कोटाः IIT-JEE साठी जिथं गर्दी व्हायची तिथली हॉस्टेल्स आता रिकामी का झाली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, कोटा
आठ मजली हॉस्टलच्या पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत सोनू गौतम गेल्या दोन वर्षांपासून राहतात. ते उत्तर प्रदेशमधील कानपूरचे रहिवासी आहेत.
एक सिंगल बेड, चहा बनवण्यासाठी छोटा सिलिंडर आणि दुसरीकडे खोलीत सगळीकडे विखुरलेली पुस्तकं आणि नोट्सच्या पसाऱ्यात ते बसलेले आहेत. 2500 रुपये मासिक भाडं असलेल्या या खोलीत सोनू एकटेच राहतात. त्यांचे बहुतेक मित्र कोटा सोडून गेले आहेत.
एकेकाळी त्यांचं हे हॉस्टेल विद्यार्थ्यांच्या गर्दीने अगदी फुललेलं असायचं. आता हे हॉस्टेल अगदी रिकामं झालं आहे.
सोनू सांगतात, "आता मुलं खूप कमी झाले आहेत. कोचिंगमध्येही आधीप्रमाणे मुलं दिसत नाही. मी दोन वर्षांपासून घरी गेलो नाही. घरी गेलं तर गावातील लोक अजूनही तुला यश का मिळालं नाही? असं विचारतील."
हिंदी माध्यमातून शिकलेल्या सोनू यांना इंग्रजीतून कोचिंग घेणं एक आव्हान होतं. दुसरीकडे शहरातील बदलतं वातावरणंही कमी आव्हानात्मक नाही.
सध्या त्यांचा सर्वाधिक वेळ अभ्यास करण्यात आणि स्वतःशी बोलण्यात जातो. कारण बोलण्यासाठी आता त्यांच्यासोबत कुणीही नाही. हॉस्टेलमधील अर्ध्याहून अधिक खोल्यांवर कुलुप लावलेलं आहे.
ही अवस्था केवळ सोनू गौतम यांच्या हॉस्टेलची नाही. याचा परिणाम कोटा शहरापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या 25 हजार विद्यार्थ्यांच्या कोरल पार्क सिटीवरही झाला आहे.
मागील काही वर्षात येथे विद्यार्थ्यांसाठी 350 हून अधिक हॉस्टेल बांधले गेले आहेत.
यशाचं स्वप्न, जग जिंकण्याचा उत्साह आणि पुढे जाण्याची आशा घेऊन देशातील कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी कोटात येतात.

फोटो स्रोत, Siddharth Kejriwal/BBC
मागील दोन दशकात 10 लाख लोकसंख्या असलेल्या कोटा शहरात अनेक भाग हॉस्टेलमध्ये रुपांतरित झाले आहेत. सगळीकडे इंजिनियरिंग आणि मेडिकलची तयारी करणारे विद्यार्थी दिसतात.
असं असलं तरी कोटाची चमक आता कमी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवावर अब्जावधी रुपयांची कोटा कोचिंग इंडस्ट्री आता धापा टाकत आहे.


जे हॉस्टेल विद्यार्थ्यांनी भरलेली असायची आता तेथे खोल्यांच्या दरवाजावर कुलपं आहेत, तर खिडक्या ओसाड पडल्यात.
याचा परिणाम केवळ हॉस्टेल इंडस्ट्रीच नाही, तर अगदी शहरातील इतरांवरही झाला आहे. विद्यार्थी कोटाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होते. त्यामुळे या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यानंतर आता कोटाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम पडणं स्वाभाविक आहे.
आयआयटी आणि नीट कोचिंगचं नाव घेतलं की, ज्या कोटाचं नाव पहिल्यांदा लोकांच्या मनात यायचं त्याची आज अशी अवस्था का झाली आहे? कोटात कोचिंगसाठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी का झाली? आणि कोटा या संकटातून पुन्हा उभारी घेऊ शकेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या संख्येत किती घट?
