औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी, खुलताबादमधील लोक काय म्हणत आहेत?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

"भारतात काही लोकांनी द्वेषाचं दुकान (नफरत की दुकान) उघडलंय. हे लोक संख्येनं नगण्य आहेत. पण ते दररोज आग लावायचं काम करत आहेत."

खुलताबादमधील व्यापारी शेख इक्बाल यांचं हे म्हणणं. छत्रपती संभाजीनगर पासून (पूर्वीचं औरंगाबाद) 25 किलोमीटर अंतरावर खुलताबाद शहर आहे.

याच शहरात औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी सध्या जोर धरत आहे.

या परिसरात शेख इक्बाल यांचं फुलांचं, प्रसादाच्या साहित्याचं दुकान आहे.

13 मार्च रोजी आम्ही खुलताबादला औरंगजेबाची कबर असलेल्या भागात पोहचलो, तेव्हा तिथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.

कबरीचं चित्रीकरण करण्यास मनाई असल्याचं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. औरंगजेबाची कबर जिथं आहे तिथल्या प्रवेशद्वारावर एक बोर्ड लावलेला दिसून आला.

हे संरक्षित स्मारक असून जो कुणी याची नासधुस करेल किंवा हानी पोहोचवेल, त्याला भारतीय पुरातत्व अधिनियमान्वये 3 महिने कारावास किंवा 5000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्यात येईल, असं या बोर्डावर नमूद करण्यात आलंय.

पोलिसांचा बंदोबस्त

पोलिसांनी त्यांच्याकडील नोंदवहीत आमची नावं, मोबाईल नंबर, पत्ता आणि आधार क्रमांक लिहून घेतला. त्यानंतर आमच्याकडील मोबाईल, बॅग हे सगळं सामान ठेवून घेतलं. त्यानंतर आम्हाल कबर पाहण्याची परवानगी दिली.

औरंगजेबाची कबर अत्यंत साधेपणाने बांधण्यात आली आहे. मातीची कबर असून तिच्यावर सब्जाचं झाड आहे.

कबरीच्या या परिसरात अनेक दुकानं आहेत. यापैकी एक दुकान शेख इक्बाल यांचं आहे. ते हार विणत होते.

औरंगजेबाविषयीची वक्तव्यं ही राजकारणासाठी केली जातात, असं त्यांचं म्हणणं आहे.

पण, औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, अशी मागणी केली जात आहे. याविषयी काय वाटतं? या प्रश्नावर शेख इक्बाल म्हणाले, "300 वर्षांपूर्वी काय झालं ते अल्लाहला चांगल्याप्रकारे माहिती आहे. आम्हाला तर हे माहिती आहे की, अफजलखानाची कबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांनी आतापर्यंत ठेवली आहे. मग औरंगजेबाचीसुद्धा कबर 300 वर्षांपासून आहे, तर तिलाही ठेवलं पाहिजे."

'वादग्रस्त वक्तव्यांचा ट्रेंड'

इथेच आमची भेट खुलताबादचे माजी नगराध्यक्ष अॅड. खैसरुद्दीन यांच्याशी झाली. ते काही लोकांशी चर्चा करत उभे होते.

सध्याच्या वादाविषयी विचारल्यावर ते म्हणाले, "औरंगजेबाच्या बाबतीत याआधीही वाद झाला आहे आणि आताही होत आहे. पण ज्याप्रकारची वक्तव्यं केली जात आहेत, त्यावरुन ही राजकीय स्टंटबाजी असल्याचं दिसत आहे. ज्याला कुणाला नेता बनायचं आहे, तो वादग्रस्त वक्तव्य करत आहे आणि लगेच रातोरात लोकप्रिय होत आहे, हिरो होत आहे. आजकाल असा ट्रेंड चालू आहे."

या परिसरातील नागरिकांशी आम्ही बोलत असताना काही पर्यटक औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी येत होते. यात काही विदेशातून आलेले पर्यटकही होते. दुपारच्या सुमारास मात्र शुकशुकाट जाणवत होता.

