नागपूर हिंसाचार : 'हे' आहेत अनुत्तरीत प्रश्न आणि आतापर्यंत काय माहिती मिळालीय?

    • Author, भाग्यश्री राऊत, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी

17 मार्चच्या रात्री नागपुरात जे काही घडलं ते अनेकांसाठी अनाकलनीय आहे. धार्मिक दंगलींचा फारसा इतिहास नसलेल्या या शहरात अचानक दोन गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. शहरातल्या महाल भागात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे स्थानिक पोलीस अधिकारी यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवलं आहे.

पण, काल (17 मार्च) रात्री झालेल्या घटनेपासून या भागातील स्थानिक दुकानदारांची दुकाने बंद आहेत, जमावाने जाळलेल्या गाड्या तशाच उभ्या आहेत. ज्या परिसरात ही घटना घडली तिथे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.

नागपुरातील गांधी गेट पासून तर अग्रसेन चौक, सक्करदरा, गणेशपेठ हा संपूर्ण मध्य नागपूरचा परिसर बाजारपेठेचा असल्याने याठिकाणी काम करणारे व्यावसायिक, मजूर सगळ्यांवर परिणाम झाला आहे.

संपूर्ण राज्यात सध्या एक प्रकारचा तणाव दिसतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

नागपूरमध्ये हे का घडलं? कुणी घडवून आणलं? दगडफेक करणारे, जाळपोळ करणारे लोक कोण होते? ही घटना नेमकी कशामुळे घडली? पोलिसांनी या प्रकरणी दिरंगाई केली का? आणि आतापर्यंत काय कारवाई झाली आहे? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला.

'उभ्या आयुष्यात असा प्रकार बघितला नाही'

नागपूरच्या भालदारपुरा परिसरात सध्या एक तणावपूर्ण शांतता आहे. दुकानं बंद आहेत, बाजारपेठ ठप्प आहे, या बंद दुकानांसमोर बसलेल्या अब्दुल खालिक आणि त्यांचे शेजारी सनी दावधरिया यांच्याशी आम्ही संवाद साधला.

अब्दुल खालिक म्हणतात, "मी माझ्या संपूर्ण आयुष्यात असं काही घडल्याचं बघितलं नाही. आमच्या शहरात असलं काही कधीच घडत नव्हतं. देशात कुठेही काहीही होऊ द्या इथे काही होत नव्हतं., काल रात्री गोंधळ झाल्यापासून आमची दुकानं बंद आहेत. आम्ही दिवसभर रोजा पाळून नमाज पठण करायला गेलो होतो. परत येईपर्यंत सगळीकडे गोंधळ उडाला होता. जे काही घडलं ते खूप चुकीचं आहे. आम्हाला खूप त्रास होतोय."

हे सांगताना अब्दुल खालिक स्वतःला सांभाळू शकले नाहीत. त्यांच्या शेजारी बसलेले सनी दावधरिया म्हणाले, "आमचं एवढं वय झालं पण असं काही कधी घडलं नव्हतं. ज्यांना हे काम करायचं होतं ते करून गेले आता आम्ही परिणाम भोगतो आहोत. काल रात्रभर आम्ही झोपू शकलो नाही. आमच्या घरातील बायका-पोरांवर दहशत बसली आहे. रोज काम करून आम्ही पोट भरतो. आता माहित नाही पुढे काय होईल?"

अब्दुल यांच्या शेजारी बसलेल्या सनी देवधरीया यांनी देखील असा प्रकार पहिल्यांदाच बघितल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "आम्ही हिंदू आणि मुस्लिम नेहमीच शांततेने एकत्र राहिलो आहोत. इथे कोणतेही संघर्ष नाहीत. सोमवारी जे घडले त्यात स्थानिकांचा सहभाग नव्हता. त्यासाठी बाहेरील लोक जबाबदार होते. बाहेरून आलेल्या हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायातील लोकांनी हे घडवून आणले."

17 मार्च रोजी नागपुरात नेमकं काय घडलं?

सध्या संपूर्ण नागपूर शहरात तगडा पोलिस बंदोबस्त आहे. ज्या गल्ल्यांमधून दगडफेक झाली होती त्या गल्ल्या पत्र्याचे शेड लावून बंद करण्यात आल्या आहेत.

काही दुकानांची तोडफोड केली आहे, तर इथे 2 वाहने सुद्धा जाळली आहेत. टायर पेटवल्याने रस्त्यावर सगळं ऑइल सांडलेले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार काही लोकांच्या घरावर दगडफेक झाली आहे आणि एका घराचं सीसीटीव्ही देखील फोडण्यात आलेलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात नागपूरमध्ये काय घडलं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, "17 मार्च 2025 रोजी सकाळी साडे अकरा वाजता नागपूर शहरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'औरंगजेबाची कबर हटाओ' अशा घोषणा देत आंदोलन केलं.

"हे आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेल्या प्रतीकात्मक कबर जाळली. यानंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर अपराध क्रमांक 114(2025) नुसार भारतीय न्याय संहिता 299, 37(1), 37(3) सह महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये 135 कलमांतर्गत दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला.