90 च्या दशकात व्ही. के. बंसल यांनी कोटातील विज्ञान नगरमध्ये बंसल क्लासेसची सुरुवात केली होती. काही विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या कोचिंगसाठी पुढे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले.

यानंतर इंजिनियरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटनी कोटात केंद्र सुरू केलं. हळूहळू कोटा शहराचं रुपांतर कोचिंग इंडस्ट्रीत झालं.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनुसार, 2024 मध्ये जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांनी नीट आणि जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांनी जेईईची परीक्षा दिली.
कोटा हॉस्टेल एसोसिएशनचे अध्यक्ष नवीन मित्तल यांच्यानुसार, मागील दोन दशकांमध्ये पहिल्यांदा कोटात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25 ते 30 टक्के घटली आहे.

ईकोर्सचे संस्थापक आणि दोन दशकं कोचिंग इंडस्ट्रीत काम करणाऱ्या डॉ. सोमवीर तायल यांनीही असंच मत व्यक्त केलं.
ते म्हणाले, "कोरोनानंतर इतके विद्यार्थी कोटात आले की, त्याची कधीही कल्पनाही कोटाने केली नव्हती. मात्र, हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. यंदा तर केवळ एक किंवा सव्वा लाख विद्यार्थीच कोटात आले आहेत.
हॉस्टेल इंडस्ट्रीची दुरवस्था?
कोटात कोचिंगला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक हॉस्टेल दिसतात. दक्षिण कोटातील विज्ञान नगर, महावीर नगर, इंदिरा कॉलनी, राजीव नगर, तलवंडी आणि उत्तर कोटातील कोरल सिटी तर विद्यार्थ्यांच्या गर्दीची केंद्रं आहेत.
मात्र आता या भागांमध्ये सगळीकडे हॉस्टेल आणि घरांबाहेर 'टू लेट'चे बोर्ड दिसतात. बाहेरून भव्यदिव्य दिसणाऱ्या अनेक इमारतींच्या आत खोल्यांना कुलूपं लागलेली आहेत. काही हॉस्टेल तर कमी भाडं मिळत असल्याने बंद करण्यात आली आहेत.
नवीन मित्तल म्हणतात, "जवळपास 30 टक्के विद्यार्थी कमी झाल्यानं आमची इंडस्ट्री 6 हजार कोटी रुपयांवरून 3 हजार कोटी रुपयांवर आली आहे."
विज्ञान नगरमध्ये मेससोबत हॉस्टेलही चालवणारे संदीप जैन म्हणाले, "हा कोटातील कोचिंगचा सर्वात जुना परिसर आहे. येथूनच बंसल सरांच्या कोचिंगला सुरुवात झाली होती."

अशीच स्थिती कोटात राहणाऱ्या दीपक कोहली यांची आहे. ते मागील 25 वर्षांपासून हॉस्टेल इंडस्ट्रीत आहेत. ते राजीव नगरमध्ये 50 खोल्याचं, विज्ञान नगरमध्ये 20 खोल्यांचं एक पीजी आणि कोटा शहरात 50 खोल्यांचे एक हॉस्टेल चालवतात.
कोहली सांगतात, "राजीव नगरमध्ये एक वर्षाआधी एका खोलीसाठी आम्ही 15 हजार रुपये भाडे घ्यायचो. आज त्याच खोलीसाठी 8 हजार रुपये मिळतात. दुसरीकडे विज्ञान नगरमध्ये पीजीचे भाडे 5 हजार होते, आता त्यासाठी कुणी 3 हजार रुपये देखील देत नाही. आमचे सर्व हॉस्टेल अर्ध्याहून अधिक रिकामे आहेत."
कोरल सिटीतही हॉस्टेल चालवणारे मुकुल शर्मा अस्वस्थ दिसले. ते 2009 पासून हॉस्टेल इंडस्ट्रीत आहेत आणि 75 खोल्यांचे एक हॉस्टेल चालवतात.
