बॉडीबिल्डरचा 42 व्या वर्षी मृत्यू; फक्त शाकाहारी अन्न खाऊन मिळवलं होतं बॉडीबिल्डिंगमध्ये यश

वरिंदर सिंग घुमन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले होते

फोटो स्रोत, Varinder Ghuman/FB

फोटो कॅप्शन, वरिंदर सिंग घुमन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले होते

पंजाबचे प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू (बॉडीबिल्डर) आणि अभिनेते वरिंदर सिंग घुमन यांचं निधन झालं आहे. ते सलमान खानच्या 'टायगर 3' मध्येही त्यांनी भूमिका केली होती.

अमृतसरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होत असताना वरिंदर सिंग यांचा मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी सांगितलं की गुरुवारी (9 ऑक्टोबर) वरिंदर अमृतसरमधील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले होते. मात्र संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची बातमी आली.

वरिंदर घुमन यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि तीन अपत्यं (दोन मुलं आणि एक मुलगी) आहेत.

वरिंदर सिंग घुमन शेती आणि डेअरी व्यवसायातदेखील होते.

बीबीसीचे प्रतिनिधी प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षांचे वरिंदर घुमन गुरदासपूर जिल्ह्यातील होते. त्यांचा जन्म गुरदासपूरमधील तलवंडी जुगला गावात झाला होता. 1988 मध्ये ते जालंधरमधील काई नगर (मॉडेल हाऊस) मध्ये वास्तव्यास गेले होते.

त्यांनी लायलपूर खालसा कॉलेजमधून एमबीएची पदवी घेतली होती. त्यांच्या वडिलांचं नाव उपितिंदर सिंग आहे. तर त्यांच्या आईचं आधीच निधन झालेलं आहे.

वरिंदर यांचे भाऊ भगवंत सिंग यांचं एक वर्षापूर्वीच निधन झालं होतं.

बॉडीबिल्डिंगचं वेड

वरिंदर सिंग घुमन यांना लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंगची आवड होती. त्यांनी त्यांच्या घराजवळच एक जिमदेखील सुरू केली होती.

2024 मध्ये एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की ते पूर्णपणे शाकाहारी आहेत आणि अगदी अंडीदेखील खात नाहीत. कारण त्यांचं कुटुंब नामधारी आहे.

ते सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे 10 लाख फॉलोअर्स आहेत.

वरिंदर घुमन यांनी 'टायगर 3' या चित्रपटात अभिनय केला होता

फोटो स्रोत, Varinder Ghuman/FB

फोटो कॅप्शन, वरिंदर घुमन यांनी 'टायगर 3' या चित्रपटात अभिनय केला होता

2009 मध्ये वरिंदर यांनी 'मि. इंडिया' हा किताब जिंकला होता. त्यांनी आशियाई पातळीवर बॉडीबिल्डिंगमध्ये नावलौकिक कमावला होता. त्यानंतर 2012 मध्ये ते 'कबड्डी वन्स अगेन' या पंजाबी चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात आले.

त्यानंतर त्यांनी अनेक पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येदेखील भूमिका केल्या.

मात्र चित्रपटांबद्दल ते म्हणाले होते की, ते स्वत:ला रुपेरी पडद्यासाठी योग्य मानत नाहीत. त्याच कारण म्हणजे, अनेक दिग्दर्शकांनी त्यांना वजन कमी करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांना त्यांना बॉडीबिल्डिंग सोडायचं नव्हतं.

'लोकांनी खेळाडू म्हणून लक्षात ठेवावं'

वरिंदर म्हणाले होते, "मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मी 2-4 चित्रपट कमी केले तरी त्यामुळे फरक पडत नाही. मला चित्रपटांमधून जी प्रसिद्धी मिळते तशीच प्रसिद्धी मला खेळातून मिळते."

"मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मी खेळाडूच राहीन. मी मेल्यावर देखील लोकांनी माझी आठवण खेळाडू आणि बॉडीबिल्डर अशीच ठेवावी अशी माझी इच्छा आहे."

वरिंदर यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

फोटो स्रोत, Varinder Ghuman/FB

फोटो कॅप्शन, वरिंदर यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

जून 2025 मध्ये त्यांनी एका खासगी वाहिनीला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ते म्हणाले होते की त्यांना विकासावर केंद्रीत असणारं राजकारण करायचं आहे.

वरिंदर यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत

फोटो स्रोत, Varinder Ghuman/FB

कपड्यांबद्दल बोलताना ते म्हणाले होते की मुंबई आणि जालंधरमध्ये काही डिझायनर आहेत, ज्यांचे कपडे त्यांच्या शरीरयष्टीला साजेसे आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.