"त्यानंतर सांयकाळी एक अफवा पसरवण्यात आली. सकाळी जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये जाळण्यात आलेल्या कबरीच्या कपड्यावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा पसरवण्यात आली. ही अफवा पसरल्यानंतर सायंकाळचा नमाज आटोपून दोनशे ते तीनशे लोकांचा जमाव तिथे तयार झाला आणि तो घोषणा देऊ लागला. याच लोकांनी 'आग लावून टाकू' असे हिंसक बोलणे सुरू केले. आणि त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर केला," फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, "त्याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध त्यांना तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेशपेठ पोलीस स्थानकात आमंत्रित करण्यात आलं. त्यांची तक्रार एकीकडे ऐकून घेत असताना दुसरीकडे हंसापुरी भागामध्ये दोनशे ते तीनशे लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले आहे. काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे."

"तिसरी घटना भालदारपुरा भागात सांयकाळी साडेसात वाजता झाली. तिथे 80 ते 100 लोकांच्या जमावाने एकत्र येऊन पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना अश्रूधूर व सौम्य बळाचा वापर करावा लागला. या घटनेत एक क्रेन, दोन जेसीबी आणि काही चारचाकी वाहनं जाळण्यात आली," असं मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी चादर जाळली गेली ही अफवा असल्याचं सांगितलं असलं तरी नागपूरच्या स्थानिक नागरिकांनी मात्र असं घडलं असल्याचं म्हटलं आहे.

बीबीसी मराठीसोबत बोलताना अ‍ॅड. राकेश दावधरिया म्हणाले, "काल गांधीगेट शिवाजी पुतळा इथे जे काही घडलं मी त्याचा निषेध करतो. माझ्या धर्माला मानण्यासाठी मला इतर धर्मांचा अपमान करण्याची गरज नाही वाटत. मी हिंदू आहे आणि माझ्या गीता, रामायणाला कुणी जाळलं, त्याचा अपमान केला तर मला वाईट वाटेल. त्याच पद्धतीने तिथे काल चादर जाळण्यात आली. त्या चादरीचा अपमान करण्यात आला आणि हे हिंदू आणि मुसलमान दोघांनाही शोभत नाही.

प्रशासनाने याविरोधात तत्काळ कारवाई केली असती तर पुढची घटना टाळता आली असती. सकाळी अशी घटना घडल्यानंतर पोलिसांनी सगळीकडे नाकाबंदी करायला पाहिजे होती. मुस्लीमबहुल भागात पोलीस पुरेशा प्रमाणात तैनात केले असते तर ही घटना झालीच नसती. मुस्लीम समुदायाने केलेल्या घोषणाबाजी आणि पोलिसांवरच्या हल्ला देखील अत्यंत चुकीचा होता. पोलीस देखील माणूस आहेत, ते त्यांचं कर्तव्य करत होते."

पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली आहे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांच्या कारवाईची माहिती सभागृहात दिली.

"या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 3 पोलीस उपयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, त्यातल्या एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आलेला आहे. एकूच 5 नागरिक जखमी झालेले आहेत, तिघांना उपचार करून सोडलेलं आहे आणि दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्यातला एकजण अतिदक्षता विभागात आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले, "आतापर्यंत आम्ही पाच एफआयआर दाखल केल्या आहेत. याशिवाय पन्नासपेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलेलं आहे."

पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, "राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन राज्यभर शांतता राखण्याचे निर्देश दिलेले आहेत.

नागपूरमध्ये सकाळची घटना घडल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्णपणे शांतता होती. पण त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं लक्षात येतं आहे. एक ट्रॉलीभरून दगड मिळाले आहेत त्यामुळे हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला हे स्पष्ट होतं.

"काही लोकांनी दगड जमा करून ठेवलेले पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात शस्त्रं देखील जप्त करण्यात आलेली आहेत. वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे आणि ठरवून काही ठराविक घरांना आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. त्यामुळे अशाप्रकारे सुनियोजित पद्धतीने हल्ला केलेल्या लोकांवर नक्कीच कारवाई केली जाईल," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

'छावा चित्रपटामुळे लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं, "छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. त्यामुळे राज्यातील लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाविषयी असणारा राग समोर येतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे आणि राज्यातील जनतेला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा केला पाहिजे, कुणीच दंगा भडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जात धर्म न पाहता त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल."

"विधिमंडळाबाहेर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं की,"औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. त्यामुळे काही लोक हा कलंक पुसून टाकण्यासाठी काही लोक आंदोलन करत आहेत. ते चुकीचं नाहीये. औरंगजेबाने अन्याय केला, जुलूम केला आणि त्याचं उदात्तीकरण करणं महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्र अशा लोकांना माफ करणार नाही."

राजकीय नेत्यांची विधानं, पोलिसांची कारवाई, राज्यभर सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा हे सगळं सध्या सुरू आहे. पण नागपूरमध्ये राहणाऱ्या लोकांना हे सगळं नेमकं कशासाठी घडलं की घडवण्यात आलं हा प्रश्न अजूनही भेडसावतो आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.