शर्मा म्हणाले, "आमच्याकडे चांगल्या ठिकाणी जागा होती. त्यामुळे हॉस्टेल चांगलं चालेल अशी आशा होती. मात्र, अर्ध्याहून अधिक हॉस्टेल रिकामं पडलं आहे. हे हॉस्टेल तयार करण्यासाठी जवळपास 4 कोटी रुपये खर्च आला. त्या हिशोबाने महिन्याला 4 लाख रुपये शिल्लक राहिले पाहिजे. वास्तवात एक लाख रुपये शिल्लक ठेवणंही कठीण जात आहे."
ते पुढे सांगतात, "विद्यार्थी कमी येत असल्याने भाडेही कमी मिळत आहे. ज्या सुविधा देऊन आम्ही विद्यार्थ्यांकडून 15 हजार रुपये घेत होतो, आता त्याचसाठी 8 हजार रुपये घेत आहोत. दुसरीकडे वस्तूंच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरणंही अवघड होत आहे."
अर्थव्यवस्थेला फटका
कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्याने होणारं नुकसान आता स्पष्टपणे दिसत आहे.
कोटात जुन्या सायकल खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय मोठा आहे. कोटात आल्यावर बहुतांश मुलं एक सायकल खरेदी करायचे.
विज्ञान नगरमध्ये राजू सायकल स्टोअरचे मॅनेजर दिनेश कुमार भावनानी म्हणाले, "बहुतांश विद्यार्थी जुनी सायकल खरेदी करतात. कारण अशी सायकल अडीच तीन हजार रुपयांमध्ये मिळते. दुसरीकडे नवी सायकल घ्यायला जवळपास 10 हजार रुपये खर्च येतो."
"आता आम्हाला सायकलचं एक दुकान बंद करावं लागलं. आधी दुकानावर चार लोक काम करायचे. आता त्याच दुकानातून एका व्यक्तीला कामाला ठेवण्याचा खर्चही काढणं अवघड होत आहे. अशी परिस्थिती राहिली तर हे सर्व बंद होईल," असंही ते नमूद करतात.

या परिस्थितीचा सामना विज्ञान नगरमध्ये मागील दोन दशकांपासून हॉस्टेलसह मेस चालवणारे संदीप जैनही करत आहेत. ते म्हणतात, "आधी माझ्या मेसमध्ये 500 ते 700 विद्यार्थी जेवण करायचे. मात्र आता अर्धे विद्यार्थी शिल्लक आहेत. जिथं आधी 20 लोकं कामासाठी लागायचे, आता तेथे 5 लोकांमध्ये काम चालवावं लागतं आहे."
महावीर नगरमध्ये चहाचं दुकान चालवणारे मुरलीधर यादव म्हणाले, "आधी खूप गर्दी असायची. कामातून एक मिनिटही बोलायला वेळ मिळायचा नाही. आम्ही दररोज 50 किलो दुधाचा चहा विकायचो. आज 40 किलो दुधही लागत नाही."
कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या कोरल पार्क सिटीत रिक्षा चालवणारे प्रेम सिंह म्हणाले, "आधी आम्ही एका दिवसात 1 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवायचो. मात्र आता 500 रुपये मिळणंही कठीण झालं आहे."
प्रेम सिंह म्हणाले, "यावेळी रुपयातील चार आणे इतक्या प्रमाणात विद्यार्थी आले आहेत. आमचे व्यवसाय विद्यार्थ्यांमुळे चालतात. जर अशीच परिस्थिती राहिली, तर आमची रिक्षा कर्ज देणारे उचलून घेऊन जातील."
कोटा शहरातील घटत्या विद्यार्थी संख्येमुळे दक्षिण कोटाचे उपमहापौर पवन मीणा देखील काळजीत दिसले.
