पाकिस्तानच्या या नदीत सोनं येतं तरी कुठून?

    • Author, इस्लाम गुल आफ़रीदी
    • Role, पत्रकार

पहाटे सूर्याची किरणं आकाशातून वर येत असताना सईद मोहम्मद आणि त्याचा मित्र वकास आपलं काम आटोपून घराच्या दिशेने निघालेले असतात. ते दोघेही खैबर-पख्तुनख्वाच्या नौशेहरा जिल्ह्यातील निजामपूर भागात राहायला आहेत.

कडाक्याच्या थंडीत या दोघांच्या अंगावर मळलेले कपडे, जुना फाटलेला कोट आणि पायात प्लॅस्टिकची चप्पल असते. हे दोघे आबासिन नदीची वाळू उपसून त्यातून सोनं काढण्याचं काम करतात.

सईद मोहम्मदला रोजंदारी म्हणून 1500 रुपये मिळतात. पण त्याचं हे काम बेकायदेशीर असल्यामुळे धोकादायक आहे, आणि याची त्यालाही जाणीव आहे.

नौशेहराचे उपायुक्त खालिद खटक यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून निजामपूरमधील सिंध म्हणजेच अबासिन नदीतून अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने सोनं काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यासाठी कोणाचीही परवानगी घेतलेली नाही.

नौशेहराच्या जहांगीरा परिसरात जवळपास 3 लाख लोक राहतात. येथील स्थानिक लोकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे लष्कराच्या सिमेंट कारखान्यात कामाला जाणं किंवा सुरक्षा संस्थांमधील नोकऱ्या किंवा वाहतूक क्षेत्रातील अंगमेहनतीचं काम करणं.

मात्र, गेल्या दोन वर्षांत परिसरातून वाहणाऱ्या सिंधू नदीतून सोनं काढण्याचं काम सुरू झाल्याने स्थानिक पातळीवर व्यवसायाच्या संधी वाढल्या आहेत.

या व्यवसायात स्थानिक लोक येन केन प्रकारेन गुंतलेले दिसतात. जेव्हा पत्रकार म्हणून तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा मात्र ते तुम्हाला कुठल्यातरी सरकारी संस्थेचे कर्मचारी असल्याचं समजून मौन बाळगतात.

हे काम बेकायदेशीरपणे सुरू असून त्यात 'मोठे लोक' गुंतलेले आहेत असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

अवजड यंत्रसामग्री भाड्याने घेऊन नदीतून काढलं जातं सोनं

अख्तर जान (नाव बदललेलं आहे) गेल्या सहा महिन्यांपासून अवजड यंत्रसामग्री घेऊन नदीतून सोनं काढण्याचं काम करत आहेत.

ते सांगतात की, निजामपूर येथील एका मित्राने दिवसाला लाखो रुपये कमावता येतील असं सांगितलं होतं. त्यासाठी थोडी यंत्रणा लागणार होती. त्यामुळे मी हे काम सुरू केलं पण आता अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

अख्तर जान यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुरुवातीला उत्खनन करणारी तीन लहान यंत्र दर महिन्याला प्रती 4 लाख रुपये अशा किमतीने भाड्याने घेतली आणि या कामासाठी 20 मजूर लावले.

यानंतर नदीकाठावर पडलेल्या वाळूतून काम सुरू झालं, मात्र सोन्याचे प्रमाण कमी असल्याने दर आठवड्याला 15 ते 20 लाख रुपयांचं नुकसान होऊ लागलं.

त्यांनी सांगितलं की, छोट्या यंत्रांच्या जागी त्यांनी पंजाब मधून 18 लाख रुपये मासिक भाड्यावर तीन मोठी उत्खनन यंत्र मागवली. यात नदीच्या मध्यभागी वाळू उपसा करण्याची क्षमता असते. यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली, मात्र त्यांनी याबाबत अधिक काही बोलण्यास नकार दिला.

सईद उल्लाह (नाव बदललेलं आहे) हे पूर्वी बांधकाम क्षेत्रात काम करायचे. पण आठ महिन्यांपूर्वी त्यांनी चार कोटी रुपयांची अवजड यंत्रसामग्री खरेदी केली आणि अर्ध उत्पन्न देण्याच्या अटीवर स्थानिक कंत्राटदाराला सोनं काढण्यासाठी भाड्याने दिली.

ते सांगतात, पहिल्या दोन महिन्यांत काहीही मिळालं नाही. उलट पोलिसांनी छापा टाकून दीड कोटी रुपयांची यंत्र जप्त केली आणि पाच मजुरांनाही अटक केली.

ते म्हणाले की, सर्व लोकांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे, मात्र यंत्र पोलिसांकडेच आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, हे काम करताना अनेक समस्या येतात. त्यात सरकारकडून कडक कारवाई केली जाते, कधीकधी यंत्र पाण्यात वाहून जातात. पण त्यांनी हे काम सोडलेलं नाही.

