परवीन शेख : 'हमास'शी संबंधित पोस्ट लाईक केल्याचा आरोप, मुख्याध्यापिका बडतर्फ, काय आहे प्रकरण?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"शाळेला 12 वर्षे प्रामाणिक सेवा देऊनही शाळा व्यवस्थापनानं मला साथ दिली नाही. सोशल मीडिया आणि एका वेबसाईटवरील खोट्या बातम्यांमुळे मला कामावरून काढून टाकणं अन्यायकारक आहे. राजकीय दबावापोटी शाळेनं ही कारवाई केली असून हे माझ्यासाठी धक्कादायक आहे."

मुंबईतील विद्याविहार इथल्या सोमय्या शाळेनं वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून हमास संघटनेशी संबंधित पोस्ट लाईक केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापक पदावरून काढून टाकलेल्या परवीन शेख ‘बीबीसी मराठी’सोबत बोलत होत्या.

परवीन शेख सोमय्या शाळेत गेल्या 12 वर्षांपासून काम करतात. त्यांची कामगिरी बघून त्यांना सात वर्षांपूर्वीच मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. तेव्हापासून त्या या शाळेच्या मुख्याध्यापक पदावर कार्यरत होत्या.

पण सोशल मीडियावर पोस्ट लाईक केल्याच्या आरोपावरून त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. शाळेनं याबद्दल एक पत्रक काढून माहिती दिलेली आहे.

सोमय्या शाळेनं काय म्हटलं?

या प्रकरणी सोमय्या शाळेनं एक पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्रकात म्हटलंय की, ‘परवीन शेख यांच्या वैयक्तिक सोशल मीडियावरील पोस्ट, कमेंट्स या आमच्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन करतो, पण ते स्वातंत्र्य इतरांचा अपमान होणार नाही अशारितीनं जबाबदारीने वापरलं गेलं पाहिजे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यवस्थापनानं परवीन शेख यांना मुख्याध्यापक पदावरून काढून टाकलं आहे.'

याच पत्रकात पुढे म्हटलंय की, 'आम्ही आमच्या मूल्यांसोबत तडजोड करू शकत नाही. अखंडता आणि सर्वसमावेशक वातावरणात आमच्या विद्यार्थ्यांचं पालनपोषण होणं महत्वाचं आहे. त्यामुळे परवीन शेख यांना आम्ही पदावरून हटवलं आहे.’

‘कारवाई राजकीय दबावापोटी’

12 वर्षांच्या सेवेनंतर आपल्याला पदावरून हटवल्याची माहिती मिळाल्यानंतर परवीन शेख यांना धक्का बसलाय.

परवीन शेख बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, ‘’सोमय्या शाळेनं मला पदावरून हटवल्याची नोटीस दिलेली नाही. ही नोटीस मिळण्यापूर्वीच मला पदावरून हटवल्याची बातमी सोशल मीडियावर वाचून मला धक्का बसला. ही नोटीस अत्यंत बेकायदेशीर आहे."

त्यांनी पुढे म्हटलं की, "OpIndia वेबसाईट आणि त्याच्या पत्रकार नुपूर शर्मा यांनी माझी बदनामी करून खोटं वृत्त माझ्याविरोधात पसरवलं. त्यावर शाळा मला कामावरून कसं काय काढू शकते? माझ्या कारकीर्दीत शाळेची इतकी चांगली प्रगती झाली असताना अशी नोटीस देऊन मला कामावरून काढणं हे अन्यायकारक आहे. हे माझ्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे."

तसंच, "12 वर्षे सेवा देऊनही शाळा व्यवस्थापनं मला पाठिंबा न देता सोशल मीडियावरील खोट्या अफवांना बळी पडले. राजकीय दबावापोटी ही कारवाई केली असून मला भारतीय संविधानावर पूर्णपणे विश्वास आहे. या कारवाईविरोधात मी कोर्टात जाण्याचा विचार करत आहे," असंही परवीन शेख म्हणाल्या.

नेमकं प्रकरण काय?

पण परवीन शेख यांना कामावरून काढून टाकण्यापर्यंत हे प्रकरण कसं पोहोचलं? परवीन शेख यांनी एका वेबसाईटचं नाव घेतलं, त्यांनी नेमकं काय वृत्त दिलं होतं?

परवीन शेख एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय होत्या. यावर त्या त्यांच्या करिअरबद्दल पोस्ट करायच्या.

पण त्यांनी इस्त्रायल-हमास संघर्षासंदर्भात हमासबद्दल सहानुभूती दर्शवणारे काही ट्वीट, हिंदूविरोधी ट्वीट, पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या पोस्ट, उमर खलिदबद्दलच्या पोस्टला लाईक केल्याचं वृत्त OpIndia या वेबसाईटनं 24 एप्रिलला दिलं होतं.

यामध्ये त्यांनी हमासने शारीरिक अत्याचाराच्या एका प्रकरणात दिलेलं स्पष्टीकरण लाईक केल्याचा आरोपही या वृत्तातून करण्यात आला होता.

या वृत्तानंतर 26 एप्रिलला शाळा प्रशासनानं परवीन शेख यांना बोलावून घेतलं आणि राजीनामा द्यायला सांगितला होता.