पवन मीणा म्हणाले, "विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने संपूर्ण कोटाला नुकसान होत आहे. कारण शहराच्या अर्थव्यवस्थेत या विद्यार्थ्यांचं मोठं योगदान आहे."
"विद्यार्थ्यांना काहीही अडचण येऊ नये यासाठी नगर पालिका स्तरावर आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. अधिक विद्यार्थी शहरात यावे म्हणून पाणी, वीज आणि पायाभूत सुविधांना अधिक चांगलं करत आहोत."
कोटाने विद्यार्थ्यांचा स्वप्नभंग का केला?
विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी कोटाला नाकारण्याची अनेक कारणं आहेत.
कोटामध्ये 2023 मध्ये 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. 2015 नंतर पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या करण्याची ही पहिली घटना होती.
बिहारमधील आदित्य कुमार त्यांच्या वर्गातील 10 मुलांसह दोन वर्षापूर्वी कोटात गेले होते. आयआयटीत प्रवेश करणं हा त्यांचा हेतू होता. मात्र, आता ते आणि त्यांचे वर्गमित्र पुन्हा पाटणा किंवा बिहारमधील इतर शहरांमध्ये परत आले आहेत. तेथेच परीक्षेची तयारी करतात.

फोटो स्रोत, Siddharth Kejriwal/BBC
पाटण्यात बीबीसी प्रतिनिधी सीटू तिवारी यांच्याशी बोलताना आदित्य कुमार म्हणाले, "2024 मध्ये आम्ही सर्व मुलं परत आलो आहोत. तेथे सातत्याने आत्महत्यांच्या बातम्या यायच्या. त्यामुळे आम्ही अस्वस्थ व्हायचो. याशिवाय तेथे चाचणी परीक्षेनंतर मुलांची वर्गवारी केली जाते आणि खालच्या तुकड्यांवर फार लक्षही दिलं जात नाही."
त्यांच्यासोबतच कोटातून परत आलेले बेगूसरायचे साकेत म्हणाले, "ज्याच्यासोबत तुम्ही बसून जेवणं करायचे, त्याने आत्महत्या केल्याचं समजतं. अशावेळी अभ्यासावर लक्ष देता येत नाही."
पाटण्यात या विद्यार्थ्यांना कोचिंग देणारे डॉक्टर कौमार्य मनोज म्हणाले, "90 च्या दशकात बिहारमधील परिस्थिती वाईट होती. त्यातूनच कोटाचा जन्म झाला."
"जे आई वडील आपल्या मुलांसाठी एक लाख रुपये खर्च करू शकत होते, ते खंडणी आणि अपहरणापासून आपल्या मुलांना वाचवण्यासाठी कोटात पाठवायचे."
"आता बिहारमधील परिस्थिती चांगली झाली आहे. देशातील मोठ्या कोचिंग संस्थांनी त्यांची केंद्रं पाटण्यात सुरू केली आहेत. त्यामुळे आता पालक विद्यार्थ्यांना कोट्याला पाठवण्याऐवजी पाटण्यात शिक्षण देणं पसंत करतात. कोटात पोहचण्यासाठी 26 तास लागतात. दुसरीकडे पाटण्यात पालक दोन तासात आपल्या पाल्याला भेटू शकतात," असं कौमार्य मनोज नमूद करतात.
नियमांमधील बदल हेही कारण?
कोटामध्ये वाढत्या विद्यार्थी आत्महत्येच्या घटना आणि अभ्यासाचा दबाव कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण मंत्रालयाने नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत गाईडलाइन फॉर रजिस्ट्रेशन रेग्युलेशन कोचिंग सेंटर 2024 ची निर्मिती केली.
यातील एक तरतूद अशी आहे की, आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी कोचिंग सेंटरमध्ये दाखल होऊ शकत नाही.
कोटात अशा अनेक संस्था होत्या ज्या विद्यार्थ्यांना सहावीनंतर लगेच कोचिंग द्यायला सुरू करायच्या. मात्र हा प्रकार आता बंद झाला आहे.