सोन्याचे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत?

नौशहरा जिल्ह्यातील सिंधू नदीतून सोन्याचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी खनिज विभाग आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे कारवाई करत आहेत.

खालिद खटक यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, काबूल आणि नौशहरातून वाहणाऱ्या सिंधू नदीतून सोन्याचं अवैध उत्खनन करणं हे फार पूर्वीपासून सुरू आहे. पण जड आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर 2022 मध्ये सुरू झाला आणि यावर्षी त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

त्यांनी सांगितलं की, सोन्याचं अवैध उत्खनन रोखण्यासाठी निजामपूर येथील सिमेंट कारखान्याजवळ पोलिस व खनिज विभागाचे संयुक्त चेकपोस्टही उभारण्यात आले असून, खनिज विभागाच्या विनंतीवरून कारवाई करण्यात येत आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, बेकायदेशीर कामात गुंतलेल्या 858 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 825 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 70 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ते पुढे म्हणाले की, त्यांनी आत्तापर्यंत 12 उत्खनन यंत्र, सात वाहने आणि 20 मोटारसायकलींसह विविध प्रकारची उपकरणे जप्त केली आहेत.

सरकारने अनेक प्रयत्न करूनही यात घट होण्याऐवजी नदीतून सोन्याचं उत्खनन करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

खालिद खटक सांगतात की, हा अवैध धंदा बंद करण्यासाठी रोज कारवाई केली जाते. मात्र खनिज विभागाने याचा लिलाव सुरू करावा किंवा भाडेतत्त्वावर काम द्यावं, जेणेकरून सरकारचं नुकसान होणार नाही.

उपायुक्त खालिद खटक पुढे सांगतात की, ज्या ठिकाणाहून सोने काढले जात आहे ते ठिकाण नौशहरा मुख्यालयापासून दूर आहे. तर दुसरीकडे ही कामं खूप मोठ्या परिसरात होतात. आणि तिथपर्यंत पोहोचणं कठीण आहे.

संबंधित संस्था कायदेशीर मार्गाने येथे उत्खनन सुरू करत नाही तोपर्यंत बेकायदेशीर प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले.

या संदर्भात प्रांतीय खनिज विभागाच्या महासंचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

परंतु या संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, नौशहरा आणि स्वाबी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीतून सोन्याचं अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याची माहिती संस्थेला आहे. मात्र इथे सोन्याचा साठा किती आहे किंवा यात सहभागी असलेल्या लोकांची संख्या याबद्दल कोणतीही माहिती नाही.

नौशहरा पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, नदीतून अवैधरित्या सोनं काढण्याच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात सातत्याने मोहीम राबविली जात आहे. पण हजारो लोक या कामात गुंतलेले आहेत. त्यांच्या विरोधात जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागतो.

ते सांगतात की पोलिओ मोहिमेनंतर आता सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्याने पोलिसांच्या जबाबदाऱ्या आणखी वाढल्या आहेत.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कारवाईदरम्यान गोळीबार आणि दगडफेकीच्या घटना घडतात. तर अटक टाळण्यासाठी अनेक लोक छोट्या बोटींच्या मदतीने दुसऱ्या बाजूला पंजाब प्रांतात पळून जातात.

अवजड यंत्रसामग्री ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेणे जिकिरीचे काम असल्याने ही यंत्रसामग्री जागेवरच पडून असल्याचे त्यांनी सांगितलं.

निजामपूरमधील सिंधू नदीव्यतिरिक्त, जहांगीरा आणि स्वाबी जिल्ह्यातील कुंड पार्कजवळील भागात तसेच पंजाब प्रांतातील अटक येथील सिंधू नदीत अवैध सोन्याचे उत्खनन सुरू झाले आहे.

काबूल नदीतून वाळू, खडी आणि सोन्याच्या बेकायदेशीर उत्खननाला अंकुश बसावा यासाठी तसेच परिसरातील समस्या सोडवण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी जहांगिरा येथील स्थानिक ज्येष्ठांची एक ग्रँड जिरगा स्थापन करण्यात आली होती.

जिरगाचे प्रमुख रिफत उल्लाह यांनी बीबीसीला सांगितलं की, नदीकाठच्या स्थानिक लोकसंख्येच्या शेकडो एकर जमिनीवर जंगल आहे. काही ठिकाणांहून बांधकाम साहित्य आणलं जातं, पण जिर्गाच्या निर्णयानुसार ज्या व्यक्तीकडे खनिज विभागाची परवानगी असेल त्यांनाच काम करण्याची परवानगी दिली जाईल.

ते म्हणाले की, भाडे करारानुसार काम करणारा व्यक्ती सरकारला कर आणि स्थानिक लोकांच्या मालकी हक्कापोटी देय असलेली रक्कम देईल. पण जिरगाने नदीतून बेकायदेशीरपणे नफा मिळवणाऱ्यांशी गुप्त करार केल्याचा आरोप फेटाळून लावला.

या बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या लोकांची माहिती कोणत्याही सरकारी संस्थेकडे नाही हे विशेष.

पाण्यामध्ये सोनं येतं कुठून?

पेशावर विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. असगर अली यांच्या देखरेखीखाली, 2016 मध्ये पदवीधर विद्यार्थ्यांनी स्वात आणि काबुल नदीत आढळणाऱ्या सोन्यावर संशोधन केलं होतं.

त्यांनी माहिती देताना सांगितलं की, सिंधू नदी आणि काबूल नदीच्या संगमावर भू-भौतिकीय सर्वेक्षण करण्यात आलं. त्यावेळी नदीच्या काठावर तीन मीटर खोलीवर सोन्याच्या सध्याच्या प्रमाणाचे विविध स्तरांवर मूल्यमापन केले. त्यावेळी या स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं असल्याचं आढळून आलं. जसंजसं आपण खोलात जातो तसं सोन्याचं प्रमाण वाढतं.

पाण्यातून सोने काढण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत मात्र त्या दृष्टीने प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राध्यापक डॉ. असगर अली सांगतात की, तीन खडकांपैकी एक असलेला एगसन खडक नदीत वाहून जातो. याला कारण आहे ते विविध प्रकारचे धातू लाव्हारसाच्या रुपात बाहेर आल्यानंतर हिमनदीमुळे पर्वत आणि जमिनीचे क्षरण होते.

ते म्हणाले की, सोनं हे जड धातूंपैकी एक आहे आणि ते पृथ्वीच्या तळाशी स्थिरावतं.

त्यांच्या मते, हे सोन्याचे कण पाण्यात तीन ठिकाणी साचण्याची शक्यता असते. एक म्हणजे जिथे पाण्याची दिशा बदलते, दुसरं म्हणजे धरणात आणि तिसरं म्हणजे दोन नद्यांच्या संगमावर.

ते म्हणाले की, काबूल आणि सिंधू नद्यांचा अटक येथे होणारा संगम आणि निजामपूर येथील सिंधू नदी ही अशी ठिकाणं आहेत जिथे केवळ सोनंच नाही तर इतर मौल्यवान धातू देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

हे सोनं पाण्यातून कसं काढतात?

डॉ. असगर अली सांगतात की, काबूल नदी आणि सिंधू नदीतून बांधकामासाठी जी वाळू आणि खडी काढली जाते त्यात सोन्यासह विविध मौल्यवान धातूंचे कण असतात. पण ते पाण्यापासून वेगळे करण्याची कोणतीही पद्धत माहिती नसल्यामुळे ते वाया जातात.

त्यांच्या मते, निजामपूर आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा करण्यात येणारी वाळू प्रत्यक्षात सिंधू आणि काबूल नद्यांमधून काढलेली असते.

अख्तर जान सांगतात की, पाण्यातील सोन्याचे कण वेगळे करण्यासाठी नदीच्या काठावर मोठ्या मजबूत लोखंडी चाळण्या बसवण्यात आल्या आहेत. या चाळण्यांवर यंत्रांच्या साहाय्याने नदीतील वाळू, माती आणि दगड टाकले जातात.

या प्रक्रियेमुळे मोठमोठे दगड चाळणीच्या वरच्या बाजूला पडतात तर वाळूचे छोटे कण चाळणीच्या तळाशी असलेल्या कार्पेटमध्ये पडतात आणि त्यात अडकतात.

ही प्रक्रिया अनेक तास सुरू राहिल्यानंतर, कार्पेट गुंडाळून एका मोठ्या लोखंडी भांड्यात रिकामे केले जाते. पुढे पाण्याच्या मदतीने सोन्याचे कण आणि वाळू वेगळी केली जाते.

त्यांच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या टप्प्यात त्यात पारा (धातू) टाकल्यानंतर सर्व सोन्याचे कण त्याला चिकटतात. अशाप्रकारे सोनं मिळवलं जातं. पुढे हे सोनं आगीत वितळवून त्यातून मौल्यवान असं सोनं बाहेर काढलं जातं.

डॉ. असगर अली म्हणाले की, जगातील दोन ठिकाणी पाण्यातून सोनं बाहेर काढलं जातं. एक म्हणजे आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहर आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य.

ते म्हणाले की, खैबर पख्तुनख्वामधील विविध ठिकाणच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा आहे, मात्र याबाबत आणखीन संशोधनाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे.

त्यांच्या मते, अवैध उत्खनन रोखल्यास याचा केवळ सरकारलाच फायदा होणार नाही तर लोकांना मोठ्या प्रमाणात कमाईच्या संधी उपलब्ध होतील. शेवटी नदीत सापडलेलं सोनं स्थानिक बाजारपेठेत पाठवलं जातं. या सोन्याच्या गुणवत्तेबाबत डॉ. असगर अली सांगतात की, हे अतिशय उच्च दर्जाचं सोनं असतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)