गटारांमधून 'सोनं' वाहणाऱ्या उत्तर भारतातल्या शहराची कथा

    • Author, रश्मा झुबैरी
    • Role, लेखिका

फिरोजाबाद ही भारताची काचेची राजधानी आहे. पण हे शहर जास्त प्रसिद्ध आहे ते, काचेच्या पारंपरिक बांगड्यांच्या निर्मितीसाठी. तसंच ते आणखी एका खजिन्यासाठीही ओळखलं जातं. पण हा खजिना लपलेला असून तो मिळवणंही अत्यंत कठिण आहे.

"त्यानं साडी जाळली आणि त्यातून निघालेल्या शुद्ध चांदीचा एक तुकडा आम्हाला दिला," असं माझ्या आईनं आम्हाला सांगितलं होतं.

तिच्या फिरोजाबाद येथील घरी 30 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचं ते वर्णन होतं. आईनं सांगितलेल्या गोष्टीतला माणूस म्हणजे एखादा जादूगार नव्हता, तर तो एक कारागिर होता. आईच्या या शहरात असे अनेक कलाकार होते, जे घरोघरी जाऊन जुन्या साड्या गोळ्या करायचे. त्या साड्यांमधून मौल्यवान धातू ते काढायचे.

1990 पर्यंत साड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शुद्ध सोनं आणि चांदी याचाही वापर केला जात होता. मला आठवतं की, मी माझ्या आईच्या कपाटामध्ये खजिन्यासारख्या चमकणाऱ्या तिच्या कपड्यांचा शोध घेत असायचे.

पण आईनं मला सांगितलं की, हे कारागिर कपड्यांपेक्षाही अधिक मौल्यवान वस्तुंच्या शोधात होते. जणू ते कचऱ्याच्या शोधात होते आणि हा कचरा या शहरासाठी खास होता.

हे समजल्यानंतर टाकाऊ गोष्टीतून किंवा कचऱ्यातून मौल्यवान असं काहीतरी मिळवण्याचं हे गूढ अधिक जाणून घेण्यासाठी मी फिरोजाबादकडं निघाले.

जवळच (पश्चिमेला 45 किमी अंतरावर) असलेल्या ताज महालाच्या सावलीखाली हे शहर झाकोळलं गेलंय.

तसंच हे शहर आता येथील मौल्यवान धातूसाठी नव्हे तर भारताची काचेच्या बांगड्यांची राजधानी म्हणून अधिक ओळखलं जातं.

पण मला जे आढळलं त्यानुसार, काही मेहनती कारागिरांसाठी हे शहर म्हणजे सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नव्हतं. हे असं ठिकाण होतं, जिथं एकेकाळी नाल्यांमधून मौल्यवान धातू म्हणजे सोनं वाहत असायचं.

दिल्लीचा सुल्तान फिरोज शाह तुघलक यानं 1354 मध्ये महालाचं शहर म्हणून फिरोजाबादची स्थापना केली होती.

इतिहासकार शम्स-ए-सिराज यांच्या लेखनानुसार फिरोजाबाद हे शाहजहानबाद (सध्याचं जुनं दिल्ली जे ताज महालाची निर्मिती करणाऱ्या राज्यकर्त्यानेच स्थापन केलं होतं) या भींतींचं कुंपन असलेल्या शहराच्या पेक्षा दुप्पट मोठं होतं.

इतिहासकार आणि 'द फॉरगोटन सिटीज ऑफ दिल्ली'चे लेखिका राणा सफ्वी यांच्या मते, "नंतरच्या काळात याचा वापर मुघल काळातील किल्ल्यांच्या बांधकांसाठी मॉडेल किंवा प्रोटोटाईपसारखा करण्यात आला होता.

कारण यात प्रथमच दिवाण-ए-आम (सामान्य लोकांसाठीचं ठिकाण) आणि दिवाण-ए-खास (विशिष्ट लोकांसाठीचं ठिकाण) या कल्पना साकारण्यात आलेल्या होत्या."

आता जुन्या शहराच्या अगदी मोजक्या खुणा इथं शिल्लक राहिल्या असल्याचं सफ्वी स्पष्ट करतात.

फिरोजाबादचं आज स्वतःचं असं एक भव्य अस्तित्व असल्याचं ते सांगतात. मी शहरात फिरत होते तेव्हा जवळपास प्रत्येक गल्लीमध्ये सूर्यप्रकाशातच चमकणाऱ्या विविध रंगांच्या काचेच्या बांगड्यांनी भरलेल्या ट्रक आणि हातगाड्या मला दिसत होत्या.