खुलताबादमधील काही जण मात्र माध्यमांशी बोलायला तयार नव्हते. 'आम्ही बोलतो एक आणि मीडियावाले दाखवतात एक,' असं त्यांचं म्हणणं होतं.

ज्या पद्धतीनं मीडियामध्ये हिंदू-मुस्लीम दाखवलं जातं, ते पटत नसल्यामुळे एकानं मीडियाला शिवी दिली आणि तो निघून गेला.

'राजकारणी फक्त हिंदू-मुस्लीम करतात'

शेख सादिक हे खुलताबादमधील रहिवासी आहेत. त्यांच्या मते, औरंगजेबावर बोलून राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम राजकारण्यांकडून केलं जात आहे.

शेख सादिक म्हणाले, "जे खरे प्रश्न आहेत, ते सोडून लोकांचं दुसऱ्या गोष्टींकडे ध्यान आकर्षित करण्यासाठी अशी वक्तव्यं करणं हे राजकारणी लोकांचं काम आहे.

"ते (राजकारणी) फक्त हिंदू-मुस्लीम करतात. तसं नाही केलं तर त्यांना मतं कशी मिळणार? ते धर्मनिरपेक्ष गोष्टींबाबत बोलणार नाहीत. शिक्षण व्यवस्थेवर, रोजगारावर, उद्योगावर बोलणार नाहीत. कारण हिंदू-मुस्लीम केल्यावरच त्यांना फायदा होतो."

खुलताबादमध्ये हिंदू-मुस्लीम एकता

खुलताबाद हे धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा असलेलं गाव आहे. खुलताबादला जुन्या काळात 'जमिनीवरचा स्वर्ग' असं संबोधलं जायचं. भद्रा मारुती हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ इथं आहे.

खुलताबाद परिसरात गिरिजी देवी मंदिर, दत्त मंदिर आहे.

दक्षिण भारतातील इस्लामचा गड असल्यामुळे आणि सुफी चळवळीचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी देशविदेशातून सुफी आलेले आहेत. त्या प्रत्येकाच्या कबरी खुलताबादमध्ये आहेत.

खुलताबादला हिंदू-मुस्लीम एकतेची मोठी परंपरा असल्याचं इथले मुस्लीम व्यावसायिक सांगतात.

शेख इक्बाल म्हणाले, "खुलताबादमध्ये 52 वाडे आहेत. यात ब्राह्मण वाडा, भील वाडा, कुंभार वाडा, चंभार वाडा, धोबी वाडा, साळी वाडा, इमाम वाडा असे वाडे आहेत. आम्ही सगळे एकमेकांशी मिळून मिसळून राहतो. इथून शिवजयंतीची मिरवणूक जाते तर आम्ही फुल-पाणी देऊन त्यांचं अभिनंदन करतो. ऊरुस असला की ते (हिंदू) आमचं अभिनंदन करतात. आमचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत."

शर्फुद्दीन रमजानी हे 22 ख्वाजा दर्गा कमिटीचे 30 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. औरंगजेब समाधीच्या परिसरात त्यांचं ऑफिस आहे.

ते म्हणाले, "खुलताबाद हे खूप जुनं गाव आहे. इथल्या हिंदू-मुसलमानांमध्ये खूप एकता आहे. आम्ही सगळे सण सोबत साजरे करतो. शिवजयंती, आंबेडकर जयंती, होळी सणाला आम्ही त्यांचं स्वागत करतो. तर ईदला आम्ही त्यांना दावत देतो."

व्यवसायावर परिणाम

औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. त्याचा थेट परिणाम खुलताबादमधील हिंदू, मुस्लीम आणि दलित व्यावसायिकांवर होत असल्याचं सांगितलं जातं.