पण मला भारताच्या राज्यघटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. मला राजीनामा द्यायला लावणं हे माझ्या मुलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे, असं म्हणत त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता.

या न्यूज वेबसाईटबद्दल मला काहीही माहिती नव्हतं, असंही परवीन सांगतात.

परवीन शेख प्रश्न उपस्थित करतात की, "शाळा व्यवस्थापनानं मला विचारणा केल्यानंतर याबद्दल माहिती झालं. त्यांना एका शाळेच्या मुख्याध्यापक पदावर असलेल्या व्यक्तीमध्ये इतका रस का?"

दरम्यान, सोमय्या शाळा व्यवस्थापनानं 4 मे 2024 रोजी परवीन शेख यांना लेखी उत्तर मागितलं होतं. त्यानंतर तीनच दिवसांत त्यांना पदावरून हटवण्याल्याची माहिती सोमय्या शाळेनं दिली आहे.

न्यूज वेबसाईटच्या संपादकाचं म्हणणं काय आहे?

ज्या वेबसाईटनं वृत्त दिलं, त्याच्या संपादिका नुपूर शर्मा यांनी खोट्या बातम्या लावल्यामुळे हे झालं, असा आरोप परवीन शेख यांनी केला.

त्यानंतर नुपूर शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलंय, "होय, ती बातमी देणारी मीच आहे. तुमची दहशतवादी समर्थक मतं प्रकाशित केल्याबद्दल माझ्याविरोधात खटला दाखल करा. मी तुम्हाला कोर्टात भेटेन."

सोशल मीडियावर पोस्ट लाईक केल्यानं कामावरून काढून टाकता येतं का?

सोमय्या शाळेनं त्यांच्या पत्रकात हे आमच्या मूल्यांच्या विरोधात आहे असं म्हटलं.

पण सोशल मीडियावर मत मांडण्याबद्दल, कुठलीही राजकीय प्रतिक्रिया देणं याबद्दल शाळेचं कुठलंही धोरण नव्हतं, असं परवीन सांगतात.

मग अशा प्रकरणात सोशल मीडियावर पोस्ट लाईक केल्यावरून पदावरून हटवता येतं का? सोशल मीडियावरील पोस्टबद्दल असा कुठला कायदा आहे का?

याबद्दल अॅड. महेंद्र लिमये सांगतात, "सध्या तरी सोशल मीडियासाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नाही."

महेंद्र लिमये बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले की, “सुरुवातीला माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत ‘66 अ’ कलमाच्या अंतर्गत सोशल मीडियावरील पोस्ट लाईक किंवा कमेंट केल्यावर कारवाई करता येत होती. पण, 2015 नंतर सुप्रीम कोर्टानं हे सेक्शन रद्द केलं. त्यामुळे सोशल मीडियावर लाईक, कमेंट केली तर त्यानुसार कारवाई होत नाही.

"फक्त सोशल मीडियावरील पोस्ट लाईक केल्याच्या आधारावर शाळेनं कारवाई केली असेल तर परवीन शेख कोर्टात दाद मागू शकतात. पण, शाळेनं नोकरीवरून हटवताना आणखी कोणती कारणं दिली हे सुद्धा बघायला हवं. यात शाळेनं मुल्यांची पायमल्ली झाल्याचं म्हटलं असेल तर शाळेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आली का हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला आहे."

कोण आहेत परवीन शेख?

परवीन या शाळेत गेल्या 12 वर्षांपासून काम करत होत्या. तसेच त्या सात वर्षांपासून या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या.

त्यांच्या कार्यकाळात शाळेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दहावीचा टॉपर विद्यार्थी देखील सोमय्या शाळेचा आहे.

शिवाय, त्यांच्या या कामासाठी, नेतृत्वासाठी त्यांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्याचं त्या सांगतात.

शाळेच्या वेबसाईटनं परवीन शेख यांचं प्रोफाईल काढून टाकलं आहे. याआधी त्यांचं प्रोफाईल या वेबसाईटवर होतं, त्यानुसार परवीन यांनी ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये डिप्लोमा केला असून शैक्षणिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्या B. Ed. आणि M. Ed. झाल्या असून NET देखील उत्तीर्ण आहेत.

याआधी अशा घटना घडल्या होत्या का?

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईक यावरून प्रश्न उपस्थित करून राजकीय वक्तव्य करणाऱ्या सात सरकारी शिक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं.

2019 ला ही घटना घडली असून काही शिक्षकांनी फेसबुकवरून, तर काहींनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांचं मत मांडलं होतं. पण, त्यांनी त्यांच्या सर्विस ऑर्डरचं उल्लंघन केलं असं सांगून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यावेळी India Express ने याबद्दल वृत्त दिलं होतं.

गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आल्यानं सिद्धरमय्या यांच्यावर 'रेवड्यांवरून' टीका करणाऱ्या सरकारी शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आलं होतं.

'सिद्धरमय्या सरकारनं रेवड्या वाटून राज्यातील कर्जाचा बोजा कसा वाढवला' अशी पोस्ट चित्रदुर्गा जिल्ह्यातील शंतनूमूर्ती यांनी केली होती. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. याबद्दल त्यावेळी हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिलं होतं.