नवीन मित्तल यांच्यानुसार, अशा 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 10 टक्के होती. मित्तल या नियमांना विरोध करतात.
ते म्हणतात, "अशा प्रकारची बंधने नसायला हवी. आयपीएलमध्ये सध्या 13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने खरेदी केलं. जर खेळात असा कोणताही नियम नसेल, तर कोचिंगबाबतही असं करायला नको. कारण दबाव प्रत्येक क्षेत्रात असतो."
दुसरीकडे ईकोर्सचे संस्थापक सोमवीर तायल यांच्यानुसार, कोटामधील विद्यार्थ्यांची घटती संख्या शहरासाठी अडचणीची गोष्ट आहे, मात्र विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही सकारात्मक गोष्ट आहे.
ते म्हणाले, "कोटा, कोचिंग इंडस्ट्रीचं केंद्र बनलं होतं. 2020 नंतर कोचिंगशी संबंधित संस्थांनी मोठा पैसा मिळवला आणि आपल्या व्यवसायाला इतर राज्यात वाढवलं."

असं असलं तरी असे अनेक आई वडील आहेत जे काळजी करायला लावणारी परिस्थिती असतानाही आपल्या मुलांना अभ्यासासाठी कोटात पाठवतात. धौलपूरचे प्रीति जादौन आणि त्यांचे पती जय सिंह जादौन दर महिन्याला त्यांची मुलगी कनक जादौनला भेटायला कोटात येतात.
प्रीति जादौन यांचा मुलगा पुनीतनेही कोटात राहून नीट परीक्षेची तयारी केली आणि आता तो एका सरकारी महाविद्यालयात एमबीबीएसचं शिक्षण घेत आहे.
प्रीति जादौन म्हणाल्या, "मूल पहिल्यांदा घराबाहेर पडतं. त्याा एकटं वाटतं. अभ्यास करताना तणावही येतो. अशावेळी मी दर महिन्याला मुलीला येऊन भेटण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून तिला घरासारखं वातावरण मिळेल."
"माध्यमांमध्ये विद्यार्थी आत्महत्येची बातमी बघितली की, आम्ही काळजीत पडतो. मात्र, आम्ही आमच्या मुलीच्या कायम संपर्कात राहतो. मागील वेळी तर मी दोन महिने आमच्या मुलीसोबत राहिले होते."
दुसरीकडे कोटा हॉस्टेल एसोसिएशनचे अध्यक्ष नवीन मित्तल यांच्यानुसार, आत्महत्यांच्या नावाखाली कोटाला ठरवून बदनाम करण्यात आलं आहे.
ते म्हणाले, "जर नॅशनल क्राईम ब्यूरोची आकडेवारी पाहिली, तर त्यात कोटाचा क्रमांक फार खाली आहे. कोटा केवळ कोचिंग सिटी नाही, तर एक 'केयरिंग सिटी' आहे. आम्ही कोटा स्टुडंट प्रीमियर लीग आयोजित केली. त्यात 16 संघ होते. विद्यार्थ्यांना चांगलं वातावरण मिळावं म्हणून आम्ही याचे आयोजन केले."
दुसरीकडे सोमवीर तायल यांच्यानुसार, कोटाच्या कोचिंग इंडस्ट्रीत चढउतार येत राहिले आहेत.
ते म्हणाले, "मध्यंतरी जेईईचा स्वरुप बदललं तेव्हा कोटा यात टिकेल का असं विचारलं गेलं. मात्र कोटा त्यातूनही बाहेर आलं आणि आपलं नाव कायम ठेवलं. यातूनही मार्ग काढण्यासाठी कोटा नक्कीच काही ना काही मार्ग काढेल, अशी मला आशा आहे."
अतिरिक्त वार्तांकन बिहारहून बीबीसी प्रतिनिधी सीटू तिवारी.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