याविषयी बोलताना अॅड. खैसरुद्दीन सांगतात, "हिंदू, मुस्लीम, दलित सगळे पकडून खुलताबादमधील लोकसंख्या 1 लाख 40 हजार आहे. जेव्हा केव्हा असे वाद झाले आहेत, तेव्हा आमच्या 1 लाख 40 हजार हिंदू, मुसलमान, दलित किंवा इतर कुणीही एखाद्या व्यक्तीनं यावर टिप्पणी केलेली नाही. आणि हे आमचं सुदैव आहे."

"पण, जेव्हा अशाप्रकारे वारंवार टार्गेट केलं जातं तेव्हा त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांचं मोठं नुकसान होतं. आमच्या येथील मंदिरं, लेण्या, दर्गा जेवढी काही पर्यटन स्थळं आहेत, तिथं 4 ते 5 हजार हिंदू, मुस्लीम आणि दलित तरुण काम करतात. यावर जवळपास 25 ते 30 हजार लोकांचा उदरनिर्वाह चालतो. वादग्रस्त वक्तव्य करणारे बोलून मोकळे होतात, पण स्थानिक लोकांचं यामुळे नुकसान होतं," खैसरुद्दीन पुढे म्हणाले.

तर, शेख इक्बाल सांगतात, "इथं वेरुळ लेणीपासून औरंगजेबाच्या समाधीपर्यंत पर्यटक येत असतात. पण अशाप्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पर्यटकांवर परिणाम होतो आणि आमच्या धंद्यावरही परिणाम होतो."

खुलताबादपासून 3 किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आहे.

'तरुणांनो चुकीचं स्टेटस ठेवू नका'

दुपार 2 च्या सुमारास आमची भेट शेख शाजेब या तरुणाशी झाली. 26 वर्षीय साजेब दुपारचा नमाज पढण्यासाठी आला होता.

तो म्हणाला, "दिवस निघाला की औरंगजेब, औरंगजेब, औरंगजेब इतकंच ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. दुसरा काहीच प्रश्न नाही का? राजकारण्यांनी विकासाचं पाहायला हवं. शिक्षणाचं पाहायला हवं. मला तरुणांना हे सांगायचं आहे की, अशाप्रकारच्या वादग्रस्त गोष्टींवर जास्त लक्ष देऊ नका. आपले मोबाईल आणि व्हॉट्सअपवर कुणासाठी चुकीचं स्टेटस ठेवू नका. सगळ्यांनी शांततेत राहा."

महाराष्ट्रात याआधी औरंगजेबाचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवण्यावरुन काही ठिकाणी वाद झाले आहेत.

खुलताबादमधील मुस्लिमांना राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा आहे? या प्रश्नावर शेख इक्बाल सांगतात, "माझं हेच आवाहन आहे की, आपली गंगा-जमना ही तहजीब आहे, ती कायम ठेवली पाहिजे. प्रेमाची गोष्ट केली पाहिजे. तरुणांच्या रोजगारावर बोललं पाहिजे. आपण माणूस आहोत आणि आपली माणुसकीच कायम राहणार आहे."

तर शर्फुद्दीन रमजानी सांगतात, "आताच्या सरकारनं विकासाविषयी बोललं पाहिजे. शिक्षण, रोजगार, बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. राजकारण्यांनी वादग्रस्त वक्तव्यं करु नये. कारण आमच्या गावात शांती आहे आणि शांतीच राहिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे."

औरंगजेबानं खुलताबाद निवडलं कारण...

दिल्लीचा शहनशहा असलेल्या औरंगजेबाचा 1707 मध्ये अहिल्यानगर (तत्कालीन अहमदनगर) येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.

मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरू सैय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारीच असावी, असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहून ठेवलं होतं.

औरंगजेब वाचन करायचा. त्यात त्याने सिराजी यांना फॉलो केलं. मग सिराजी यांच्याजवळच कबर बांधायची असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहिलं, असं इतिहासकार सांगतात.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं खुलताबादमधील ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे.

त्याकाळी ही कबर बनवण्यासाठी 14 रुपये 12 आणे इतका खर्च आल्याचं सांगितलं जातं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.