लहान असो वा मोठी, त्यांनी त्या नेहमी पूर्ण आदराने आणि तयारीने साकारल्या.

असरानी यांनी या मुलाखतीत सांगितलं की, "माझ्या दृष्टीने कॉमेडी म्हणजे फक्त हसवणं नव्हे, तर सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. हसण्याच्या माध्यमातून माणूस आपल्या भीतीतून, दांभिकतेतून आणि रूढ चौकटीतून बाहेर पडतो."

अभिनेते असरानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेते असरानी

असरानी असे एक अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या कलेतून हिंदी सिनेमाला हलक्या-फुलक्या विनोदाची प्रतिष्ठा तर शिकवलीच, पण एक चरित्र अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी छाप कशी उमटवायची हेही दाखवून दिलं.

'शोले'मधील 'जेलर' घराघरात पोहोचला

'आज की ताजा खबर'मधील त्यांच्या अफलातून कामगिरीसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कारही मिळाला होता. 'रफूचक्कर', 'बालिका वधू', 'पति, पत्नी और वो' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची बहुरंगी कॉमिक टायमिंग पाहण्यासारखी होती.

मग सर्वात सुपरहिट सिनेमा, अर्थात 'शोले' आणि त्यातील इंग्रजांच्या काळातील 'जेलर'.

शोले सिनेमातील असरानी यांची भूमिका छोटी असली, तरी त्यांचा संवाद असंख्या सिनेरसिकांच्या आजही तोंडपाठ आहे. तो संवाद म्हणजे, "हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं…"

या पात्राच्या बॉडी लँग्वेजमध्ये हिटलरची झलकही दडलेली होती.

अभिनेते असरानी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेते असरानी

असरानी यांनी या जेलरला फक्त विनोद म्हणून नव्हे, तर सत्तेच्या विचित्र आणि हास्यास्पद स्वरूपाच्या रूपात साकारले.

असरानी यांची जीवनदृष्टी अगदी सोपी आणि थेट आहे, ते म्हणत, "काम करत राहा, संधी आपोआप निर्माण होतात."

पुण्यात घेतलं अभिनयाचं शिक्षण

मॅट्रिकच्या शिक्षणादरम्यान त्यांना सिनेमात काम करावं वाटलं म्हणून ते मुंबईला निघून आले. मात्र, दोन वर्षे दिशाहीन भटकंती केल्यानंतर ते परत जयपूरला गेले.

कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजेच आजच्या एफटीआयआयमध्ये प्रवेश घेतला आणि अभिनयाचा कोर्स पूर्ण केला.

प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी ते पुण्याहून मुंबईला जात, निर्मात्यांना भेटत. सातत्याने प्रयत्न करत राहण्याची ही त्यांची सवयच पुढे त्यांची ओळख ठरली.

सुरुवातीला त्यांना लहान-मोठ्या भूमिका मिळाल्या, पण सत्तरचं दशक असरानींसाठी सिनेसृष्टीतल्या पदार्पणासाठी महत्त्वाचं ठरलं.

'गुड्डी', 'बावर्ची', 'नमक हराम', 'चुपके चुपके', 'अभिमान' अशा चित्रपटांमध्ये त्यांची हजेरी त्या त्या कथानकाला हलकी-फुलकी, मानवी आणि संस्मरणीय बनवून टाकायची.

जयपूर जन्मभूमी, मुंबई कर्मभूमी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'कहानी जिंदगी की' या बीबीसी हिंदीच्या कार्यक्रमात असरानी यांनी सांगितले होते की, त्यांचे वडील जयपूरमधील एका कार्पेट कंपनीचे मॅनेजर होते आणि त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण जयपूरमध्ये झाले होते.

त्यांनी सांगितले होते की, मी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांनी सिनेमांत जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सुरुवातीच्या काळातील प्रयत्नांनंतरही त्यांचा सिनेमांचा प्रवास सुरू होऊ शकला नाही. यानंतर त्यांनी ठरवलं की, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे घ्यायचे.

जयपूरच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी दोन-तीन वर्षे काम केले आणि त्यानंतर पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला.

पुण्यात असरानींना अभिनयातील प्रसिद्ध शिक्षक रोशन तनेजा यांनी शिकवले. त्यांनी म्हटलं होतं, "फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचल्यानंतर मला समजले की अभिनयामागे काही पद्धती असतात. हा व्यवसाय एखाद्या शास्त्रासारखा आहे. तुम्हाला प्रयोगशाळेत जावं लागेल, प्रयोग करावे लागतील."

अभिनयात बाह्य मेकअपशिवाय इनर मेकअप देखील खूप महत्वाचा आहे, हे आपल्या समजल्याचं ते म्हणाले होते.

असरानी यांनी मुलाखतीत अभिनेता मोतीलाल यांच्याकडून शिकलेल्या धड्यांचीही आठवण करून दिली होती. ते म्हणाले होते की, "एकदा अभिनेता मोतीलाल पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पाहुणे म्हणून आले होते. माझ्या अभिनयची झलक पाहून त्यांनी मला विचारलं, "तू राजेंद्रकुमारचे सिनेमे खूप बघतोस का? त्यांची नक्कल करत आहेस. आम्हाला चित्रपटांमध्ये कॉपी नको आहे."

"हा एक मोठा धडा होता. मोतीलाल यांचा अर्थ असा होता की तुमच्यात असलेली प्रतिभा बाहेर आणा."

अशी मिळाली सिनेमात पहिली संधी

असरानी यांनी सांगितले होते की, दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एडिटिंग शिकवण्यासाठी येत असत. एक दिवस त्यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्याकडे स्वत:साठी संधी मागितली, पण त्या दिवशी हे प्रकरण पुढे सरकले नाही .

काही दिवसांनी ऋषिकेश मुखर्जी 'गुड्डी' या चित्रपटातील गुड्डीच्या भूमिकेसाठी मुलीच्या शोधात फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. त्यांनी असरानी यांना जया भादुरीबद्दल विचारले आणि त्यांना फोन करण्यास सांगितले. ऋषिकेश मुखर्जी यांच्या टीमसोबत त्या दिवशी लेखक गुलजार देखील आले होते.

असरानी म्हणाले होते की, "हृषिकेश मुखर्जी जया भादुरींशी बोलताना पुढे गेले होते, म्हणून मी गुलजार यांच्याशी माझ्यासाठी एका छोट्या भूमिकेबद्दल बोललो. त्यानंतर मी हृषिकेश मुखर्जी यांच्याकडे याच भूमिकेसाठी विचारलं आणि अखेर मला ती भूमिका मिळाली."

ते म्हणायचे, "हा चित्रपट हिट झाला. तेव्हा मनोजकुमार यांनी माझी नजर पडली. त्यांना वाटलं की याला पण घेऊया, असं करत करत मला चार-पाच सिनेमे मिळाले आणि तिथूनच माझ्या करिअरला सुरुवात झाली."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)