एखादं सुंदर चित्र रेखाटल्यासारखं ते दिसत होतं. बांगडीला भारतीय परंपरेत मोलाचं स्थान आहे. नवविवाहिता आणि महिलांसाठी ते समृद्धीचं, सौभाग्याचं आणि चांगल्या भविष्याचं प्रतिक मानलं जातं.

प्रत्येक हातात मोठ्या संख्येनं या बांगड्या घातल्या जातात. फिरोजाबादमध्ये सध्या बांगड्यांचे अंदाजे 150 कारखाने आहेत. त्यामुळं या शहराला बांगड्यांचं शहर म्हणून नाव मिळालं आहे.

या कलेचा इतिहास जवळपास 200 वर्षं मागं जाणारा आहे. एका सिद्धांतानुसार फिरोज शाहच्या दरबारातील उपस्थितांमध्ये काही राजस्थानातून आलेले प्रवासी होते.

दागिन्यांच्या या प्रकाराचे म्हणजे बांगड्या तयार करणारे कुशल कारागिर होते. त्यांनी ही कला स्थानिक कलाकारांना शिकवली.

त्यानंतर जसजसा काळ पुढं गेला तसा हा काचेचा व्यवसाय वाढत गेला आणि काचेच्या बाटल्या आणि झुंबरांच्या निर्मितीपर्यंत तो पसरला.

नंतरच्या राजेशाहीच्या काळामध्ये दरबारांमध्ये आणि गर्भश्रीमंतांकडून याला मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली होती.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर विदेशी आयातीवर बंदी लादण्यात आली होती. त्यामुळं फिरोजाबादमधील काच व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर वृद्धी झाल्याचं पाहायला मिळालं.

1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे शहर देशातील काचेचा आणि बांगड्यांचा सर्वाधिक पुरवठा करणारं शहर ठरलं.

आज देशातील काचेच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 70% उत्पादन याठिकाणी होतं.

त्यामुळंच माझ्यासाठी ही आश्चर्याची बाब होती की, शहरात अनेकदा फिरल्यानंतर आणि स्थानिक लोकांसह काच व्यवसायाशी संबंधित रहिवाशांशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, फिरोजाबादमध्ये आणखी एक मौल्यवान गोष्ट आहे. सर्वांत मौल्यवान असली तरी तिचा इथं बांगड्यांच्या नंतर क्रमांक लागतो, ते म्हणजे सोनं.

पारंपरिक पद्धतीनं शहरात तयार होणाऱ्या काचेच्या बांगड्या या शुद्ध सोन्याच्या पॉलिशनं सजवलेल्या असायच्या. याचा अर्थ पॉलिशच्या या प्रक्रियेदरम्यान अनेक गोष्टींचा संपर्क या मौल्यवान धातूबरोबर येत होता.

त्यात पॉलिश भरलेल्या बाटल्या, डबे, बफिंगसाठी वापरलं जाणारं कापड, बांगड्या ठेवण्याचे बास्केट आणि अगदी तुटलेल्या बांगड्यांचे तुकडेदेखील.

बांगड्यांचे कारखाने आणि छोट्या वर्कशॉपसह कारागिरांच्या घरांतून निघणारा हा कचरा अनेकदा शहराच्या गटारांमध्ये फेकला जायचा. पण त्यातूनदेखील सोनं मिळवणं शक्य होतं. हा कचरा गोळा करून स्वच्छ केल्यानंतर त्यातून सोनं मिळवण्यासाठी प्रक्रिया केली जायची.

"त्यांच्यासाठी नक्कीच या सगळ्या गोष्टी केवळ कचरा होत्या. पण ज्यांना याबाबत माहिती आहे, त्यांना या कचऱ्याचं खरं मूल्य माहिती होतं," असं फिरोजाबादमध्ये दागिन्यांचं दुकान असलेले मोहम्मद सुल्तान म्हणाले.

सुल्तान यांनी स्वतः सुमारे 25 वर्षांपेक्षा अधिक काळ अशाप्रकारे सोनं किंवा सोन्याचा अर्क काढण्याचं काम केलंय.

आजच्या काळात अशाप्रकारे टाकाऊ गोष्टींमधून मौल्यवान धातू काढण्याचं तंत्र हे काही मोजक्या कारागिरांना अवगत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे तंत्रदेखील वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळं असतं, असंही ते म्हणाले.

सुल्तान यांनी आम्हाला त्याबाबत माहिती दिली. "सोन्याचा अर्क मिळवण्यासाठी पॉलिश भरलेल्या बाटल्या काही तासांसाठी थिनर आणि टर्पेंटाईनच्या बकेटमध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर सोन्याचे अवशेष किंवा अर्क हा थिनरच्या वरच्या भागावर तरंगत असतो.

हा अर्क कपड्याच्या सहाय्यानं पुसून घेतला जातो. त्यानंतर का कपडा वाळवला जातो आणि नंतर तो जाळला जातो. त्यानंतर ही राख वाळूच्या एका जाड थरावर ठेवून त्याला गरम केलं जातं. त्यात काही रसायनं टाकली जातात. जोपर्यंत या राखेचं पाणी होत नाही तोपर्यंत ते गरम केलं जातं. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याची काच तयार होते आणि त्यातून सोनं बाजुला होतं, ते वाळूच्या तळाशी जमा झालेलं असतं."

"यासाठी म्हणजे ही कला किंवा तंत्र शिकण्यासाठी आणि त्यात पारंगत होण्यासाठी खूप संयम लागतो. आठवडाभरात शिकता येईल अशी ही गोष्ट नाही," असंही सुल्तान म्हणाले.

काही वर्षांपूर्वी ते स्वतः जेव्हा अशाप्रकारे सोनं काढायचे त्याच दिवसांची आठवण त्यांना हे सांगताना झाली.

यातून मिळालेलं सोनं सोनारांना विक्री केलं जात होतं. गेल्या अनेक वर्षांमध्ये या शहरामध्ये असं काम करणारे अत्यंत विनम्र आणि चांगली पार्श्वभूमी असलेले कारागिर पाहायला मिळाले आहेत.

अत्यंत कठोर मेहनत, संयम आणि काहीशी नशिबाची साथ मिळवत त्यांनी स्वतःचं नशीब पालटलंय. "या कामानं काहींना कोट्यधीश बनवलं," असं मोहम्मद कासीम शफी म्हणाले. त्यांनीदेखील फिरोजाबादमध्ये अशाप्रकारे सोनं काढण्याचं काम केलं आहे.

या कामाच्या इतिहासाबाबत काही लिखित अशा नोंदी नाहीत. स्थानिक लोकांनी त्यांच्या आई वडिलांकडून किंवा त्यांच्या आजोबा आजींकडून हे काम शिकलं आणि गेल्या 80 किंवा अधिक वर्षांपासून ते असंच याठिकाणी सुरुय.

गेल्या काही काळात सोन्याचे दर प्रचंड वेगानं वाढले असले तरी आता मोठ्या प्रमाणावर सोन्याऐवजी रसायनांचा वापर करून बांगड्यांवर पॉलिश केलं जातं. त्यामुळं ही कला किंवा तंत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जात असलं तरी ते आता हळू-हळू लुप्त होत असल्याचंही चित्र आहे.

"या माध्यमातून सोनं काढणं हे अत्यंत कौशल्याचं, सरावाचं आणि बारीक काम आहे. सजावटीसाठी सोन्याऐवजी इतर पर्यांयाचा वापर सुरू होण्यापूर्वीही अगदी मोजक्या लोकांना याबाबत माहिती होती.

पण जेव्हा बांगड्यांना सोन्याऐवजी रसायनांचा वापर करून पॉलिश करायला सुरुवात झाली, तेव्हा तर या कलेला जणू ग्रहणच लागलं," असं शफी म्हणाले.

या व्यवसायामध्ये आता सोन्याचा वापर हा अत्यंत कमी झाला असला तरी काही लोक अजूनही बांगड्यांमध्ये त्याचा वापर करतात. फिरोजाबादमधील बाजारपेठेत फिरत असताना मी अशाच काही कारखान्यांसमोरून गेले, त्यावेळी मला कारागिर बांगड्यांवर सोन्याचं पॉलिश वापरून सजावट करत असल्याचं पाहायला मिळालं.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मी परतण्यासाठी म्हणून कारमध्ये बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की, या शहराबाबतचं एक गूढ समजल्यानंतर आता मला शहर अगदीच वेगळं वाटू लागलं आहे.

कचरा किंवा फेकून देण्याच्या म्हणजे टाकाऊ वस्तूला नवं रुप देऊन वापरण्याच्या माझ्या आईच्या सवयींच्या आठवणींनाही आता मी नव्या दृष्टीकोनातून पाहू लागले होते.

त्याचं कारण म्हणजे फिरोजाबादमधील खजिन्याचा शोध घेणाऱ्या कारागिरांच्या मी ऐकलेल्या गोष्टी. त्या सर्वांनी मिळून शहराबाबत एक अशी कथा गुंफलीये ज्यामुळं माझा शहराबाबतचा दृष्टीकोनच बदलला. कारण आधी इतिहासातील एका लहानशा उल्लेखानं त्याची ओळख मला झालेली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)